Saturday, 7 February 2015

रंगरेषा

घटातील पोकळी

परवा मला एक सुंदर ग्रीटिंग कार्ड आले. त्यात नववर्षाच्या शुभेच्छा होत्या. पण माझे मन विशेष वेधून घेतले ते कार्डावरच्या चित्राने. चित्र तसे साधेच होते. 

ओल्या मातीचा गोळा चाकावर घालून कुंभार त्याला मडक्याचा आकार देत आहे असे दृश्य चित्रात रंगवलेले होते. चित्र मला आवडलेच, पण चित्रापेक्षाही कार्डाच्या आतल्या बाजूला त्यासंबंधी जो मजकूर छापलेला होता तो अधिक अर्थपूर्ण वाटला. मजकूर इंग्रजीत होता. त्याचा आशय साधारणत: असा होता, ‘मातीच्या गोळ्यापासून मडके तयार होते. पण मडक्याचा खरा अर्थ म्हणजे त्याच्या आतली पोकळी. मडक्याचा खापराचा देह ही झाली त्याची व्यावहारिक उपयुक्तता. पण आतली पोकळी हा त्याचा आत्मा आहे. तो त्याचा जीवनाशय आहे!'

मजकूर वाचता वाचता माझ्या मनात एक वेगळीच आठवण जागी झाली. माझा एक आर्किटेक्ट मित्र आहे, तरुण वयातच त्याने खूप नाव मिळवले आहे. आपल्या कामाबद्दल अखिल भारतीय पातळीवरून राष्ट्रपतींनी त्याचा गौरव केला आहे. तो आपल्या शास्त्रात निष्णात आहे तशी त्याला उत्तम रसिकता आणि वाङ्मयीन जाणही आहे. एकदा तो वास्तुकलेसंबंधी माझ्याशी बोलत होता, आता घरबांधणीचे शास्त्र हा विषय तसा माझ्या आवाक्यातला नाही. त्याचे मला फारसे आकर्षणही नाही. तरीही मित्र जे सांगत होता ते मला कुतूहलजनक वाटले. तो मला म्हणाला, ‘आम्ही घरं बांधतो. इमारती बांधतो, घराला आकार देणाऱ्या भोवतालच्या घटातील पोकळी भिंती, दरवाजे, वरचे छप्पर हे तर सारे महत्त्वाचे असतेच पण तितकीच महत्त्वाची असते ती आतली पोकळी, अधिक नेमका शब्द वापरायचा झाला तर अवकाश. आम्ही जेव्हा घर, इमारत बांधतो तेव्हा त्यातला अवकाश बंदिस्त, सीमित करून त्याला एक अर्थ देत असतो. लेखक लिहिताना निवेदनातल्या काही जागा तशाच मोकळ्या सोडतो ना? लेखनातल्या या मोकळ्या जागांना जे महत्त्व असते तेच घटातल्या या अवकाशालाही!’

मित्र जे सांगत होता ते ऐकताना आपल्या अध्यात्मातले काही संदर्भ माझ्या मनात उलगडू लागले. वस्तुत: अध्यात्म हाही मला पूर्णत: अनाकलनीय असलेला विषय. भगवद्गीतेमध्ये आत्म्याचे अमरत्व सांगताना श्रीकृष्णांनी देह भंगुर आहे पण आत्म्याचे अविनाशित्व नष्ट होत नाही असे म्हटले आहे, आता ते श्लोकही आठवू लागले. ‘घटाकाश’, ‘मठाकाश’ या ज्ञानदेवांनी वापरलेल्या संज्ञांचे स्मरण झाले. घटामध्ये घटाच्या आकाराची पोकळी असते. मठामध्ये मठाच्या आकाराची पोकळी असते. या दोन्ही पोकळ्या किंवा रित्या जागा बाहेर सर्वभर पसरलेल्या अनंत अवकाशाचाच छेद असतात. महत्त्व घटाला किंवा मठाला नसते. ते त्यात सामावलेल्या आकाशाला असते. घटाचा किंवा मठाचा बाह्याकार भंगून गेला तर आत कोंडलेले आकाश बाहेरच्या आकाशात मिसळून त्याच्याशी एकरूप होऊन जाते. पाण्यात बुडलेला आणि पाण्याने काठोकाठ भरलेला घडा फुटला तर आतलेबाहेरचे पाणीही एक होते, खऱ्या अर्थाने आकाश व पाणी नाहीसे झालेलेच नसते. ते काही काळापुरते मुळापासून अलग झालेले असते इतकेच. या विचारापाठोपाठ आणखीही काही विचार मनात आले. पोकळी म्हणजेच शून्य. आणि या ‘शून्य’ संज्ञेलाही आपल्या अध्यात्मात विशिष्ट अर्थ, महत्त्व आहे.

