पुस्तकं –
लाल बासनात बांधलेली
ऋषींसारखी –
सुरकुतेली, निश्चल, मौनी, ज्ञानी –
शेल्फच्या धुकट काचांमधून
उत्सुकतेने डोळे विस्फारत पाहणारी,
'मला कडेवर घ्या' म्हणत खुणावणारी –
मोबाइलच्या, टॅबच्या, रीडरच्या
गुळगुळीत स्क्रीनवरून
घसरगुंडी खेळल्यासारखी
सरकत जाणारी –
एमपीथ्री होऊन
कानात गुजगोष्टी सांगणारी –
पुस्तकं.
करतात सोबत आपल्याला कुठेही –
ट्रेनमध्ये, बसमध्ये, बसस्टॉपवर, बाइकवर...
प्रवास रटाळ असला तरी
पुस्तकं आपल्याला नेतात
अद्भुत सफरींवर... घनदाट अरण्यात...
किंवा
मनाच्या तळघरात...
आपण आनंदी असो वा दुःखी वा सुखी
ती एेकून घेतात आपलं म्हणणं निमूट.
शोषून घेतात आपले अश्रू
खुलवितात आपलं हास्य.
जपून ठेवतात आपल्या आत –
'ते' खास दिले-घेतलेले गुलाब
किंवा
सुरकुतलेली निरागस चॉकलेटची सोनेरी चांदी...
किंवा
जाळीदार करतात स्मरणांची पिंपळपाने...
पुस्तकांच्या पोटात असते
अलिबाबाची गुहा –
अनेक रत्नांची,
राग, लोभ, मत्सर अशा नवरसांची,
मन विषण्ण करणार्या वास्तवाची
आणि कल्पनेपलीकडच्या
अद्भुत विश्वाचीही...
फक्त पुस्तके
'खुल जा सिमसिम' न म्हणताच
उघडी करतात आपली कवाडं
उघडी करतात आपली कवाडं
कोणाहीसाठी मुक्तपणे...
फक्त अवकाश
एक पान उलटण्याचा!
....
प्रणव सखदेव