Wednesday, 27 August 2014

वपुर्झा

स्वप्नं बाळगण्यासाठी कर्तृत्व लागतं असं कुणी सांगितलं? अनेक माणसांच्या बाबतीत, ते जन्माने पुरुष आहेत, एवढा पुरुषार्थ त्यांना पुरतो. `अर्थ असलेला पुरुष' म्हणजे पुरुषार्थ अशी व्याख्या ते करीत नाहीत. हिरकणी योगायोगाने मिळते. ती टिकवायची असते हे ज्यांना उमगतं ते `पुरुष' शब्दाला `अर्थाची' जोड देतात. कर्तृत्व नसेल तर नसेल. प्रत्येकाकडे असतं असं नाही. पण कर्तृत्व अनेक प्रकारचं असतं. द्रव्यार्जनाची शक्ती म्हणजेच पुरुषार्थ नाही. जोडीदारावर अमाप माया करणं, बायकोची शक्ती ओळखणं, तिला सुरेख साथ देणं, तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकी तिच्या कर्तृत्वाची शान सांभाळणं, हा सगळा पुरुषार्थच. क्षमाभाव, वात्सल्य ही गुणवत्ता केवळ बायकांची मक्तेदारी नाही.

मुळातच दागिन्यांचा सोस कशासाठी?

मंगळसूत्र कशासाठी? नवऱ्याबद्दलच्या भावना दागिन्यांतूनच व्यक्त व्हायला हव्यात का? एकीकडे मारे मंगळसूत्र घालायचं आणि नवऱ्याच्या तऱ्हेवाईकपणाच्या हकिगती ऑफिसातल्या मैत्रिणींना वा मित्राला सांगायच्या; ह्या विसंगतीचा कुणी विचार केला आहे का? नवऱ्याबद्दलच्या ह्या मानसिक व्यथा इतरांना सांगताना, मंगळसूत्रामागचा संकेत जातो कुठे? मग तो केवळ एक उपचार राहतो. चार मामुली वा रवण्यायोग्य गिन्यांप्रमाणे मंगळसूत्र हा निव्वळ एक दागिना उरतो.

असं असेल तर ह्या दागिन्याचं प्रयोजन काय?

वेगवेगळ्या पॅâशन्सची मंगळसूत्रं करवून घेण्यासाठी आज भगिनीवर्गात चढाओढ लागलेली आहे. परवडत नाही, महागाई किती आहे असं म्हणता म्हणता, सराफाच्या दुकानात पाय ठेवायला जागा नसते. पहिलं मंगळसूत्र मोडून, नवीन पॅâशनचं करवून घेताना, सराफ-सोनार मंडळी आपल्याला किती लुबाडतात, हे
तर बापजन्मी तुम्हांला कळणार नाही. प्रत्येक व्यवहाराच्या वेळी चोख सोनं घेऊनही तुम्ही ते विकायला गेलात वा त्यातच थोडी भर घालून नवा दागिना बनवायला निघालात की तुमचं पहिलं सोनं कधीही शुद्ध नसतं. ह्यावर वाद घालायचा नाही. सराफाचं दुकान आणि लोकलमधला गुंड ह्यांत फरक इतकाच की, पहिल्या ठिकाणी तुम्ही आपण होऊन मंगळसूत्र काढून देता आणि लोकलमध्ये ते खेचलं जातं.

No comments:

Post a comment