Thursday 6 March 2014

प्रतारणा


पोस्टमन!!!! दारावरची हाक ऐकून प्रीती लगबगीत बाहेर आली. ‘मॅडम टेलिग्राम’... पोस्टमनचा आवाज ऐकताच घाईतच तीने टेलिग्राम घेतला आणि उत्सुकतेने ती वाचू लागली. ‘’Sweetheart, coming on  monday’’. टेलिग्राम वाचताच प्रीतीच्या आनंदाला उधाण आलं. सोमवारी G.K. येतोय. सहा वर्षांची प्रतीक्षा आता संपली. आनंदाच्या भरात ती देहभान विसरून गेली. सहावर्षापुर्वी G.K. आणि प्रीतीची engagement झाली होती. एक वर्ष प्रोजेक्ट वर probation आणि नंतर परदेशात उच्च तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी तो गेला. Probation संपल्यानंतर आणि परदेशी जाण्याआधी प्रीतीची आणि त्याची फक्त एकदा विमानतळावर भेट झाली होती. डोळ्यात आसवं साचलेली, ती खाली न सांडण्याची दक्षता घेत प्रीती उभी होती. त्याचा एक आश्वासक स्पर्श आणि भेटू पुन्हा असं विश्वासदर्शक वचन या दोन गोष्टींवर सहा वर्ष मिलनाची आस ठेवत G.K.च्या प्रतीक्षेत काढली होती. एकमेकांना पत्र लिहायचं नाही किवा फोनही करायचा नाही असं त्यांच्यात आधीच ठरलं होत. सहा वर्षाची तपश्चर्या आज फळाला आली होती. प्रीती मनाशी बडबडत होती, गेल्या सहा वर्षात फक्त एक ओझरती भेट. G.K. आज तू खुप मोठा माणूस झाला असशील. इथ तुझ्या प्रीतीनेही बरीच प्रगती करण्याचा प्रयत्न केलाय. विद्यापीठाचे मेडल, लेखनाचे विविध पुरस्कार आणि आपलं मोडकं तोडकं लेखन तुलाच समर्पित करत आलेली ही प्रीती.. या सर्वांना तुझ्याच आगमनाची प्रतीक्षा आहे रे. गेलं अर्ध तप तुझ्या त्या कौतुकाच्या स्पर्शासाठी अधीर झालेय. तिची विचार शृंखला मध्येच एका हाकेन तुटली.


बाई साहेब, पाणी देता का जरा ? “ तळपत्या उन्हात तिच्याच वयाची बाई आणि सोबत पाच सहा वर्षाची क पोर अनवाणी चालत तिच्या घराजवळ तहानलेल्या आल्या होत्या. प्रीतीला दया आली.तिने त्यांना पाणी दिल.

बाई साहेब काम मिळेल का इथे?”  त्या बाईचा केविलवाणा प्रश्न. पण प्रीतीला आज G.K. आणि त्याच्या आठवणी यामध्ये व्यत्यय नको होता. तीने त्या बाई कडे विशेष लक्ष न देता काम नाही म्हणून सांगितलं. ती बाई पुन्हा कळवळून बोलली,” धुणे, भांडी, स्वयंपाक, झाडलोट सर्व करीन मी.प्रीतीला आता मात्र चीड आली पाणी देवून हिला दया दाखवली तर पायच पसरायला सुरवात केली. तीने रागातच तिला काम नाही म्हणून सांगितलं. ती बाई उठून चालू लागली. पुन्हा प्रितीने स्वत:शीच विचार केला, आज शनिवार. G.K. सोमवारी यायचाय. शिवाय लग्नाची तयारीही करावी लागेल. या बाईला काम द्यायला काय हरकत आहे ? G.K. चा बंगलाही अजून स्वच्छ केला नाही. हिला काम देवून तिची गरजही भागेल आणि मलाही मदत होईल. म्हणून प्रीती घाईतच घराबाहेर आली. ती बाई आणि मुलगी झाडाखाली सावलीत बसल्या होत्या.  प्रितीने त्यांना घरात बोलावलं. माझी सर्व कामे तुला करावी लागतील. पगाराची काळजी नको.” प्रीती बोलली. ती बाई कृतार्थ झाली. प्रीतीच्या पायाशी लोळण घेत ती बोलू लागली , ” खुप उपकार झालेत बाईसाहेब. माझी पोर दोन दिवसापासून उपाशी आहे. कोण या अनोळखी शहरात ओळख नसताना कुणाला कामावर ठेवतं? तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. “  प्रितीने तिला आणि मुलीला जेवायला घातलं आणि आराम करायला सांगितलं. संध्याकाळी कामाबद्दल बोलू असं सांगून G.K.च्या आठवणीत ती रमून गेली.

