Saturday, 29 June 2019

माय नेम इज परवाना

डेबोरा एलिस लिखित आणि अपर्णा वेलणकर अनुवादित 


तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर त्यांनी मांडलेल्या मुलींच्या आणि स्त्रियांच्या छळाच्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या.
१९७९ मध्ये सोव्हिएत युनियननं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं. दहा वर्षांच्या युद्धानंतर १९८९ मध्ये रशियन सेनेचा पाडाव झाला तरीही युद्ध संपलं नाही. कारण अफगाणिस्तानातल्याच अनेकानेक टोळ्या देशावर कब्जा मिळवण्यासाठी परस्परांशी लढत होत्या. तालिबान ही त्यांतलीच एक टोळी. कधी काळी अमेरिका आणि पाकिस्तान यांनी पोसलेली. पैसे आणि शस्त्रं पुरवून उभी केलेली. त्यांनी १९९६ मध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा मिळवला. त्यांनी मुलींचा आणि स्त्रियांचा छळ सुरू केला. मुलींच्या शाळेत जाण्यावर बंदी आली. मुलींच्या शाळाच बंद पाडल्या गेल्या. स्त्रियांना नोकरी करण्यास मज्जाव करण्यात आला आणि कपड्यांवर, सार्वजनिक वावरावर जुनाट बंधनं लादली गेली.
तालिबानच्या वळचणीला ‘अल् कायदा’ ही दहशतवादी संघटना जन्मली आणि पोसली गेली.
‘अल् कायदा’नं २००१ मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ला चढवल्याने चवताळलेल्या अमेरिकेनं बदला घेण्यासाठी जगातल्या प्रगत राष्ट्रांची एकजूट करून अफगाणिस्तानात सैन्य घुसवलं. तालिबानच्या मुसक्या आवळल्या गेल्या. २००५ मध्ये अफगाणिस्तानात नवं लोकनियुक्त सरकार स्थापन झालं. नवी राज्यघटना मंजूर करून लागू झाली.
– तरीही युद्ध संपलं नाहीच.
देशात परदेशी सैन्याच्या काही तुकड्या होत्या. त्यांच्याशी वितुष्ट घेऊन तालिबानच्या टोळ्यांनी नव्यानं हल्ले चढवले. तालिबान विरुद्ध अफगाणिस्तानातली लोकनियुक्त राजवट असाही एक संघर्ष पेटला. पूर्वीच्या टोळ्यांचे बलदंड नेते देशभर पसरलेले होते. त्यांनी सत्तेसाठी नव्या टोळ्या बांधून आपापसात दुश्मनी सुरू केली.
युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी जगभरातून पैशाचा मोठा ओघ या देशात ओतला गेला. पण यातले बरेचसे पैसे एकतर युद्धात संपले; जे उरले ते सगळे सर्व स्तरांवर बोकाळलेल्या भ्रष्टाचारानं गडप केले.
– या पार्श्वभूमीवर आपल्या मोडलेल्या, उद्ध्वस्त देशाला पुन्हा उभं करण्याचे प्रयत्न अफगाणिस्तानमध्ये चालू आहेत. इथली माणसं पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी धडपडू लागली आहेत. वर्षानुवर्षांच्या अखंड पेटलेल्या युद्धानं या देशाचे इतके लचके तोडले आहेत, की साध्यासाध्या गोष्टींसाठीही इथल्या माणसांच्या नशिबी मोठा संघर्ष वाढून ठेवलेला असतो.
शाळेच्या इमारती, पुस्तकं, खडू, पेनं आणि प्रशिक्षित शिक्षक– यांतलं काहीच पुरेसं नाही. अफगाणिस्तानातल्या जवळपास निम्म्या मुलांना शिक्षणाची कसलीही सोय उपलब्ध नाही. निम्म्याहून अधिक देश आजही निर्वासितांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या शिबिरांमध्ये राहतो. या शिबिरांमध्ये ना पुरेसं पाणी आहे, ना दोन वेळच्या भुकेला पुरेसं अन्न. विजेसारख्या सोयी तर दूरच.
