Thursday, 18 September 2014

मी एरिक

माझे नाव ‘एरिक’ आहे. सोनेरी चौकट असलेला महत्त्वाचा असा एक कागद सांगतो की, मी एक ‘पॉमेरॅनियन कुत्रा’ आहे. ‘डॉग शो’मध्ये ज्यांनी अनेक बक्षिसे पटकावली आहेत, अशा पूर्वजांचा मी वारसदार आहे. माझे जन्मठिकाण म्हणजे दूरवरचे – ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स खेड्यातील कुत्र्यांची पैदास करणारे फार्म. माझा जन्म १६ डिसेंबर, १९९७ रोजी झाला.

मला वाटले होते की, मी त्या शेकडो एकर जागेत आणि त्या टेकड्या असलेल्या वातावरणात मोठा होत, एक दिवस म्हातारा होईन. मग मी या काँक्रीटच्या जंगलात आणि सिंगापूर नावाच्या राज्यात, माझ्या मूळ जागेपासून हजारो मैल दूर कसा आलो? 

ती माझी ही कथा आहे....

माझ्या आईच्या – इवल्याशा आणि धापा टाकणाऱ्या – शरीराची जराही पर्वा न करता मी व आणखी दोन वळवळणारी, केकाटणारी भावंडे या जगात आलो. आमच्या बिचाऱ्या आईला आम्ही ज्या यातना दिल्या त्याचा सूड म्हणूनच की काय, निसर्गाने आम्हाला अचानक तळपत्या पांढऱ्या उजेडाच्या झोतात फेकले. आमच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांना या अशा उजेडाची सवय नव्हती. विलक्षण सुरक्षित असलेल्या आईच्या गर्भाशयातून आम्हाला अचानक बाहेर फेकले गेले, त्यामुळे घाबरून आमचे केकाटणे वाढलेच. जणू आम्ही व्यक्त केलेला हा निषेध होता! अचानक पुढे काय असेल, त्याबद्दलची कोणतीही सूचना न मिळता आम्हाला त्या सुरक्षित जागेतून या नव्या भीतिदायक जगात टाकण्यात आले होते.

चेहर्यांचा एक अंधूक समुद्र आमच्याभोवती गोळा झाला आणि मग ‘ओहो, पाहा! ती किती छान आहेत, विशेषत: हे एक!’ अशा आरोळ्या आमच्या कानावर आदळू लागल्या. ‘अरे देवा, या मानवी राक्षसांना इतके मोठ्याने बोलावे लागते का?’ माझ्या नवजात, कोवळ्या कानांनी त्याचा निषेध केला. माझ्या शांत जगात अचानक केलेल्या घुसखोरीने चिडून, मी माझ्या फुफ्फुसांत जेवढी मला शक्य होती, तेवढी हवा भरली आणि मोठ्याने किंचाळलो. मग एक घामेजलेला हात अगदी हळुवारपणे माझे कान थोपटण्यासाठी पोहोचला. त्याला चॉकलेटचा आणि कॉण्डी फ्लॉसचा वास येत होता. या साध्याशा कृतीने शरीरभर एक समाधानाचा प्रवाह पसरला.

जणू एक चुंबकीयशक्ती आमच्या दोघांतून वाहात होती आणि माझ्यावर कुणीतरी प्रेम करतोय याची जाणीव होऊन मला आश्वस्त, सुरक्षित वाटू लागले. मला हे त्या वेळी माहीत नव्हते की, आयुष्यभराच्या मानवी प्रेमाचा हा माझा पहिला संपर्क होता. त्यामुळे मला या वाढत्या, गोंधळवून टाकणाऱ्या जगात काहीसे सुरक्षित आणि आरामदायी वाटत होते. मग मी ओळखले की, हे बेढब मोठ्याने बोलणारे राक्षस मला आवडणार आहेत.

माझ्या जीवनातील सुरुवातीचे काहीसे उत्तेजित दिवस जगाची ओळख करून घेण्यात गेले. हे जग तऱ्हेवाईक आवाज, वास आणि दृश्य यांनी गजबजलेले होते. शेतातील माणसे व प्राणी यांचे अनोखे मिश्रण त्यात होते. पहिल्या आठवड्यानंतर मी असे ठरवले की, मनुष्यप्राणी हा जास्त बरा आहे. इतर प्राण्यांचा वेळ स्वत:चे संरक्षण करणे आणि स्वत:ची काळजी घेणे यातच इतका जायचा की, त्यांना इतर प्राण्यांची काळजी घेण्याइतकी फुरसद नसायची. याच्या उलट मनुष्यप्राणी हे आमची काळजी घेताना दिसायचे! जणू त्यांच्या जीवनातील कामाचाच तो एक भाग होता.

