Friday, 5 July 2019

मगरडोह

शिशीकांत काळे लिखित 


कथा हा वाङ्मय प्रकार सर्वसाधारणपणे वाचकाच्या आवडीचा असतो. गूढकथा हाही तसा वाचकप्रिय प्रकार. मगरडोहया कथासंग्रहातून शशिकांत काळे यांनी एकूण अकरा गूढकथा वाचकांच्या भेटीला आणल्या आहेत. रत्नाकर मतकरींची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या गूढकथासंग्रहाला लाभली आहे. घातचक्रही कथा पुनर्जन्मावर आधारित आहे. श्यामकांत हा एका कंपनीचा मालक आपली पत्नी सुमनसह अमावस्येच्या दिवशी रेल्वेतून प्रवास करत असतो. त्यावेळी बोलता बोलता सहज त्याच्या कंपनीत पूर्वी (श्यामकांत व सुमनच्या विवाहापूर्वी) स्टेनो कम सेक्रेटरी असलेल्या ज्यूली परेराचा विषय निघतो आणि श्यामकांत अस्वस्थ होतो.  त्यानंतर श्यामकांत त्या प्रवासात सुमनच्या नकळत मध्येच कुठेतरी उतरतो. सुमन पोलिसांच्या साह्याने त्याच्यापर्यंत पोहोचते. कुठे गेलेला असतो श्यामकांत? तिथे गेल्यावर त्याच्या पूर्वजन्माचं स्मरण त्याला कोण करून देतं? पूर्वजन्मात ज्यूलीशी आणि सुमनशी त्याचा काय संबंध असतो? ‘सन १८६०चा रुपयाया कथेतील प्रल्हाद घाटगे त्याची पत्नी अरुणाबरोबर लोणावळ्याला वर्षासहलीसाठी गेलेला असतो. लोणावळ्यात एका ठिकाणी ते दोघं फिरायला गेलेले असताना अचानक तो एका खड्ड्यात पडतो आणि त्याच्या अंगावर बरीच माती पडते. त्याला जेव्हा जाग येते तेव्हा तो एका तंबूत असतो. काही दिवसांनी त्याच्या असं लक्षात येतं, की त्या अपघातानंतर तो २००७ सालातून १८६० सालामध्ये पोचला आहे. आता त्याच्यासमोर प्रश्न असतो, २००७मध्ये कसं परतायचं?‘चकवाही कथा आहे संजय गिते ऊर्फ ए.उ.ची. ए.उ.नी लहानपणीच आई-वडिलांवर रागावून त्यांच्या नकळत जुनापाडा येथील त्यांचं घर सोडलेलं असतं. त्यानंतर त्यांचा घराशी काहीच संपर्क नसतो. आता डहाणूत बायको आणि बावीस वर्षाचा मुलगा रंजन याच्यासह ते सुखनैव जगत असतात; पण रंजनच्या आग्रहावरून आपलं गाव, आपले कुटुंबीय याविषयी ते रंजनला सांगतात. रंजन त्यांच्या गावी जाऊन येतो आणि आजी, काका-काकु यांचे फोटो काढून आई-वडिलांना दाखवायला आणतो; पण ए.उ.ना त्या फोटोत एका मध्यमवयीन अनोळखी बाईशिवाय कोणीच दिसत नाही. एकदा ते कुणाला न सांगता आपल्या गावी स्वत:च्या घरी जातात. त्या घरात माणसांच्या वावराच्या खुणा असतात; पण एकही माणूस त्यांच्या दृष्टीला पडत नाही. त्यामुळे ते आपल्या मनाची अशी समजूत करून घेतात, की आपल्या मनातील सूड भावनेमुळे आपलं कुटुंब नाहीसं झालं आहे. काय असतो हा प्रकार?
        ‘रेखाचा आरसाया कथेत एक तरुण मुंबईहून कारवारला आयनापूरनावाच्या गावात ऑफिसच्या कामासाठी गेलेला असतो. त्याच्या प्रकाश नावाच्या मित्राच्या घरी त्याची राहायची सोय केलेली असते. प्रकाश स्वत: नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. त्याच्या अनुपस्थितीत त्याची बहीण रेखा आणि त्याची आई या तरुणाचा पाहुणचार करतात. त्या वास्तव्यात त्या तरुणाची आणि रेखाची चांगली मैत्री होते. रेखाने त्याला एक मोठा आरसा भेट म्हणून दिलेला असतो. तो मुंबईला आल्यावर आपल्या बेडरूममध्ये तो आरसा लावतो. त्या आरशातून रेखा रोज रात्री त्याला भेटायला यायला लागते. पुढे काय होतं? ‘रंजनाची प्रतिमाया कथेतील तरुण चंदनपूर या गावी त्याच्या वडिलांनी बांधलेलं घर विकण्याच्या दृष्टीने गेलेला असतो. त्याच्या त्या घरात रंजना सामंत नावाची विधवा तरुणी एकटीच राहत असते. त्या तरुणाच्या वडिलांकडून विकत घेतलेली शेती ती कसत असते. हा तरुण तिच्यासमोर घर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवतो, तेव्हा ती दोन-तीन वर्षांची मुदत मागून घेते. पहिल्या वेळेस त्याच्याशी मोकळेपणाने वागलेल्या रंजनाबाबत नंतरच्या दोन-तीन वर्षांत त्याच्या मनात एका बाबतीत शंका उत्पन्न होते. रंजना घर विकत घेते का? त्याचं शंकानिरसन होतं का?
        ‘मगरडोहया कथेत डॉ. कर्वे या मानसोपचारतज्ज्ञांच्या मुंबईतील क्लिनिकच्या रिनोव्हेशनच्या दरम्यान एक धबधब्याचं चित्र त्यांच्या केबिनमध्ये लावलं जातं. ए.उ.(संजय गिते) या त्यांच्या मित्राला त्या चित्रात काहीतरी विचित्र वाटत असतं. पौर्णिमेच्या दिवशी ते चित्र प्रकाशमान होत असतं. ते चित्र लावल्यापासून दोन-तीन वेळा कव्र्यांच्या हाताला जखम झालेली असते आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्या हाताला जखम झालेली असते, त्यावेळी अमावस्या असते. कव्र्यांना त्याबाबतीत वेगळं काही वाटत नाही; पण ए.उ. आणि लेखक यांना मात्र त्या चित्राबाबत काहीतरी गूढ वाटत असतं. उकलतं का ते गूढ?
        तर ही आहे या कथासंग्रहातील काही कथांची झलक.अगदी साध्या निवेदनातून या कथा पुढे सरकत राहतात. गूढकथांप्रमाणे गूढ किंवा भयप्रद वातावरणनिर्मिती काळे करत नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या भावभावनांना थोड्याशा गूढातून भिडतात;
पण त्यांचं निवेदन वाचकाला खिळवून ठेवतं. तेव्हा रंजक अशा या कथा वाचकांनी आवर्जून वाचाव्या अशा आहेत. रत्नाकर मतकरींची प्रस्तावना नवोदितांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.
No comments:

Post a Comment