Tuesday, 2 September 2014

ज्येष्ठागौरी (महालक्ष्मी) माहात्म्य

ज्येष्ठागौरी (महालक्ष्मी) माहात्म्य

भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवाबरोबरच भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीचा उत्सव थाटात साजरा होतो. अनुराधा नक्षत्रावर आवाहन केल्या जाणाऱ्या या देवतेस ‘ज्येष्ठागौरी’ अशी संज्ञा आहे. ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन केले जाते; तर मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन केले जाते. ‘गौरी’ म्हणजे ‘शिवाची अर्धांगिनी’ असली, तरी ती ‘महालक्ष्मीच’ आहे. अभिवृद्धी आणि वैभव प्राप्त व्हावे, हीच या व्रताची फलश्रुती असते.

प्राचीन काळी उन्मत्त दानवांनी देवगणांसह प्रजाजनांना त्राही भगवान करून सोडले. सर्व स्त्रियांनी महालक्ष्मीला प्रार्थना केली की, ‘आमच्या सौभाग्याचे रक्षण कर. कल्याण करून सुख व समृद्धी दे. स्त्रियांच्या आर्त आवाहनाने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिने कोलासुरासह अन्य दैत्यांचा संहार करून त्रैलोक्याला दिलासा दिला. 

भाद्रपद शुद्ध पक्षातील ज्येष्ठागौरीच्या आवाहनप्रसंगी दोन गौरी बसविण्याची पद्धत आहे. एक गौरी घरातलीच असते. तीच लक्ष्मी होय. एक लक्ष्मी बाहेरून आणली जाते. तीच ‘ज्येष्ठागौरी’ होय. मुख्य द्वारापासून पूजास्थानापर्यंत रांगोळीची आठ पावले रेखाटली जातात. ज्येष्ठागौरीला प्रत्येक पावलावर
थांबवत – ‘आद्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, अमृतलक्ष्मी, कामलक्ष्मी, सत्यलक्ष्मी, भोगलक्ष्मी व योगलक्ष्मी’ अशा अष्टलक्ष्मींचे स्मरण करण्यात येते.

कुलाचारानुसार गौरीपूजनाच्या विविध प्रथा-परंपरा-पध्दती आढळतात; मात्र समृद्धी आणि मांगल्याची कामना हीच या आनंददायी उत्सवामागची भावना असते.

No comments:

Post a comment