Thursday, 23 July 2015

मामा भुर्रर्रर्र...  

एक जावईबुवा होते. दिसायला मोठे राजिंबडे. गोरेपान, सरळ नाकाचे आणि गुटगुटीत अंगाचे. पण डोक्याच्या नावाने आनंद होता.डोक्यात त्यांच्या काय भरले होते देव जाणे. कुणी म्हणत कांदे असावेत. कुणी म्हणत बटाटे असावेत. कुणी म्हणायचे गोलगोल गोटे असावेत नर्मदेतले. पण खरे सांगायचे म्हणजे त्यांचे डोके अगदी रिकामे होते. पोखरलेला नारळ असतो ना, तसे! किंवा  रिकामे खोकेच म्हणानात. असे हे बुवाजी गावात करीत तरी काय? काही नाही. दोन्ही वेळेला तालमीत जाऊन व्यायाम करावा, खूप दूध प्यावे आणिगावातून भटकावे. ते दुपारीही झोपायचे आणि अंधार पडला की रात्रीही झोपायचे. 
जावईबुवा घरचे बरे होते. घरदार, शेतीवाडी चांगलीहोती. काही नाही केलं तरी दोन्ही वेळेला छान जेवायला
मिळायचे. कुठल्या सासऱ्याने त्यांना मुलगी दिली कोण जाणे! पण जावईबुवांचे एकदाचे लग्न झाले आणि ते `जावईबुवा' बनले.
चारसहा महिने गेले.दिवाळी आली. सासऱ्यांनी  दिवाळसणासाठी आमंत्रण पाठवले. 
पत्रात लिहिले, ``दिवाळी यंदा आमच्याकडेच करावी अशी आमची इच्छा आहे. तरी सगळ्यांनी अवश्य यावे. आम्हाला फार आनंद होईल...''
हे पत्र वाचल्यावर जावईबुवा वडिलांना म्हणाले, ``यंदा आपल्या गावात दिवाळीला सरकारने बंदी केली काय, बाबा?''
वडील म्हणाले,``शतमूर्खा! अरे, असा या पत्राचा अर्थ नाही.''
``मग?''
``तू त्यांचा जावई आहेस ना? दिवाळसण देण्यासाठी त्यांना बोलावलं आहे, समजलं?''
जावईबुवांच्या रिकाम्या डोक्यात एकदम बत्ती पेटल्यासारखा उजेड पडला. त्यांनी दोन्ही हातांनी चुटक्या वाजवल्या.
``हां हां! आता आलं लक्षात. म्हणजे दिवाळीत आपण पोस्टमनला बक्षीस देतो, मोलकरणीला देतो, पोस्त का काय म्हणतात तेच ना?तसंच मला पण पोस्त देणार आहेत काय आमचे सासरे? वा वा! मग फार मजा होईल. अजूनपर्यंत एकाही गाढवानं मला कधी पोस्त दिलं नाही बघा.''
वडील लालबुंद चेहरा करून खेकसले, ``हात मूर्खा! अरे, तू काय गडीमाणूस आहेस पोस्त घ्यायला? जावई आहेस जावई, समजलं?सासुरवाडी चांगली श्रीमंत आहे तुझी. सोन्याचं कडं, अंगठी, भिकबाळी असलं काहीतरी देतील तुला सासरे. आणखीन तुला काही पाहिजे असलं तर माग की लेका. रुसून बस. म्हणजे सगळं मिळतंय बघ. मी सांगतो तसं करायचं. आपली अक्कल चालवायची नाही.''
जावईबुवांनी डोळे मिटून घेतले. क्षणभर विचार केला. मग मान हलवून ते म्हणाले,``बराय, आपल्याला काय? तुम्ही सांगाल तसं करतो.''झाले. जावईबुवांचे सासुरवाडीला जायचे नक्की ठरले. वडिलांनी सूनबार्इंना अगोदरच पाठवून दिले. जावईबुवांची जाण्याची सगळी तयारी केली. चारदोन नवे कपडे शिवले. फराळाचे सामान दिले.जावईबुवांचे घर खेड्यात. सासुरवाडीही खेड्यातच. जायला मोटार नव्हती, काही नव्हते. बैलगाडीने तरी जायचे किंवा  घोड्यावर बसून.जावईबुवांच्या घरचे एक तट्टू होते ते घेऊन जायचे ठरले. तयारी करताकरता दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपली. निघायचा दिवस उजाडला.वडिलांनी चिरंजीवांना उपदेश केला–
``हे बघ, स्वत:ची अक्कल फारशी पाजळायची नाही. मी सांगतो तसं करायचं.''
``अर्थातच! हे मी मागंच कबूल करून टाकलं आहे, बाबा.''जावईबुवांनी मान डोलवली.
``सासुरवाडीला गेल्यावर अगदी ऐटीत वागायचं. असं गबाळ्यासारखं नाही रहायचं. सगळ्यांवर कशी आपली जोरदार छाप पडली पाहिजे.सगळ्यांना मनातून दरारा वाटला पाहिजे.''
``ते लागलं माझ्याकडं. गेल्या गेल्या एकेकाची तंगडी मोडून टाकतो. म्हणजे असा दरारा वाटेल सगळ्यांना की यंव!'' जावईबुवा नाक फुगवून अभिमानाने बोलले.
