Thursday, 25 December 2014

द मिसिंग रोझ

फेब्रुवारी २२
माझ्या लाडक्या आईस,

माझ्या लहानपणी ‘इतरां’च्या अडथळ्यांना ओलांडून तुला शोधायचं माझं स्वप्न मी जपू शकले होते. पण जसा काळ पुढे सरकला, तसं मलासुद्धा इतर बनवण्याच्या ‘इतरां’च्या सततच्या प्रयत्नांपुढे माझी शक्ती कमी पडू लागली. मग एका रात्री मला स्वप्न पडलं. मी एका छोट्या बोटीत होते आणि ती बोट समुद्रातल्या प्रवाहाबरोबर मार्ग आक्रमत होती. मी सपेâद नाइटगाउन आणि केशरी हॅट घातली होती. क्षितिज स्वच्छ होतं, पण मला पलीकडे नेण्यासाठी त्या बोटीला वल्हं किंवा शीड नव्हतं. मी जेव्हा तशीच असाहाय्य अवस्थेत बोटीत बसले होते तेव्हा एका करड्या रंगाच्या ढगामागून तू माझ्याशी बोललीस.

‘‘मेरी, माझ्याजवळ परत ये.’’
‘‘आई, तू कुठे आहेस?’’
‘‘आपली ताटतूट झालेली नाही मेरी! मी तुझ्याजवळ नेहमीच असते.’’
‘‘मग मी तुला पाहू कशी शकत नाही?’’
‘‘कारण ‘तू’ माझ्याजवळ नाहीस.’’
‘‘मग मी तुझ्याजवळ कशी येऊ?’’
‘‘तू मला तुझ्या स्वत:मध्ये पाहा.’’
‘‘ते मला कसं जमणार?’’
‘‘मग मी तुला दिलेल्या ‘भेटी’मध्ये मला पाहायचा प्रयत्न कर.’’
तेवढ्यात अचानक आकाश फाटल्यासारखा कानठळ्या बसवणारा एक प्रचंड आवाज झाला. प्रकाशाचा एक मोठा हात खाली आला आणि माझी हॅट काढून त्याने माझ्या डोक्यावर पांढऱ्या गुलाबांचा एक सुंदर मुकुट बसवला. आई, तो हात तुझाच होता आणि आजपर्यंत तू दिलेल्या ‘भेटी’पैकी ती सर्वात अमूल्य भेट होती!

त्या मुकुटाचं प्रतििंबब पाण्यात पाहून त्याचं सौंदर्य मी थोडा वेळ न्याहाळलं, पण नंतर अचानक एक मोठं वादळ उठलं आणि माझी बोट त्या गगनचुंबी लाटांमुळे फेकली जायला लागली. तेव्हा, ‘आई, मला वाचव’ असं म्हणत, हुंदके देत घाबरून मी बोटीच्या तळाशी लपून बसले.

थोड्या वेळाने वारा थांबल्यावर पाऊस पडू लागला आणि समुद्रसुद्धा शांत झाला.

मग मी जेव्हा पाण्यामध्ये पुन्हा माझं प्रतििंबब पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की, माझा मुकुट हरवला होता! त्या वेळी मला सर्वनाश झाल्यासारखं वाटलं. मला कोरड्या पडलेल्या नदीसारखं किंवा पंख कापलेल्या पक्ष्यासारखं किंवा सुवास नसलेल्या गुलाबासारखं वाटलं. तरीसुद्धा अजूनही मी एक नदी किंवा एक पक्षी किंवा एक गुलाब होते. त्यामुळे मला माझा मुकुट शोधायलाच हवा होता. मी बोटीत शोधलं, दूरवर शोधलं, समुद्रामध्ये शोधलं आणि आकाशातदेखील शोधलं; पण मला तो सापडला नाही. मग मी तुला साद घातली, ‘‘आई, माझा मुकुट कुठे गेला?’
‘‘मेरी, तू खाली वाकून बघ.’’

