Friday, 19 September 2014

मेहता पब्लिशिंग पब्लिशिंग हाऊसचे' संचालक श्री. सुनिल मेहता यांची एनजेपीच्यावतीने श्री. शरद गोगटे यांनी घेतलेली मुलाखत

पुण्यातील सर्वांत मोठी प्रकाशनसंस्था असलेल्या' मेहता पब्लिशिंग पब्लिशिंग हाऊसचे' संचालक श्री. सुनिल मेहता यांची एनजेपीच्यावतीने श्री. शरद गोगटे यांनी घेतलेली मुलाखत

शरद गोगटे – आज मेहता पब्लिशिंग हाऊस ही मराठीतील एक मोठी प्रकाशनसंस्था आहे. कदाचित मराठीतील सर्वांत मोठी म्हणता येईल अशी संस्था आहे. याची सुरुवात साधारण १९७६ साली झाली. आज या व्यवसायाला ३५-३६ वर्षे झाली आहेत. इतक्या सातत्यानं आणि सतत प्रगतीपर असलेली अशी ही संस्था आहे.१९८६ पासून या प्रकाशनसंस्थेची जबाबदारी श्री. सुनिल मेहता सांभाळत आहेत. अशा प्रतिथयश संस्थेच्या संचालकाशी बोलणे हा एक चांगला अनुभव आहे. नॉट जस्ट पब्लिशिंग तर्फे सुनिल मेहतांची मुलाखत घ्यायची ठरविली आहे. थेट त्यांनाच विचारू या की व्यवसायाशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध कधी आला?
सुनील मेहता – १९६६ मध्ये कोल्हापूरमध्ये सुरू केलेल्या अजब पुस्तकालयात मला १९८० पासून पप्पांनी (श्री. अनिल मेहता) दुकानाची जबाबदारी सांभाळायला सांगितले. कॅश काउंटर आणि बालभारतीतील पुस्तक आणायची-द्यायची अशी जबाबदारी त्यावेळी वडलांनी माझ्यावर टाकली. तेव्हापासून माझं पुस्तक व्यवसायातले जीवन सुरू झाले. १९८६ ला बी.कॉम पूर्ण केल्यावर मेहता पब्लिशिंग हाऊसची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपविली. तेव्हापासून मी ही प्रकाशनसंस्था सांभाळत आहे.

शरद गोगटे – जेव्हा दुकानात पहिल्यांदा बसला होतात तेव्हा हाच व्यवसाय आपल्याला करायचा की दुसराही कोणता असा काही विचार केला होता का?
सुनील मेहता – आठवीनंतर पुस्तकाच्या दुकानात बसायचो. नंतर कॅश काउंटरची जबाबदारी दिली. तेव्हा असे कुठलेच ध्येय नव्हते, जे पारंपारिक चाललेलं होतं ते सांभाळत होतो. त्यातूनच वडलांनी ही जाणिव करून दिली तुझे ध्येय हेच आहे ही जबाबदारी पुढे तू सांभाळायला हवीस. भावंडांनी आणि आम्ही हे जे उभं केलंय ते पुढे नेणं हे तुझे कर्तव्य आहे. त्यामुळे मी या व्यवसायात आपोआपच ओढला गेलो.

शरद गोगटे – त्यांनी सांगितलं आणि तुला ते पटलं की तू त्याच्यावर काही वेगळा विचार केलास?
सुनिल मेहता – पुस्तकाच्या दुकानातला कॅश काउंटर सांभाळताना व इतर कामं करताना मी दुकानात रुळलो होतो. पण त्यांनी जेव्हा मला एकदम पुण्याला जाऊन मेहता पाqब्लशिंगची जबाबदारी घ्यायला सांगितली तेव्हा मला ते आवडलं नाही. तसे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेही. पण आता पुण्यात नव्यानी व्यवसाय सुरू केला आहे तो कोण सांभाळणार हे वडलांनी विचारल्यानंतर मी धाडस केलं. वडील सांगताहेत ते ऐवूâन बघू म्हणून मी या व्यवसायात आलो. 

शरद गोगटे – वडलांशिवाय तुला कुणी या व्यवसायात यावं हे पटवून दिलं का ?
सुनील मेहता – सुट्टीत दुकानात जात होतो. तेव्हा त्यांनी पुण्यात व्यवसाय सुरू केला होता. मला एकूण व्यवहाराची कल्पना होती. मला पुण्याला जावं असं सुचविले. मला कोल्हापूरात राहून व्यवसाय सांभाळायची इच्छा होती. पुण्याला जायला नाखूष होतो. पण आईनं मला समजावलं. पुण्याला तुझ्यासाठी त्यांनी धाडस केलयं. तुला जायलाच हवं. वडलांना मदत करणं हे पहिले कर्तव्य आहे. तुझं शिक्षण पुण्यात झालयं. त्यामागेही तू पुढे-मागे पुण्यात स्थायिक होशील आणि प्रकाशन व्यवसायात मदत करशील अशीच कामना होती. आणि तो तू पुढे न्यावा असे मला वाटते.