शून्य आणि पूर्ण दोहोंचा अर्थ एकच मानला जातो. पूर्णातून पूर्ण वजा केले तरी पूर्णच राहते अशा अर्थाचा एक श्लोक आहे. तो साNयांना माहीत असेल. ‘पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते’ शून्यातून शून्य वजा केले, शून्याने शून्याला गुणले, भागले तरी उत्तर शून्यच येते. गणितशास्त्र आपल्याला सांगते. पण ध्यात्मशास्त्रही तेच आपल्या मनावर ठसवते. मग जीवनमरण, लाभहानी, यशअपयश साऱ्यां चा अर्थच बदलून जातो. एका ग्रीटिंग कार्डावरील चित्राच्या, मजकुराच्या निमित्ताने इतके भिन्न भिन्न संदर्भ मनात जागे व्हावेत हे आश्चर्य तर खरेच, पण तसे ते झाले खरे. या शून्यावरून आणखी जुनी गोष्ट आठवली. मागे अनंत काणेकर यांनी ‘लहान शून्य आणि मोठे शून्य’ अशा शीर्षकाचा एक सुंदर लघुनिबंध लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘माझ्या लहानपणी शंभरातून शंभर वजा केले तरी शून्य आणि लाखातून लाख गेले तरीही शून्यच हा हिशेब मला कळत नसे. मला वाटे, पहिल्या शून्यापेक्षा दुसरे शून्य खूपच मोठे असले पाहिजे.’ काणेकरांचे हे तर्कशास्त्र त्यांच्या बालवयाला साजेसे भाबडे असले तरी एका फार गहन अर्थाने ते खरेही आहे. पूर्णातून पूर्ण गेले
तरी अंती पूर्णच शिल्लक उरते या आध्यात्मिक विचाराशी ते किती जवळीक साधते!

या शून्याचीही एक गंमतच आहे. म्हटले तर ते अगदी लहान असते. आणि म्हटले तर ते साऱ्या विश्वाला गवसणी घालण्याइतके विराटही होते. ज्याला आपण ईश्वरी चैतन्य म्हणतो ते प्राणिमात्राच्या ठायी सामावलेले असते त्याबरोबर ते अखिल ब्रह्मांडालाही व्यापून राहू शकते. आपल्यासारख्या सामान्य माणसांना हा विचार समजून घेणे अवघड जाते. पण ज्ञानदेवांसारखा थोर आध्यात्मिक अधिकारी पुरुष जेव्हा ‘हे विश्वचि माझे घर’ असे म्हणतो तेव्हा ‘घरा’ चा हाच विशिष्ट अर्थ त्याला अभिप्रेत असतो. आपली प्राणिमात्राबद्दलची स्नेहभावना, कनवाळूपणा विश्वव्यापक होणे म्हणजेच ‘हे विश्व' आपले ‘घर’ होणे. प्रारंभी एकाच व्यक्तीच्या ठायी केंद्रित असणारे प्रेम साऱ्या विश्वापर्यंत पसरत जाणे याचेच नाव अध्यात्म. हीच कल्पना जिगर मुरादाबादी या उर्दू शायराने आपल्या एका शेरात फार सुंदर रीतीने मांडली आहे. ते म्हणतात-
इस लफ्जे मुहब्बतका
इतनाहि फसाना है
सिमटे तो दिले - आशिक
फ़ैले तो जमाना हैं ।

या शेराचा अर्थ असा : प्रेमाच्या एका शब्दाची इतकीच कहाणी असते. ते संकुचित झाले तर प्रिय व्यक्तीच्या हृदयात सामावून राहते. आणि त्याचा विस्तार झाला तर ते साऱ्या विश्वाला व्यापून टाकते. ते प्रेम म्हणजेही आपल्या अध्यात्माने सुचवलेले घटातली पोकळी आणि बाहेरचे अंतराळ यांचे अभिन्नत्वच! 