दुपारची झोप झाल्यावर उठून पाहते तो आजूबाजूचा सारा परिसर झाडून पुसून स्वच्छ झाला होता. घर आरश्यासारखे लखलखीत होते. ती बाई प्रीतीच्या उठण्याची वाट पहात बसली होती.बाईसाहेब , चहा करू का तुमच्यासाठी ?”. प्रीतीला तिचा हा आज्ञाधारकपण खुप आवडला. ती (म्हणाली) बोलू लागली , “ आज मी तुला आराम करायला सांगितलं होत. अग उद्यापासून आपली काम सुरूच होणार आहेत. उद्या साहेबांचा बंगला स्वच्छ करायला जायचय .”

 “बाई , तुमचे साहेब दुसऱ्या बंगल्यात राहतात ?”,   त्या बाईचा भोळा प्रश्न.

 “अग आमच लग्न नाही झालं अजून. ते परदेशात गेलेत शिकायला. आता परतले की आम्ही लग्न करणार आहोत.”  असं म्हणत प्रितीने तिला बोटातली अंगठी दाखवली. G.K.देवून गेलाय ही अंगठी”.

 “मग बाईसाहेब झक्कास बंगला सजवून देईन की. लग्नाची तयारीही मलाच करावी लागलं ना ?प्रीतीला आश्चर्य वाटलं एका दिवसात ही बाई मैत्रीण सारखी बोलतेय आणि आपण साध नावही विचारल नाही. सहज चौकशी म्हणून तीने विचारले

नाव काय ग तुझं?”

 कजरी

ही तुझी मुलगी वाटत ?

होय बाईसाहेब,  मोहिनी हीच नाव.

हिला वडील नाहीत काय ?

आहेत की, धरणावरचे मोठे साहेब आहेत ते.

मग तुला का अशी काम करावी लागतात. ? “प्रितीने आश्चर्याने विचारलं.

पाच वर्षापूर्वी ते बाहेर गावी जातो म्हणून सांगून गेले. अजून परतलेच नाहीत डोळ्यात पाणी आणून कजरी बोलली.

आपल्या बायको पोरांना असं वाटेवर सोडताना लाज कशी वाटत नाही या लोकांना?” प्रीती रागाने बोलली.

बाईसाहेब मी त्यांची बायको नाही. म्हणजे त्याच असं की आमच लग्न नाही झालं अजून. पण परतल्यावर ते नक्की लग्न करतील माझ्यासोबत कजरी अडखळत बोलत होती. आता सर्व स्थिती प्रीतीच्या डोळ्यासमोर स्पष्ट झाली. राग अनावर होवून ती संतापाने बोलली , अश्या नराधमाला तू जावू कसं दिलस कजरी? त्यांना बायका म्हणजे काय किल्ल्यांची खेळणी वाटतात का? हलकट, नीच... असं माणूस G.K.च्या हाती सापडला न तर तो लोणच बनविल त्याच “, संतापाने प्रीती बोलत होती.

