Friday, 5 July 2019

अशक्य भौमिती


मिचिओ काकू लिखित आणि लीना दामले 


भौतिकशास्त्राच्या भूत, वर्तमान, भविष्याला अभ्यासपूर्णतेने स्पर्श करणारे पुस्तक 

 आज जे तंत्रज्ञान अशक्य वाटतं आहे, ते कदाचित येत्या काही दशकांत अथवा शतकांमध्ये अगदी नेहमीच्या वापरातलं होऊन जाईल, या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित पुस्तक आहे – ‘Physics Of The Impossible’ मिचिओ काकू यांनी लिहिलेलं हे पुस्तक मराठीत अनुवादित केलं आहे लीना दामले यांनी. या पुस्तकाचं मराठी शीर्षक आहे ‘अशक्य भौतिकी.’ 

या पुस्तकाच्या उपोद्घातात मिचिओ काकू यांनी या पुस्तकाच्या कल्पनेचं बीज त्यांच्या मनात कसं रुजलं, या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना काय आहे, हे सांगताना अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. त्यांच्या मनात कोणत्या वैज्ञानिक कल्पना रुंजी घालत होत्या, कोणत्या वैज्ञानिक गोष्टींची मोहिनी त्यांना पडली होती, त्यांच्या मनावर कोणत्या टेलिव्हिजन मालिकेचा प्रभाव होता याविषयी त्यांनी  लिहिलं आहे. सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होण्यापर्यंतची त्यांची वाटचालही त्यांनी सांगितली आहे. अशक्यता या मुद्द्यावर त्यांनी सोदाहरण प्रकाश टाकला आहे. 

हे पुस्तक तीन विभागांत विभागलेलं आहे. पहिला भाग आहे, पहिल्या प्रतीची अशक्यता. ज्यात ऊर्जाक्षेत्रे, अदृश्यता, ऊर्जाशास्त्रे आणि तोफग्रह, दूरप्रेषण, परचित्तज्ञान, सायकोकायनेसिस, रोबो, एक्स्ट्रा टेरेस्ट्रिअल्स आणि यूफो, अवकाशयाने, अ‍ॅन्टिमॅटर आणि अ‍ॅन्टियुनिव्हर्स हे मुद्दे त्यांनी स्पष्ट केले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आज अशक्य वाटत असले; तरी ते भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करीत नाही.

दुस-या प्रतीची अशक्यता या दुस-या भागात प्रकाशवेगातीत, कालप्रवास, समांतर विश्वे हे मुद्दे त्यांनी चर्चेला घेतले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे; जे या भौतिक जगाच्या आपल्या समजाच्या अगदी काठावर उभे आहे. तिस-या प्रतीची अशक्यता या तिस-या विभागात शाश्वत गतियंत्र आणि भविष्यकथन हे मुद्दे स्पष्ट केले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे.‘उपसंहार’मध्ये काकू  यांनी अशक्यतेमध्ये मोडणा-या आणखी तांत्रज्ञानाकडे लक्ष वेधलं आहे. त्याचबराबेर विविध शास्त्रज्ञांची विविध विषयांवरील मते, काही सिद्धान्त, त्यासंदर्भातील आक्षेप इ. बाबींचं विवेचन केलं आहे.

एकूण , भौतिकशास्त्राला, त्यातील महत्त्वाच्या सिद्धान्तांना अभ्यासपूर्णतेने स्पर्श करणारं हे पुस्तक त्या क्षेत्रातील लोकांनी वाचावं, असं तर आहेच; पण सर्वसामान्यांनीही वाचावं असं आहे. मिचिओ काकुंच्या ज्ञानाचा आवाका थक्क करणारा आहे. विषयाची पाश्र्वभूमी, त्यात गतकाळात झालेलं संशोधन, वर्तमानात त्या  संशोधनात काही बदल झाले आहेत का आणि भविष्यात त्या संशोधनाबाबत काय परिस्थती असेल, अशा पद्धतीने त्यांनी त्या त्या विषयाची मांडणी केली आहे. उपोद्घात आणि उपसंहार ही प्रकरणं उल्लेखनीय म्हणता येतील. भोतिकशास्त्रासारखा विषय त्यांनी सोप्या भाषतले उलगडून दाखवला आहे. या पुस्तकाचं भाषांतर करणं, हे अवघड काम होतं; पण लीना दामले यांनी ते कुशलतेने पार पाडलं आहे. 

तेव्हा अवश्य वाचा – ‘अशक्य भौतिकी.’

No comments:

Post a comment