Thursday, 5 February 2015

संपत पाल, गुलाबी साडीवाली

सकाळचे आठ वाजलेत. मी आवरून तयार होतीय. यांत्रिकपणे माझ्या हालचाली घडतायत. मी माझ्या छोट्याशा अंधाऱ्या खोलीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे माझं मुख्य कार्यालय आहे. मी केसांचा अंबाडा वळते, मग गुलाबी साडीची घडी उघडून ती नेसते. बाहेर जमलेल्या गर्दीचा गलका केव्हापासूनच कानावर पडतोय. त्या सगळ्या जणी युद्धासाठी सज्ज आहेत. माझ्याकडून एक इशारा मिळायचा अवकाश, त्या आणखी मोठ्यानं गर्जत उसळून उठतील!

झालं... माझं आवरून झालंय. मी काठी घेऊन बाहेर जाते. मी दारापाशी येताच आभाळाच्या दिशेनं उंचावलेल्या काठ्यांचं जंगल माझ्या स्वागतासाठी उत्साही आवाजात गगनभेदी गर्जना करतं :
‘‘गुलाबी गँग! गुलाबी गँग!’’
इथला रस्ता सकाळच्या वेळी नेहमी शांत शांत असतो. पण आता तो थरारून गेला आहे. मीही समोरचं दृश्य पाहून उत्साहित होत माझ्या गँगला त्याच घोषणेनं प्रत्युत्तर देते.

अतार्रा गावातल्या उखडलेल्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा छोटी छोटी काँक्रीटची घरं आहेत. हे सारं तडाखेबंद गुलाबी लाटेनं झाकून गेलंय. या मानवतेच्या महापुरात सर्व वयोगटातल्या स्त्रिया आहेत. त्या आमच्या गँगचा गणवेश परिधान करून आल्या आहेत. या साडीनं आम्हाला लोकप्रिय बनवलंय. इथं जवळपास दीडशे बायका एकत्र जमल्या आहेत, कदाचित दोनशेसुद्धा असतील. त्यांच्यापैकी बऱ्याचशा खालच्या जातीतल्या आहेत. त्या अतिशय कष्टात आयुष्य कंठतात, पण त्या स्वखुशीनं घरातून बाहेर पडून माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली कामं सोडून इथं आल्या आहेत. त्यांच्यातल्या काही जणी जवळपासच्या खेड्यांतून बैलगाड्यांतून किंवा टॅक्सी करून आल्या आहेत. काही जणी कुणा गाडीवानाला सोबत नेण्याची विनंती करून, तर कुणी कित्येक किलोमीटर्सचा रात्रभर प्रवास मी, करून इथं पोहोचल्या आहेत. मी माझ्यासोबत निरनिराळ्या खेड्यांत काम करणाऱ्या माझ्या काही सहकारी महिलांना काल रात्री फोन केला होता. त्यानंतर काही तासांतच त्यांनी माझा निरोप सर्वत्र पोहोचवला. कुठं त्यांनी घराची दारं ठोठावून माझा निरोप पोहोचवला, तर काही ठिकाणी चौकाचौकांत जाहीर घोषणा केल्या.
‘‘संपत पालचा निरोप आहे. उद्या सकाळी सर्वप्रथम तिच्या कार्यालयात हजर राहा, गणवेशात!’’
ज्यांना ज्यांना शक्य होतं त्या सगळ्या जणींनी माझ्या आवाहनाला साद दिली होती आणि गुलाबी साडी परिधान करून त्वेषानं हातात काठी पकडून इथं हजेरी लावली होती. माझं न्यायदाता सैन्य... किती विलक्षण दृश्य असतं! उशिरा येणाऱ्यांची प्रतीक्षा करत मी त्यांच्यात मिसळते. माझ्या दलांमध्ये चेतना जागवते. माझ्या ब्लाऊजमध्ये खोचलेला माझा सेलफोन अविरत वाजत असतो. माझ्या गँगमधली एखादी बाई नवा गट आल्याचं सांगत असते किंवा एखादा पत्रकार आम्ही खरंच आगेकूच करतोय ना, याची खातरजमा करत असतो. पत्रकार महोदय आले आहेत. कारण आम्ही जेव्हा जेव्हा धाड टाकायला जातो तेव्हा कायम, न विसरता प्रेसला सूचना देतो. आम्हाला जितके जास्त लोक बघतील तितका आमचा आवाज ऐकला जाण्याची शक्यता जास्त असेल. आज आम्ही खळबळ माजवणार असं मला वाटतंय!

