Tuesday, 16 September 2014

जमिलच्या साहसकथा

परत मोत्यांच्या बेटाकडे

सूर्य मावळतीकडे झुकु लागला होता. साऱ्या मोत्यांच्या बेटावर सूर्याने तांबड्या रंगाची पखरण घातली होती. त्याच वेळी मासा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान उतरले.

जमिल खिडकीशेजारच्या आसनावर बसून उत्सुकतेने बाहेर पाहत होता. त्याच्या मनात अनेक विचार घोंघावू लागले. ‘आता ते बेट कसे दिसत असेल? 

एवढ्या मोठ्या कालावधीनंतर मला तिथल्या थोड्याफार खुणा ओळखीच्या वाटतील की नाही? माझे नातेवाईक आणि मित्र मला भेटतील का?’ अशी प्रश्नमालिका त्याला सतावू लागली. जमिलनं खिडकीतून पाहिलं. आकाशात काही ढगांचे ठिपके दिसत होते आणि दूरवर सूर्यास्त होत होता.

‘‘प्रवाशांनी उतरण्यास सज्ज व्हावे,’’ वैमानिकाच्या आवाजाने जमिलच्या विचारांची तार तुटली.

जमिलनं एक दीर्घ सुस्कारा टाकला. त्याला आता कळून चुकले की, काही क्षणातच तो आपल्या मातृभूमीवर पाऊल ठेवणार आहे! त्याने तब्बल एकोणीस वर्षांपूर्वी सोनेरी किल्ली शोधण्यासाठी आपल्या मातृभूमीचा निरोप घेतला होता. 

‘‘सरतेशेवटी घरी आलो; तेही किल्ली घेऊन!’’ शेजारी बसलेली हस्क कुजबुजली. तिला हे सारं अद्भुत वाटत होतं. तिनं त्याच्याकडे पाहून स्मित केलं. एक मोठा श्वास घेतला आणि आपले काळे कुरळे केस बांधू लागली. केस व्यवस्थित सावरल्यानंतर तिनं जमिलच्या मांडीवर हलकेच हात ठेवले. 

‘‘सगळं नीट होईल,’’ जमिलला धीर देत ती म्हणाली. आनंदाने आणि आश्चर्याने तिचे डोळे चमकू लागले. ‘‘तुझा पट्टा घट्ट बांध,’’ ती हसत म्हणाली. त्याने पट्टा घट्ट बांधला. तो फार बोलत नव्हता.

विमान खाली खाली येत धावपट्टीवर उतरले. जमिलच्या जिज्ञासू दृष्टीला विमानातून ओळखीचं असं काहीच दिसलं नव्हतं.  हा विमानतळ समुद्रात खूप दूरवर बनवलेल्या कृत्रिम बेटावर बांधलेला होता. तो राहत असलेल्या बेटापासून खूपच दूर. त्याने त्याचे बेट आठवण्याचा निष्फळ प्रयत्न करून पाहिला.

‘‘सगळं ठीक होईल,’’ विमानातून उतरताना हस्क पुन्हा एकदा म्हणाली.

‘‘जाहीर करण्यासारखं तुमच्याकडे काही आहे?’’ जमिलकडे बघत कस्टम अधिकाऱ्यानं विचारलं.

‘‘नाही.’’ जमिलनं नम्रपणे उत्तर दिलं!

‘‘कृपया, तपासणीसाठी आपली बॅग उघडा,’’ अधिकाऱ्याने मागणी केली. जमिलनं बॅग उघडून दाखविली. बॅगेच्या आतल्या कप्प्यात अर्धवट गुंडाळून ठेवलेल्या वस्तूकडे बोट दाखवत अधिकाऱ्याने विचारले, ‘‘हे काय आहे?’’

‘‘पाशिया राज्याकडून मिळालेले स्मृतिचिन्ह आहे,’’ जमिलने उत्तर दिलं.

‘‘पण हे नक्की काय आहे?’’ अधिकाऱ्याने जोर देऊन विचारले.

‘‘हा एका किल्लीचा भाग आहे... एक प्राचीन वस्तू,’’ जमिलने स्पष्ट केलं.

‘‘अस्सं. तुम्ही जाऊ शकता,’’ अधिकाऱ्याने हातवारे करून सांगितलं. जमिल आणि हस्क आगमन सदनामध्ये आले. तिथे एक मोठा स्वागतपर फलक लावलेला होता –

‘मोत्यांच्या बेटावर आपले सहर्ष स्वागत – जिथे सूर्य कधीच मावळत नाही!’ सदनातून पुढे जाताना जमिलला थोडंसं विचित्र वाटलं. त्याच्याभोवतीचं काहीच त्याच्या परिचयाचं नव्हतं. जिथे तिथे फक्त दुकानं आणि सौंदर्यप्रसाधनांची रेलचेल असलेली बूटिक्स.

