Saturday, 29 June 2019

सँँक्ट्स : साक्षात्कार की हाहाकारसायमन टॉएन लिखित आणि उदय भिडे अनुवादित 
 

एक कडवी धर्म संघटना आहे. टर्कीमधील रुइन या ऐतिहासिक शहराजवळच्या डोंगराळ भागात ती अत्यंत गुप्तपणे  राहते आहे. त्या संघटनेच्या लोकांना ‘सँक्टस’ असे संबोधले जाते. सॅम्युएल नावाचा एक सँक्टस या संघटनेचा क्रूर  चेहरा पाहिल्यानंतर तिथून निसटतो. या भूतलावरील सर्वांत जुन्या मानवी संस्कृतीच्या अधिष्ठानस्थळाच्या सर्वोच्च स्थानावर (एका पर्वतावर) पोचतो. त्याने आपले हात अशा पद्धतीने ठेवलेले असतात, की दूरवरून तो एखाद्या क्रॉससारखा दिसावा आणि त्याच अवस्थेत तो काही वेळ त्या सर्वोच्च स्थानावर उभा असतो. त्या विशिष्ट स्थानावर क्रॉस दिसणं, हा काहीतरी दैवी संकेत आहे, असं लोकांना वाटायला लागतं आणि त्या स्थानाभोवती पर्यटकांची गर्दी उसळलेली असताना, दूरचित्र वाहिन्यांवरून या क्रॉस दिसत असलेल्या ठिकाणाचं थेट प्रक्षेपण सुरू असताना एकदम तो क्रॉस म्हणजेच सॅम्युएल स्वत:ला झोकवून देतो आणि त्याचा मृत्यू होतो. या घटनेने अर्थातच खूप खळबळ माजते. सॅम्युएलचं मृत शरीर पोलीस ताब्यात घेतात. त्याच्याजवळ एक मोबाइल नंबर पोलिसांना सापडतो आणि त्याच्या जवळ असलेल्या सफरचंदाच्या बियांवर काही इंग्रजी अक्षरं कोरलेली असतात, त्या अक्षरांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न पोलीस करत असतात. या घटनेचा तपास इन्स्पेक्टर दाऊद अर्काडियन करत असतो. सॅम्युएलचं शवविच्छेदन करताना त्याच्या अंगावरच्या खुणा पाहून, त्याचा शारीरिक छळ झाला असल्याचं आणि कोणत्या तरी कडव्या धर्म संघटनेशी त्याचा संबंध असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात येतं. अर्थातच त्याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडे सोपवला जातो.  सॅम्युएलकडे सापडलेल्या मोबाइल नंबरवर इन्स्पेक्टर अर्काडियनने संपर्क साधला असता तो नंबर लिव्ह नावाच्या पत्रकार तरुणीचा असल्याचं त्याला समजतं. सॅम्युएल तिचा भाऊ असल्याचं ती त्याला सांगते. सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी लिव्ह न्यू जर्सीहून रुइनला जायला निघते. सॅम्युएलचा मृतदेह पोलिसांच्या हातात पडू नये, असं त्या कडव्या धर्म संघटनेला वाटत असतं; पण त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. सॅम्युएलच्या या आत्महत्येच्या घटनेमुळे पोलीस आपल्यापर्यंत पोचतील, ही भीती त्या संघटनेच्या प्रमुखांच्या (मठाधिपतींच्या) मनात असते. दरम्यान, पोलिसांच्या कॉम्प्युटरवरून शवचिकित्सेचा अहवाल, शवाचे फोटो, डॉक्टर आणि अर्काडियनच्या संभाषणाची नोंद, अर्काडियनने करून ठेवलेली टिपणे – या सगळ्याची मेमरी स्टीकमध्ये एक प्रत तयार करून ती प्रत एक मनुष्य कॅॅथरीन मान या स्त्रीकडे पोचवतो आणि तीच प्रत तो त्या धर्म संघटनेकडेही पोचवतो. कॅॅथरीन  एक समाजसेवी संस्था चालवत असते. आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लिव्ह रुइनला येते. ती विमानतळावर उतरते तेव्हा गॅब्रिएल नावाचा माणूस तिला घ्यायला आलेला असतो. ती त्याच्याबरोबर गाडीतून जात असताना तिला अर्काडियनचा फोन येतो. लिव्हला घेण्यासाठी त्याने ज्या माणसाला पाठवलेलं असतं, तो माणूस गॅब्रिएल नाही, हे त्या फोनमुळे तिच्या लक्षात येतं. गॅब्रिएलपासून स्वत:ची सुटका कशी करून घ्यावी, या विचारात ती असतानाच त्यांच्या गाडीवर हल्ला होतो. लिव्ह तिथून