शरद गोगटे – पुण्यात व्यवसाय करायला आईने प्रवृत्त केले तर! परंतु स्वतंत्रपणे पुस्तकाच्या दुकानात काम करताना ग्रंथ व्यवसायाबद्दल काही आकर्षण, कुतुहल निर्माण झाले होते का?
सुनील मेहता – कोल्हापूरच्या दुकानात बसलेलो असताना ख्यातनाम साहित्यिक रणजित देसाई सतत अजब
पुस्तकालयाच्या दुकानात येत असत, तेव्हा मी पाहत होतो. स्वामी, श्रीमानयोगी लिहणारा हा मोठा लेखक सतत येतो. वडील त्यांच्याशी किती चांगुलपणाने वागतात. त्यांचे आमच्याशी संवाद किती होताहेत. त्यामुळे ते पाहणं, अनुभवणं हा मोठा आकर्षणाचाच विषय होता. लहान मुलांना फिल्म अ‍ॅक्टर बघण्याची जशी आवड असते तसे मला काही लेखकांना बघणं, अनुभवणं हे एक आकर्षण होतं. त्या काळात मी सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईकांची पुस्तवंâ वाचायचो, तेव्हा मला वाटायचं, या लोकांना बघावं. त्यातूनच रणजित देसाई सारखा मोठा लेखक दुकानात येतोय, बसतोय, बोलतोय याचे आकर्षण नक्कीच होते.

शरद गोगटे – असे काही किस्से घडले का की ज्यामुळे या व्यवसायाबद्दल अधिक कुतूहल वाढले?
सुनील मेहता – त्यावेळी माझ्या वडलांनी अरुण शौरी, नानी पालखीवाला यांची पुण्यात आणि कोल्हापुरात व्याख्यानं ठेवली होती. वपुंच्या एका पुस्तकाचा प्रकाशन समारंभ त्यांच्या हस्ते झाला होता. वडलांनी प्रथमच या दोन लोकप्रिय लेखकांना कोल्हापुरात, पुण्यात आणलं हे मी अनुभवलं, पाहिलं. त्यातून जाणवायला लागलं अजून या व्यवसायात काही ग्लॅमर आहे. प्रकाशन व्यवसायाकडे आकर्षित होण्यातलं तेही एक प्रमुख कारण होतं. 

शरद गोगटे – प्रकाशन व्यवसायाची जबाबदारी घेऊन तू जेव्हा या व्यवसायात आलास तो तू कसा हाताळायला लागलास – स्वतंत्रपणे की कुणी मदतीला होतं?
सुनील मेहता – ऑगस्ट, १९८६ला व्यवसाय हाती घेतला तेव्हा दोन सहाय्यक कर्मचारी होते. वडलांनी अचानक माझ्यावर हा सारा व्यवसाय सोपवला. हा व्यवसाय कसा चालविला जातो हे शिकण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. पहिले पंधरा दिवस हिशेबाशिवाय मला त्यातलं काहीच समजत नव्हते. आठवडाभर रोज रात्री वडलांना फोन करायचो ते सांगतील त्याच्या नोट्स घ्यायच्या. त्याचा अभ्यास करून ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीत होतो. यातूनच आपण हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकू असा विश्वास वाटायला लागला. वडील पुण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या संभाषणाचा तू कसा उपयोग केलास याबद्दल विचारणा केली. मी सांगितलं की प्रश्न पडला की मी नोटस् बघतो, त्याचे उत्तर सापडत. हळूहळू आत्मविश्वासही वाढत गेला.

शरद गोगटे – त्यावेळच्या परिस्थितीसारखीच आजही तुमच्या व्यवसायातील स्थिती आहे. आज तुझा मुलगा अखिल या व्यवसायात येणार आहे का? त्यावेळच्या पप्पांच्या आणि तुझ्या वयातले अंतर, काहीशी तशीच स्थिती आजही तुझ्यात आणि अखिलमध्ये आहे. या दोन परिस्थितीकडे तू कसे पाहातोस? 
सुनील मेहता – त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी तंत्रज्ञान एवढे प्रगत नव्हते. पारंपारिकपणा तंत्रातही होता. आज उलटे आहे. काळ खूप बदलला आहे. जेव्हा मला वडील शिकवत होते तेव्हा प्रगत तंत्राचा अभाव होता. आज तंत्र खूपच प्रगत अवस्थेत आहे. अखिलच्या संदर्भात विचार करता तंत्राचा उपयोग, वाढता विस्तार आणि त्याचे बी.बी.ए.चे शिक्षण आणि वर्ष-दीड वर्षात त्याने जे अनुभवले, पाहिले आणि आजोबांकडून ऐकलेले आहे ते सर्व पाहता तो नक्कीच माझ्या व्यवसायात मला मदत करेल. तो व्यवसाय पुढे नेईल. तो व्यवसायात आवडीने लक्ष घालतोय. 