इथे एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. आत्मा आणि परमात्मा यांची अंती होणारी एकरूपता अध्यात्म आपल्याला समजावून देते. ‘आब्रह्मस्तंबपर्यंत’ म्हणजे परब्रह्मापासून तो साध्या गवताच्या झुबक्यापर्यंत साऱ्या विश्वात एकच ईश्वरी चैतन्य भरून राहिले आहे असे थोर आध्यात्मिक अधिकारी पुरुष आपल्याला सांगातात. ज्ञानदेवासारख्यांना गवताच्या पात्यात, प्राणिमात्रात या चैतन्याचा साक्षात्कार होतो आणि त्यांच्या स्नेहाची कक्षा सर्व विश्वाला आपल्या कवेत घेते. विज्ञानही आपल्या भाषेत वैश्विक एकतेची हीच जाणीव आपल्याला करून देते. एकच चेतना, एकच ऊर्जा विश्वाला व्यापून राहिली आहे हे शास्त्राच्या द्वारा विज्ञान आज सिद्ध करू शकते. तिसरा मार्ग आहे तो प्रतिभाशाली कलावंतांचा. हे कलावंत आपल्या प्रतिभेच्या बळावर स्वत:चे संकुचित व्यक्तिमत्त्व ओलांडून विश्वाशी सहज एकरूपता साधू शकतात. केशवसुत म्हणतात 
पूजितसे मी कवणाला 
तर मी पूजी अपुल्याला
अपुल्यामध्ये विश्व पाहुनी
पूजितसे मी विश्वाला

गोविंदाग्रज जेव्हा ‘शून्यात परार्धे भरली’ असे म्हणतात तेव्हा त्यांनाही केशवसुतांच्या कवितेतला विश्वप्रेमाचा हाच अर्थ कदाचित अभिप्रेत असावा. अध्यात्मवादी, शास्त्रज्ञ, कलावंत हे आपापल्या भिन्न मार्गांनी पण शेवटी
एकाच निष्कर्षाला जाऊन पोहोचतात. कुणाचा मार्ग तत्त्वज्ञानाचा, कुणाचा शास्त्राचा तर कुणाचा उत्कट प्रेमाचा. पण साऱ्या मार्गांचा अंतिम विराम एकाच ठायी असतो, प्रश्न आहे तो आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा. आपल्यापाशी आध्यात्मिक अधिकार नाही. वैज्ञानिक जाणीव नाही की प्रतिभावंताची प्रतिभाही नाही. या विश्वात प्रतिभाबलाने विचरण्याची कवींची किमया आपल्याला कुठून साध्य होणार? आपण आपली व्यावहारिक स्वार्थ जपणारी, ऐहिक वासनाविकारांनी ग्रस्त झालेली आणि आपल्या एकसुरी जीवनाच्या चाकोरीतून फिरणारी सामान्य माणसे. पण आपल्याजवळही एक गोष्ट आहे. ती म्हणजे प्रेम करण्याची ताकद. कवीप्रमाणे प्रतिभेच्या बळावर नव्हे तर साध्या प्रापंचिक शहाणपणाने आपण एकमेकांवर प्रेम करतो. एकमेकांच्या गरजा जाणून घेतो. एकमेकांच्या साहाय्याला धावून जातो. या प्रेमाची सुरुवात स्वार्थी भावनेपासून होत असली तरी तिचा प्रवास निरपेक्ष प्रीतिभावनेपर्यंत होत जातो. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘ऐशी कळवळ्याची जाती! करी लाभावीण प्रीती’ हा अनुभव आपल्यासारख्या क्षुद्र माणसांनाही आयुष्यात कधी ना कधी येतोच. प्रश्न असतो तो त्याच मार्गाने पुढे पुढे जाण्याचा. ज्याची जितकी कुवत असेल तितका तो स्वत:ची प्रगती करून घेतो. आणि मला वाटते, हेच आपल्यासारख्यांना उमगणारे अध्यात्म. याहून वेगळे अध्यात्म आपल्याला कधी भेटणार नाही आणि आपल्याला त्याची आवश्यकताही नाही.

No comments:

Post a Comment