Saturday, 27 December 2014

सेलेक्टिव्ह मेमरी

माणसाच्या आवाजावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज बांधता येतो असं म्हणतात. घरंदाजउच्चभू्रपणाचा कितीही आव आणला तरी एकदा तोंड उघडलं की पितळ उघडं पडतंच. असंस्कृत, गावंढळ भाषा, चिरका स्वर आणि हेल काढून बोलणं सुरू झालं की बाह्य रंगरूपाला, भपकेदार सुगंधित कपड्यांना काही अर्थच उरत नाही. मद्रासहून मुंबईत येऊन डेरेदाखल झालेली रेखा सुरुवातीच्या काळात अगदी अशीच होती. तिच्या बेढब शरीराचा मला कधी त्रास झाला नाही, पण तिने बोलण्याकरता तोंड उघडलं की तिचा तो आवाज माझ्या मस्तकात जात असे. घाटावर कपडे आपटून धुणाऱ्या अडाणी, अशिक्षित धोबिणी ज्या र्कश, किनऱ्या आवाजात बोलतात तशी अखंड बडबड करून रेखा सगळ्यांना वैताग आणायची. ...


आज तीच रेखा हॉलीवूडमधल्या जगप्रसिद्ध गायिकेच्या थाटात नाजुक किणकिणत्या आवाजात बोलते, तेव्हा ऐकणाऱ्याच्या कानाशी त्याचे प्राण जमा होतात. आवाजाचा बादशहा असणाऱ्या एका अव्वल शिक्षकाकडून तिने मोठ्या परिश्रमाने धडे घेतले आणि आपल्या वागण्या-बोलण्यात आमूलाग्र बदल घडवून आणला. (अमिताभ बच्चनचं वर्णन आणखी कुठल्या शब्दात करणार?)... आवडत्या पुरुषाच्या प्रेमात कंठ बुडालेली स्त्री तन, मन आणि आत्मा समर्पित करून किती अत्युच्च दर्जाचं यश मिळवू शकते, याचं रेखा हे सर्वोत्तम उदाहरण आहे. काही वर्षांपूर्वी मद्रासहून रेल्वेने आलेली काळी, बेढब मुलगी बघता बघता केवढी बदलली! माझा तर विश्वासच बसत नाही!! अफाट कष्टहिंमत, तीव्र महत्त्वाकांक्षा आणि बुद्धिमत्तेच्या बळावर रेखाने आपला कायापालट घडवून आणला. आज `रेखा' नावाच्या सुंदर, सुसंस्कृत स्त्रीलाभेटताना तिच्या मोहक व्यक्तिमत्त्वाची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. अर्थात, काहींच्या मते रेखामधला हा बदल वरवरचा आहे... पांढऱ्या संगमरवराने मढवलेल्या तिच्या बंगल्याची दारं बंद झाली की आपला मुखवटा फेकून रेखा पुन्हा पहिल्यासारखीच मद्रासी अम्मा होते असं अंतर्गत वर्तुळातले काहीजण अगदी ठामपणाने सांगतात.


मी `स्टारडस्ट' सोडल्यानंतर काही वर्षांनी रेखाबद्दल लेख लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. ठरल्या वेळी मी लेख दिला. तो प्रसिद्ध झाल्यावर रेखा बरीच दुखावली असं माझ्या कानावर आलं. पण तिची समजूत घालण्याच्या, स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत मी अजिबात पडले नाही... त्यानंतर आम्ही दोघी भेटलोदेखील नाही. चार-पाच वर्षांपूर्वी गौतम राज्याध्यक्षच्या स्टुडिओत योगायोगानेच आमची गाठ पडली. माझं फोटोसेशन संपवून मी निघणार एवढ्यात गौतम म्हणाला, `संध्याकाळी रेखा येते आहे'... मग मात्र माझा पाय निघेना. मी तिथेच थांबले. काही वेळाने रेखाच्या नोकरचाकरांचा ताफा येऊन दाखल झाला. असंख्य कपडे आणि दागदागिन्यांनी भरलेल्या मोठमोठ्या ट्रंका प्रत्येकाच्या हातात होत्या. गौतमच्या स्टुडिओत पाय ठेवायला जागा उरली नाही. ... 

अडीच-तीनच्या सुमारास रेखा आली... अत्यंत साधा पांढऱ्या रंगाचा सलवार कुर्ता आणि पेंसिलने काळजीपूर्वक कोरलेल्या `ट्रेडमार्क' भुवया सोडल्या; तर चेहऱ्यावर कोणत्याही प्रसाधनाचा अगदी अंशदेखील नाही! माझ्याकडे नजर वळताच ती क्षणभर थबकलीच... पण लगेच तिने स्वत:ला सावरलं आणि एक हलकासा नाजूक प्रश्न मला कू आला, `हॅलो, हाऊ आर यू?'

माझ्यासोबत माझी मुलगी अवंतिका होती. माझ्याशी एक ओळखीचं स्मित करून रेखा लगेच अवंतिकाकडे वळली. काही वेळातच दोघींची चक्क दोस्ती झाली. स्वत:भोवतीचं झगमगीत ग्लॅमर विसरून एका तरुण मुलीशी मनापासून गप्पा मारणाऱ्या रेखाकडे मी पाहातच राहिले. अवंतिकाचा आनंद तर गगनात मावत नव्हता. त्या दोघींनी एकमेकींबरोबर फोटो काढले. नंतर माझ्याही गळ्यात हात टाकू रेखा कॅमेऱ्यासमोर उभी राहिली. शेवटी तर तिने गौतमच्या हातातून कॅमेरा जवळपास हिसकावून घेतला आणि स्वत: आमच्या दोघांचा फोटो काढला. ही रेखा काही वेगळीच होती... परकरी पोरीच्या उत्साहाने वावरणारी, खट्याळ, थोडीशी नखरेल आणि उत्स्फूर्त!– त्या दिवसापासून पुन्हा ती भेटली नाही पण गौतमशी भेट झाली की विसरता अवंतिकाची चौकशी करते. अवंतिका तर रेखा नामक सौंदर्यसम्राज्ञीच्या चिरकालीन मोहजालात कायमची अडकली आहे

No comments:

Post a comment