``हात् मूर्खा! सासुरवाडी म्हणजे काय तालीम-बिलीम समजलास की काय? तसलं काही करायचं नाही. आलं लक्षात? रुबाबात वागायचं, रुबाबात!''
``ठीक आहे; आमच्या बापाचं काय जातं? रुबाबात वागतो.''
``शाबास! फारसं कुणाशी बोलायचं नाही. अगदी बेतास बात.बोललं तरी अगदी मोजकं. अगदी हळू. किती हळू?''
``अजिबात कुणाला ऐवूâ येणार नाही इतकं! बरोबर आहे ना?''
``गाढवा! इतकं  हळू नाही. थोडं हळू... कुठेही गेलं तरी उच्चस्थानी जाऊन बसावं. गंभीर मुद्रा असावी. बायकांशी फारसं बोलू नये.सगळ्यांची प्रेमळपणानं चौकशी करावी.''
जावईबुवा खो खो हसून म्हणाले,
``हे तर अगदीच सोपं आहे बाबा. अगदी बरोबर करतो. बराय,मी निघतो.''
जावईबुवा वडिलांच्या पाया पडून तट्टावर बसले. बरोबरचे सगळे सामान पडशीत नीट कोंबले. मग तट्टाचा लगाम हाती घेऊन त्यांनी घोड्याला इशारा केला. तेवढ्यात वडिलांनी चिरंजीवांना पुन्हा थांबवून सांगितले, ``हे बघ, सासू-सासरे यांची गाठ पडल्याबरोबर त्यांना नमस्कार करायचा आणि त्यांना म्हणायचं, `मामा नमस्कार, मामी नमस्कार'... समजलं?''
सकाळपासून उपदेश ऐकून ऐकून जावईबुवा कंटाळले होते.त्यांचे रिकामे डोके गरगरायला लागले होते. तोंड वेडेवाकडे करून ते म्हणाले,``आता हे सगळं कसं लक्षात ठेवायचं बुवा? विसरून-बिसरून गेलो तर?''
``छे: छे:! हे शिष्टाचार आहेत. नाही पाळले तर वाईट दिसेल. तू  आपलं असं कर. मामा नमस्कार... मामी नमस्कार... असं सारखं घोकतच जा ना वाटेनं. म्हणजे विसरणार नाहीस.''
ही कल्पना जावईबुवांना एकदम पटली. तट्टाला चुचकारून ते घोकतच निघाले एकसारखे.``मामा नमस्कार... मामी नमस्कार.''
हळूहळू सकाळ उलटली. दुपार झाली. उन्हे चांगली तापली. जावईबुवांचे डोके चांगलेच तापले. पण तिकडे लक्ष न देता ते जोराने तट्टू पिटाळीत होते आणि मनाशी घोकीत होते, ``मामा नमस्कार...मामी नमस्कार.''
थोड्या वेळाने वाटेत एक मोठे वडाचे झाड लागले. त्या झाडावर दुपारच्या वेळी कितीतरी पाखरे सावली धरून बसली होती. वडाखालून जावईबुवा चालले. त्यांच्या एकदम ध्यानात आले की, तट्टू लेकाचे फार हळू चालते आहे. चकचक करून काही उपयोग होत नाही. शेवटी त्यांनी पडशीतला चाबूक काढला आणि त्याचा काडकन आवाज हवेतकेला. त्या शांत वेळेला तो आवाज फार मोठा निघाला. झाडावरची पाखरे एकदम घाबरून भुर्रर्रर्रकन् उडाली. त्यांचे थवेच्या थवे उडाले आणि भुर्रर्र... असा मोठा आवाज झाला. जावईबुवा मनाशी घोकीत चालले होते. ते एकदम दचकले. तो आवाज त्यांच्या रिकाम्या डोक्यात जाऊन पोहोचला आणि पक्का झाला. काहीतरी गडबडगोंधळ झाला खरा. अन् जावईबुवा इकडं मनाशी घोकत पुढे निघाले,
``मामा भुर्रर्र... मामी भुर्रर्र...''
संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला. सासुरवाडीचे गाव अगदी हाकेच्या टप्प्यात आले तरी जावईबुवा घोकीतच होते,
``मामा भुर्रर्र... मामी भुर्रर्र...''
अखेर सासुरवाडीच्या दारापाशी घोडे थांबले. जावईबुवा खाली उतरले. जावई आल्याची वर्दी सगळीकडे गेली. गडीमाणसं धावत आली. सासूबाई आल्या. सासरे आले. आसपासचे लोक कौतुकाने सावकाराच्या जावयाकडे पाहू लागले. जावईबुवांनी सगळ्यांच्या तोंडाकडे दृष्टी टाकली. मग ऐटीत पावले टाकीत ते पुढे गेले. सासऱ्यांना नमस्कार करून ते मोठ्यांदा म्हणाले,
``मामा भुर्रर्र...''
सासरे दचकलेच. आ करून बघायला लागले. तेवढ्यात जावईबुवांनी सासूबार्इंना नमस्कार केला. पुन्हा ते मोठ्यांदा म्हणाले,
``मामी भुर्रर्र...''
सासूसासरे घाबरून गेले. आसपासची माणसे मोठमोठ्यांदा हसू लागली. जावईबुवांना काही कळले नाही. तेही खो खो करून हसू लागले.

No comments:

Post a Comment