बायका अतिशय थरारून गेल्या आहेत; उतावीळ झाल्या आहेत. सर्वत्र हास्याचे फवारे, किलबिल भरून राहिलीय. पायांचे आवाज येतायत. काही जणी आतुरता शमवण्यासाठी हवेत काठी फिरवण्याचा सराव करतायत. प्रतिस्पध्र्याला भीती घालण्यासाठी किंवा दृष्टी किंचित कमी असलेल्या अधिकाऱ्याला ‘कारण’
दाखवण्यासाठी ‘लाठी’सारखं शस्त्र नाही. या बायका इथं नटण्यामुरडण्याची मौज करायला जमलेल्या नाहीत. त्या इथं जमल्या आहेत ते त्यांना संताप आलाय म्हणून आणि त्यांना हे सर्वांना कळायला हवंय. एव्हाना सूर्य वर आला होता. आमची निघायची वेळ झाली होती. मी निघण्याचा इशारा दिला,
‘‘चलो!’’
मिरवणूक पुढं निघाली. या धुमसत्या लाव्हालोळाच्या अग्रभागी मी आमच्या नेहमीच्या घोषणा देत होते :
‘‘गुलाबी गँग! गुलाबी गँग! बघा, आम्ही आलोय! लक्ष्मणरेषा ओलांडायचा प्रयत्नही करू नका! विजय आमचाच आहे, गुलाबी गँगचा!’’