शरद गोगटे – अखिलच्या बाबतीत काय म्हणायचे? तो परंपरेने व्यवसायात येतो आहे की, स्वत:ची आवड जाणून तो यात येतो आहे?
सुनील मेहता – त्याला या व्यवयासाची आवड आहे. व्यवसायचे महत्त्व त्याला पटले आहे. आजोबांनी किंवा वडलांनी जे उभं केलंय त्यात त्याला ग्लॅमरही दिसलेलं असेल. या व्यवसायातील नवीन संधी दिसताहेत. आजही आमच्याकडे ८-९ लेखक असे जोडले गेले आहेत की, हा व्यवसाय त्याला पुढे न्यावेसे वाटेल. मराठी पुस्तके अधिक प्रमाणात प्रकाशित करण्याबरोबरच माझ्यापेक्षाही त्याला अधिक पुढची पाऊले दिसत असतील.

शरद गोगटे – मेहता पब्लिशिंग हाऊस हे व्यवसायातील एक अग्रगण्य नाव आहे. संस्थेची जी आजची प्रतिमा आहे ती मुख्यत: भाषांतराचे प्रकाशक अशी आहे. ती प्रकाशन व्यवसायातील तुमच्या धोरणांमुळे झालेली असणार. ते धोरण कुठलं. 
सुनील मेहता – आमच्या प्रकाशन संस्थेबाबतीत म्हणाल तर, मी स्वत:च स्वत:चा प्रतिस्पर्धी आहे. वडलांनी अनुवादित पुस्तकाचे काम सुरू केले. त्याकाळात पत्रव्यवहारामुळे प्रकाशनकाळ लांबला जायचा. अनुवादित पुस्तकांचे हक्क लवकर प्राप्त व्हायचे नाहीत. आज इंटरनेट, ई-मेलमुळे अनुवादित पुस्तकांचे हक्क मिळायला वेळ लागत नाही. अनुवादित पुस्तकात विषय इतके विविध आहेत. मराठीत तसे विषय हाताळणाऱ्या लेखकांचा अभाव आहे. अनुवादित पुस्तकातून मराठी वाचकाला उत्सुकता वाटेल असे विषय असतात, शैलीही असते म्हणूनच ती काढली जातात. अनुवादित पुस्तके हाच मेहता पब्लिशिंग हाऊसचा महत्त्वाचा भाग आहे. असे मी म्हणणार नाही. पण विविध विषय देण्यात वेगळा आनंद आहे म्हणून हे काम चालू ठेवले आहे. भाषांतरीत पुस्तकातून जे वेगळे प्रयोग आणि विषय वाचकांना देता येतात म्हणून भाषांतर किंवा अनुवादित पुस्तके हा प्रकाशन व्यवसायातला महत्त्वाचा विषय मानायला हवा.

शरद गोगटे – आरंभी भाषांतराकडे वळलात त्याला इतर काही कारणं होती का?
सुनील मेहता – अनेक मराठी यशस्वी लेखक त्याकाळातील प्रथितयश प्रकाशन संस्थेसाठी बांधील होते. नवीन लेखक शोधणे. त्यावर संस्कार करणं. त्यासाठीचे संपादक विंâवा शुद्धलेखन तपासणारे प्रुफरिडर न मिळणं ह्या काही अडचणी होत्या. म्हणून अनुवादित पुस्तकांची प्रकाशने आपण वाढवावीत असे वाटले. त्यात वाव आहे असे वाटले म्हणून ते सुरू केले.

शरद गोगटे – तुम्ही आज यशस्वी झाल्यानंतर अनेक नवे लेखक येत असतील. त्यामुळे तुमच्या त्या पूर्वीच्या धोरणात काही बदल झाला आहे का?
सुनील मेहता – धोरणात बदल झालेला नाही; पण पुस्तकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनुवादित पुस्तके त्याचप्रमाणे मूळ लेखकांची पुस्तके काढण्यासाठी आज आम्ही पूर्ण सज्ज झालेलो आहोत. आमच्या व्यवसायातल्या कौशल्यात वाढ झाली आहे. धोरणात बदल करण्यापेक्षा जास्तीत जास्त पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्यावर अधिक भर दिला गेला आहे.

