Saturday, 6 June 2015

एक ‘उनाड’ दिवस - योगेश शेजवलकर


रोज सकाळी आपण जागे झाल्यावर आपल्याला त्या दिवसाबद्दल, तो दिवस कसा जाणार आहे याबद्दल एक फिलिंगयेतं. म्हणजे काहीवेळा विशेष काही कारण नसतानाही खूप उत्साही, आनंदी वाटतं.. काहीवेळा समोर लख्ख सूर्यप्रकाशाने वातावरण उजळलेलं असतानाही कपाळावर आठ्यांची जळमटं साचतात.. तर कधी फारसं काहीही न जाणवता मागच्या पानावरून पुढे सुरुअसं म्हणत आपल्या उद्योगांना सुरुवात केली जाते.


योगेश शेजवलकर 
अगदी नकळत येणाऱ्या अशा फिलिंगमुळे तो दिवस अनुभवण्याचा आपला एक mind set तयार होतो... प्रत्येक दिवस कालच्यापेक्षा निराळा वाटतो (कदाचित त्यामुळेच रोज सगळं तसचं होऊनसुद्धा रुटीनखूप जास्त कंटाळवाणे होत नाही आणि छोट्यामोठ्या सुट्यांची लोडशेडिंगसोडली तर आयुष्यातली ३५-४० वर्ष नोकरीची गिरणीअव्याहतपणे सुरु राहते.)

पण मागच्या गुरुवारी काहीतरी निराळंच झालं... सकाळी उठल्या-उठल्या त्या दिवसाबद्दल काहीतरी वेगळंच फिलिंग आलं... ते विकेंडला येणाऱ्या फिलिंगसारखं नव्हतं किंवा झकास रजा टाकल्यावर त्या दिवशी सकाळी जसं वाटतं तसंही नव्हतं, काहीतरी वेगळंच वाटत होतं... कदाचित शाळेत असताना मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुटीच्या पहिल्या दिवशी जसं सॉलिड हुंदडावसंवाटायचं वाटायचं, खूप काही करावसं वाटायचं तसं काहीतरी.

त्याचवेळी डोळ्यासमोर ऑफिस, रोजची धावाधाव, दिवसभरातल्या टीम मिटींग्ज, संध्याकाळचा कॉल हे अक्षरश: फेर धरून नाचत होते, पण आज ऑफिसला जावं असं चुकूनही वाटत नव्हतं. काय करावं? या संभ्रमात मी पडलो. फार विचार करून निर्णय घेतला की तो हमखास चुकतोया माझ्या नेहमीच्या अनुभवाला स्मरून मी झटकन मॅनेजरला फोन करून पर्सनल रिझनचं रामबाण कारण देत ऑफिसचा विषय संपवला.. मोबाईल स्वीच ऑफ केला आणि संध्याकाळपर्येंत येतोअसं सांगून विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांना फाट्यावर मारत मी घराबाहेर पळालो. कडक इस्त्रीचे फॉर्मल्स आणि चकचकीत बूट घालून ऑफिसच्या बसची वाट पाहत उभ्या असलेल्या ओळखीच्या कितीतरी जणांना, माझ्या हाफ पँटनी आणि फताडया स्लीपर्सनी जळवत मी गाडी ताणली.

तुफान भटकण्यासाठी आधी पोटाची टाकी फुल करणं गरजेचं होतं. पण काय खावं?’ हा यक्ष प्रश्न होता. म्हणजे पोटोबातृप्त करण्यासाठी श्रीची मिसळ दाबावी... स्वीट होमची इडली चेपावी... वैशालीमध्ये जाऊन चर चर चरावं की आज्ञाधारकपणे अप्पाच्या खिचडीसाठीओळीत उभं राहावं हे ठरवताना जरा गोंधळ होत होता. पण शेवटी अप्पालाशरण जाऊन मी गप् ओळीत उभं राहिलो आणि कशासाठी पोटासाठीम्हणत तुडुंब खिचडी हाणली.

पोट भरल्यावर डोक्यानी जरा विचार करायची तसदी घ्यायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की कितीतरी दिवसांपासून काही पुस्तकं विकत घ्यायची राहताहेत. आपसूक माझ्या गाडीने टिळक रोडकडे  मोर्चा वळवला. तिकडे जाताना हाफ पँट बदलून फूल पँटमध्ये जावं असा विचारही एकदा मनात आला. पण fashion च्या नावाखाली काहीही खपणाऱ्या कपड्यांच्या तुलनेत माझी हाफ पँट अंगभर(??) असल्याने आणि त्याच्यात खिशात क्रेडीट कार्डनावाचे ब्रह्मास्त्रअसल्याने मला कोठेही बिनधास्त फिरता येईल असा ठाम विश्वास मला वाटत होता...अर्थात तो खराही ठरला.