कसाबसा पळ काढते आणि अर्काडियनपर्यंत पोचते. सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी अर्काडियन तिला शवागारात घेऊन येत असतो, तेवढ्यात सॅम्युएलचा मृतदेह तिथून नाहीसा करण्यात येतो. सीसीटीव्ही फुटेजमधे सुरुवातीला गॅब्रिएल सॅम्युएलचं शव चोरून नेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. नंतर दुसरीच कुणीतरी माणसं येऊन ते शव चोरताना दिसतात. अर्काडियन शहरातील पोलीस यंत्रणेला ते शव घेऊन जाणा-या गाडीला अडवण्याच्या सूचना देतो.दरम्यान, अर्काडियन गॅब्रिएलची माहिती काढतो, तेव्हा गॅब्रिएल सैन्यातून निवृत्त झाल्याचं त्याला समजतं; पण सॅम्युएल आणि लिव्हशी त्याचा काय संबंध आहे, हे मात्र त्याला समजत नाही. आता लिव्ह पोलिसांच्या संरक्षणात असते; पण पोलिसांमध्ये असूनही ती सुरक्षित नाही, असे फोन तिला येत असतात. म्हणून ती पोलिसांना गुंगारा देते आणि रुइनमधल्या एका वर्तमानपत्राच्या कचेरीत आश्रयाला जाते. सॅम्युएलच्या मृतदेहाबरोबर जी इंग्रजी अक्षरं सापडलेली असतात, त्याचा अर्थ लावण्याचा ती खूप प्रयत्न करत असते; पण तिला तो लागत नसतो. त्या अक्षरांचा आणि सॅम्युएलच्या आत्महत्येचा काही संबंध असावा, असं तिला वाटत असतं. इकडे मठाधिपतींनी गुलिर्मो रॉड्रिग्ज, जोहान लार्सन आणि कार्नेलियस वेब्स्टर या तिघांना लिव्हच्या मागावर पाठवलेलं असतं. त्यांनीच गॅब्रिएल तिला घेऊन चाललेला असताना तिच्यावर हल्ला केलेला असतो. ती पोलिसांच्या तावडीतून निसटल्यानंतरही ते तिच्या मागावर असतात.परत एकदा गॅब्रिएल लिव्हला तिच्या असुरक्षिततेची जाणीव करून देऊन तिला स्वत:बरोबर येण्यास भाग पाडतो. ती गॅब्रिएलबरोबर ज्या ठिकाणी जाते, तिथे तिला गॅब्रिएलची आई कॅॅथरीन  मान आणि त्याचे आजोबा (आईचे वडील) ऑस्कर भेटतात. गॅब्रिएलविषयी लिव्हच्या मनात एक अनामिक ओढ निर्माण होते. त्यांच्यापाठोपाठ इन्स्पेक्टर अर्काडियनही तिथे येऊन पोचतो. सॅम्युएलचा मृतदेह चोरण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याला गॅब्रिएलला अटक करायची असते; पण गॅब्रिएल त्याला समजावू पाहतो, की त्याच्या अटकेपेक्षा लिव्हचं संरक्षण करणं आणि सॅम्युएल मरताना जो काही संदेश देऊ पाहत असतो, त्याचा माग काढणं महत्त्वाचं आहे.त्यांचं हे संभाषण चाललेलं असताना मठाधिपतींनी लिव्हच्या मागावर पाठवलेले जोहान लार्सन आणि कार्नेलियस वेब्स्टर तिथे पोचतात (त्यांच्याबरोबर असलेला गुलिर्मो रॉड्रिग्ज आधीच मारला गेलेला असतो.) आणि जोहान तिथे ग्रेनेडचा स्फोट घडवून आणतो; पण तो स्वत: त्यात मारला जातो. त्या गडबडीत कार्नेलियस, लिव्हचं अपहरण करतो. अर्थातच लिव्हला त्या धर्म संघटनेच्या गुप्त जागी नेलं जातं. काय दिसतं लिव्हला तिथे? मठाधिपतींना लिव्हला ठार का मारायचं असतं? तिथे गेल्यावर लिव्हला त्या इंग्रजी अक्षरांचा अर्थ लागतो का? गॅब्रिएल, कॅॅथरीन  आणि ऑस्करचा त्या धर्म संघटनेशी आणि सॅम्युएलच्या मृत्यूशी काय संबंध असतो? ते लिव्हला का वाचवू पाहत असतात? त्या धर्म संघटनेत राहणारे फादर थॉमस आणि अथानायसिस त्या संघटनेच्या नकळत, त्या संघटनेच्या ग्रंथालयातील कोणता ग्रंथ शोधत असतात आणि कशासाठी? तो ग्रंथ शोधण्यात ते यशस्वी होतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘सँक्टस’ ही कादंबरी अवश्य वाचायला हवी. ती वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

No comments:

Post a Comment