आम्ही आम्हाला अतिशय चांगली माहीत असणारी गाणी मंत्र म्हणावेत तशी म्हणतो. आमच्या लेखी ही जणू युद्ध सुरू होण्याआधी रक्त उसळवणारी रणदुदुंभी असते. अतार्राच्या रस्त्यावरून आमची यात्रा सुरू होताच इथले रहिवासी आमचा गलबला ऐकून घराबाहेर येतात. दर खेपेला त्यांची प्रतिक्रिया एकच असते. ते भारून गेलेले असतात. त्यांच्यापैकी बरेच जण आमच्यामागून येऊ लागतात. आम्ही कुठं निघालोय हे जाणून घ्यायचं कुतूहल त्यांना स्वस्थ बसू देत नसतं. औत्सुक्यानं आमच्या मागून येणाऱ्या या मंडळींसोबत आमची यात्रा सुरूच असते. आमचा ज्वर आता पराकोटीला पोहोचलेला असतो. आमच्या गालांनाही आमच्या साडीचाच रंग चढलेला असतो. आमची ही यात्रा पाहून दर्शक चार पावलं मागं सरकून आम्हाला वाट करून देत असतात. आता ही यात्रा एक अजस्त्र, तेजस्वी गुलाबी रंगाची लाट बनलेली असते... सर्वत्र फक्त हीच लाट दिसत असते. अध्र्या
तासानं आम्ही आमच्या नियोजित लक्ष्याप्रत पोहोचतो. गावातलं पोलीस ठाणं. मी माझ्या हातातली काठी उंचावून थांबण्याचा आदेश देते. तत्क्षणी सगळ्या जणी थांबतात. नि:शब्द शांतता पसरते. समोरच्या इमारतीमधून जराही आवाज येत नसतो. मात्र पोलीस खिडकीतून आमच्याकडं बघतायत हे लक्षात येतं.
‘‘ साहेब बाहेर या! आम्हाला तुमच्याशी बोलायचंय.’’
‘‘तुमच्याशी बोलल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीय!’’ मग त्या इमारतीतून एक माणूस बाहेर येतो आणि माझ्या दिशेनं येऊ लागतो.
‘‘तर मग तुम्हाला काय हवंय?’’
‘‘आम्हाला तक्रार दाखल करायचीय.’’
‘‘कुणाविरुद्ध?’’
‘‘खेड्यातल्या भ्रष्टाचारी प्रमुखांविरुद्ध! ते गरीब माणसांसाठी असणारा पैसा शोषत आहेत.’’
‘‘तुम्ही कशाबद्दल बोलताय?’’
‘‘आम्ही प्रधान मंडळींबद्दल बोलतोय. त्यांनी गरीब लोकांना काम द्यायचं आहे, त्यासाठी सरकारी निधीतून पैसे मिळतात. काही जण सांगतात की, कामही नाहीय आणि पैसेही नाहीत. पण मी चौकशी केलीय, पैसे आले आहेत. मग ते गेले कुठं?’’
‘‘आणि म्हणून तुम्ही उत्तर प्रदेशच्या सर्व रहिवाशांना तक्रार दाखल करण्यासाठी सोबत घेऊन आला आहात?’’
‘‘दु:खाची गोष्ट आहे, पण याचं उत्तर ‘होय’ आहे. तुम्हाला ते चांगलंच ठाऊकही आहे. अलीकडं कित्येक महिने आम्ही या सार्वजनिक निधीला कुठं पाय फुटतात याचा तपास करत होतो. कितीतरी लोकांनी त्यांच्या गावातल्या पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे तक्रार दाखल करण्याचाही प्रयत्न केलाय, पण प्रत्येक वेळी तुमच्या अधिकाऱ्यांनी एकतर त्यांना हाकलून दिलंय किंवा त्यांची तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिलाय. तुम्ही पोलीसवालेही इतर अधिकाऱ्यांसारखेच, आतपर्यंत पोखरलेले!’’
‘‘असलं बोलायचं काम नाही!’’
‘‘तुम्हाला माझं खरं बोलणं नकोय, पण तुम्ही या जिल्ह्यातल्या पोलिसांना त्यांची कर्तव्यं न पार पाडण्याची परवानगी देता.’’
‘‘मी या संदर्भात काहीही करू शकत नाही.’’
‘‘तुम्ही असं सांगायचं धाडसच कसं करता? हे अधिकारी तुमच्या आज्ञेनुसार काम करतात. तुम्ही त्यांना आमच्या तक्रारी दाखल करून घ्यायला लावू शकता. त्यांना त्यासाठी तर पगार मिळतो.’’
‘‘हं... ठीक आहे. मी बघतो काय करता येतंय ते.’’
‘‘नुसतं बघू नका. करा!’’
‘‘पण मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे?’’