पुस्तकांच्या दुकानात वेळ कसा केला समजलच नाही. पु.लं, वं.पु, ग.दि.मा, व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, शांता शेळके, भा.रा, भागवत ह्यांच्या मानदंड असलेल्या कलाकृतींच्या जोडीला प्रकाश आमटे, राजन खान, मधू लिमये, सुधा मूर्ती अशांसारख्या तगड्या लेखकांची उत्तमोतम पुस्तके तिथे होती. त्यामुळे फास्टर फेणे’, ‘एक शून्य आणि मी’, ‘प्रकाशवाटा’, ‘भूलभुलैया’, ‘माणदेशी माणसं’, ‘लवासा’, ‘महाश्वेताअशी विषयांचा प्रचंड विरोधाभास असणारी पुस्तकं घेऊन मी बाहेर पडलो (या सगळ्यात एक चित्रकलेबद्दलचे पुस्तकही मी विकत घेतलं. ते घेताना हे आपण का? आणि कोणासाठी? घेतोय असा प्रश्न सतत पडत होता.. पण बहुतेक थोडी फार माझ्यासारखीच चित्रकलेची स्टाईल(????) असलेल्या कोणाला तरी माणसासारखा माणूस’, ‘प्राण्यासारखा प्राणीकाढायला जमला यानीच भरून येऊन मी ते घेतले असावे).

आता पुढे काय? असा प्रश्न पडायला आणि हनुमंताला करंगळीवर द्रोणागिरी उचलताना ब्लॉकयेईल.. इतका नाटकाचा सेट एका टू व्हीलरवरून नेणारे काही ओळखीचे नाटकवाले कार्यकर्ते दिसायला एकच गाठ पडली. पुरुषोत्तमचे दिवस असल्याने वातावरण तापलेले होतेच. तालमी धडाक्यात सुरु होत्या.. त्यामुळे त्या वातावरणात दुपार मस्त गेली. इतर कॉलेजमध्ये काय सुरु आहे? कोणी कशी फिल्डिंग लावली आहे... कोणाची कोणती बक्षिसे नक्की आहेत.. कोण कोणाचा हिशोब चुकता करणार आहे?.. या वर्षी कोण तोडणार आहे? चोपणार आहे? अशा बऱ्याच माहितीने डेटाबेसअपडेट झाला... खरंतर टवटवीतझाला.

संध्याकाळी टेकडीवर जायचा बेत आधीपासूनच नक्की होताच. त्या प्रमाणे टेकडी झाली... टेकडीवरून विस्तारलेलं शहर पाहताना पूर्वीचं पुणं आता राहिलं नाहीअशी कोणी विचारली नसतानाही प्रतिक्रिया देऊन झाली. रोज नेमाने टेकडीवर येणाऱ्यांना उद्यापासून मी नक्की येणारअसं भक्कम आश्वासन दिलं गेलं आणि त्यावर त्यांनीही कळेलचअसं अर्थपूर्ण हसूनही घेतलं.

मग घरी येताना आज टेकडीवर गेल्यामुळे खूप कॅलरीज बर्नझाल्यात असं सोयीस्कर वाटून सगळ्यांसाठीच भेळेचंपार्सल घेतलं. त्यामुळे माझी ऑफिसला मारलेली दांडी सत्कारणी लागल्याची पावती मला घरातल्या प्रत्येकानी दिली (उगाचच... कोणी मागितली होती?).

म्हणता म्हणता दिवस संपला. पण बागडण्याचा उत्साह किंचितही कमी झाला नव्हता त्यामुळे खूप दिवसांनी बिल्डींगमधल्या माझ्या एके काळच्या मित्रमंडळीना (त्यांची लग्न झाल्यापासून आमचा काळसंपला) गच्चीत गोळा केलं. मंडळी बोलती झाली.. जुने विषय निघाले... जुन्या आठवणी निघाल्या... नेहमीच्या १-२ बकऱ्यांना भरपूर चिडवलं... संसारात पडल्यापासून फॉर्मलझालेली ही मंडळी इन फॉर्मलझाल्याचं पाहून खूप बरं वाटलं. शेवटी दर शनिवारी तरी गच्चीत भेटायचं नक्की (??) करून पांगापांग झाली... इतरांसारखाच मी पण अंथरुणात शिरलो आणि उद्या ऑफिसया नुसत्या कल्पनेचीच भीती वाटून पांघरूण तोंडावरून ओढून घेतलं. पडल्या पडल्या मनात विचार आला की आज आपण नेमकं काय केलं?’

आयुष्यभर चालणाऱ्या घर-ऑफिस-घर या आपल्या कंट्रोलच्या बाहेर गेलेल्या रुटीनमध्ये एखादा दिवस उनाडपणेदांडी मारणं हे तसं अगदी शुल्लक. हे रुटीनफाट्यावर मारून एक दिवस उनाडपणे भटकून तसं मी काही वेगळं, काही एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी केलं नव्हतं... करणारही नव्हतो.

पण तरीही आजचा हा दिवस म्हणजे खट्याळपणे मुद्दामून रुटीनची खोडी काढल्यासारखा ठरला. रुटीनआपल्यासाठी असतं... आपणरुटीनसाठी नसतो हे जाणवून देण्यासाठी पुरेसा.. आपल्याला नेमका आनंद कशातून मिळतो ह्याची जाणीव करून देणारा आणि आपण आयुष्यभर फक्त महिन्याचा जमाखर्च सांभाळण्यासाठी रुटीनमध्ये अडकणार आहोत का? हा उनाड विचार गंभीरपणे करण्यासाठी भाग पाडणारा...!!


2 comments: