Wednesday, 29 April 2015

नटरंग - आनंद यादव

‘‘तमासगिरांची दशा बघून. दुस्काळातली माणसं उतरल्यागत त्या शाळंत उतरली हुती. पोटार्थी आल्यागत दिसतेली. आपूण का नि कशाला आलूय ह्येची जाण एकालाबी न्हाई. उगंच मंतऱ्यामागं, फुडाऱ्यामागं पळत हुती. म्हाताऱ्या बजरंगागत हात जोडून त्येंच्या फुडंफुडं करत हुती. रातच्या बैठकीत बगिटलंस न्हवं; सरकारी पर्चाराचं कार्येक्रम मिळत न्हाईत म्हणून कुत्र्यागत भांडत हुती. अध्यक्ष झालेल्या गोपाळमामांनी तरी कशाला आपल्या बोलण्यातनं मंतऱ्याफुडं तमासगिरांच्या पोटापाण्याच्या, घरादाराच्या अडचणी सांगायच्या? सरकारी मदतीची भीक मागायची? सरकारच्या जिवावर का तमासगीर तम्माशा करतूय?... 

असं ह्या अध्यक्षानं बोलायचं नि आम्ही मंतऱ्याफुडं टाळ्या वाजवायच्या. नुसता माकडखेळ...त्या मंतऱ्याला तरी तम्माशातलं काय कळत हुतं? ना जिवाळा ना आस्था, वाट्टंल तसा बडबडत हुता. तम्माशा ऱ्हायला बाजूलाच. आम्ही आपल्या वाजवतूय टाळ्या. तम्माशाबद्दल काय तरी बोलणं झालं का ह्या तीन दिसात? सगळं ठराव सरकारकडं तोंड करून मांडलं नि ‘सरकार यंव करंल, त्यंव करंल अशी आशा बाळगू’ म्हणून येळ खाल्ला. 

आपलं गणगोत सरकार नव्हं, खेड्यापाड्यातलं पब्लिक हाय...! जाऊ द्या. आपलं आपून करत ऱ्हावं हेच खरं.’’ स्वत:शीच बोलल्यासारखा तो बोलत होता. नयना त्याच्याकडं एकटक बघत होती. बघता बघता खुदकन हासली.
‘‘का हासलीस?’’
‘‘न्हाई; एक व्याख्यानच झालं म्हणून हसू आलं.’’
‘‘हे का खोटं हाय?’’
‘‘तसं कुठं मी म्हणाली? अहो, गोरगरीब तमासगीर पोटापाण्याचं आदूगर बघणार. पोट भागलं की मग कला. मग सरकारकडं पोट भागलं तर सरकारकडनं; पब्लिककडनं भागलं तर पब्लिककडनं.’’
‘‘पर सरकारम्होरं कुत्र्यागत किती लाळ गाळायची ती. आपूण आलू ते तम्माशाचं काय तरी ऐकायला मिळंल. बोलायला मिळंल म्हणून. पर हितं तम्माशा सोडून बाकीचंच समदं.’’
‘‘एकंदरीत तुम्हांस्नी बरं वाटलं न्हाई म्हणा.’’
‘‘तसंच झालं नि काय.’’
थोडा वेळ ती काहीच बोलली नाही. त्याचा ताव थोडा कमी झाल्यावर म्हणाली, ‘‘आणि ही तुम्हांस्नी नटराजाची मूर्ती तुमच्या कलेबद्दल मिळाली ती? का
तीबी वाईटच?’’
‘‘तिला कसं मी वंगाळ म्हणीन? माझ्या कलेबद्दल मिळाली ती. पोटापाण्यापायी न्हवं. तेवढाच कार्यक्रम तम्माशाचा झाला. गुणी कलावंतांचं कौतिक झालं. रातरी वग-लावण्या झाल्या..’’ ‘‘बघू तरी मूर्ती जरा. मी अजून नीट बघिटलीबी न्हाई.’’ ‘‘बघ की.’’ त्यानं ट्रंकेतनं मूर्ती काढली. तिच्यावर गुंडाळलेला कागद सोडला नि अलगद तिच्या मांडीवर दिली...जडसर होती. 
‘‘जड हाय की हो.’’
‘‘जड असणारच; पंचरसी धातूची हाय.’’
ती न्याहाळू लागली. उचललेला डावा पाय, दुसऱ्या पायावर सहज सावरलेला तोल, चारी बाजूंनी चार हात पसरून केलेली मुद्रा, गळ्यातल्या दोन नागांचे डौलदार आकार, मागे पसरत गेलेल्या जटा...मूर्ती सुरेख होती. ‘‘झकास हाय. किती मोठा मान मिळाला तुम्हांस्नी!’’ ‘‘त्यातला अर्धा वाटा तुझा हाय.’’ ती मुग्ध झाली. पाहून झाल्यावर त्याच्या मांडीवर तिनं ती ठेवली. धावत्या गाडीतून बाहेर मागेमागे सरकणारा निसर्ग एकटक पाहू लागली. आपण नाच्या म्हणूनच कायम राहावं असं गुणाला वाटू लागलं होतं. या मानमरातबानं त्याच्या मनाचा पक्का निश्चय झाला. पुढची धुक्यामागची स्वप्नं बघू लागला. एकटा एकटा झाला...‘आपूण आता मनापासनं हीच कला पत्करायची. नाचेपणाचाच रातध्याड ध्यास घ्यायचा. नुसतं कामापुरतं नाच्यागत बोलून चालून भागणार न्हाई. तसं केलं तर कामात कमतरता येती. चुकून बापय अवतरतू. बाईगत वागलं पाहिजे. तिच्यागत बोललं चाललं पाहिजे. तिच्यागतच दीसभर हाताचं, मानंचं हावभाव केलं तर रातचं नाच्या सजासजी हुबा ऱ्हाईल. नाच्या गुणा म्हंजे नाच्या गुणाच झाला पाहिजे.

...पैल्यापैल्यांदा कामं कराय हुबा ऱ्हायलू की बाईगत चालणं-बोलणं कराय किती धडपड करावी लागायची. बायकी चालीनं चालू बघायचा नि हिकडं बोलण्याच्या नादात बापयाची चाल कवा उरावर बसायची नि बाहीर पडायची पत्त्याच लागायचा न्हाई. नाच्याच्या वक्ताला ह्या बापयाच्या चालीसंगं तर झटपट करून तिला मागं सारावं लागायचं. तिथल्या तिथं तटवून धरावं लागायचं. पैलं वरीस हेच्यातच गेलं. ...ह्या हुन्नरीकडं जीव लावून वळलं पाहिजे. बायकांचं हावभाव, त्येंची चाल, बसणं-बोलणं, हसणं-रुसणं सारखं न्यहाळलं पाहिजे. त्येंचं बारकावं नीट ध्येनात ठेवलं पाहिजेत. कुणी नसलं की आपल्या पालात त्येंचा अंगावर घेऊन सराव करायचा. तसं केल्यबगार खरा नाच्या हुबा ऱ्हाणार न्हाई माझ्यातनं. 

...राधानं क्रिस्नाचा ध्यास घेटला नि क्रिस्नरूप झाली; तसा क्रिस्नानंबी राधाचा ध्यास घेटला हुता. त्योबी राधारूप झाला हुता. तशी गुणाची गंगी झाली पाहिजे. शंकराची पार्वती झाली पाहिजे. एका बाजूनं बघावं तर शंकर आणि दुसऱ्या बाजूनं बघावं तर पार्वती...नाच का बाईनंच करावा असं न्हाई. शंकरबी नाचतू. पार्बतीत मिळून जातू. पार्बती त्येच्यात मिळून जाती. कसं एकमेकांत ऱ्हाईत असतील?...देवाची करणी!’ 

...खरं म्हंजे बापयात बाई नि बाईत बापय कायम असतू. मला न्हाई झाली दया? अगदी माझ्या तोंडातनं पडल्यागत. बाईच हाय ती माझ्यातली. माझा राजा दारकीच्या तोंडातनं पडल्यागत. दारकी बाई तर राजा बापय. शंकर-पार्बतीचीच ही कला? तो मूर्तीकडं मन लावून बघू लागला...‘नाचे-नर्तकांच्या राजा, कसा संभाळलाईस ह्यो तोल? ह्यो डावा पाय हलकापूâल तरी अवघड अवघड वर उचललेला नि दुसरा वाकुन भक्कम हुबा. तुझ्या ह्या चारी हातांची अशी हालचाल की आता बघता बघता दुसरी मोड हुणार. एकानं डमरूचा ताल धरलाय नि दुसऱ्याच्या तळव्यावर जिता जाळ. फुडचा हात भगताला धीर देणारा तर दुसरा...दुसरा तुझ्या पायावर डोकं टेकंल त्येला आशीर्वाद देणारा. आता डोळं झाकलं तर झटक्यानं दुसरा डौल घेशील अशी अंगाची गत. लांबसडक बारीक जिती बोटं. नागणीच्या पिल्यागत वळवळणारी. अंग झोकता झोकता उडालेल्या बटांची चवरी. अंगांगात नाचाची उसळी किती उफाळलीया देवा! काय हे कसब! तुझा तूच ताल, तोल धरून नाचतूस हे एक बरं हाय... पर हे हातावर आग घेऊन नाचणं कशापायी? एवढा का कडक तू? कसली आग ही? तुझं पाय वडता वडता पायाबुडीच दडपलेला ह्यो राक्षेस कोण?

‘...नटेसुरा, मी दुबळा. मला बळ दे. माझा मलाच ताल दे. जिवात डमरू दे. माझा मीच नाचीन. तुझ्यासारखा धुंद हुईन. हातापायात नाच भरून ऱ्हायलेल्या नटरंगा, हे सगळं मला शिकीव. मी तुझी पूजा बांधीन. तुझी ही मूर्ती कायम जवळ बाळगीन. सोमवार, उपासतापास करीन नि तुझा वसा घेऊन नाचीन. देवा, आता नाच माझा नसंल; तुझाच असंल. त्येचं भलंबुरं तुझं तू बघ. तुझ्यातली पार्वतीच माझी गंगी होऊन उतरंल आता. नटराजा, तुला कसं सांगू?...म्हणशील तर माझ्या मुंडक्याची माळ तुझ्या गळ्यात घालतू. माझ्या ध्यायीची राख करून तुला माखतू. मला नाचाचं बळ दे’ डोळे उनउनीत पाण्यानं भरून आले. तसाच मूर्ती न्याहाळू लागला. तिच्या रेखीव, नीटस शरीरावरून हळुवार थरथरती बोटं फिरवू लागला.

No comments:

Post a Comment