Monday, 1 December 2014

देसी ‘स्टीव्ह’ची गोष्ट - योगेश शेजवलकर

देसी स्टीव्हची गोष्ट


कणखर देशा... दगडांच्या देशा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातल्या माणसांची हृदयेही पाषाणाची असावीत अशी शंका येणारी घटना त्या काळोख्या रात्री घडली. एका कॉलेजकुमारीने नको त्या उद्योगातून जन्माला आलेल्या अवघ्या तीन दिवसांच्या स्टीव्हला कचराकुंडीत फेकून दिलं... आणि ही माता गडद अंधारात कायमची दिसेनाशी झाली.

योगेश शेजवलकर
दुसऱ्या दिवशी सकाळी नेमाने फेरफटका मारायला निघालेल्या एका आजीआजोबांना स्टीव्हच्या रडण्याचा आवाज ऐकू गेला आणि मग पोलिसांच्या उर्मट प्रश्नांना उत्तरे द्यायची मानसिक तयारी करून त्यांनी चौकीत फोन लावला. मग पोलीस आले.. कचऱ्याच्या ढिगातून स्टीव्हला बाहेर काढलं... पंचनामा झाला आणि मग स्टीव्हची वैद्यकीय तपासणी करून त्याला एका सरकारी इस्पितळात ठेवण्यात आलं.

इतके ऊन-पावसाळे पाहूनही अशा पद्धतीने लहान मूल सापडल्याचा अनुभव त्या आजी-आजोबांसाठी नवीन होता.. हेलावून टाकणारा होता. त्यामुळे त्या दोघांनी शक्य होईल तेवढं स्टीव्हसाठी करायचं ठरवलं (अर्थात आपल्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांना काहीही न सांगता). स्टीव्हला ज्या अनाथाश्रमात ठेवलं होतं तिकडे ते दोघे गेले. नुकताच त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस झाला होता त्यामुळे त्यांना तसंही काहीतरी सोशल कॉजसाठी करायचं होतचं त्यामुळे त्यांनी त्या अनाथाश्रमाला भरपूर देणगी दिली. ती देताना स्टीव्हला चांगल्या घरात दत्तक देण्याची अट घातली आणि ती पूर्ण होईपर्येत देणगीतली काही रक्कम स्वत;जवळ राखून ठेवली. (बहुतेक त्यामुळेच) खूप वर्ष मूल होत नसलेल्या सुसंस्कृत कुटुंबात स्टीव्हला दत्तक देण्यात आलं. त्या आजी-आजोबांचे कष्ट सार्थकी लागले... त्या नव्या घरात आनंदाला उधाण आलं... स्टीव्हचं कोडकौतुक सुरु झालं. अक्षरशः दृष्ट लागावी अशी कलाटणी स्टीव्हच्या आयुष्याला मिळाली.

मग काय? एक दिवस दृष्ट लागलीच. दत्तकविधीनंतर अवघ्या दोन वर्षातच स्टीव्हच्या या नव्या मातेला दिवस राहिले आणि मग (सर्व नातेवाईक, मित्रमंडळींच्या मते) त्या घराला AUTHORIZED वारस मिळाला आणि स्टीव्ह पायरेटेड मुलगाकम घरगडीझाला.

तरीही लोकलज्जेखातर स्टीव्हला शाळेत घालणे भाग होते म्हणून मग स्टीव्हची बोळवण एका साध्या शाळेत करण्यात आली. अर्थात त्यानी स्टीव्हची बुद्धीमत्ता लपून राहणार नव्हती. आपल्या तल्लख बुद्धीच्या तडाख्याने स्टीव्हने (नोकरी मिळत नाही म्हणून बी.एड. केलेल्या) शिक्षकांना लोळवायला सुरुवात केली आणि त्यांचा राग ओढवून घेतला. मग त्याच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांना निरर्थक ठरवून त्याला वाह्यात ठरवण्याचा चंग त्याच्या शिक्षकांनी बांधला... कायम त्याला वर्गाबाहेर उभं केलं जाऊ लागलं... स्टीव्ह चौथीत असताना त्यांनी सातवी, आठवीच्या पुस्तकातील प्रमेय वापरून गणिते सोडवली म्हणून त्याचा पेपर भर वर्गात फाडून टाकण्यात आला आणि पालकसभेतून स्टीव्हला मुलांना बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरवण्यात आलं.

या प्रगती(??)मुळे स्टीव्ह घरात आणखीनच नावडता बनला, सणसमारंभ, घरगुती कार्यक्रम, गेट-टुगेदर अशा कार्येक्र्मातून त्याला बॅनकरण्यात आलं. त्यामुळे मग सगळं कुटुंब एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर जेवण मिळवण्यासाठी स्टीव्हला पाच-सहा कि.मी. पायपीट करून एखाद्या देवी-देवतांच्या संस्थानाच्या/प्रतिष्ठाण (??) च्या महाप्रसादावर भागवावं लागायचं.