शरद गोगटे – याच उद्देशाने तुम्ही ज्या मान्यवर लेखकांची पुस्तके वाचकाला मिळत नव्हती त्यांची पुस्तके एकदम घ्यायची असे काही धोरण स्विकारले आहे का?
सुनील मेहता – जेव्हा १९९९-२०००मध्ये वपु गेले तेव्हा असं वाटलं होतं की, वपूंची सर्व पुस्तके एका प्रकाशनाकडून प्रकाशित झाली तर वाचकांना आणि पुस्तक विक्रेत्यांनाही ते सोईस्कर होईल. जर एका लेखकाची सर्व पुस्तके एके ठिकाणी मिळाली तर त्यापेक्षा अधिक आनंद कुठला? त्याप्रमाणे वपु काळे, शंकर पाटील तसेच द. मा. मिरासदारांची सर्व पुस्तके आज आम्ही काढली आहेत. असंही झालं असेल जे जे लेखक त्या-त्या प्रकाशकांकडे होते त्या प्रकाशकांना पुन्हा त्यांची पुस्तके काढण्यात काही कारणानं शक्य झालं नसेल त्यामुळे त्या लेखकांनी आपले प्रकाशही बदलले असावेत. ती संधी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळाली. पुस्तकांच्या हिशेबाबाबतीत आमचा पारदर्शी व्यवहार किंवा पुस्तकांचे योग्य मार्केटिंगमुले  ते लेखकही खूष झाले असतील आणि त्यांनी ही सारी पुस्तके आम्हाला दिली असतील.

शरद गोगटे – तुम्ही ज्या लेखकांची संपूर्ण पुस्तके प्रकाशित करीत आहात असे किती लेखक तुमच्याकडे आहेत त्यांची यादी सांगशील कां?
सुनील मेहता – रणजित देसाई, वि. स. खांडेकर, आनंद यादव, व.पु.काळे, शंकर पाटील आहेत. द. मा. मिरासदार आहेत. आता व्यंकटेश माडगूळकर आहेत. त्यांची ४१ पुस्तके मे मध्ये प्रकाशित होत आहेत. अनुवादित पैकी किरण बेदी, अरूण शौरी, सुधा मूर्ती अशा अनेक लेखकांची सर्व पुस्तके आम्ही प्रकाशित केली आहेत. अशा अनेक लेखकांच्या पुस्तकांचे चांगल्या प्रकारे लोक स्वागत करीत आहेत. एकत्रित पुस्तके मिळण्याचा फायदा वाचकांना नक्कीच आहे. पुस्तक विक्रेत्यांना त्याहून अधिक जास्त आहे.

शरद गोगटे – विक्रेत्याला फायदा यात कसा?
सुनील मेहता – विक्रेत्याला असं वाटत असतं की, एकाच प्रकाशकाकडे जर पुस्तके मिळाली तर त्याचा फायदा अधिक आहे. त्यांना इतर ठिकाणी जावून पुस्तके गोळा करण्याचे कष्ट वाचतात व आर्थिक कमाईही अधिक होते. म्हणून एका प्रकाशकाकडे ती एकत्रित मिळण्यातला आनंद विक्रेत्याला केव्हाही अधिक असतो.

शरद गोगटे – भाषांतर प्रकाशक ही तुमची प्रतिमा आहे म्हणून विचारतो की, सध्याच्या यादीत एकूण तुमच्या प्रकाशनात भाषांतरीत किती आणि मूळ पुस्तके किती?
सुनिल मेहता – मूळ पुस्तकांचे प्रमाण २५³ आहे. ७५³ अनुवादित पुस्तके येताहेत. अनुवादित पुस्तकात सध्या मराठीत खूपच फोफावला आहे. तो प्रकार म्हणजे 'सेल्फ हेल्प'चा. त्यामुळे त्या पद्धतीची पुस्तके खूप येत आहेत. आज महाराष्ट्रातल्या वाचकाला तशा पद्धतीची पुस्तके पाहिजे आहेत. ती आपण प्रकाशित करीत आहोत.

शरद गोगटे – सध्या मोठाल्या लेखकांची संपूर्ण पुस्तके प्रकाशित करीत आहात त्यामुळे या प्रमाणात काही फरक पडला आहे का?
सुनील मेहता – सध्या दोन वर्षांत मूळ लेखकांची संपूर्ण पुस्तके प्रकाशित करत असल्यामुळे भाषांतरीत आणि मूळ लेखकांची पुस्तके यांचे प्रमाण सारखेच आहे. कॅटलॉग वाईज पाहता हे दोन्ही सेमच झाले आहेत.

