Tuesday, 9 December 2014

महाभारतातील मातृवंदना

दर्शनापूर्वी...

रामायणात श्रीराम केंद्रस्थानी आहेत. रामायणाचे कथानक रामाभोवती गुंफलेले आहे. रामाखेरीज इतर पात्रे गौण आहेत. सीतेला रामायणाची नायिका म्हणता येईल; पण सरतेशेवटी सीतेनेही रामांच्या व्यक्तिरेखेत आत्मसमर्पण केले आहे. लक्ष्मण आणि भरतासारखी पात्रे क्वचितच उठून दिसतात तोच पुन्हा लगेच रामात विलीन होऊन जातात. हनुमान आणि रावण ही दोन पात्रे रामकथेच्या उत्तरार्धात विकसित होत असताना एकूण घटनाक्रमाचा एक भाग बनून जातात. रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मीकींनी रामकथेच्या आरंभीच हे स्पष्ट केले आहे. स्वत: ब्रह्मदेवांकडून त्यांनी रामाची ओळख करून घेतली आहे. रामायण म्हणजे एका लोकोत्तर पुरुषाच्या जीवनाचे चित्रण करण्याचा उपक्रम मात्र आहे. ‘लोकोत्तर पुरुष’ असाच रामाचा परिचय करून देऊन त्याच्या जीवनाचे चित्रण करण्यास खुद्द ब्रह्मदेवानेच वाल्मीकींना सांगितले आहे. त्यामुळे ‘रामायण म्हणजे रामकथा’ असे नि:संकोचपणे म्हणता येईल.

महाभारताबद्दल तसे म्हणता येणार नाही. महाभारताची कथाच अशी गुंतागुंतीची आणि व्यापक आहे की त्यातून एका मुख्य पात्राला नायक म्हणून काढणे कठीण आहे. तसे पाहता, महाभारताचे रचनाकार कृष्ण द्वैपायन व्यास अगदी त्रयस्थपणे, केवळ एक सृजनकार या नात्याने महाभारताची रचना करत नाहीत, कारण ते स्वत: महाभारतातील एक पात्रही आहेत. वाल्मीकी ज्या तटस्थपणे रामायणाचे चित्रण करतात तशा तटस्थपणे व्यास महाभारताचे आलेखन करत नाहीत. व्यासांकडून अशा तटस्थेची अपेक्षाही करता येणार नाही. कारण ते महाभारताच्या प्रारंभी आणि शेवटी दोन्हीवेळी अवतीर्ण होणारे त्यातील एक पात्र आहेत. हजारो पृष्ठांच्या, शेकडो घटनांच्या या कथेत, एक पात्र म्हणून व्यासांचाही अधूनमधून सहभाग आहे. तरीसुद्धा व्यासांना महाभारताचा नायक विंâवा एक प्रमुख पात्र म्हणता येणार नाही. 

व्यासांपाठोपाठ लगेच नाव आठवते ते कृष्णाचे! कृष्ण ही महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे हे खरेच, त्यातील बहुतांश घटनांवर कृष्णाचे वर्चस्व आहे हेही खरे... कृष्णाच्या अनुपस्थितीत जे घडते त्यात घटनांपेक्षा दुर्घटनाच अधिक आहेत. पांडव द्यूतात आपले सर्वस्व हरल्यावर वनवास भोगत होते त्यावेळी, सभापर्वात कृष्णाने स्वत: युधिष्ठिराला म्हटले आहे की, ‘‘मी जर तेथे हजर असतो तर हे सारे घडलेच नसते!’’ अशा तेव्हेने, महाभारतातील तमाम घटनांच्या होण्यान होण्यावर कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे. तरीसुद्धा कृष्णाला महाभारताचा नायक म्हणता येणार नाही. महाभारतात कृष्णाचा प्रवेशच खूप उशिरा झाला आहे. द्रौपदी स्वयंवराच्यावेळीही महाभारताच्या घटनाक्रमामध्ये कृष्ण पहिल्यांदाच दिसतो तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा पुत्र प्रद्युम्न आहे. कृष्णाचे वय तेव्हा किमान पन्नास वर्षांच्या जवळपास असले पाहिजे असे विद्वानांचे मत आहे. म्हणजेच कृष्णचरित्राचे आलेखन हा काही महाभारताचा विषय नाही.

या खेरीज धृतराष्ट्र, युधिष्ठिर, दुर्योधन किंवा कर्ण ही अन्य पात्रेही वेळोवेळी दिसतात, स्वतंत्र व्यक्तिरेखा म्हणून विकसित होतात, घटनांवर त्यांची छाया असते आणि वाचकांच्या मनावर त्यांचा प्रभाव पडतो हे सर्व जरी खरे असले तरीसुद्धा ह्यांपैकी कुणीच महाभारताचा नायक ठरू शकत नाही. महाभारताच्या विस्तृत कथेतील ही सर्व फक्त ‘महत्त्वाची पात्रे’ आहेत इतकेच!

भीम व अर्जुन हे लक्ष्मण-भरताप्रमाणे स्वत:ला थोरल्या भावाच्या व्यक्तिमत्त्वात विलीन करून टाकत नाहीत; भरत-लक्ष्मणापेक्षा ही दोन्ही पात्रे अधिक विकसित आणि स्वतंत्र आहेत हे मान्य केले तरी ह्या दोघांचीही महाभारताचे मुख्य पात्र म्हणून गणना होऊ शकत नाही. 

महाभारतातील सर्वाधिक महत्त्वाचे पात्र म्हणजे भीष्म! कथेचे रचनाकार असलेल्या व्यासांचा या गणनेत अपवाद केल्यास, इतर शेकडो पात्रांमध्ये हिमालयाच्या शिखरासारखे व्यक्तिमत्त्व भीष्मांचे आहे. कृष्णाचे भव्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व वजा करता भीष्म हेच महाभारतातील सर्वाधिक महत्त्वाचे पात्र आहे. महाभारत ही कुरुवंशाची कथा आहे आणि कृष्ण तर कुरुवंशीय नाही; त्यामुळे कथेचा उगम आणि सातत्य लक्षात घेता भीष्म हेच सर्वांत महत्त्वाचे ठरतात. कथेच्या प्रारंभी, व्यासांनंतर लगेच त्यांचा प्रवेश होतो. त्यावेळी ते भीष्म नाहीत, देवव्रत आहेत; परंतु कुमार देवव्रत भीष्म झाल्यानंतर मात्र महाभारतातल्या एकजात सर्व घटनांवर - कुरुक्षेत्रावरील युद्ध समाप्त होऊन युधिष्ठिराचे राज्यारोहण झाल्यानंतरही-भीष्मच सर्वोपरी स्थान राखून आहेत. म्हणजे भीष्मांना महाभारताचे नायक मानले नाही तरी सर्वाधिक महत्त्वाचे पात्र म्हटलेच पाहिजे. मग महाभारताच्या नायकपदी आहे तरी कोण? 

महाभारताची कथा नायकविहीन वाटते एवढेच तिचे वेगळेपण नाही. एकापेक्षा एक वरचढ अशी उत्तमोत्तम पात्रे त्यात आहेत. वर उल्लेखिलेल्यांखेरीज द्रोणाचार्य, कृपाचार्यांसारखी महत्त्वाची पात्रे आहेत. ह्या सगळ्यांचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे. कृष्णाचा एक अपवाद वगळता या अन्य सर्व प्रमुख पात्रांपैकी कुणाचाच जन्म, सामाजिक मूल्यांनी सर्वोपरी मानलेल्या स्त्री-पुरुष संबंधातील स्वीकृत लग्नपद्धतीने झालेला नाही. ह्या सर्वांच्या जन्माशी एखादी विशेष कथा निगडित आहे. अधिकांश पात्रे एकतर चमत्कारिक किंवा मग अवैध संबंधातून जन्मलेली आहेत. महाभारताचे सर्जक असलेल्या स्वयं व्यासांचा जन्म एका हळव्या, दुबळ्या क्षणाच्या परिणामामुळे झाला आहे. द्रोणाचार्यांचे पिता भारद्वाज ह्यांचे स्खलित वीर्य द्रोणात पडले त्याच्या परिणामस्वरूप द्रोणाचार्यांचा जन्म झाला आहे. कर्ण, पांडव, कौरव सर्वांबद्दल असेच काही ना काही सांगता येईल.

एक ओझरती नजर महाभारतातील स्त्रीपात्रांवरूनही फिरवूया! असे करताच, महाभारत-कथेचा नायक कोण हा प्रश्न सोपा झाल्यासारखा वाटतो. वरवर पाहता हे विधान काहीसे आश्चर्यकारक वाटण्याजोगे आहे. जरा खोलात शिरून तपशिलांचा वेध घेतल्यावर मात्र, ह्या सगळ्या स्त्रीपात्रांचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य नजरेस पडून आपण चकित होतो. वर म्हटल्याप्रमाणे महाभारतातील सर्वाधिक तेजस्वी आणि आपल्या विराट व्यक्तित्वाने विश्वसाहित्यात स्थान मिळवू शकतील अशा या तमाम पात्रांचे पिता बहुतांशी कुठेच या मुलांचे आयुष्य साकारायला किंवा त्यांचा विकास घडवायला पुढे आलेले दिसत नाहीत.

एखाद-दुसरा अपवाद वगळता प्रत्येकाचा पिता आपल्या पुत्राला अवैध जन्म देऊन लगेचच अदृश्य झाला आहे. पुत्रजन्माचाच काय, पुत्र संगोपनाचाही सगळा भार, सगळा संघर्ष ह्या स्त्रीपात्रांनीच सहन केला आहे. मग ती सत्यवती असो की कुंती, गांधारी असो की कोवळी किशोरी उत्तरा! सत्यवतीच्या उदरी जन्मलेले दोन्ही पुत्र विशेष काही करू शकण्याआधीच मृत्युमुखी पडतात आणि त्यानंतर वंशविस्तारासाठी दोघी तरुण सुनांसह सत्यवती जो संघर्ष करते ती अतिशय अद्भुत आणि रोमांचकारी कहाणी आहे. या सर्व स्त्रियांनी कठीण परिस्थितीला तोंड देऊन आपल्या गर्भाला जन्माला घातले. जन्म दिल्यानंतर त्याच्या पालनपोषण-संगोपनाचा कळत-नकळत अंगावर येऊन पडलेला भार पेलला आणि आपल्या मुलांतून ‘उत्तुंग व्यक्तिमत्त्वे’ निर्माण करून समाजापुढे सादर केली. अशा तेव्हाने भीष्म वा द्रोण, युधिष्ठिर वा कर्ण, दुर्योधन असो की अभिमन्यू, भीमार्जुन असोत की धृतराष्ट्र-विदुर... ही यादी पुष्कळ लांबवता येईल, या सगळ्यांच्या आपापल्या स्थानाची खरी अधिकारी कुणी असेल तर ती त्यांची जननीच आहे. ह्या मातांनी जे भोगले त्याचे यथायोग्य परिप्रेक्ष्यातील मूल्यांकन खुद्द व्यासांनीही महाभारतात केले नाही असे म्हटले नाही तरी ह्या मातांच्या अनोख्या स्थानाचे अलगपणे, एका विशिष्ट दिशेने दर्शन घेण्याचे फारच कमी प्रयास झाले आहेत ह्यात शंकाच नाही.