या देशातल्या स्त्रिया आणि मुलांचं आयुष्य तर अधिकच वैराण. त्यांना तऱ्हेतऱ्हेच्या हिंसाचाराचा सामना करत रोज आपला जीव वाचवण्याची कसरत करतच जगावं लागतं.
स्त्रियांची परीस्थिती दयनीय असण्याला कारणं अनेक.
एकतर गरिबी. कित्येक वर्षांच्या युद्धग्रस्ततेतून आलेली राजकीय-सामाजिक आqस्थरता... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाई ही दुय्यम दर्जाची, उपभोगासाठी निर्मिलेली वस्तू असते; तिला पुरुषाच्या आज्ञा पाळण्यापलीकडे स्वतःच्या मताचा अधिकार नाही, असं मानणाऱ्या पारंपरिक विचारसरणीचा घट्ट करत नेलेला पगडा.
कायदे आहेत; पण त्यांच्या अंमलबजावणीची शक्यता जवळपास शून्यच.
अशा परीस्थितीत स्त्रियांच्या हक्कांसाठीच्या चळवळी अफगाणिस्तानात सुरू आहेत. मुलींसाठी सुरू केलेल्या शाळा जाळल्या जातात, स्त्रियांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालून मारलं जातं... तरीही हे प्रयत्न थांबलेले नाहीत.
आता अमेरिकेसह अनेक देशांनी अफगाणिस्तानातून आपापलं सैन्य काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
...आणि तरीही युद्ध संपलेलं नाही.
ज्याचा जेता कोण याचा अंदाज बांधणंही मुश्कील अशा युद्धाच्या ज्वाळांमध्ये धुमसणं हेच आजच्या अफगाणिस्तानचं वास्तव आहे.
...पण तरीही, जगणं कुठे थांबतं?
अफगाणिस्तानातल्या सामान्य माणसाला रोजच्या जगण्याची लढाई लढावीच लागते.
वीरा मौसी, परवाना, शौझियासारख्या अनेक व्यक्ती ही लढाई निकरानं आणि हिमतीनं लढत आहेत.
ही माणसं, यांच्यासारखी अनेकानेक अफगाण माणसं, या देशातले पुरुष, स्त्रिया आणि मुलं... या सगळ्यांना या लढाईत मदतीचा, आधाराचा हात हवा आहे.
परवाना या पंधरावर्षीय कोवळ्या वयातील मुलगी या धगधगत्या निखाऱ्याचे चटके सोसूनही शिक्षणाची, फ्रान्सला जाण्याची- स्वातंत्र्यपूर्ण भरारीची स्वप्ने पाहतेय... तिच्या अम्मीला, नूरिया, मरियम, असीफ या भावंडांबरोबर स्त्रियांना शिक्षण देण्यासाठीच्या धडपडीत मदत करत आहे. या लढाईत तिच्या अब्बूंबरोबर  तिच्या अम्मीलाही ती गमावून बसते. मागे उरतात मरियम, तिच्या आश्रयाला आलेले बद्रिया, हसन, इव्हा, किना. त्रास देणारे नवरे आणि दुष्ट वडिलांच्या तावडीत सापडलेल्या स्त्रिया, मुलींची सुटका करून त्यांना आसरा मिळवून देणं हे वीरा मौसीचं मुख्य काम आहे. ‘‘यांतले काही पुरुष समाजातले मातब्बर असतात, काहींचा आर्मीशी संबंध असतो. त्यांच्या हाती सापडलो, तर ठारच मारतील आम्हाला ते. हे परदेशी आर्मीवाले पण त्यांचीच बाजू घेतात. स्वतःच्या मनाने काही करणाऱ्या बायकांचा गट कधीच कुणाला आवडत नाही आपल्या देशात. त्यामुळे हे काम फार अवघड आहे; पण केलं पाहिजे ना कुणीतरी. आम्ही करतो-’’ वीरा मौसी सांगते. अशा या वीरा मौसीच्या आधारावर ती त्या स्फोटक परिस्थितीतून कशी बाहेर पडते, याविषयी अंगावर शहारे आणणारी परवानाची गोष्ट.  

No comments:

Post a Comment