शरद गोगटे – ह्यापुढच्या व्यवसायाच्या नवीन दिशा किंवा योजना काय आहेत?
सुनील मेहता – दोन महत्त्वाच्या योजनांमध्ये इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन आणि मराठी पुस्तकांची ई-बुक्स देणे. इंग्लिश पुस्तकांना जागतिक बाजारपेठ असल्यामुळे आम्ही इंग्लिश प्रकाशन व्यवसायात पडतो आहोत. प्रादेशिक भाषेतली म्हणजे मराठीतली पुस्तके तंत्रज्ञानाच्या पुढच्या गोष्टी लक्षात घेता ई-बुक्स मध्ये द्यायची आहेत. ती कन्व्हर्ट करून ई-बुक्समध्ये तयार करायची आहेत. तो आमचा आज प्रयत्न आहे. साधारण १५-२० दिवसांत आमची सर्व पुस्तके ई-बुक मध्ये वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. वर्ष-दीड वर्ष या तंत्रात सुयोग्य बदल करण्यासाठी वेळ गेला. आज आमचा तो सगळा प्रयत्न जवळजवळ यशस्वी झालेला आहे. मराठीतली पुस्तके ई-बुकमध्ये कन्व्हर्ट करणे हा मोठा कठीण जॉब होता. आता ते यशस्वी झाल्याने हा ई- बुकचा प्रोजेक्ट पूर्णत्वास जात आहे. मराठीतील ही पहिली प्रकाशनसंस्था असेल जी त्यांची मराठीतील सर्व पुस्तके ई-बुकमध्ये
सादर करेल. तंत्राच्या दृष्टीने त्याचे काम सुरू आहे. त्याची प्रात्यक्षिके घेतली आणि ई-बुक आता सिद्ध होऊन ती अधिकृतरित्या आमच्या वेबसाईटवर दिसू लागतील.

शरद गोगटे – इंग्रजी प्रकाशन व्यवसायात पडताना कोणत्या स्वरूपाची पुस्तके तुम्ही करणार आहात?
सुनील मेहता – मूळ इंग्रजी लेखक आज आमच्याकडे येतील असे नाही कारण इंग्रजी प्रकाशन व्यवसायात आम्ही नवीन आहोत. इंग्लिश रि-प्रिंट राईट्स म्हणजे भारतासाठी, सार्वâ देशांसाठी लंडन, यु.एस.ए मधले हक्क विकत घेऊन त्या देशात ती पुस्तके वितरीत करणार आहोत. कदाचित त्यानंतर इंग्रजी पुस्तके प्रकाशनाचा व्यवसाय मोठा होत जाईल.

शरद गोगटे – इंग्रजी ज्या पुस्तकांचे हक्क घेतलेत ती तिकडेच छापलेली पुस्तके इकडे वितरीत करणार आहात की काय?
सुनील मेहता – तिकडे प्रकाशित झालेली पुस्तके आम्ही भारतात छापून कमी किमतीला वाचकांना उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. परदेशातून येणारी पुस्तके साधारण ७०० ते ८०० रुपये किंमतीत असतात. भारतात जर ती छापली तर ती कमी किंमतीत म्हणजे २५०-३५०रुपयात वाचकांना मिळू शकतील.

शरद गोगटे – याशिवाय भारतीय भाषांमधली कन्नड, बंगाली, हिंदीतली पुस्तकांची भाषांतरे तुम्ही मराठीत केलेली आहेत. मराठीतील पुस्तके बाहेर न्यायचा तुमचा प्रयत्न आहे का?
सुनील मेहता – असा विचार आहे. त्यासाठी एक टीम तयार करत आहोत. जी आमची बेस्ट सेलर्स असतील किंवा इतर भाषात वाचकाला आवडणारी असतील. ती त्या त्या भाषेत जावीत यासाठी प्रयत्न करणार आहोत. इंग्रजीपेक्षा इतर भाषेत ती पुस्तके जाऊ शकतात. इंग्रजी करून ते पुस्तक जागतिक पुस्तकांच्या दृष्टीने योग्य नसले तरी इतर भाषेत जावू शकेल. तशी मराठी भाषेतील पुस्तके भारतीय भाषेत जावू शकतील अशी पुस्तके तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.

शरद गोगटे – इंग्रजी पुस्तकात तुम्ही आपल्याकडच्या इंग्रजी लेखकांची पुस्तके काढणार आहात काय?
सुनील मेहता – यासंदर्भात अजून विचार केलेला नाही; पण काही गोष्टी अशा आहेत की, जोपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाहीत तोपर्यंत त्याबाबत काही ठोस काम कसं अवघड असतं. पुढे हाही विचार नक्की करू.

शरद गोगटे – बरेच भारतीय लेखक चांगल्यापैकी इंग्लिश पुस्तके लिहून यशस्वी झाले आहेत. तुम्ही अशा लेखकांना वाव देणार आहात काय?
सुनील मेहता – असा जर मूळ इंग्रजी लेखक मिळाला आणि त्याची पुस्तके प्रकाशित करण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच करेन. पण त्याबाबत एक टीम तयार करून मग या लेखकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. जशी ही टीम तयार होईल तसे मोठे लेखकही आम्हाला मिळतील. त्यासाठी पाया तयार करायला हवा. त्यासाठी आम्हाला असे लेखक बघायला लागणारच आहेत ज्यांच्यामुळे कदाचित आमचं नावही होऊ शकेल. अशा लेखकांच्या शोधात आम्ही आहोतच.