महाभारत हे एक इंद्रधनुष्य आहे. त्यातला अमुकच एक रंग बघायचा असेल तर तो खास प्रकारच्या भिंगांच्या माध्यमातूनच त्या विशिष्ट रूपात बघता येईल. अनंत आकाशात इंद्रधनुष्याचा सप्तरंगी पट्टा बघता येतो पण त्यातल्या एकाच रंगाला वेगळा काढून त्याच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी खास भिंगाची गरज असते. अशा विशिष्ट भिंगातून महाभारताच्या ह्या स्त्रीपात्रांकडे पाहून आपण मोहित होतो. एवढेच नव्हे तर थक्क, स्तिमित होतो. ही स्तंभित अवस्था ओसरल्यावर पहिलीच संवेदना उमटते - अरे! महाभारतकथेच्या नायकपदी स्थापित करायचेच असेल तर दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही — ह्या मातांना, त्यांच्या मातृत्वालाच
ते स्थान दिले पाहिजे!

परंतु ह्या मातृत्वाला महाभारताच्या नायकपदी अभिषेक करावा न करावा तोच, आपल्या सात-सात मुलांना जन्मताक्षणीच पाण्यात सोडून देणारी गंगा दिसते तशाच, कौमार्यावस्थेत मातृत्व मिळाल्यावर पुत्राचा त्याग करणाऱ्या माता सत्यवती आणि माता कुंती ह्या दोघीही दिसतात! प्रजोत्पत्तीस असमर्थ असलेल्या पतीऐवजी अन्यांकडून गर्भधारणाऱ्या कुंती, माद्री दिसतात तशाच, पितृतुल्य व्यासांशी संबंध करून धृतराष्ट्र वा पांडूला जन्म देणाऱ्या विधवा अंबिका - अंबालिका दिसतात...

आणि लगेचच एक अवघड प्रश्न उभा ठाकतो!

ह्या... ह्या माता महाभारताच्या नायकस्थानी कशा असू शकतील? असू शकतील... निश्चित असू शकतील! एकच अनिवार्य अट आहे - एखादी घटना, ती कथा, तिचा सूचक संकेत आणि त्या सूचक अर्थच्छायेत ह्या प्रश्नांचे रहस्य जाणण्यासाठी त्या खास भिंगातून दिसणारे दृश्य बघायला मनाला शिकवावे लागेल, तसे स्वच्छ निर्मळ मन तयार करावे लागेल. गल्लीबोळात बसल्याबसल्या कथेकऱ्यांच्या ऐकीव कहाण्यांतून डोक्यात भरवून घेतलेले अर्थ बाजूला ठेवावे लागतील; त्यातून मुक्त व्हावे लागेल!

नाहीतरी, महाभारत म्हणजे सगळे काही छान छान असलेला धर्मवाचनासाठीचा ग्रंथ नव्हे! महाभारत म्हणजे मानवजातीचे समग्र जीवनच आहे. अशा समग्र जीवनाचे त्याच्या संपूर्ण रूपात दर्शन घ्यायचे असेल तर सगळे काही छान छान आणि उत्तमोत्तम असण्याची अपेक्षा ठेवता येत नाही. अपेक्षा एवढीच ठेवता येते, की जीवन सांगोपांग प्रतिबिंबित व्हावे! 

ही लेखमाला म्हणजे, महाभारतातील ह्या मातांमध्ये अशा संपूर्ण जीवनाचे दर्शन घडते की नाही, प्रतिबिंबित होते की नाही हे बघण्याचा एक प्रयास आहे. हा आयास रोमांचक आहे, रमणीय आहे आणि म्हणूनच, सारे काही उमजून घेण्यासाठी परिश्रम करायला तयार असणारे स्वस्थ निर्मळ मन हीच त्यासाठीची पूर्वअट आहे. ही अट लक्षात ठेवूनच पुढील पृष्ठांतून आपण महाभारतातील मातांचे दर्शन घेऊया! 

No comments:

Post a comment