मी खाली वाकून माझं प्रतििंबब पाहिल्यावर मला दिसलं की, माझा मुकुट फक्त घसरून मानेवर मागच्या बाजूला गेला होता. मग तू परत माझ्याशी बोललीस. पण या वेळी तुझा आवाज आकाशातून न येता तो माझ्या मुकुटातल्या गुलाबांमधून येत होता. 

‘‘मेरी, सोनुल्या, लक्षात ठेव की तो आवाज हरवला आहे असं कधीच समजू नकोस. तुझ्याजवळ पहिल्यापासून असलेली गोष्ट तुझ्यापलीकडे शोधू नकोस.’’ त्याच वेळी समुद्राच्या पाण्यातून एक राजवाडा वर आला. त्याच्याभोवती एक सुंदर बाग होती. त्याच्या भिंतीवर सगळीकडे गुलाबांचे वेल पसरलेले होते आणि त्यांच्या पलीकडून बुलबुलांचं सुमधुर संगीत ऐकू येत होतं.

तू परत एकदा माझ्याशी बोललीस, ‘‘तुला माझा आवाज ऐकायचा असेल, तर बागेतल्या रस्त्यावर जा. त्या माळ्याचा हात धर आणि गुलाब काय म्हणतायत ते ऐक.’’

‘‘पण आई, तो राजवाडा किती दूर आहे. त्याच्या आणि माझ्यामध्ये एवढा मोठा समुद्र आहे. शिवाय मला पोहताही येत नाही.’’

‘‘तू घाबरू नकोस. नुसती चालत राहा. फक्त तू तुझं सामान मात्र मागे ठेवून ये. म्हणजे तू पाण्यावर तरंगू शकशील.’’

‘‘पण माझ्याजवळ काहीच सामान नाहीये.’’

‘‘पाण्यावर तरंगू शकणार नाहीस असं समजणं हा विचार हेच सर्वात जड सामान आहे. म्हणून ते सोड आणि चालायला सुरुवात कर.’’

‘‘पण आई, ह्या मार्गाने मी कुठे पोहोचेन?’’

‘‘माझ्याकडे!’’

‘‘म्हणजे ह्याच जगात मी तुला भेटू शकते?’’

‘‘हो, ह्याच जगात.’’

हे स्वप्न मी कधीच विसरू शकले नाही आणि ते खरं होईल याची वाट पाहत जगले! तीन वर्षानंतर माझी मैत्रीण आणि तिच्या कुटुंबाबरोबर मी फिरायला गेले असताना आम्ही उतरलो होतो त्या गेस्ट हाउसच्या मागे लपलेली एक गुलाबाची बाग मला दिसली. पुढे थोड्याच अंतरावर मला ‘टोपकापी’ राजवाडा दिसत होता आणि तो मी स्वप्नात पाहिलेल्या राजवाड्यासारखा दिसत होता. ती बाग आणि तो राजवाडा पाहिल्याबरोबर मला वाटलं की, ज्या जागेला मी भेट द्यावी असं तुला वाटत होतं, ती हीच जागा असावी. ती माझी कल्पना खरी ठरली!

गेस्ट हाउसची मालकीण झेनेप, ही एक असामान्य बाई होती, कारण ती ‘इतरां’सारखी नव्हती. मी इतके दिवस कशाची वाट पाहतेय ते तिला माहीत होतं आणि तुझा आवाज ऐकायला ती मला नक्कीच मदत करणार होती. नंतर ती मला गुलाबाच्या बागेतल्या ‘जादुई-सफरी’ला घेऊन गेली. गुलाबाचं बोलणं ऐकण्यासाठी काय करायचं असतं, ते तिनं मला शिकवलं. त्या वेळेस तिनं माझ्या अंत:करणात जे बीजारोपण केलं; त्याच्या मदतीने कित्येक वर्षानंतरही अगदी माझ्या घरात बसूनदेखील मी गुलाबांचं बोलणं ऐकू शकले. बहुतेक माझ्या पुढच्या पत्रात मी माझ्या प्रवासातल्या या तिसऱ्या पर्वाबाबत जास्त सांगू शकेन. 

तुझीच मेरी

1 comment: