Saturday, 13 September 2014

माझी जीवनयात्रा

माझ्या वडिलांचा प्रात:कालीन फेरफटका

मला आठवतंय तेव्हापासून, माझे वडील जैनुलब्दीन यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होत असे. घरातल्या सर्वांच्या आधी ते उठत असत. पहाट फुटतानाच देवाची प्रार्थना करून, ते आमच्या नारळाच्या बागेत लांबवर पायी फिरायला जात असत. आम्ही ‘रामेश्वरम’मध्ये राहायचो. रामेश्वरम म्हणजे तमिळनाडूत एका बेटावरचं छोटंसं मंदिर- ग्राम होतं. आमचं गाव भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असल्यामुळे आमच्याकडे सूर्योदय लवकर होतो. आमचं दिवसाचं वेळापत्रक सूर्योदय -सूर्यास्त व सागराच्या लाटांच्या लयीत चालत असे.

सागराची गाज आमच्या आयुष्यात सदैव भरून असायची. पावसाळ्यात खवळलेल्या दिवसांत वादळं, चक्रीवादळं नियमित घुमत असत. आमचं वडिलोपार्जित घर चांगलं प्रशस्त होतं. चुनखडी आणि विटांचं ते घर एकोणिसाव्या शतकात केव्हातरी बांधलं होतं. आमचं घर सुखसोयींनी युक्त वगैरे कधीच नव्हतं, पण घरात प्रेमाची उब मात्र भरपूर होती. माझ्या वडिलांचा नाव-बांधणीचा व्यवसाय होता. शिवाय, आमच्या घरापासून साधारण चार मैल अंतरावर आमची छोटीशी नारळाची बाग होती. माझे वडील भल्या पहाटे त्या बागेपर्यंत फिरायला जात असत. त्यांचा हा अगदी नित्यक्रम होता, त्यात सहसा खंड पडत नसे. आमचं घर ज्या मशीद मार्गावर होतं, त्या भागात मुख्यत्वे मुस्लिमांची छोटी वस्ती होती. आमच्या गावातील सुप्रसिद्ध प्राचीन मंदिरापासून हा भाग जवळच होता. माझे वडील फिरायला बाहेर पडायचे ते गावातल्या अरुंद गल्ल्या पार करत नारळाच्या बागांच्या दिशेने जाणाऱ्या मोकळ्या रस्त्यांच्या दिशेने जायचे आणि अखेर आमच्या जमिनीच्या छोट्याशा तुकड्यावर लावलेल्या नारळाच्या बागेकडे त्यांची पावलं वळायची.

आजही ते त्या शांत वाटांवरून चालत निघाले आहेत... 

दिवसाच्या अनेकविध मागण्या सुरू होण्याच्या कितीतरी आधीच ते फिरायला बाहेर पडले आहेत, असं चित्र डोळ्यांसमोर आणायचा प्रयत्न मी करत असतो. आमचं कुटुंब खूप मोठं असल्यामुळे आमच्या सगळ्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्यावर नक्कीच अनेक दडपणं असणार. पण त्या वेळी ते लाटांची गाज तन्मयतेने ऐकत असायचे. त्यांच्यासारखेच उगवत्या सूर्यासोबत उठलेले आणि आवतीभोवती विहार करणारे, भक्ष्याच्या शोधार्थ घिरट्या घालणारे पाणपक्षी पाहात असायचे. चालताना बहुधा ते प्रार्थना म्हणत असायचे किंवा कदाचित प्रात:समयी त्यांच्या प्रसन्न, शांत मनात कुटुंबाचा विचार असावा. त्यांच्या या नित्य दीर्घ फेरफटक्यात त्यांच्या मनात काय चाललेलं असतं, हे मी त्यांना कधी विचारलं नाही... कारण आपल्याला लहानपणी आपल्या वडिलांबद्दल अशा प्रकारे विचार करायला वेळ कुठे असतो? पण मला नेहमी वाटत आलं आहे की, या सकाळच्या फेरफटक्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी भर नक्कीच पडली होती... एक असीम शांततेची ही छटा अनोळखी व्यक्तीच्यासुद्धा लक्षात येत असे.

माझ्या वडिलांचं औपचारिक शिक्षण फारसं झालेलं नव्हतं किंवा त्यांना त्यांच्या दीर्घ आयुष्यात फार ऐश्वर्यही कधी लाभलं नाही, पण मला आयुष्यात ज्या अत्यंत सुज्ञ व खरोखर उदार व्यक्ती भेटल्या, त्यामध्ये माझे वडीलही आहेत. आमची मशीद वस्तीच्या केंद्रस्थानी होती. सगळे जण अडीनडीला माझ्या वडिलांकडेच येत असत. त्यांचं ईश्वराशी खरंखुरं नातं आहे, असं लोकांना वाटत असे. मला आठवतंय, मी त्यांच्यासमवेत मशिदीत नमाज पढायला जात असे. ते एकही नमाज चुवूâ देत नसत किंवा तो टाळण्याचा विचारही ते आमच्या मनात येऊ देत नसत. 

नमाजपठण झाल्यानंतर आम्ही बाहेर यायचो तेव्हा बाहेर लोक त्यांची वाट पाहत थांबलेलेच असत... त्यांना माझ्या वडिलांशी बोलायचं असे, आपल्या चिंता-काळज्या सांगायच्या असत. या सर्व स्त्री-पुरुषांना त्यांच्यात काय दिसत असेल? ते कुणी प्रवचनकार नव्हते की शिक्षक! स्वत:ची श्रद्धा व आपल्या धर्माच्या तत्त्वांनुसार जगणारी ती एक व्यक्ती होती. मग ते या लोकांना काय देत होते? आता मला असं वाटतं की, त्यांच्या नुसत्या असण्यानेच हे लोक शांत होत असत आणि त्यांच्या मनात आशेचा किरण जागत असे. माझे वडील या लोकांसाठी प्रार्थना करत असत. बरेच लोक त्यांच्यासमोर पाण्याने भरलेला कुंडा धरत असत. माझे वडील त्या कुंड्यात बोटं बुडवून प्रार्थना करत असत. मग ते पाणी आजारी माणसाला द्यायला नेलं जात असे. पुढे यांपैकी बरेच लोक आमच्या घरी येऊन त्यांच्या जिवलग व्यक्तीला बरं वाटल्याबद्दल माझ्या वडिलांना धन्यवाद देत असत.

No comments:

Post a comment