‘‘हा विमानतळ समुद्रात बांधलाय?’’ त्याने स्वत:लाच विचारलं.

‘‘होय जमिल, हे एका कृत्रिम बेटावर वसवलंय,’’ हस्कने पुढाकार घेऊन उत्तर दिलं.

‘‘अविश्वसनीय!’’ गोंधळलेला जमिल उद्गारला. दोघं माहिती कक्षाकडे गेले. लाल-पांढNया पोशाखातील तरुणीने हसून त्यांचं स्वागत केलं. ‘‘आमच्या समृद्ध भूमीवर – मोत्यांच्या बेटावर आपले स्वागत!’’ त्या
तरुणीचं स्मित अजूनही तसंच होतं. ‘‘मी काय मदत करू आपल्याला?’’

‘‘इथून गॅरियोनला कसं जाता येईल?’’ जमिलनं विचारलं. जमिलनं हस्ककडे पाहिलं; जणू तिच्या चेहऱ्यावर त्याच्या प्रश्नाचं उत्तर लिहिलंय. हस्क हसली. माहिती कक्षातील तरुणीने स्पष्ट केलं, ‘‘जुनं गॅरियोन जय शहरात आहे. जय शहर ‘वैभवशाली मासा’ बेटावर म्हणजे मुख्य बेटावर आहे.

नवीन गॅरियोन हे इथून खूप दूर असलेल्या न्यूृ-फाउंड-लँडला (नवीनच सापडलेल्या परत मोत्यांच्या बेटाकडे भूमीवर) आहे.’’

‘‘माझा जरा गोंधळ होतोय,’’ जमिलनं कबूल केलं.

‘‘आपल्यासारख्या प्रवाशांसाठी नवीन गॅरियोन हे योग्य स्थळ नाही. पर्वतापलीकडची ती एक विशिष्ट वस्ती आहे; पण जुनं गॅरियोन मात्र आपल्यासाठी अगदी योग्य आहे. नवीन गॅरियोनच्या तुलनेत तेच अधिक गजबजलेलं आहे. तिथे पाहण्यासारख्या आणि ऐकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. डिस्को आहेत; दुकानं आहेत; हॉटेल्स,

बँका आणि कॅसिनोही आहे. सगळं आहे तिथे!’’

‘‘अच्छा, मग आता जुन्या गॅरियोनमधले जुने रहिवासी कुठे असतात?’’ जमिलने विचारलं.

‘‘दहाएक वर्षांपूर्वीच, त्या सगळ्यांना नवीन गॅरियोनमध्ये स्थलांतरित करण्यात आल. सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी जागा हवी होती ना म्हणून!’’ 

‘‘असं आहे तर,’’ जमिलनं मान डोलवत म्हटलं.

‘‘माझा सल्ला असा की, तुम्ही जुन्या गॅरियोनमध्येच जावं. कारण तिथेच सगळी मजा आहे. नवीन गॅरियोनमध्ये पाहण्यासारखं काहीच नाही. आणि हो, कधीकधी तिथे जाणं धोकादायकही ठरू शकतं!’’

‘‘आम्ही तिथे कसं जाऊ शकतो?’’ हस्कनं विचारलं. ‘‘मला खूप मजा करायचीये....’’

‘‘तुम्ही बाहेर जाणाऱ्या पहिल्या दरवाजातून निघून बोटीने जाऊ शकता किंवा समुद्राखालून जाणाऱ्या ट्रेनमधून जाण्यासाठी पहिल्या दरवाजाने बाहेर पडू शकता. हे दोन्ही मार्ग व्हिलााqन्सयाला जातात. तिथून १० क्रमांकाची बस पकडून तुम्ही जय शहरात पोहोचू शकता.’’ मोत्यांच्या बेटाच्या नकाशाकडे पाहत ती तरुणी समजावून
सांगू लागली. 

‘‘म्हणजे समुद्राखालूनही रेल्वे वाहतूक चालते?’’ बावचळलेला जमिल म्हणाला.

‘‘होय, मासा मेट्रो रेल्वे समुद्राखालून विमानतळापासून ग्रँड मासा बेटाकडे दर दहा मिनिटांनी धावते,’’ त्या तरुणीने सांगितलं.

‘‘आश्चर्यच आहे!’’ जमिल त्या नकाशाकडे एकटक पाहत राहिला. त्या तरुणीने ते अचूक टिपून सांगायला सुरुवात केली, ‘‘इथे सात बेटं आहेत. त्यांपैकी दोन आहेत नैसर्गिक; आणि आता आपण ज्यावर आहोत ते मिळून पाच कृत्रिम आहेत.’’

No comments:

Post a comment