शरद गोगटे – इंग्लिशचं मार्केट. त्याचे आकर्षण आणि ते फिल्ड एवढे मोठे आहे की त्याकडे तुम्ही वळल्यावर मराठीकडे दुर्लक्ष कराल अशी मला धास्ती वाटते?
सुनिल मेहता – मला नाही वाटत असे होईल. कारण माझ्याकडे मराठीतले प्रस्थापित जे ९-१० लेखक आहेत. त्या लेखकांसाठी काम करायला मला आयुष्यभर आनंद वाटेल. मराठीकडे दुर्लक्ष करणं चुकीचे ठरेल. याचं कारण ज्या भाषेनी तुम्ही वर आलात. ती भाषा सोडून तुम्ही इंग्रजीकडे जागतिक बाजारपेठ उपलब्ध होईल म्हणून जाणं चुकीचं असेल. या मराठी लेखकांना कायम जिवंत ठेवणं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ते काम मला प्रथम सांभाळायचे आहे. मग इतर भाषांकडे मी वळेन.

शरद गोगटे – मराठीतले अनेक लेखक खूप काही वेगवेगळ्या विषयावर लिहित आहेत. त्यांना तुम्ही प्रोत्साहन देणार आहात का? प्रकाशन क्षेत्र जोपासून त्यात या चांगल्या नव्या लेखकांची भर घालणार आहात का?
सुनील मेहता – आज नवे लेखक बरेच आहेत. सेल्फ हेल्प, मेडिटेशन, योगावरची पुस्तके असतील किंवा काही
आत्मचरित्रे असतील. अशा पद्धतीच्या पुस्तकांच्या लेखनाचे प्रमाण आज जास्त आहे. विषय कुठलाही असो, पुस्तक चांगलं असणे हे महत्त्वाचे आहे. चांगल्या लेखनावर चांगले संपादकीय संस्कार करून ते चांगल्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहचविणे हे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे जेवढे लेखक येतील त्या प्रत्येकाचा विचार आमच्या प्रकाशन संस्थेतर्फेकेला  जाईल. चांगली पुस्तके नक्कीच वाचकांपर्यंत पोचविली जातील.

शरद गोगटे – काहीसे दुर्लक्षित क्षेत्र म्हणजे लहान मुलांसाठाची पुस्तके. त्यातही विशेषत: पौंगंडावस्थेतील विद्याथ्र्यांसाठीची पुस्तके ही आपल्याकडे फारशी नाही दिसत. यासाठी काही तुम्ही प्रयत्न करत आहात काय?
सुनील मेहता – तीन वर्षांपूर्वी लहान मुलांसाठी जवळ-जवळ १५० पुस्तके काढली. ती सगळी रंगीत काढली. त्याला पूर्णपणे यश मिळाले असे मी म्हणणार नाही; पण ती चांगल्या पद्धतीने वाचली गेली. तुम्ही म्हणताय तसं पौंगंडावस्थेतील मुलांसाठी पुस्तके मराठीत नाहीत. त्यासाठी मी काही लेखकांशी बोललो आहे. कदाचित या वर्षभरात त्या सगळ्या कथा, चित्रांसहीत सगळी पुस्तक माझ्याकडे तयार होऊन येतील. मग ती प्रकाशित करेन. मला मुलांसाठी खूप काम करावेसे वाटते.

शरद गोगटे – तुम्ही जे मोठे लेखक एकत्र घेतलेत ते तुमच्याकडे का आले? इतर प्रकाशकांकडे का नाही गेले? त्यांनी आधीचा प्रकाशक सोडायचे ठरविल्यानंतर त्यांनी मेहता पाqब्लशिंग हाऊसच का निवडले?
सुनील मेहता – याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विश्वास. पुस्तके वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आमच्याकडचे जे प्रस्थापित लेखक आहेत ते खूष आहेत. मला वाटतं जे लेखक आत्ता माझ्याकडे येताहेत. ते जुन्या आमच्या लेखकांना फॉलो करताहेत. महत्त्वाचे म्हणजे लेखकांचा विश्वास निर्माण करणं. त्यांची पुस्तके वाचकांपर्यंत पोचली जातात हे त्यांना दाखविणे. त्यांचं मानधन वेळेवर देणं या ज्या काही व्यावसायिक गोष्टी आहेत त्या मी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित हे सगळं होत असावं.