नाही बाईसाहेब असं म्हणू नका गिरीशबाबू देव आहेत. प्रीतीची उत्सुकता शिगेला पोहचली. एक माणूस आपल्या कार्यभाग उरकून एका अबलेला समाजाच्या खस्ता खाण्यासाठी वाऱ्यावर सोडून देतो आणि ही त्याला देव म्हणते? भानगड काय आहे ? म्हणून ती कजरी च्या बोलण्याकडे लक्ष देवून ऐकू लागली. बाईसाहेब मला आई, बहिण, भाऊ कुणीच नाहीत. बाप होता तोही गेल्यावर्षी मेला. आजारामुळे बापाच्याने काम होईना म्हणून मलाच काम करून गुजराण करावी लागे. मी धरणाच्या कामावर होती. तिथ गिरीशबाबू साहेब होते. एकदा चक्कर येवून मी पाण्याच्या टाक्यात पडली. जीवावर उदार होवून त्यांनी मला वाचवल. बाप त्यांचा जन्माचा ऋणी झाला. त्यानंतर मी दोन चार महिने आजारी होते. पण पैशांची चणचण नाही भासू दिली त्यांनी. म्हणाले , “मला हॉटेलात जेवावे लागते. तू घरी बनवत जा. मी पैसे देत जाईन. धरणाच्या कामावर जाण्याची काही गरज नाही.बाप डबा नेवून द्यायचा. अधून मधून तब्ब्येतीच्या चौकशीसाठी गिरीशबाबू येत. स्वयंपाकाची खुप तारीफ करत. एक दिवस औषध घेण्यासाठी बापाला तालुक्याला जा लागलं. पाऊस पडत होता. म्हणून मी पण डबा नेवून दिला नाही. वाट बघून शेवटी तेच आले. मी जेवायला वाढलं. बाहेर पाऊस थांबण्याच नाव घेईना. घरात आम्ही दोघंच. अखेर पावसाने घात केला. काय घडतंय हे कळायच्या आधीच सर्व संपल होत. पण बाईसाहेब त्यांनी बळजबरी नव्हती केली माझ्यावर. ‘मोहिनी हे नाव त्यांच्या आवडीचे, तिच्या येण्याची बातमी कळल्यावरही ते फितूर झाले नाहीत. त्यांनी जबाबदारी नाकारली नाही. मला लग्नाचे वचन दिल. दोन दिवसात परततो सांगून गेले, ते पुन्हा परतलेच नाही.  देव न करो त्याच काही बरवाईट तर झालं नसेल ना बाईसाहेब?”  कजरीच्या एकेका शब्दात वेदना होती. प्रीतीला तिची खुप दया आली स्वत:शीच ती बोलत होती,” काय एकेकाच नशीब असते ? कुठे एका अंगठीच्या वचनावर सहा वर्ष प्रीतिमय होणारा माझा G.K. आणि कुठे हिचा गिरीशबाबू आणि तरीही हिची तक्रार नाही.आधीच प्रीती एक संवेदनशील लेखिका. कुणाच्याही सुखाला तन्मयतेन आणि दुख:ला तितक्याच आर्ततेन आपल्या लिखाणात मूर्त रूप देणारी. कजरीच्या कहाणीने ती वारंवा व्यथित होत होती. आणि G.K.ची तुलना करत होती. किती भाग्यवान आहे मी G.K.!! तुझ्यासारखा पती मिळतोय मला. कजरीची कहाणी ऐकून तुही व्यथित होशील. शेवटी स्वता:च विचारचक्र थांबवत, कजरीला सांयकाळच्या स्वयंपाकाचे सांगून प्रीती बाहेर गेली. रात्री जेवण झाल्यावर नित्यनेमाप्रमाणे diary लिहायला घेतली. साहजिकच G.K. या एका गोष्टी खेरीज तिच्याजवळ दुसरा विषय नव्हता. लिहिताना मध्येच थांबत विचार करू लागली. का कुणास ठावूक G.K. आणि मोहिनीच्या डोळ्यामध्ये साम्य का वाटतय? कोणत्याही गोष्टीचे पडसाद त्याच्या डोळ्यात कसे चटकन उमटतात. याही पोरीच्या डोळ्यात तेच भाव कसे ? दुसऱ्या क्षणाला भानावर येत पुन्हा बोलली छे ! हा काय मूर्खपणा G.K.शिवाय मला आज काही सुचतच नाही. त्या पोरीचा आणि याचा काय संबध ? आपल्याच बावळट विचारावर हसत ती झोपी गेली. G.K.आणि त्याच्या आठवणी यातच तिची रात्र संपली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तिघीही G.K.च्या बंगल्यावर गेल्या. फाटक उघडताच प्रीती सर्वात पहिले गुलाबाच्या झाडाजवळ गेली. “G.K.च किती प्रेम आहे गुलाबावर. G.K.केवळ तुझ्यासाठी या फुलांना मी सहा वर्ष जीवापाड जपल. तुला खुप आनंद होईल ही बहरलेली बाग पाहिल्यावर.प्रीती बडबडत होती. “बाईसाहेब मी तोडू एक फुल ? मला खुप आवडतात ही फुल ? “  मोहिनी अनिमिष नेत्रांनी त्या बागेकडे पहात बोलली. प्रितीने एक फुल तोडून तिच्या केसांमध्ये लावून दिल. आणि कजरीला हाक मारली. कजरी तू बाहेरची साफसफाई कर तोवर मी वर साहेबांची खोली स्वच्छ करते. प्रीतीचा हुकुम मिळताच कजरी कामाला लागली.

       G.K.च्या खोलीत जावून प्रीती एक एक वस्तू डोळ्यात साठवून ठेवावी, पुन्हा कधीही न विसरण्यासाठी, अश्या नजरेन पाहू लागली. त्या खोलीतल्या प्रत्येक गोष्टीला वस्तूला आज G.K.ची प्रतीक्षा होती. प्रीतीनेही या वस्तू जीवापाड जपल्या होत्या. तिलाही या जगात G.K.शिवाय कोण होत ? अपघातामध्ये संपूर्ण कुटुंब गेल्यावर G.K.नी च तिला आधार दिला होता. दुख:च्या गर्तेतून बाहेर काढून तिला समर्थ आयुष्य जगायला शिकवलं होत. आपल्याच धुंदीमध्ये ती गत स्मृतीनांच जणू समोर आणत होती. किती वेळ गेला असेल याच तिला भानच राहील नाही. नंतर तिला आठवले कजरीच बाहेरच काम संपल असेल. म्हणून ती खाली येवू लागली. प्रीतीची चाहूल लागताच कजरीने लगबगीने एक वस्तू टेबलावर ठेवली आणि डोळ्यातील कचरा काढण्याच्या अविर्भाव करीत प्रीतीसमोर येवून बोलली, ” बाईसाहेब बाहेरच काम संपल. आता काय करू ? कजरीची सारवासारव प्रीतीच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. पण प्रितीन तिला तस जाणवू दिल नाही. टेबलावर कजरीन ठेवलीली वस्तू म्हणजे G.K.चा फोटो होता.

अग बाहेरच काम संपवून आतल्या कामालाही लागलीस ? कजरी बघ हेच तुझे साहेब. यांचा फोटो पुसायची गरज नाही बघ. गेली सहा वर्ष आपल्या पापण्यांनी त्यावरची धूळ स्वच्छ करतेय मी आणि त्यावर माझ्या अश्रूचा अभिषेक करतेय. केवळ या एका फोटोच्या दर्शनासाठी तर मी इथ येत होते.

प्रितीच बोलन संपल अन कजरी रडू लागली.

