Friday, 5 September 2014

चिकन सूप फॉर द सोल इंडियन टीचर्स

शिक्षकाच्या पोतडीतून
दहा वर्षांच्या आनंदी मुलींचा गराडा माझ्याभोवती पडलेला होता.

‘मिस, मी सुद्धा!’

‘प्लीज, माझंही नाव लिहा ना!’

‘बांधवगडला आपल्याला खूप वाघ बघायला मिळतील, नाही?’

‘माझे बाबा म्हणत होते तसं!’

‘वॉव! किती मज्जा येईल. मिस, हॉटेलच्या एकाच खोलीत आम्हा मैत्रिणींना झोपता येईल ना? चालेल ना तसं?’

‘आपण फक्त तपकिरी किंवा मळकट हिरव्या रंगाचे शर्ट घालू या. भडक रंग पाहून वाघ घाबरतील.’

‘एऽऽ, आणि वाघाला पाहून किंचाळू नका. नाही तर तो तुमच्या अंगावरच उडी मारेल.’

मुलींची कल्पनाशक्ती मोकाट सुटली असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. त्यांची बालसुलभ उत्सुकता, सळसळता उत्साह पाहून मला हसू आलं. मला त्यांना जवळ घ्यावंसं वाटलं. तेवढ्यात माझं लक्ष त्या मुलीकडे गेलं. ती बारकुडी, ढगळ पोशाख घातलेली छोटी मुलगी मोठ्या आशाळभूतपणानं त्या मुलींकडे पाहात होती.

‘रिनिका, तू पण येणार आहेस ना?’

‘नाही.’

तिच्या त्या तुटक उत्तरानं मी चमकले. तिच्या नकाराचं कारण काय असेल बरं? मी कशी विचारू? पण तिला काही विचारायची माझ्यावर वेळच आली नव्हती. मुलींच्या निरागस, मोकळ्या-ढाकळ्या वृत्तीनं त्यांनी मला सांगितलं, 

``मिस, रिनिका नाही येणार. ती नादार, अनाथ आहे ना?’’ त्या एका शब्दानं सगळाच उलगडा झाला होता. मी आवंढा गिळला. रिनिकाची मान खाली गेली होती. हात थरथरू नयेत, म्हणून तिनं माझं टेबल घट्ट पकडलं होतं. पण ओठांनी दगा दिलाच. ते थरथरू लागले. एक आसू त्या टेबलावर पडलाच.

मी मनाशी काही एक निश्चय केला. तिच्या कमरेभोवती हात घालून तिला जवळ घेतलं. ``मग काय झालं? मिसेस अब्राहम म्हणाल्या की, रिनिका इतकी छान मुलगी आहे की तिला वाघ दाखवायला नेलंच पाहिजे,’’ मी म्हणाले.

‘येऽऽऽ’ मुली आनंदानं चित्कारल्या.

‘मिस, पण या ट्रिपचे पैसे देण्यासाठी मला आई-बाबा नाहीत,’ ती हलक्या, कापNया स्वरात म्हणाली.
‘वेडी कुठची! अगं, तू इतकी चांगली आहेस ना, त्याचंच हे तुला बक्षीस!’

मी कोणालाच न विचारता तिला ही सवलत दिली होती. आमच्या प्रिन्सिपलनी याविषयी कोणतीच आडकाठी आणू नये, अशी मी मनोमन प्रार्थना करत होते.

रिनिकाच्या ओठांवर हसू खेळू लागलं. ती माझ्यावर विसंबून राहिली असेल का? तिनंही काही अपेक्षा ठेवल्या असतील का? तिच्या मैत्रिणींनी तिला मिठीच मारली. मुलींच्या त्या निरागस वर्तनाची मला गंमतच वाटली. क्षणात निष्ठुर; तर दुसऱ्याच क्षणी गळ्यात गळा!

‘चला, निघा बरं सगळ्या! मेट्रनजवळ ही यादी द्या. त्या तुम्हाला तुमची बॅग भरायला मदत करतील,’ मी म्हणाले.

केसांच्या पोनी टेल्स उडवत, उड्या मारत जाणाऱ्या रिनिकाकडे मी पाहात होते.

‘रेहाना, अगदी योग्य तेच केलंस बरं! अगं वेडाबाई आणि आता तुला रडायला काय झालं?’

मला तर आमच्या प्रिाqन्सपलबार्इंना मिठीच मारावी असं वाटत होतं. पण एका शिक्षिकेनं असं काही करणं योग्य दिसलं नसतं आणि ते देखील तिच्या भर ऑफिसमध्येच? छे! काहीतरीच काय! 􀂄

- रेहाना अली
From a Teacher's Desk


No comments:

Post a comment