‘‘या गुन्ह्याबद्दल प्रधानांविरुद्ध आमच्या तक्रारी दाखल करून घ्या. आत्ताच्या आत्ता! त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करायला नकार देणाऱ्या पोलिसांना निलंबित करा. ते अधिकारीवर्गाचं प्रतिनिधित्व करण्याच्या लायकीचे नाहीत.’’
‘‘ते ठरवण्याचं काम तुमचं नाही.’’
‘‘बरोबर आहे! आमचं नाही, तुमचं आहे. बघा, तुम्ही जर काहीच केलं नाही, तर मी पुढच्या वेळी देशातल्या सर्व स्त्रीयांचा उठाव घडवीन आणि तुम्ही तरीही काही केलं नाहीत, तर आम्ही जिल्हान्यायाधीशांना भेटू. समजा त्यांनीही काही केलं नाही तर आम्ही थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटू आणि कदाचित, नवी दिल्लीत पंतप्रधानांनासुद्धा!’’
त्या पोलिसानं माझ्याकडं तुच्छतेनं पाहिलं. पण तो आमची तक्रार दाखल करून घेणार, हे मी ओळखून होते. कारण एका बाईला हुसकून लावणं सोपं असेल, पण शंभर बायकांना घालवणं अशक्य असतं. म्हणूनच मी दोन वर्षांपूर्वी ‘गुलाबी गँग’ची मुहूर्तमेढ रोवली. दबाव आणून न्याय मिळवण्यासाठी! ही गँग महिलांचीच का? त्याचं कारण म्हणजे महिलांच्या माध्यमातूनच समाजपरिवर्तन घडेल. सगळ्या लोकांमध्ये महिला सर्वांत कमजोर असतात, पण त्याच सर्वांत ताकदवानही असतात. कारण त्यांच्यात जास्त एकी असते. इतकी एकी पुरुषांमध्ये कधीच होणार नाही. आम्ही एकत्र आल्यामुळं आमच्यात प्रस्थापित नियम-हुकुमांची चौकट उलथून लावण्याची ताकद आहे. माझ्या बाबतीत अपवादात्मक असं, खास करून सांगण्याजोगं काहीही नाही. इतर बायकांपेक्षा मी जास्त भोगलंय अशातलाही भाग नाही. सर्वांत तिरस्कृत मानल्या जाणाऱ्या एका जातीतल्या गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. माझं शिक्षण झालेलं नाही. मी भारतातल्या लक्षावधी स्त्रियांसारखीच एक स्त्री आहे. माझा नवरा माझ्या माथी मारला गेला होता. कितीतरी काळ मी शरणागती पत्करून आयुष्य जगत होते. इतर अनेक स्त्रियांसारखीच मीही ‘बळी’ ठरू शकले असते. पण एके दिवशी मी पुरुषांच्या कायद्यापुढं मान तुकवायला नकार दिला. ते सोपं नव्हतं, पण मी स्वत:च्या आयुष्याचा मार्ग निवडला. आज मी या गँगचं नेतृत्व करते, अन्यायाचा बळी ठरलेल्या सर्वांच्या पाठीशी उभी राहते : समाजानं तिरस्कृत केलेल्या, गरीब आणि शोषितांच्या, पिळवणुकीचे बळी ठरलेल्यांच्या, ज्यांच्या जमिनी बळकावल्या गेल्या आहेत अशा लोकांच्या, मनमानी हिंसाचाराच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभाराचे बळी ठरलेल्या लोकांच्या रक्षणार्थ धावून जाते. यामागचा माझा उद्देश योग्य व बरोबर आहे आणि या ठाम खात्रीमुळंच मला जराही भय वाटत नाही. मला अधिकारीवर्गाचं दडपण येत नाही. मी माझ्या धनगर जातीतल्या एखाद्या शेतकऱ्याची जशी कानउघडणी करीन, तशाच पद्धतीनं एखाद्या पोलीस-निरीक्षकाला त्याची जागा दाखवून देईन. मी त्याला त्याच आक्रमकपणे धमकी देईन, त्याच ठाम निश्चयानं त्याला जेरीला आणीन. मी कुणी फार मोठी वगैरे नाहीये, पण मला जबरदस्त शरीरप्रकृती लाभली आहे. माझ्या भेदक नजरेची लोकांवर कशी छाप पाडायची ते मला चांगलं माहीत आहे. मला जबरदस्त आवाजही लाभला आहे आणि लोक माझं बोलणं ऐकतात. मी एक स्त्री आहे. मला माझा आवाज इतरांना ऐकवायचा असेल, तर मला इतरांपेक्षा जास्त मोठा आवाज काढावा लागेल; शक्य असेल तेव्हा शांततेनं आणि गरज पडली, तर माझ्या मनगटांच्या जोरावर!

No comments:

Post a Comment