तरीही स्टीव्ह लढत राहिला.. स्वत:च्या आकलनानुसार, उपलब्ध स्त्रोतातून प्रयत्न करत राहिला... ज्ञान मिळवीत राहिला. बारावीनंतर इंजिनिअरिंगला जावे अशी त्याची फार इच्छा होती पण त्याच्या माता-पित्यानी त्याच्या हातावर कॉमर्स कॉलेजची अॅडमिशन टेकवली. स्टीव्ह वैतागला.. कॉलेजला जाईनासा झाला... नाक्यावरच्या कट्ट्यावर बसून कटिंग चहा आणि क्रीमरोल खात तो आपली चित्रविचित्र गॅजेटस् बनवू लागला. एक दिवस त्याने स्वतःची कंपनी उघडण्याचा निर्णय घेतला. भांडवल मिळवण्यासाठी अनेक बँकांचे त्याने खेटे घातले पण प्रत्येक ठिकाणाहून त्याला धक्के मारून बाहेर घालण्यात आले.

स्टीव्ह रडकुंडीला आला. आत्महत्या करावी या विचाराने एका तळ्यापाशी गेला. तळ्यातल्या गणपतीला वंदन करावे आणि आयुष्य संपवावे हा त्याचा निर्णय पक्का झाला आणि त्यानी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. तिथल्या प्रसन्न वातावरणामुळे स्टीव्हच्या मनाला जरा शांतता लाभली आणि अचानक (बहुतेक गणरायाच्या कृपेने) त्याला एक अद्वितीय कल्पना सुचली. आत्महत्येचा बेत रद्द करून स्टीव्ह झपाटून कामाला लागला आणि त्यानंतरच्या गणेशोत्सवात स्टीव्हने एका मंडळाच्या वतीने टच आशीर्वादगणपती लॉन्च केला. गणरायाच्या चरणांना भक्तीभावाने टचकेल्यावर तथास्तुअसं आशीर्वाद मांडवभर घुमायचा आणि चरणस्पर्श करणारा भक्त आणि त्याला आशीर्वाद देणारा बाप्पा अशी इमेजतिथल्या स्क्रीनवर दिसायची (जास्तीचे पैसे देउन त्या दृश्याची प्रिंटपण भक्ताला मिळायची). टच आशीर्वादमूर्तीनी धमाल उडवून दिली... मंडळानी तुफान पैसा कमावला आणि मंडळाचा भाईस्टीव्हच्या धंद्याचाफायनान्सर कम पार्टनर झाला.

भाईला त्याच्या गावातून निवडणूक जिंकायची होती त्यामुळे सर्वप्रथम स्टीव्हने आपले लक्ष ग्रामीण भागावर केंद्रित केले आणि निरक्षर शेतकऱ्यांसाठी आणि साखरसम्राटांसाठी अफलातून गॅजेटस् बनवली. आता शेतकरी झाडाच्या सावलीत बसून टच पॅडवर नुसता टचकरून खुरपणी, नांगरणी, फवारणी करू लागला. एका टचनी आपला माल कारखान्याच्या गोडाऊनपर्यंत पोचवू लागला. साखरसम्राटांना एक टचकरून आपला काळा पैसा एका खोट्या अकाउंटमधून दुसऱ्या खोट्या अकाउंटमध्ये दडवता येऊ लागला. सगळं मस्त सेट झालं... धंदा वाढला... भाईदणक्यात निवडणूक जिंकला.

पण आता त्याला स्टीव्हला नफ्यात हिस्सा देणं जीवावर आलं त्यामुळे एक दिवस त्याने स्टीव्हसमोर घोडा ठेवला. कंपनीतून आत्ताच्या आता कल्टी मारली तर जीव न घेण्याची हमी त्याने स्टीव्हला दिली. बिचाऱ्या स्टीव्हला स्वत:च सुरु केलेल्या कंपनीतून बाहेर पडावं लागलं. तो अक्षरशः रस्त्यावर आला. त्यात त्याचं लग्नाचं वयही उलटून चालले होते. आता मंत्री झालेल्या भाईच्या धाकाने स्टीव्हला कोणी भांडवल देईना आणि पक्की नोकरी व धंदा नसल्याने त्याला पोरगीही मिळेना. शेवटी त्याच्या आईवडिलांनी त्याचा बँक बॅलन्स हातात घेतला आणि उलटा मुलीला हुंडा देऊन शेजारच्या राज्यातली एक घोडनवरी स्टीव्हच्या गळ्यात मारली (आणि मधल्यामध्ये आजवर स्टीव्हच्या पालनपोषणासाठी(???) केलेले पैसेही वळते केले).
लग्नाच्या निमित्ताने शेजारच्या राज्यात गेलेल्या स्टीव्हला ते झिरो लोडशेडिंगअसणारे राज्य फार आवडले. तसेही दगडांच्या देशातभाऊबंदकीची भांडणे सोडून बाकी काही होत नव्हतेच आणि भाईंच्यादबावामुळे काहीही करताही येणार नव्हते. त्यामुळे काही वर्ष तरी त्या राज्यात स्थायिक होण्याचा निर्णय त्याने घेतला. मग एकदिवस नव्या कंपनीच्या पायाभरणीसाठी तिथल्या जनता दरबारात त्याने राज्याच्या दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी अगोदरच स्टीव्हबद्दलची सर्व माहिती मिळवली होती. त्यामुळे त्याला पाहताच मुख्यमंत्र्यांनी केम छो स्टीव्हभाई?’ असे म्हणत त्याला मिठीच मारली. आयुष्यात स्टीव्हचा इतका मोठा बहुमान पहिल्यांदाच झाला आणि पिकतं तिथे विकत नाहीह्याची त्याला प्रचीतीही आली’... आपली कोणालातरी किंमत आहे ह्या भावनेने स्टीव्ह गहिवरला.

दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांनी स्टीव्हला पूर्ण सपोर्ट दिला आणि पुढच्या पाच वर्षात स्टीव्हची कंपनी नावारुपास आली आणि असंख्य लोकांना रोजगार मिळाला. अनेक उत्तमोत्तम प्रकल्पांमुळे त्या राज्याचे नाव जगाच्या नकाशावर आले.. मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची बळकट केली आणि स्टीव्ह विकासाचे रोल मॉडेलझाला.
त्याचे कर्तृत्व पाहून अलीकडच्या राज्यातील साहित्य संमेलनात लाथ मारीन तिथे पाणी काढीनही म्हण बदलून टच करीन तिथे पाणी काढीनअशी करण्याचा प्रस्ताव युवा साहित्यीकांतर्फे सादर करण्यात आला (त्यामुळे तो ताबडतोब फेटाळलाही गेला). मग एक दिवस स्टीव्हने दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट घेऊन भाईला एन्काउंटरची धमकी दिली आणि आपली आधीची कंपनी परत मिळवली. (दाढीवाल्या मुख्यमंत्र्यांची एकूण क्षमतापाहता भाईनेगपचूप कंपनी परत दिली) स्टीव्ह सर्वार्थाने जिंकला.

पण परत एकदा नशिबाने घात केला... स्टीव्हला कॅन्सर डिटेक्ट झाला. उपचाराकरिता देशादेशांच्या वाऱ्या सुरु झाल्या. पण यश येईना... स्टीव्हला हातात असलेल्या अपुऱ्या वेळेची कल्पना आली आणि त्याने आपला पुरता जोर लावला. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्याच्या हातात दिल्या आणि तो म्हणेल त्या प्रकल्पांना तात्काळमंजुरी दिली. खऱ्या मातृप्रेमाला कायमच्या पारख्या झालेल्या स्टीव्हने आपल्या कल्पनेतील आईच्या स्मरणार्थ आई-फोन’, ‘आई-पॅड’,’आई-मॅकअशी सरस उत्पादने बनवली आणि त्या राज्याला देशातील सर्वोत्तम राज्य बनवून एक दिवस शेवटचा श्वास घेतला.

मात्र त्याची गोष्ट इथेच संपली नाही. स्टीव्हवर अंत्यसंस्कार कोठे करायचे यावरून दोन्ही राज्यात संघर्ष सुरु झाला... आंदोलने झाली... २०-२५ लोकांचे मुडदे पडून त्यांचेही अंत्यसंस्कार झाले पण स्टीव्हला मात्र मुक्ती मिळेना. शेवटी हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने दोन्ही राज्यांच्या सीमेवर स्टीव्हचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय दिला. अंत्यसंस्कारानंतरच्या शोकसभेला त्याच्या दत्तक कुटुंबानी, ‘भाईनी, राज्यकर्त्यांनी झाडून हजेरी लावली आणि स्टीव्हबद्दल बोलण्याऐवजी स्टीवला घडवण्यात आपले कसे मोलाचे योगदान होतेहे सांगून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.


सरतेशेवटी दाढीवाले मुख्यमंत्री भरलेल्या कंठाने बोलायला उठले. काहीक्षण स्टीव्ह्च्या फोटोकडे पाहत ते म्हणले “मित्रो..स्टीव्ह हा नाविन्याच्या ध्यासाने कायम भुकेला राहिलेला एक हेल्दीमनुष्य होता. आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीकडे त्यानी हेल्दी स्पर्धेच्यादृढीने पहिले आणि नशिबावर कोणतेही खापर न फोडता त्यानी आयुष्यभर हेल्दी अॅटीट्यूडने काम केले. अशा हंग्री आणि फूलीशमाणसाला माझी एक छोटीशी हेल्दी श्रद्धांजली.” असे म्हणत एक हिरवेगार सफरचंद त्यांनी स्टीव्हच्या फोटोसमोर ठेवले.


No comments:

Post a comment