शरद गोगटे – थोडक्यात म्हणजे तुमची व्यावसायीक प्रकाशक म्हणून जी प्रतिमा आहे ती महत्त्वाची आहे. यातले महत्त्वाचे घटक कोणते?
सुनील मेहता – त्या व्यवसायातली गुणवत्ता महत्त्वाची आहे. प्रकाशन व्यावसायातली तुमची बांधणी मजबूत हवी. हा व्यवसाय इतर व्यवसायांसारखा नाही. कुठेही जाहिरात करा. तुमची पुस्तके विकली जातील असं नाही. त्याला काही चॅनल्स आहे त्यानुसार तुम्ही जाणं, दुर्गमभागापर्यंत तुमची पुस्तवंâ पोचविणं, पोचती करणं हे महत्त्वाचं आहे. त्याची साखळी आमच्याकडे असल्यामुळे आम्ही लेखकांना समाधान दे शकत आहोत.

शरद गोगटे – थोडक्यात व्यवहारातली पारदर्शकता. तुमची विक्री व्यवस्था आणि एकुंदर व्यवसायातली वागण्याची पद्धत यामुळे तुमच्याकडे लेखक आले. पण याशिवाय तुम्ही कुठे कमी पडताय असं तुम्हाला वाटतं का?
सुनील मेहता – मला असं वाटतं आमच्या पुस्तकाची गती कमी पडत आहे. या पलिकडे आता तरी मला काही जाणवत नाही; पण काही त्रुटी नक्कीच असतील. संपादक पुरेसे नाहीत. प्रुफरिडरची संख्या तशी कमी आहे. यामुळे आमची पुस्तके येण्याचा वेग कमी पडत आहे. काही अडचणी बॅकऑफिसमध्ये असलेल्या त्रुटीमुळे ही येऊ शकतात. त्या दूर करता आल्यास विक्रीव्यवस्थेसकट प्रकाशित पुस्तकात वाढहोण्यास मदत होईल.

शरद गोगटे – व्यवस्थापनाबाबत तुमचे मत काय?
सुनील मेहता – आत्ता तरी मी त्याबाबत समाधानी आहे; पण मला असे वाटते, व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहता इथे खूप काम करण्यासारखे आहे. कारण परदेशी विंâवा दिल्लीतले जरी प्रकाशक बघितले तरी त्यांच्याकडे जे व्यावसायिक कौशल्य किंवा व्यवस्थापन आहे. ते पाहिले म्हणजे आपण खूप कमी पडतो असं वाटतं. कदाचित या व्यवसायात शिकलेल्या व्यक्ती मिळत नाहीत. तुम्हाला ती तयार करायला लागते. त्याला वेळ देण्यासाठी जो वेळ तुमच्याकडे पाहिजे तो वेळ कमी मिळतो म्हणून यात त्रुटी असू शकतील. अखिल माझा मुलगा व्यवसायात आल्यानंतर कदाचित या त्रुटी दूर होतील. याची मला खात्री आहे.


शरद गोगटे – तुमची वितरण व्यवस्था अनेक लोकांपर्यंत पुस्तके पोचविण्याची ताकद याची काय अंग आहेत. ती कुठल्या प्रकारे तुम्ही पुस्तके लोकांपर्यंत पोचविता?
सुनील मेहता – जाहिराती, बुक सेलरकडे ब्रोशर्स, कव्हर्स, ग्रंथालयांना माहिती पुस्तिका जाणे, पोस्टर्स जाणे. प्रत्येक पुस्तक विक्रेत्याची व्यक्तिश: संबंध असणे. गावोगावी जे लहान पुस्तक विव्रेâते आहेत त्यांना प्रोत्साहीत करणं. या सगळ्या गोष्टी आमच्या व्यावसायिक भागात मोडतात. त्या मी तर करतोच पण कर्मचारी वर्गाला हे सारे समजून सांगितल्यामुळे एक स्नेहबंध निर्माण होतो. हाऊस मॅगेझिन, मेहता मराठी ग्रंथजगत यामुळे १०-२०हजार घरात आम्ही पोचत आहोत. त्यामुळे ही विक्री वाढत आहे. त्यामुळे आम्ही लोकांना नवीन पुस्तकांची माहिती पुरवित असतो. साहित्यिक घडामोडी, बातम्या हे सर्व या अंकात असते. थोडक्यात पण वाचनीय अंक केलेला असतो.

शरद गोगटे – प्रादेशिक भाषेतील प्रकाशकांची अडचण म्हणजे गावोगाव चांगले पुस्तक विव्रेâते नाहीत. ह्या दृष्टीने तुमची काही योजना आहे काय?
सुनील मेहता – मेहता मराठी ग्रंथजगतमधून नवीन पुस्तकांचे परिचय देत असतो. यातून ती पुस्तके वाचली आणि घेतली गेलीच पाहिजेत. असं जे वातावरण गं्रथ जगतमधून निर्माण केलेलं आहे. त्यामुळे वाचक इथपर्यंत येतो. वाचकांना आपण चांगली पुस्तके देतो आहोत ही भावना निर्माण होते. गावोगावी पुस्तकांची दुकाने असणे महत्त्वाचे वाटते. कोल्हापूरात वर्ड पॉवर या नावाचं पुस्तकांचं दुकान यात पुस्तकापासून स्टेशनरीपर्यंत, टॉईज सीडी असं एक बुक शॉप चालू करत आहोत त्याची चेन शॉप बेळगाव, सातारा, कराड येथे सुरू करण्याचा आमचा विचार आहे. कदाचित या वर्षभरात तो दिसून येईल. 

शरद गोगटे – चेन शॉपला लागणारी मॅन पॉवरचे काय ?
सुनील मेहता – त्यासाठी कुशल लोक असणे हे गरजेचे आहे. त्यातल्या व्यावसायिक गुणवत्ता आणि व्यवस्थापन कौशल्याचा भाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी विचार करून व्यवस्थापन कौशल्य असलेल्या माणसाच्या जीवावर ते चालवायचा विचार करतोय. त्यांना ट्रेनिंग दिले आहे तसा कर्मचारी वर्ग शोधलाय कॉर्पोरेट विश्वात जसे क्रॉस वल्र्ड, लँड मार्कज्यापद्धतीने काम केलं जातं त्याचपद्धतीने काम आपणही शिकायला हवे. त्यासाठीच हा पहिला प्रयत्न आहे.

शरद गोगटे – प्रयोग स्तुत्य आहे; पण क्रॉस वल्र्डमध्येसुद्धा जो प्रत्यक्ष काउंटरवर माणूस असतो त्याला पुष्कळदा पुस्तकांची पाहिजे तशी माहिती नसते. इंटरनॅशनल, मॅनिज आणि डेक्कन अशा जुन्या बुकस्टॉलमध्ये पुस्तकेच नाही तर मार्गदर्शनही मिळत असे त्यादृष्टीने विचार केला आहे काय?
सुनील मेहता – ह्या चेनशॉपमध्ये तुम्ही ती पुस्तके प्रत्यक्ष चाळू शकता. कितीही वेळ बसून वाचू शकता. येणाऱ्या वाचकाला असे वाटले पाहिजे की, मी इथं येवून कधीही कितीही वेळ पुस्तके हाताळू, वाचू शकतो. विकत घेतलेच पाहिजे असे नाही. ह्या प्रयत्नातून एक वाचकवर्ग निर्माण होणार आहे. ज्याला पुस्तके चाळायला आवडतात तो आपोआपच ती नंतर खरेदी करणार आहे. असा आमचा प्रयत्न राहणार आहे. कर्मचार्यांनी प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा त्या वाचकाने पुस्तकात गुंतून राहणे, वाचणे आणि नंतर ती पुस्तके खरेदी करणे ही प्रक्रिया महत्त्वाची आहे.

शरद गोगटे – चेनशॉपसाठी जसे तुम्ही अशा पद्धतीचे ट्रेनिंग स्टाफला दिले आहे म्हणता. पण तुमच्या प्रकाशन संस्थेतल्या संपादकांना किंवा इतर स्टाफला काही ट्रेनिंग द्यायचा विचार केला आहे काय?
सुनील मेहता – संपादक, प्रुफरिडर यांना ट्रेनिंग द्यायची ही खूप मोठी गरज आहे. प्रादेशिक भाषेत या सगळ्यांचा अभाव सगळीकडेच आहे. त्यांच्यासाठी वर्वâशॉप घेण्याच्या प्रयत्नात आहोत. एखाद्या संस्थेशी टायअप करून हे कोर्सेस सुरू करावेत. जेणे करून या व्यवसायात व्यावसायिकता आहे हे त्या व्यक्तींना समजणे गरजेचे आहे. म्हणून हा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

शरद गोगटे – असे कोणाशी टायअप करण्याचा विचार आहे?
सुनील मेहता – मराठी प्रकाशक संघातर्फे अशा पद्धतीने वर्कशॉप घेण्यासाठी निश्चितच टायअप करू. विद्यापीठ पातळीवर हा एक कोर्स चालू होईल असाही प्रयत्न आहे. त्यातून संपादक, पु्रफरिडर निर्माण होतील. यातून आपली ही मराठी भाषा टिकुन राहिल.

शरद गोगटे – ह्या अतिशय रंजक अशा गप्पा झाल्या. त्याबद्दल तुमचे मन:पूर्वक, माझ्यातर्फे आणि एनजेपी तर्फे आभार.
सुनील मेहता – मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने मुलाखत घेतल्याबद्दल मी सुनिल मेहता एनजेपीचे आणि सर्व वाचकांचे आभार मानतो. धन्यवाद.

(शब्दलेखन – श्री. सुभाष इनामदार, पुणे)

No comments:

Post a comment