बाईसाहेब मी आपल्या इथ काम नाही करू शकत. ज्या बाईने मला आणि माझ्या पोरीला ओळख नसतांना अन्न पाणी दिले,  तिच्या संसाराला मी आग नाही लावणार. मी कुठेही जाईन हे पाप घेवून. मोहिनीकडे बोट दाखवत कजरी बोलत होती. क्षणभर प्रीतीला काही कळेच ना. पण मग ती सावध झाली.कदाचित ......कदाचित G.K.च तर हिचा गिरीश बाबू नसेल ? धरणावरचा साहेब……. होय G.K. probation मध्ये Dam project वरच तर गेला होता. आता सर्व स्थिती तिच्यासमोर स्पष्ट झाली. गेलं अर्ध तप मनाशी रचलेले सुख स्वप्नाचे मनोरे प्रीतीच्या शब्दात धड धड कोसली. आयुष्यात तीने G.K. नावच एकच स्वप्न पाहिलं होत. तेही भंगल होत. पण शेवटी ती एक समर्थ स्त्री होती. तीने स्वत:ला सावरल. अन कजरीशी बोलू लागली,कुठ जाणार आहेस तू ? पुन्हा एखाद्या धरणावर की बांधकामावर ? तिथे तुझी ही पोर मोठी होईल, तिलाही असाच कुणी गिरीश बाबू भेटेल आणि आपल प्रारब् म्हणून ती सुद्धा सर्व सहन करीत राहील. तिला पाप मानायचा तरी काय हक्क आहे ग तुला ? सुईच्या अग्रावर मावणाऱ्या कोट्यावधी बिजांपैकी एकाचा संयोग झाला की ही भगवंताची मूर्ती जन्माला येते आणि तू तिला पाप म्हणते  ?  स्वता:च सर्वस्व अर्पण करताना घाबरत नाही ना ?  मग स्वतःचे हक्कही मिळवायला शिकल पाहिजे. क्षणिक सुखाच्या मागे लागून वाहवत जावून तुझ्या हातून चूक घडली खरी पण त्याला तू एकटी जबाबदार नाहीस. मी मिळवून देईल तुला तुझे हक्क.

नाही बाईसाहेब गिरीश बाबू तुमचेच आहेत. त्यांचा एवढा अपराध पोटात घाला. अन त्यांना सुखी करा. मी जाईन कुठही.
कजरीचे बोलणे ऐकले अन प्रीती आश्चर्यचकित झाली. कोणत्या मातीची बनली ही बाई ? ज्याला देव म्हणून पुजले तो दगड निघाला. तरी हिची श्रद्धा कमी होत नाही.कजरीशी वाद घालण्यात काही अर्थ नव्हता. शेवटी प्रीती तिला म्हणाली, आजची रात्र तू फक्त इथ थांब. उद्या आपण ठरवू कुणी जायचं ते आणि कजरी ला G.K.च्या बंगल्यावर थांबवून ती घरी परतली. परतली ती पक्का निर्णय करूनच.

       घरी आल्याबरोबर तीन पेन कागद घेतला आणि लिहायला सुरवात केली.......

 “ G.K. Welcome to motherland, welcome home .

हे पत्र तू वाचत असशील तेव्हा प्रीती तुझी राहिलेली नसेल. कजरीला बघूनच तुला प्रीती का आली नाही ? या प्रश्नाच उत्तर मिळालेलं असेल. संपूर्ण प्रवासात कदाचित तू माझाच विचार करत आलेला असशील. अरे असच होत बघ. माणूस विचार एक करतो अन त्याच्या पुढ्यात वाढून दुसरच काही तरी ठेवलल असत. नशीब, प्राक्तन, योगायोग वगैरे शब्दाचे पोकळ खेळ वाटायचे रे मला आजवर, पण आज त्याची महती कळलीय.

