Saturday, 17 January 2015

अनलाइकली हिरो-ओम पुरी


ओम चौदा वर्षांचा असताना आणि नववीत शिकत असताना त्याचे आयुष्य बदलून टाकणारी एक घटना घडली. उन्हाळ्यातील एके रात्री सर्व कुटुंबीय गच्चीवर झोपले होते. त्या वेळी छोट्या मामीचा पोटाचा भाग उघडा पडल्याचे ओमला दिसले. त्या काळात त्याला मामीविषयी आकर्षण वाटू लागले होते आणि त्या रात्री त्याचा तोल सुटला. तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या पोटाला त्याने घट्ट मिठी मारली. मामी कुशीवर वळली आणि रागाने काहीतरी बडबडली. दुसऱ्या दिवशी सकाळी ओम झोपेतून उठला, तेव्हा त्याचे मामा ताराचंद यांनी त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि काहीही न बोलता त्याला एक सणसणीत थोबाडीत ठेवून दिली. त्याला तातडीने आपले चंबूगबाळे आवरण्यास फर्मावण्यात आले आणि लुधियानाच्या गाडीत त्याला बसवून देण्याचे काम रमेशवर सोपविण्यात आले.

लुधियानात परत आल्यानंतर ओम काही काळ शांत होता, पण त्याचे आई- वडील त्याला काहीच बोलले नाहीत. ओमला त्याचे शिक्षण पूर्ण करायचे असल्याने त्याला मामाच्या घरी परत जाण्याची तीव्र इच्छा होती. काही दिवसांनंतर त्याचा भाऊ वेद त्याला पुन्हा सनौरला घेऊन गेला आणि मामांची समजूत काढण्याचा त्याने प्रयत्न केला. त्यांनी त्याला फारशी दाद दिली नाही अन् ओमदेखील लुधियानाला परत जाणार नाही म्हणून हटून बसला. त्या वेळी शाळांच्या सुट्या सुरू असल्याने ओमला राहण्यासाठी अक्षरश: कोणतीही जागा नव्हती. त्याने शाळेचा रखवालदार जेथू याला पटवून शेवटी व्हरांड्यात झोपण्यासाठी जागा मिळवली. सुटीच्या काळात तो तिथेच राहिला. त्याच्याजवळ असलेल्या पत्र्याच्या पेटीत त्याचे सर्वस्व होते. नरेश कौशल हा मित्र त्या वेळी त्याला रोज घरून जेवण आणून देत असे.

शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर प्रीतमिंसग यांनी पुन्हा ओमच्या मामांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यांचा पवित्रा कायम होता. ओमला स्वत:च्या राहण्याची व्यवस्था स्वत:च बघण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ओमने किशनिंसगच्या घरी आपला मुक्काम हलविला आणि त्याच्या शेतीच्या कामातही तो मदत करू लागला. शाळा संपल्यानंतर तो शिकवण्या घेऊन त्यातून दरमहा सत्तर रुपये कमावू लागला. किशनिंसगकडे राहण्याचे दरमहा वीस रुपये भाडे दिल्यानंतर उरलेल्या पैशांत स्वत:चा खर्च भागविण्याची सवयही त्याने लावून घेतली. अनेकदा विद्याथ्र्यांच्या घरी मिळणारी चहा-बिस्किटे किंवा पराठा अशा नाश्त्यावर तो अवलंबून राहत असे. थोड्याच दिवसांत साठवलेल्या पैशांतून त्याने एक सेकंड हँड सायकल विकत घेतली. या काळात नरेशनेही त्याला आर्थिक मदत केली. शिकवण्यांसाठी जास्त वेळ दिल्याने ओमचे अभ्यासातील लक्ष कमी झाले. आधी अतिशय हुशार असलेला ओम मॅट्रिकच्या परीक्षेत जेमतेम दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाला?

त्या अगदी कोवळ्या वयापासूनच नशिबाने फटकारल्यानंतर आता यापुढे कठोर मेहनतीला पर्याय नाही, हे ओमने पक्के जाणले. स्वत:च्या हिमतीवर राहावे लागूनही ओम त्याच्या मामांचे आजही आभार मानतो. त्या वेळी त्यांनी मदतीचा हात दिला नसता, तर ओम कधीच शाळेत जाऊ शकला नसता. त्याचबरोबर मामांनी त्याला घरातून हाकलून दिले नसते, तर तो पतियाळामध्ये एखाद्या सुपरवायझर पदावर आयुष्यभर खर्डेघाशी करीत राहिला असता. (आपल्या मामांना आपल्या भवितव्याविषयी चर्चा करताना त्याने अनेकदा ऐकले होते.) नाट्यशाळेत तो कधीच गेला नसता.

गंमत म्हणजे सुरुवातीच्या काळात ओमला लष्करात जाण्याची खूप इच्छा होती. पाकिस्तानबरोबरील १९६५च्या युद्धानंतर लुधियानामध्ये सुमारे दोनशे जवानांनी कडक संचलन केले होते. ते पाहून ओम आणि त्याचे मित्र फार भारावून गेले होते. त्याच वेळी छोट्या ओमने `फौजी’ बनण्याचा निश्चय करून टाकला होता. त्याने प्रवेशप्रक्रियेसाठी अर्जही केला होता, परंतु त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षणाचे शुल्क त्याच्या वडलांना परवडणारे नव्हते. त्यामुळे त्याचे ते स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकले नाही. 

रुपेरी पडद्याचे आकर्षणही ओमला स्वस्थ बसू देत नव्हते. नववीच्या वर्गात असताना त्याने एका प्रादेशिक वृत्तपत्रात एका चित्रपटातील भूमिकेसाठी तरुणांना आवाहन करणारी जाहिरात आलेली पाहिली. ओमने त्यासाठी अर्ज केला. त्याला एका रंगीत पोस्टकार्डाद्वारे लखनौला ऑडिशनला येण्यासाठी निमंत्रण आले. ऑडिशनसाठी पन्नास रुपये भरायचे होते. त्या काळी पन्नास रुपये म्हणजे मोठी रक्कम होती. तेवढे पैसे ओमकडे नव्हते आणि लखनौहून परत येण्यासाठी भाड्याचे पैसेही नव्हते. त्यामुळे त्याची रुपेरी पडद्याची स्वप्नेही तिथेच विरली. हा चित्रपट होता `जिओ और जीने दो’. 

No comments:

Post a comment