अर्थात मग मला कळले की, घेतली जाणारी काळजी तशी फुकाफुकी नव्हती, त्यातही काही हेतू होता...! जेव्हा माझे वय फक्त एक आठवडा – इतके होते, तेव्हा यापैकी गोष्टी मला माहीत नसणे, तसेच लोकांबद्दल आणि जीवनाबद्दल साधा-सरळ दृष्टिकोन असणे, हेही तसे क्षम्य होते! माझ्या दृष्टीने शेत हे माझे घर होते आणि ज्या लोकांच्या ते मालकीचे होते आणि जे ते चालवत होते, ते माझे कुटुंब होते; नंतर मात्र मी फुकट घालवलेल्या वेळेची भरपाई झटकन केली. मला प्रत्येक गोष्टीचा व प्रत्येकाचा संशय येऊ लागला! त्या वेळी माझ्या कुटुंबांत एवढी कुत्री का होती आणि ती वेगवेगळी का दिसत होती, हे मला माहीत नव्हते. मला लांब केस आहेत आणि पावडरच्या पफप्रमाणे मी गोल आहे. सर्व प्रकारचे लोक माझ्याभोवती गर्दी करून ओरडत असतात, ‘ओहो, बघा, तो किती गोड आहे!’ 

शेवटी-शेवटी मला त्या शब्दांबद्दल अगदी वैतागच आला. परंतु तिथे दुसरी अनेक कुत्र्यांची पिल्ले होती – जी अगदी कुरूप होती. त्यांचे मोठाले डोळे बाहेर आल्यासारखे दिसत होते. चेहरा गोल, चपटा आणि त्यावर गाठी असलेला आणि नाकाच्या जागी फक्त दोन भोकंच! तर काही अंगावर अजिबात केस नसलेली, लुकडी आणि थोट्या शेपटीची, पण तरीही लोकांना ती हवी असायची. आमच्या शेजारच्या निराळ्या भागात असलेल्या कुटुंबात अशी केस नसलेली, लुकडी सहा पिल्ले होती. त्यांना शेपूटच नव्हती आणि तरीही लोक त्या भयानक नमुन्यांवर लाळ गाळत कौतुक करताना मी ऐकायचो. ते म्हणत, ‘त्यांचे पाय आणि त्यांच्या शरीराची ठेवण तर पाहा. उत्तम जात आणि त्याची लक्षणे त्यांच्यात आत्तापासून दिसत आहेत.’ मग एक दिवस एक माणूस आला आणि तो त्या सहाही पिल्लांनािं पजऱ्यात घालून घेऊन गेला; नंतर मी त्यांना पुन्हा कधीही पाहिले नाही. त्यांची आई काही रात्री रडली आणि मुसमुसत राहिली; तिला त्या दूध पाजणाऱ्या आयांच्या जागेपासून दूर नेले गेले तरीही अनेकवेळा!

दुसऱ्या एका कुटुंबाने त्यांची ती जागा घेईपर्यंत ती आपल्या पिल्लांना बघण्यासाठी परत यायची. यामुळे खिन्न झालेल्या माझ्या आईने आम्हाला अगदी तिच्या जवळ ठेवायला सुरुवात केली. रात्रीच्या वेळी ती आम्हाला जास्तच घट्ट बिलगून राहायची; जणू काही आम्हालाही कोणीतरी तिच्यापासून दूर नेईल, अशी तिला भीती वाटायची. सुदैवाने आम्हाला त्याची कल्पना नव्हती, पण त्या शेतावरची सर्व परिस्थिती माझ्या आईला माहीत होती असे दिसते.

लोक तिथे सारखे येत असायचे, ते आम्हाला आणि इतर कुत्र्यांच्या पिल्लांना बघण्यासाठी. ‘ही कुत्र्यांच्या पिल्लांची निपज अगदी उत्तम आणि निर्यातीस योग्य आहे.’ अशी बेचैन करणारी संभाषणेही क्वचित कानावर पडायची. नंतर मला कळले की, बिल – तो तगडा, उग्र दिसणारा माणूस या सर्व जागेचा आणि आमचा मालक होता. तो कुत्र्यांची निपज करायचा आणि त्याच्या दृष्टीने आम्ही निव्वळ ‘वस्तू’ होतो. आमचे जन्म घरगुती पाळीव प्राणी म्हणून दूरवरच्या ठिकाणी विकण्यासाठी अगदी काळजीपूर्वक योजलेले असायचे. आम्ही जेवढे अधिक सशक्त व निरोगी तेवढी आमची रवानगी दूर होणार. जरी माझ्या दोन बहिणी होत्या आणि मला काही चाहत्यांचा तुटवडा नव्हता, तरी मला एक खास चाहता होता – तिचे नाव ‘सू’ होते – बिलची आठ वर्षांची मुलगी. तिला आमच्याबरोबर खेळण्याची परवानगी नव्हती, तरी ती खेळायची. प्रत्येक दिवशी – जेव्हा ती चकचकीत पिवळ्या रंगाच्या शाळेची बस तिला सोडून परत जायची तेव्हा ती धावत, तिचे लाल शेपटे उडवत आमच्या जागेकडे यायची आणि जवळ-जवळ एक तास मला गोंजारण्यात घालवायची, माझ्या पोटाला इतक्या गुदगुल्या करायची की, मी अगदी खदखदत लोळण घ्यायचो. तिचे बाकीच्या पिल्लांवरही प्रेम होते, पण मी तिचा जास्त आवडता होतो. 

No comments:

Post a comment