लक्ष्मण वनवासाला गेल्यावर, डोळ्याची पापणी न हलवता चौदा वर्ष ऊर्मीलेने त्याची प्रतीक्षा केली होती. माझीही प्रतीक्षा त्यापेक्षा  कमी नाही रे. पण त्या प्रतीक्षेची तू प्रतारणा केलीस.  प्रीतीच्य श्रद्धेची, विश्वासाची प्रतारणा केलीस तू G.K. प्रीती नावाच्या एका स्वप्नाच्या मनोऱ्याची प्रतारणा केलीस, ज्याचा पाया खुद्द तू होतास. G.K. अरे तुझा अपराध कदाचित इतका मोठा नसावाही की त्याला माझ्यासारख्या क्षुल्लक स्त्रीच्या क्षमेची गरज वाटावी. क्षणिक सुखाच्या प्रवाहात आपल्या सर्वस्वाला विसरून वाहत जाणारा तू पहिलाच पुरुष नाहीस. But imagin, imagin just for moment तू जे केलस ते करण्याचा विचार, फक्त विचार ही कधी माझ्या मनात येवून गेला हे तुला कळल असत तर तू सहन करू शकला असतास ? तुझ्या अहंकाराला ते पेलवलं असत का ? त्याच स्वच्छ मनान तू प्रीतीचा स्वीकार करू शकला असतास का ? एकनिष्ठेच व्रत फक्त स्त्रीनच पाळायच असत” ,  हा इथला अलिखित नियम कदाचित निमूटपणे मीही मान्य केला असता पण सुदैवानं म्हण किवा दुर्दैवान ,  “ स्त्रीलाही स्वत:च अस्तित्व, स्वाभिमान असतो. अन तीने तो जपला पाहिजे.हे तूच मला शिकवलं त्यामुळे क्षमा करण्याचा उदारपणा मी नाही दाखवू शकत. माफ कर मला. खरतर तुझ्या उपकाराची जाणीव ठेवून तरी मी तुझ्या स्वागतासाठी यायला हव होत. पण काय आहे. आम्ही स्त्रिया तुम्हा पुरुषांप्रमाणे स्वप्नवादी , तत्ववादी नसतो. त्याग,  ध्येय,  achievement अशी आकाशाला गवसणी घालणारी आमची स्वप्न कधीच नसतात. आम्हाला फक्त एक देव्हारा हवा असतो. आपल्या सर्वस्वाची पूजा करायला. हास्याची फुल उधळायला अन अश्रूचा अभिषेक करायला. त्या देव्हाऱ्यात एक मूर्ती हवी असते. आज ती मूर्तीच भंगलीय तर मी देव्हाऱ्यात येवून काय करू ? पण हो कजरीच्या हृदयात तू अजूनही देव आहेस . एक अंगठी देवून तू मला लग्नाच वचन फक्त दिल होतस. पण कोणतेही वचन न मागता तीने तुला आपले सर्वस्व दिलेय. तिचा अधिकार निश्चितच माझ्यापेक्षा खुप मोठा आहे. तिचा आनंदान स्वीकार कर. G.K. एका बछ्डीला तिचा हरवलेला बाप मिळू दे. एका असहाय स्त्रीच्या तपश्चर्येला फळ दे. मला खात्री आहे कजरीचा गिरीश बाबू एवढा दयाळू तरी निश्चितच आहे. तिची आणि माझी भेट हे नियतीने कजरीला न्याय मिळवून देण्यासाठी दिलेला संकेत आहे. आणि हो लग्नाला बोलवायला विसरू नकोस. तुझी पत्नी होण्याच सौभाग्य भलेही मी नाकारल,  पण तुझी मैत्री तोडण्याचा करंटेपणा मी कधीच करू शकणार नाही. बराय भेटू कधीतरी पुन्हा”….........प्रीती

ते पत्र घेवून दुसऱ्या दिवशी प्रीती कजरीकडे गेली. ते पत्र आणि अंगठी कजरीच्या हातात ठेवत प्रीती तिला म्हणली.G.K.जाताना म्हणत होता मी परतल्यावर काय देशील ? त्याला सांग कजरी आणि मोहिनी या अनमोल भेटी त्याच्यासाठी ठेवून प्रीती गेलीय.असं बोलून ती निघून गेली. कजरी मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून रडत होती. आजवर G.K. शिवाय प्रीतीच अस्तित्व नव्हत. कधी प्रीतीला त्याची गरजही वाटली नव्हती. पण आज मात्र या अनंत विराट विश्वात तिला आपल अस्तित्व शोधायचं होत. सिध्द करायचं होत. एक वेलही आयुष्यभर वृक्षाशिवाय जगू शकते हे जगाला पटवून द्यायचं होत. सर्व काळे ढग तिला इंद्रधनुष्यची आशा दाखवत होते आणि प्रीतीच्या गरुड पंखाला आज एका नव्या क्षितिजाची प्रतीक्षा होती.................................. 

वैशाली करडे  
        

1 comment: