Saturday, 25 June 2022

विश्वास पाटील महासम्राट - झंझावात | Mahasamrat - Zanzavat by Vishwas Patil

 छत्रपती शिवरायांची जीवनगाथा म्हणजे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणारी धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड अर्थात झंझावात. छत्रपती शिवरायांच्या हदयात ज्या घटनांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग जागवलं, त्या घटनांचा विस्तृत परीघ आणि अवकाश सादर करणारं हे पुस्तक आहे. शिवरायांच्या जन्मापूर्वीच्याही आधीच्या अज्ञात इतिहासावर प्रकाशझोत टाकत नवी ऐतिहासिक मांडणी यात आहे. जिजाऊ आणि शिवरायांचा विजापूर दौरा, शहाजीराजांच्या उपस्थितीतली शिवरायांची तालीम, हा इतिहासाचा पैलू मराठी वाचक प्रथमच वाचतील आणि तो वाचकांना भारावून टाकणारा ठरेल, यात शंका नाही.

Buy Print Books Online Mehta Publishing House webstore: https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MAHASAMRAT-ZANZAVAT/3619.aspx

Subscribe to Mehta Publishing House channel: https://www.youtube.com/c/MehtaPublishingHouse1976

Follow us here: Website | https://www.mehtapublishinghouse.com 

Friday, 24 June 2022

New Arrivals Books

 

 उत्तुंग  ---  श्रीकृष्ण म्हणजे भारतीय मिथक कथातलं सर्वात अद्भुत मिथक. या मिथकाभोवतीचं वलय आजवर अनेक अद्भुत अविष्कारातून मांडण्यात आलं आहे. मात्र कृष्णाच्या ईश्वरीय उत्तुंगतेपेक्षा त्याची मानवीय उत्तुंगता अधोरेखित करण्याचा, त्याच्या समतोल व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या कादंबरीतून झाला आहे. कृष्णाला लोकनायकाच्या भुमिकेत सादर करणं, हे या कादंबरीचं खास वैशिष्ट्य. कृष्णजीवनातील अनेक घटनाक्रमातून त्याचा मानवतावादी ईश्वरी प्रवास ही कादंबरी मांडते. Buy Now|खरेदी करागोवा... मला दिसलेला ---गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि `इट,ड्रिंक अँड बी मेरी’ छाप उथळ प्रचारकी जाहिरातींमुळे गोव्याच्या खऱ्या अंतरंगाकडे पर्यटकांचे लक्ष जात नाही. गोव्याचे बाह्यशरीर दिसते. पण अंतरंग दिसत नाही. दिव्यावरची काजळी काढावी तसा गोव्याबद्दलचा हा अध्यास दूर केल्यासच खरा गोवा दृष्टिगोचर होईल. म्हणूनच गोव्याचे मूळ स्व-रूप, मूळ संस्कृती, गोव्याची अभिजात ओळख हलक्या-फुलक्या शब्दांत लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते. गोव्यातील अनेक अज्ञात बाबी समोर आणत हे पुस्तक एका नव्या गोव्याचे दर्शन घडवते.Buy Now|खरेदी करा

क्रिमिनल्स इन युनिफॉर्म ----Latest Review

 

                Both writers Sanjay & Trivedi do not have Marathi as their mother tounge.  And even before in the laungage of their mother tounge (hindi) and commercial launagge English…. They have published book first in Marathi. Hindi & English edition are still awaited. I think they are targeting lower rank of police (constables to Inspector level) for a potential reader for their book. Even though names changed, If I as lay-man knows it then every policeman in Maharashtra will know who are the charecters they are reading about. Is it so difficult to guess the difference between Parambir & Mahavir ???----Mandar Parab, Senior Journalist

               The story is extremely fast-paced and racy. Each chapter carries a certain amount of shock value for the reader. The way an onion reveals its layers as you slowly peel it, similarly four linear stories are revealed one by one at regular intervals. After each layer of the story is revealed, the truth comes to light, igniting all the senses of the reader.----Geeta

               Reading this book is like watching a web-series. writers have written it in episodic/chapter wise. As a regular reader & Netflix lover, I think that entire style of writing, plot setting, suspense building , speed …. All screaming to say that more than book, a web-series was in mind while writing this book. If you have good visualization power then You may agree with my views----Sandeep Thorat
            
               A hardcore journalism’s best transformation into a thriller book The book has interesting plot. Which has been very much in recent memory. Just happened last year. The story has been set in India’s commercial and underworld capital, Mumbai in early 2021. In the game of police vs conscience where all characters are grey, this dark story is of that one man who takes charge and becomes a player from pawn and this journey of his traverses through the political, criminal, bureaucratic, judicial and corporate world. The main protagonist of the story is police officer who is chief of elite CIU unit. There are frequent flashbacks to previous three decades before coming back to 2021, to bring out the character & life of the protagonist. When he was wronged, no one got to know, but when he did something wrong, it took the nation by storm. When he wronged the wrongdoers, he became both, the hunted and the hunter. Its jointly authored by two hardcover crime reporters. Surprisingly both authors have abstain from keeping their photographs in the book. But never the less all info about them is available in book. they have succeeded in simplying one of most complex case in the book for a common reader.---Dr.Ashwini
                
                संजय सिंह आणि राकेश त्रिवेदी ह्यांनी लिहिलेले "क्रिमिनल्स इन युनिफॉर्म" हे पुस्तक वाचले. पुस्तकातील भाषा समजायला सोपी आणि जलद आहे. मला ह्या पुस्तकातील कथा , कथा ज्या घटनेवर आधारित आहे त्या घटनेच्या पडद्यामागील कथा शिवाय Public Domain मध्ये न आलेले आणि सार्वजनिक रित्या उघड न झालेले तपशील मला जाणून घ्यायचे होते. पात्रांची नावे बदलली असली तरी, बाकीचे सर्व तपशील विस्कळीत झालेले नाहीत. पुस्तक वाचताना वाचक म्हणून मला काही प्रश्न पडले होते ,पण जसे जसे पुस्तक वाचून हातावेगळे होत होते तशी तशी प्रश्नांची उत्तरे सुद्धा मिळत गेली ,पण सदर प्रश्नांनी माझी उत्सुकता सुद्धा जागी केली , पुस्तकाच्या क्लायमॅक्स मध्ये एक खुलासा कटाचा मुख्य हेतू ! आता मला समजले की तपास यंत्रणा आणि राजकारणी स्वतःचा मुखवटा उघडण्याच्या भीतीने बोलण्यात का घाबरतात.--एस गांगण.
 
                 मस्त......... जबरदस्त।  पुस्तकाच्या नावावरुनच समजतं की आत नक्की काय आहे. क्राईम इंटेलिजेन्स युनिट क्रिमिनल इन युनिफॉर्म कसं बनलं त्याची ही गोष्ट आहे. चांगले पोलीस आणि वाईट पोलीस अशी वर्गवारी करणं सोप्प आहे.पण वाईट पोलिसांची काळी करतूत बाहेर येणं सहसा कठीण असतं. या पुस्तकात अश्याच पात्रांचा पर्दाफाश करण्यात आलाय. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीसांना ही त्याच्या सारखाच विचार करावा लागतो. ही मांडणी जेव्हा घट्ट होते, यशस्वी तेव्हा त्यांचे गुन्ह्याचं नियोजन एखाद्या सराईत गुन्हेगारापेक्षा ही भयंकर असते.----जयेश उपाध्याय.

              देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडते. कथानकाचं वृत्तपत्र आणि टीव्हीवर पाहिलेल्या बातम्यांशी साधर्म्य आहे.तरीही अनेक प्रश्न अनुत्तरीत होते. लेखक संजय सिंह आणि राकेश त्रिवेदी यांनी अनेक छुुपे संदर्भ शोधलेत. लोकांना या गोष्टींची कल्पनाच नव्हती. अनेक गुढ गोष्टींना पुढे कथानक वेगानं पुढे घेऊन जातं. त्यामुळं उत्कंठता शेवटच्या पानापर्यंत कायम राहते...----व स शेट्टी.

             मी ते वाचले कारण तुकड्या-तुकड्यांमध्ये छापलेल्या अर्ध्या अपूर्ण बातम्यांनी संपूर्ण आणि वास्तविक कथेला न्याय दिला नाही, जी मूलत: लपवलेली राहते आणि पुस्तकातील रहस्य उलगडते. हे पुस्तक वाचल्यानंतर मी लेखकांबद्दल गुगल केले. लेखकाचा गुन्हा लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही, गेल्या दोन दशकांपासून ते हे करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आणि अहवाल देताना त्यांना जे काही सापडले, ते त्यांनी पुस्तकात विणले, असे गृहीत धरणे सोपे आहे.--जयेश आर.

Thursday, 23 June 2022

कुलामामाच्या देशात,प्लँटोन --Latest Reviews

 

                                मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केलेले "कुलामामाच्या देशात  "हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले. दिवसेंगणिक या पुस्तकाला वाढते समिक्षण वाचून परत वाचण्याचा मोह झाला . अमरावतीचे प्रसिध्द साहित्यीक तथा केंद्रीय उत्पादन शुल्क खात्याचे वरीष्ठ अधकारी श्री जी. बी. देशमुख यांनीत्यांचे मित्र वन विभागाचे मुख्य वन संरक्षक श्री. रवींद्र वानखडे या वनाधिकाऱ्याने त्याच्या मेळघाटातील १७ वर्षाचे सेवाकाळात जंगलात अनुभवलेल्या चित्तथरारक घटनांवर आधारित हा वन कथासंग्रह आहे . श्री. रविंद्र वानखडे या ज्येष्ठ वन अधिकाऱ्याचे प्रत्यक्ष अनुभवाचे श्री. जी. बी. देशमुख यांनी केलेले लेखांकन वाचकाचे मानवी मनाला मेळघाटातील हिंस्त्र पशू प्राण्यांचे, पक्ष्यांचे व तेथील आदिवासींचे दैनंदिन जगणे याचे डोळ्यांसमोर जीवंत दर्शन प्रत्यक्ष साकारणारे आहे. श्री.रवींद्र वानखडे या वनाधिकाऱ्याची महत्तम सेवा अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलात गेली . भारतीय पक्षीतज्ञ आणि वृक्ष अभ्यासक तथा प्रसिध्द साहित्यीक श्री. डाॅ. मारूती चितमपल्ली हे मेळघाट मधून वनाधिकारी म्हणून बदलून गेल्यावर श्री रवींद्र वानखडे यांनी त्याचा प्रभार घेतला होता असे कळते. मेळघाटात कोरकू व गवळी ही आदिवासी जमात मुख्यतः वसलेली आहे मात्र त्यात ‘कोरकू’ चे वास्तव्य जास्त प्रमाणात आहे. मेळघाट हा नैसर्गिक वनश्री सौंदर्याने नटलेला परिसर विस्तीर्ण पसरलेला आहे . सुंदर वनश्री मनाला प्रसन्न करणारी असली तरी हिंस्त्र पशूंचे अस्तित्वांमुळे तितकीच भयावहही आहे . विस्तीर्ण जंगलातील दऱ्या खोरे, डोंगरातील दाट वृक्षाचे सोबतीला तापी सिपना नदींचे खळखळणारे विस्तीर्ण पात्राचा मनमोहक नजारा नेत्रसुखद असला तरी हिंस्त्र पशूचे वावरामुळे तितकाच थरारकही आहे . हिंस्त्रपशु निशाचर असले तरी दिवसासुद्धा त्यांची भिती भयावह व काळीज चिरणारी आहे. वाघ,अस्वल, रानगवा, बिबटे, सांबार , रानकुत्रे इत्यादीं तत्सम जंगली पशुंचा मुक्त संचार तेथे असताना त्याभागातच कोरकू जमातीचे वास्तव्य व दैनंदिन जीवन जगताना त्यांना वाघा सारखे हिंस्त्र पशुचे दर्शन व सानिध्य हि नित्याची व सर्व साधारण बाब आहे. कोरकूचे भाषेत ‘कुला ’ म्हणजे वाघ . कोरकू लाडाने वाघाला ‘मामा’ म्हणतात. उन्हाळा संपला की पावसाळ्यात या जंगलात हिरवीगार नटलेली वनश्री ,कधी कधी गारांचा वर्षाव झाला की गावे हिम चादरीखाली झाकली जातात ,असा हा सुखद नजारा देणारा मेळघाट हा जंगल प्रदेश आहे. ‘ कुलामामाच्या देशात ‘ हा लेखक श्री जी.बी. देशमुख यांनी लिहीलेला ग्रंथ एक वनानुभवाचा कथासंग्रह आहे. या संग्रहात वाघा शिवाय रानगवे , रानकुत्रे , हत्ती यांचे अस्तित्व जाणवून त्यांचा जंगलातील विहार, जगण्यासाठी भक्ष्य शोध, वावरत असतानाचे प्रत्यक्ष अनुभव वनाधिकारी श्री रवींद्र वानखडे यांनी` याची देही याची डोळ्यां ` जीव मुठीत घेत छाती उदार करून टिपलेले प्रसंग व त्या प्रसंगातील घटनांचे वर्णन श्री. जी. बी. देशमुख यांनी कुलमामाचे देशात या अनोख्या शिर्षकी पुस्तकातून त्या २५ कथास्वरूपात शब्दबद्ध केलेले आहेत. कथासंग्रहातील अदभूत आनंद देणार्या सर्व २५ कथा वाचनीय आहेत. त्यातील लेखकाची बोलकी कथनशैली, जंगल सफारी चा थरार वाचकास खिळवून ठेवणारा व आवर्जून लक्षात राहील असाच आहे. प्रसिध्द साहित्यीक श्री जी.बी. देशमुख यांना लेखनाचा चांगला सराव आहे. विविध मोठे वृत्तपत्र आणि फेसबुक माध्यमातून नियमितपणे त्यांनी केलेलं लेखन अप्रतिमच असते यात दुमत नाही . त्यांचे वडिलांचे जीवनावर आधारित महारूद्र, पप्पूच्या पुड्या, प्राॅमिसलँड , गोष्ट महानायकाची, अ-अमिताभचा हि त्यांची साहीत्य संपदा वाचून हे लक्षात येतेच. "कुलामामाचे देशात" या ग्रंथात लेखकाने श्री. रवींद्र वानखडे यांचे वनानुभव खास वऱ्हाडी शब्दात सोपे व सरळ लेखनशैलीत मांडले आहेत. जंगलातील आदिवासींचे जगणे त्यांचे रितीरिवाज या वरही त्यांनी प्रकाश टाकला आहे त्यातून बरीच नावीन्यपूर्ण माहिती वाचकास मिळते . वाघाची शिकार पद्धत, त्याचे जंगलात नैसर्गिक जीवन ,जमीनीवर वाघांचे पंजाच्या उमटलेल्या ठशावरुन वन कर्मचाऱ्यांची वाघाची गणना करण्याची अनोख्या पद्धतीची माहिती अदभूत आहे दुसऱ्या प्राण्यानं केलेली शिकार, वाघ स्वत:हून माणसावर हल्ला करत नाही , हा समज , रानकुत्र्यांनी पाण्यात उतरलेल्या एका सांबराची शिकार करण्यासाठी रात्रभर पाळलेला संयम ,त्यातून रानकुत्र्यांच्या सवयी आणि शिकारीच्या शैलीबद्दल ग्रंथातील बरीच माहिती ज्ञानवर्धक आहे. भोलाप्रसाद या मदांध हत्तीला त्याच्या माहुताचे हत्येचा पश्चात्ताप, त्या मदांध अवस्थेतही त्याच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा शोक ग्रंथ वाचतांना मानवी हदय हेलावून जाते. मेळघाटच्या जंगलाची वैशिष्ट्ये,व आदिवासींचे सान्निध्यात हिंस्त्र प्राण्याची जीवन पद्धती व त्या माहोल मध्ये वन अधिकाऱ्यांची जीवावर उदार होत जंगलातील सेवेचा थरार याची रोचक मांडणी हे या ग्रंथाचे यश आहे . पुस्तकावरील अन्वर हुसेन यांनी रेखाटलेले वनाचे नैसर्गिक रंगात व विशीष्ठ चित्रशैलीतील मुखपृष्ठ आकर्षक व मनोवेधक आहे. आतील चित्रे पण बोलकीच आहेत. लेखक श्री जी. बी. देशमुख यांचे कुलामामाचे देशात या ग्रंथाचे कौतुकास्पद समिक्षण विवीध लेखकांकडून भरभरुन तर होतच आहे परंतू लोकसत्ता सारखे महाराष्ट्रातील अग्रणी वृत्तपत्राने त्या ग्रंथाची दखल घेऊन श्री मंगल कातकर यांनी केलेले समीक्षण निश्चितच लेखकासोबतच साहित्य नगरी अमरावतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे याचा उल्लेख करावाच लागेल. प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित हे पुस्तक वाचकांनी जरूर वाचावे. मेळघाटातील थरारक जंगल सफारीचा एक अदभूत आनंद वाचकास मिळेल याची मला खात्री आहे.---वा पां.जाधव, अमरावती

                                     कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचताना जंगल , आरण्य, रान ही सारी नावं पोहचतात मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात आणि हत्तींसारख्या महाकाय प्राण्यांपासून ते दोन पायाच्या मानवांपर्यंत असलेले तेथिल रहिवासी सारे डोळ्यासमोर येतात. त्यातील सार्वभौम राजा असतो अर्थातच वाघोबा. हा वाघ मेळघाटातील कोरकू जमातीचा जवळचा आणि लाडका `कुलामामा` .त्याचे राजस रूपडे, भेदक डोळे, अत्यंत नेटत्या पध्दतीने खाणे, दिलदार स्वभाव, आपल्यापेक्षा पिल्लांसाठी स्वतःच्या नियमांना घातलेली मुरड या गुणांमुळे हा कुलामामा अधिकच जवळचा वाटू लागतो. `कुलामामाच्या देशात` या पुस्तकातील हे सारे लिखाण म्हणजे अरेबियन नाईट्स पेक्षाही सुरस आणि चमत्कारिक वाटते.त्यातील वनातील झाडे, पशू पक्षी अगदी मासे सुध्दा `कुलामामाच्या देशात` या पुस्तकात आपल्याला भेटतात.जेष्ठ वनाधिकारी रवींद्र वानखेडे यांच्या अभ्यासपूर्ण अनुभवांना शब्दात मांडले आहे श्री.जी.बी देशमुख यांनी! यात अनुभव संपन्नता आहेच पण त्या बरोबर खुसखुशीत आणि चेह-यावर हास्य रेषा उमटवणारी भाषा देखील आहे. तिथल्या बोली भाषेचे शब्दही ओघवत्या लिखाणात शोभून दिसतात. लिखाणातून सतत जाणवते निसर्गावर मानवाचे अतिक्रमण बघून आलेली असहाय्यता आणि खिन्नता. सतत हे धन वाचवण्याची सा-यांची धडपड आणि तेही अपू-या साधन सामुग्रीनीशी! कुलामामा आपल्या मर्जीचा मालक त्यामुळे दिवसेंदिवस दर्शनासाठी ताटकळणा-याची फजिती करतानाच दुस-याच कोणाला तरी सहजतेने दर्शन देणारा कुलामामा एकदम भारी!. बिबट्याचा बेरकी स्वभाव, गवे आणि रानडुकराने पाठीला पाठ लाऊन आत्मरक्षणासाठी केलेली भिंत, रानटी कुत्र्यांचे झुंडीने केलेला हल्ला आणि जिवंत शिकारीची तोडलेले लचके, मोहाची फळे खाऊन झिंगणारी अगडबंब अस्वले हे सारे प्राणी या पुस्तकात आपल्याला भेटतात आणि स्तिमित करतात. पुस्तक वाचून झाल्यावर ये दिल मांगे मोअर अशी अवस्था होते. मनाला एकच रुखरुख वाटते की हा समृध्द ठेवा पुढील पिढ्यांसाठी आपण जपणार की नाही? जगा आणि जगू द्या हे आपण कधी शिकणार? पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि छपाई सुंदर! नव्या अनुभवांची प्रतीक्षा सर्वच वाचकांना आहे हे निश्चित.---डॉ किरण पाटणकर, पेडियाट्रिशीअन, सोलापूर

                 मेळघाटातील जंगलकथा... सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांना मामाच्या गावाला जायचे वेध लागतात आणि जर का तो मामा जंगलचा राजा असेल, त्याच्या अस्तित्वाचा दबदबा असेल, तर...? अशाच रुबाबदार मामाच्या गावाची सफर घडवणारं, थरारक, रोमांचकारी, भावनिक अनुभवांत चिंब भिजवणारं पुस्तक म्हणजे ‘कुलामामाच्या देशात’ हा कथासंग्रह. यात ज्येष्ठ वनाधिकारी रवींद्र वानखेडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभवकथा जी. बी. देशमुख यांच्या खुमासदार शैलीत वाचायला मिळतात. एकूण २५ कथांचा हा संग्रह आहे. जंगल, तिथल्या प्राण्यांचे जीवन, आदिवासींचं जगणं, वनक्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं जीवावर उदार होऊन कर्तव्य पार पाडणं या सगळ्याचा रोचक, थरारक, भावनिक अनुभव वाचकांना या कथांतून येतो. प्रत्यक्ष वनाधिकाऱ्याने कथन केलेल्या वास्तव अनुभवांबद्दल विलक्षण वाचकांनाही साहजिकपणे उत्सुकता असते. कोरकू आदिवासींच्या कुलामामा म्हणजे वाघोबा. मेळघाटाच्या जंगलातला हा रुबाबदार कुलामामा काळजात धडकी भरवत असला तरी त्याच्या दर्शनाची उत्कंठा तिथले कर्मचारी, अधिकारी आणि पर्यटकांनाही लागलेली असते. कधी कुलामामाला पाहण्यासाठी, कधी संकटात सापडलेल्या कुलामामाची सुखरूप सुटका करण्यासाठी, तर कधी त्याचा माग ठेवण्यासाठी केले जाणारे प्रयास ‘डरकाळीचा थरार, ‘जीवाची पर्वा’, ‘अज्ञात पाहुणा’ यांसारख्या कथांतून वाचायला मिळतात. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचे स्वत:चे एक तत्त्वज्ञान असते. तिथे ‘सव्र्हायव्हल ऑफ दी फिटेस्ट’ हा एकच नियम असतो. दया-मायेच्या भावनेपेक्षा स्वअस्तित्वाचे भान सगळ्यात टोकदार असते. हे तत्त्वज्ञान ‘जीवाचा आकांत’, ‘मेळघाटचे दारासिंग आणि किंगकाँग’, ‘जगण्याची उमेद’ या कथांतून प्रत्ययाला येते. हत्ती आणि माहूत यांचं नातं सहसा जिव्हाळ्याचं असतं. रागाच्या भरात भोला हत्तीने केलेली माहूताची हत्या व त्यानंतरचा त्याचा पश्चात्ताप, आक्रोश, माहूताप्रति असणारं प्रेम व त्यासाठी त्याने केलेला स्वअंत याचं हृदयद्रावक वर्णन ‘खूश रहना मेरे यार’ व ‘महाकाय आकांत’ या कथांमध्ये वाचून आपलेही डोळे पाझरतात. जे लोक बेशिस्त असतात त्यांना ‘जगली’ म्हटलं जातं. पण जंगलातल्या प्राण्यांना शिस्त असते. ते वेळप्रसंगी संयम, जबाबदारीचं भान कसं दाखवतात ते ‘रानगव्यांची कवायत’ कथेत वाचायला मिळतं. आपल्याला असं वाटत असतं की वाघ उष्टी शिकार खात नाही. पण वेळ आली तर वाघीण आपल्या पिलांचे पोट भरण्यासाठी अर्धवट खाल्लेली शिकार खाऊन वेळ कशी मारून नेते ते ‘आणि वाघीण खानदान की इज्जत विसरली!’ या कथेत वाचायला मिळतं. मेळघाटात आदिवासी अवैध शिकार आणि मासेमारी करत असतात. रोगोर, एंडोसल्फॉनसारखी कीटकनाशकं टाकून किंवा डायनामाइट वापरून अवैध मासेमारी केली जाते. कीटकनाशकांमुळे क्विंटलच्या वजनाएवढे मासे मरून पडतात. असे मासे खाल्ल्याने माणसांना विविध आजार होतात. डायनामाइटचा स्फोट घडवताना बऱ्याच वेळा आदिवासींची बोटे तुटतात, हाताच्या चिंध्या होतात. जंगलात घडणाऱ्या अशा अवैध गोष्टी ‘एक थरारपट’, ‘अवैध मासेमारी’, ‘वैराटची जंगलकथा’ या कथांमधून वाचायला मिळतात. ‘हिरूबाई भाग गयी’, मेहमान रह गया’ या कथाही आपल्याला अंतर्मुख करतात. प्रत्येक प्राणी आपल्या ताकदीनुसार सावज हेरून शिकार करतो. गाय, म्हैस, बैल, रानगवा यांसारख्या वजनदार प्राण्यांची शिकार वाघ करतो. पहिली शिकार खाऊन संपल्यावरच तो दुसरी शिकार करतो. माणसासारखं तो अन्न साठवून ठेवत नाही. रानकुत्रे टोळीने सावजाचा पाठलाग करून, दमवून त्याचे लचके तोडतात. तर बिबट्या सांबर, चितळ, भेकर अशा छोट्या सावजांना लक्ष्य करतो. अस्वल, रानगवे, रानटी कुत्रे, सांबर यांची जगण्याची पद्धत, शत्रूशी लढण्याची कला आदी माहिती या कथांमधून मिळते. कथेची भाषा साधी, सोपी व प्रवाही आहे. प्रत्यक्ष जंगलातले अनुभव कथेच्या रूपात मांडलेले असूनही त्यांत कुठेही रटाळपणा जाणवत नाही. मेळघाटातले हिरवेगार दाट जंगल आणि त्यातला रुबाबदार कुलामामा अन्वर हुसेन यांनी अतिशय सुंदररीत्या मुखपृष्ठावर चितारला आहे. हुसेन यांनी प्रत्येक कथेचा आशय समर्पक चित्रांतून मांडल्यामुळे कथा वाचकांच्या काळजास भिडतात. असा हा मेळघाटातल्या जंगलाचा सचित्र रोमांचकारी अनुभव देणारा, ‘वन है तो धन है, तो जन है’ असं शेवटी सांगणारा हा कथासंग्रह नक्कीच वाचनीय आहे. – मंगल कातकर                                                   
                                
                 कर्तव्यदक्ष अधिकारी रविंद्र वानखेडे यांनी यांची देही यांची डोळा अनुभवलेले व कथन केलेले स्वानुभव , प्रथितयश, ऊत्साही लेखक जी बी देशमुख यांनी शब्दांकित केले व आपल्याला मेळघाटासारख्या मागासलेल्या, दुर्गम, तरीही प्रसिद्ध भूमीत डोकावण्याची संधी दिली आहे. त्यांचे " कुलामामाच्या देशात " हे पुस्तक वाचले. साध्या सोप्या भाषेतील हे लिखाण आपल्याला अलगद मेळघाटात नेते. धाडसी वनरक्षकांच्या वेगळ्याच दुनियेत आपण पोचतो. तिथला थरार अनुभव करतो. आपल्या लक्षात येत की मेळघाटातील वनाचे हे संरक्षक , तिथली सामान्य माणसे, व प्राणिमात्र नेहमीच धोक्याला सामोरे जात असतात . ह्या सर्वांचेआयुष्य एकमेकांवर अवलंबून असते. ह्या सर्वांना ज्याच्यापासून धोका असतो त्या वाघोबाच्या (कुलामामाच्या) आसपास या सर्व कथा घडतात. सर्वांनाच या रुबाबदार प्राण्यांबद्दल भयमिश्रीत आदर वाटतो. बिबट्या व रानटी कुत्रे मात्र तितके आदरणीय नसतात. अस्वलाचा हल्ला भयावह असतो. कायदे तोडणारे (शिकरी, तस्कर) जंगलातही असतातच. त्यांचे उद्योगही लक्षणीय असतात. जंगलातील झाडे, झुडपे व पाणवठाही महत्वाचे असतात. तसेच महत्वाचे असते ॠतुचक्र. कर्तव्यदक्ष वनरक्षक, वन्यप्राणी व आदिवासी यांनी अनुभवातून शिकलेल्या गोष्टी वाचून एखादा गुप्त खजिनाच हाती लागल्यासारखे वाटते. या वेगळ्याच दुनियेतील नवनवीन पद्धती, माहिती व अनुभव वाचून आपल्या मनाच्या कक्षा रुंदावशतात. छान साहित्य, जरूर वाचाच . संग्रही ठेवण्याजोगे पुस्तक आहे.---डाॅ. मीना शहा नातू.

              जी.बी.देशमुखांचे "कुलामामाच्या देशात" सर्वांग सुंदर पुस्तक* चार दिवसांपूर्वीच ‘कुलामामाच्या देशात’ हे सर्वांगसुंदर पुस्तक वाचनात आले. विदर्भातील मेळघाट, तेथील जंगलवैभव हे तर सृष्टीचे एक अद्भूत लेणे. कोणत्याही ऋतुमध्ये तुम्ही मेळघाटात गेलात तरी तेथील सौंदर्य तुम्हाला मोहून टाकते. मग विचार करा एखाद्या व्यक्तीला जर इथे २४ तास १२ महिने असे काही वर्षे रहायला मिळालं तर? खरा नशीबवानच तो! आणि त्यात असा माणूस संवेदनशील उत्तम निरिक्षणशक्ती व स्मरणशक्ती असलेला असला तर? अशी व्यक्ती आहे श्री रवींद्र वानखडे… वनखात्यात वनाधिकारी म्हणून त्यांचे मेळघाटात दीर्घकाळ वास्तव्य झाले. निधडी छाती, कामावर प्रेम, चौफेर निरिक्षण, वन्य प्राण्यांची आवड, अहर्निश भटकंती या सर्वांमुळे त्यांच्याकडे विलक्षण अनुभवांचे समृद्ध गाठोडेच जमा झाले तर काही नवल नाही. ते अस्सल अनुभव तपशीलांसहित त्यानी व्यक्त केले सिद्धहस्त लेखक श्री जी. बी. देशमुख यांच्याकडे. या समृद्ध अनुभवांना शब्दरूप देऊन आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे देशमुख सरांनी. आपले बोट धरून ते आपल्याला अलगद त्या मेळघाटात घेऊन जातात व तिथेच खिळवून ठेवतात. त्या दाट झाडीत, विविध वृक्षांच्या सावलीत, कधी नदीओढ्यांच्या काठाने, कधी उंच डोगरांच्या कुशीत, कपारीत, आदिवासींच्या गावात तर कधी मचाणावर… रात्री… एकट्यानेच तो वाघांच्या सानिध्यातील थरार अनुभवत! तुम्ही या जंगलात केव्हा हरवता तुम्हाला समजत नाही. मग तुम्ही एक वाचक नसता तर एक रवींद्र सरांच्या जागी कथानायक असता आणि त्या अनुभवांची प्रत्यक्ष अनुभूती घेत असता. या गारूडात आपण अडकून जातो व पुस्तक संपवूनच ते खाली ठेवतो. ही किमया आहे जी बी सरांच्या प्रत्ययकारी शब्दांची! ती छोटी उपनदी खूप वळणे घेत, जशी काही आढेवेढे घेत; तापीला मिळते; कारण तिला स्वत:चे अस्तित्व जास्त वेळ टिकवायचे असते. काय भन्नाट कल्पना आहे. त्यांचे कवी मन या गद्यात आपल्याला पानोपानी भेटते. आदिवासींचे जीवन, त्यांच्या समजुती, सवयी, दिनक्रम, भाषा यांच्याशी आपला परिचय ते गोष्टीरूपांने करून देतात. जंगलातील प्राणी, त्यांच्या येण्याजाण्याच्या वाटा, गणना, त्यांचे स्वभाव,, त्यांची बलस्थाने, कमतरता, त्यांचे एकमेकांशी संबंध, मानव भेटल्यास त्यांच्या प्रतिक्रिया या किती वेगवेगळ्या असतात हे वाचून आपण चकित होतो. जंगल, तेथील डोंगर, दऱ्याखोऱ्या, झाडेझुडपे, गवत,पाण्याचे साठे, प्रवाह, पशुपक्षी, मानव वस्ती या सर्व गोष्टी एकमेकांवर किती अवलंबून आहेत; किती गुंतल्या आहेत याचा समग्र चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर गोष्टीरूपात गुंगवून साक्षात उभा करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. वाचून झाल्यावर एका भारलेल्या अवस्थेत हे पुस्तक आपण हातावेगळे करतो. जंगल, प्राणी वगैरेंची याच नुसती जंत्री नसून उत्कंठा, भिती, कुतुहल,आनंद व दु:ख या भावना पण आपल्या सोबत असतात. दु:ख? होय दु:ख सुद्धा! आपल्या प्रिय व्यक्तीचा अनवधानाने आपल्या हातून शेवट झाला आहे; हे लक्षात आल्यावर एक मदांध हत्ती कसा वागतो? त्याचा राग, त्याची अगतिकता, हट्टीपणा व वेडे प्रेम हे सरांनी इतके सुंदर चितारले आहे की डोळ्यात पाणी येणार नाही असा वाचक विरळा! याशिवाय वाघांनी दिलेला चकवा आणि त्याची अनपेक्षित भेट, अस्वलाचा हल्ला, रानरेड्यासारख्या रेम्याडोक्याची तल्लखता, रानकुत्र्यांची क्रुरता, बिबट्याची भक्ष्य संपविण्याची पद्धत, त्याने मानवी वस्तीत घातलेला धुमाकूळ, हरीण सांबरांची अगतिकता या सर्व व इतर खूप गोष्टी आपल्या भेटीला छोट्या छोट्या कथारूपाने येतात. सरांची भाषा सरळ मोकळी आहे. उगीच शब्दालंकारांचा फापटपसारा नाही पण नेमकेपणाने थेट वर्णन. प्रत्यक्ष तो अनुभव तुम्हाला देणारे! आता तुम्हाला प्रश्ण पडला असेल की हे सर्व छान आहे पण पुस्तकाचे नाव हे ‘कुलामामा’च्या देशात हा काय प्रकार आहे? आदिवासींच्या कोरकू भाषेत वाघाला म्हणतात कुला… व प्रेमाने कुलामामा! वाघापासून त्यांना अहर्निश धोका असला तरी जंगलाच्या शीर्षस्थानी तोच आहे हे त्यांचे शहरी लोकांच्या आधीपासून असलेले पारंपारिक ज्ञान! त्यामुळेच त्यांनी वाघाला मामा ही उपाधी दिली असावी. तेव्हा वनाच्या या अनभिषिक्त राज्यातील कथांना ‘कुलामामाच्या देशात’ यापेक्षा अधिक चपखल काय नाव असेल? १३५ पानांचे हे छोटेखानी पुस्तक एका बैठकीतच वाचल्याशिवाय सोडवत नाही. संग्रही ठेवावे व इतरांना भेट द्यावे असे वाटणारे हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस या ख्यातनाम प्रकाशक कंपनीने प्रकाशित केले आहे. छपाई व शुद्धलेखन निर्दोष आहे. आकर्षक मुखपृष्ठ व आतील चित्रसाज अन्वर हुसेन यांचा आहे. किंमत सर्वांना परवडण्याजोगी २००/-₹ आहे. माझ्याप्रमाणे सर्वच वाचकांना हे पुस्तक मोहित करेल याची मला खात्री आहे. याची पहिली आवृत्ती संपली असून दुसरी आवृत्ती सध्या उपलब्ध आहे.---डॉ. चंद्रशेखर एन. कुळकर्
                 
                  जी. बी. देशमुखांच्या वाचनीय वनकथा … सुरुवातीलाच सांगून टाकतो, ‘कुलामामाच्या देशात’ हा जेमतेम १३५ पानांचा छोटेखानी कथा (!) संग्रह वाचनीय आहे. हा कथासंग्रह म्हणजे रवींद्र वानखडे आणि जी. बी. देशमुख यांचा ‘दोस्तीनामा‘ आहे, याचाही आवर्जून उल्लेख करणं अप्रस्तुत ठरणार नाही. रवींद्र वानखडे या वनाधिकाऱ्यानं त्याच्या वनसेवेतील सांगितलेल्या अनुभवांचं केंद्रीय उत्पादन शुल्क (वस्तू आणि सेवा कर) खात्याचे अधिकारी जी. बी. देशमुख यांनी केलेलं शब्दांकन म्हणजे या कथा आहेत. यांच्या दोस्तीचा एक योगायोग असा की, या दोघांचा जन्म एकाच वर्षातला आणि एकाच महिन्यातला आहे! रवींद्र वानखडे यांची बहुसंख्य सेवा विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलात गेली. मेळघाटातले मूलवासी म्हणजे आदिवासी ‘कोरकू’ म्हणून ओळखले जातात. कोरकू भाषेत ‘कुला’ म्हणजे वाघ. कोरकू प्रेमाने वाघाला ‘मामा’ म्हणतात. थोडक्यात काय तर मेळघाट नावाच्या वाघांच्या देशातल्या या वनकथा आहेत. मेळघाटचा परिसर विस्तीर्ण पसरलेला आहे. तिथलं जंगल एकाच वेळी सुंदर, मन प्रसन्न करणारं, अफाट, अक्राळविक्राळ आणि क्वचित भयावहही आहे. या विस्तीर्ण जंगलात नजरबंदी होईल अशा दऱ्या आहेत, डोंगर आहेत आणि अर्थातच अगणित झाडं आणि पशुपक्षी आहेत. मेळघाटचं पर्जन्यमान अति आहे आणि तिथला उन्हाळाही वैदर्भीय परंपरेला शोभणारा उग्र आहे. ऐन उन्हाळ्यात ज्याला अवकाळी पाऊस म्हणतात तसा या जंगलात गारांचा वर्षाव होतो. गारांवरून आठवलं, एका वर्षी (बहुधा २००५) मेळघाटात गारा नव्हे तर चक्क बर्फवृष्टी झाली; ती किती? तर अनेक रस्ते आणि गावं हिम चादरीखाली झाकली गेली. त्याचं, काश्मिरात झालेल्या हिम वर्षावासारखं एक छायाचित्र संपादक म्हणून ‘लोकसत्ता’च्या पहिल्या पानावर पहिल्या अर्धा भागात सात कॉलम प्रकाशित केल्याचं अजूनही लक्षात आहे. थोडक्यात, निसर्गाच्या लहरीपणाचाही पदोपदी, कधी भीतिदायक तर कधी सुखद अनुभव देणारा मेळघाट हा जंगल प्रदेश आहे. सुक्ष्मात जाऊन जर मेळघाटचा आस्वाद घ्यायचा झाला तर माणसाचा एक जन्म अपुरा पडावा असा हा अफाट विस्तार आहे. ‘कुलामामाच्या देशात‘ हा एक वनानुभवाचा अस्सल दस्ताऐवज आहे. शीर्षकात जरी कुलामामाचा उल्लेख असला तरी या संग्रहातील सर्व पंचवीस कथांचा नायक वाघ नाही. रानगवे, रानकुत्रे, हत्ती हेही काही कथांत नायक म्हणून डोकावले आहे. कथासंग्रहातील सर्व कथा वाचनीय झाल्या आहेत त्या कथनशैलीमुळे. किंचित पाल्हाळीकपणाकडे झुकलेली पण, प्रासादिक कथनशैली, हे या सर्व कथांचं वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे आत्मपर असूनही या संपूर्ण लेखनात ‘मी’ कथा आशयावर मात करत नाही, हे लेखक जी. बी. देशमुख याचं वैशिष्ट्य आवर्जून नोंदवून ठेवावं असं आहे. जी. बी. देशमुख यांना लेखनाचा चांगला सराव आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांविषयी त्यांचा दै. ‘सकाळ’च्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत प्रकाशित होणारा स्तंभ बराच वाचकप्रिय आहे. तसंही त्यांचा लेखनाचा रियाज बराच जुना आहे. याआधीही विविध नियतकालिके आणि फेसबुकवर नियमितपणे त्यांनी केलेलं लेखन वाचनात आलेलं आहे. लेखनाचा तो रियाज कसा पक्का आहे हे जी. बी. देशमुख यांच्या याही कथातून लक्षात येतं. जाता जाता हेही सांगायला हवं की, जी. बी. देशमुख यांचे वडील भीमराव हे त्या काळचे ‘स्टार’ फुटबॉलपटू होते. वडिलांचं ‘महारुद्र…’ हे जी. बी. देशमुख यांनी लिहिलेलं चरित्रही (प्रकाशक -ग्रंथाली) विलक्षण वाचनीय आहे. या पुस्तकामुळेच जी. बी. देशमुखांच्या लेखनाकडे माझं लक्ष वेधलं गेलं. जी. बी. देशमुख यांनी रवींद्र वानखडे यांचे वनानुभव रसाळ शैलीत कथन केलेले आहेत. ते करत असतांना ‘दौड लगाकर’ किंवा ’तामझाम’ असे खास वऱ्हाडी शब्दही त्यांच्या लेखनात येतात आणि त्यामुळे त्यांच्या लेखनाला बहार येते. काही कथांत त्यांनी हिंदी चित्रपटातील संवादांचाही अतिशय सहजपणे वापर केलेला आहे. अनुभवांवर आधारित कथालेखन करतांना जंगल प्रदेशातल्या रितीरिवाज आणि निसर्गाच्या नियमांबाबतही बरीच नवीन माहिती या लेखनातून मिळते. उदाहरणार्थ, प्राणी परस्परांची शिकार करत असले आणि ते पाहताना आपल्याला एखाद्या प्राण्यांची कितीही कीव आली तरी वन खात्याच्या नियमानुसार जंगलात नैसर्गिकरीत्या घडतं त्यात मानवी हस्तक्षेप वर्ज्य असतो. आणखी एक उदाहरण वाघ गणनेचं. (माध्यमात सर्रास उल्लेख येतो त्याप्रमाणे ‘वाघांची जनगणना’ नव्हे!) वाघांची गणना त्याच्या पंजाच्या उमटलेल्या ठशावरून करतात. ही पद्धत कशी विकसित झाली ती नेमकी काय आहे, ती कशी केली जाते, ठसे कसे घेतले जातात, त्याचे साचे कसे बनवले जातात, या विषयी या पुस्तकात सामान्य वाचकाला जेवढं हवं आहे तेवढ्याच विस्तारानं आलेलं आहे. दुसऱ्या प्राण्यानं केलेली शिकार वाघ खात नाही, हा पसरवला गेलेला समज कसा पूर्णपणे गैर आहे हा पुस्तकातला अनुभव वेधक आहे. शिवाय तो अनुभवकर्त्याच्या घरालगतच घडल्यामुळे त्यात थरारही आहे. वाघ स्वत:हून माणसावर हल्ला करत नाही, हा समज खराच असल्याचं अनुभव कथनही वेधक आहे. रानकुत्र्यांनी पाण्यात उतरलेल्या एका सांबराची शिकार करण्यासाठी चौदा-सोळा तासांचा दाखवलेला संयम एका कथेत येतो. त्यातून रानकुत्र्यांच्या सवयी आणि शिकारीच्या शैलीबद्दल बरीच माहिती मिळते. वन प्रदेशातील जे जे प्राणी कथानायक होऊन कथेत येतात त्या सर्वच प्राण्यांच्या सवयीबद्दल आलेले तपशील कथा सौंदर्य खुलविणारे जसे आहेत तसेच ते वाचकाच्या ज्ञानातही भर घालणारे आहेत. भोलाप्रसाद या हत्तीनं मदांध झालेल्याच्या काळात त्याच्या माहुताची हत्या केली. त्या हत्येचा त्याला पश्चात्ताप कसा झाला आणि त्या मदांध अवस्थेतही त्याच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा शोक या कथासंग्रहात वाचायला मिळतो. त्या शोकाचा ‘महाकाय आकांत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याबद्दल वर्णन करणारी कथा मुळातूनच वाचण्यासारखी आहे.---श्री. प्रविण बर्दापूरकर
                      
                          कुलामामाच्या देशात जंगलाचं ज्ञान देणारं पुस्तक... ज्येष्ठ वनाधिकारी रविंद्र वानखेडे यांच्या मेळघाटच्या जंगलातील अनुभवकथा असणारे व जी. बी. देशमुख यांनी शब्दबद्ध केलेलं ‘कुलामामाच्या देशात’ हे नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक असून ते थरारक, रोमांचकारी आणि वाचकांना खिळवून ठेवणारे असल्याने एका बैठकीत वाचून झाले. जंगलप्रेमी आणि अभ्यासकांना त्यातील विविध अनुभव कथांतून मोलाचे अरण्यज्ञान मिळते. जंगलच्या राजा वाघाविषयी महत्त्वपूर्ण ज्ञान मिळते. ‘रानगव्यांची कवायत’ या प्रकरणात ज्येष्ठ गविणीला प्रमुख पदाचा सन्मान दिला जातो. पाणवठ्यावर लहान बछड्यांना आधी पाणी पिऊ देणे त्यानंतर त्यांच्यापेक्षा मोठे अशा शिस्तबद्ध क्रमात पाणी पिणे यांचा अनुभव तर ‘मेळघाटचे दारासिंग आणि किंगकाँग’ या प्रकरणात पावसाळ्याच्या सुरुवातीला गव्याचं हंबरणं वाघासारखे असणे आणि नंतर किंगकाँग - दारासिंग यांची दंगल ते बघण्यासाठी प्रेक्षक म्हणून शेकडो गवे उपस्थित असणे हे सर्व रोमांचकारी आहे. तसेच हा प्रकार केवळ मनोरंजन नसून आपली वंशावळ निकोप पद्धतीने वाढली पाहिजे, हा प्रमुख हेतू यामागे असणे हे महत्त्वाचे जंगल ज्ञान त्यातून मिळते. ‘शिकार हो गया’ प्रकरणात शिकारी किती योजनाबद्ध मोहीम आखतात यांचा अनुभव येतो. ‘एक थरारपट’मध्ये शिकाऱ्यांच्या टोळीच्या शिकारीसाठी वन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना जीवाची बाजी लावून मोहीम यशस्वी करणे किती कठीण काम आहे, हे वाचायला मिळते. ‘हिरुबाई भाग गयी’ प्रकरणात अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर रविंद्र वानखेडे या अधिकाऱ्यातील ‘माणूस’ जागा झाल्यानंतर सतत तीन महिने हिरुबाईला वाचविण्यासाठी केलेली धावपळ आणि त्यातून यश मिळवणं हे खरं माणूसपण देऊन जाते. ‘खूश रहना मेरे यार’ आणि ‘महाकाय आकांत’ या थरारक प्रकरणात हत्ती आणि माहूत यांचं नातं बरेच काही देऊन जाते. नंतर भोलाचा आकांत मन हेलावून टाकतो. लेखकाच्या संवेदनशील मनाची ही यशस्वी पावती आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात ती दिसून येते. जंगलाचं ज्ञान देणारं ‘कुलामामाच्या देशात’ हे अतिशय सुरेख पुस्तक आहे. माझा बालसखा ज्येष्ठ वनाधिकारी रविंद्र वानखडे याने यापुढेही आपल्या जवळपास ३५ वर्षांच्या वनसेवेतील अनुभवांवर आधारित असे अनेक पुस्तके वाचकांना द्यावी, ज्यामुळे वाचकांना निसर्ग संरक्षण आणि संरक्षण याविषयी आवड निर्माण होऊ शकेल. ‘कुलामामाच्या देशात’ या मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठही अतिशय आकर्षक असून प्रत्येक प्रकरणातील स्केच उत्कृष्ट आहे.–प्र. सु. हिरुरकर

           
                      विज्ञानातून गैरव्यवहाराला आव्हान!... विज्ञान कथालेखक म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. संजय ढोले यांची ही पहिलीच विज्ञान कादंबरी, कथानक ज्या वेगाने पुढे जातं, त्याच वेगाने आजूबाजूची कल्पनासृष्टी आपल्यासमोर उभी राहते. खानदेशातील वनपरिक्षेत्र आणि कथानकाचा प्रमुख नायक वनपाल सुनील सोनवणे आपल्या भेटीला येतात. त्यांचे स्वागतच वनपरिक्षेत्रात चालणाऱ्या चांगल्या-वाईट घडामोडींचं अचूक टिपण करतं. एकाच कादंबरीत दोन स्वतंत्र कथानकं - एक सामाजिक परिस्थितीवर अचूक भाष्य करणारं, तर दुसरं विज्ञानजगताचा सारिपाट नेमक्या पद्धतीने मांडणारं! विशेष म्हणजे, ही दोन्ही कथानक समांतर असली तरी, परस्परांमध्ये आत्मीय सहसंबंध पाहायला मिळतो आणि त्यामुळेच वैज्ञानिक संकल्पनांपासून कोसो दूर असलेल्या वाचकालाही ‘प्लँटोन’ कादंबरी कवेत घेते. या कादंबरीत साहस, सामाजिक वास्तव, राजकीय कुरघोड्या, ध्येयवेडी माणसं, प्रेमाचा हळुवार स्पर्श, समर्पित जीवन, सर्वसामान्यांतला नायक आणि त्याहूनही सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, वैज्ञानिक समुदायाची कार्यपद्धती आणि विज्ञानाचा अद्भुत आविष्कार असं सारं काही येतं. वाचकाला याच सुरुवातीच्या घडामोडींतून कादंबरीच्या उत्कटतेची ओढ लागते. सोनवणेंच्या कर्तव्यदक्ष कारकीर्दीचा लेखाजोखाच आपल्याला प्रशासकीय व्यवस्थेतील जळजळीत वास्तव समोर ठेवतो. निसर्गसंपन्न रामपूर परिक्षेत्रात बदली होऊन आलेले सोनवणे, त्यांचे सहकारी जाधवकाका, साहाय्यक वनपाल निशिकांत ठाकरे, वाहनचालक नटवरसिंग या वनविभागातील प्राथमिक लोकांचे प्रयत्न दर्शवतात आणि त्यांच्याभोवती फिरणारं कथानक सर्वच भ्रष्ट यंत्रणांचा बीभत्स चेहरा समोर आणतं. विज्ञान कथानकाचा प्रमुख नायक सोनवणेंचा घनिष्ठ मित्र डॉ. समीर ताटकरे एका पत्राच्या रूपाने भेटायला येतात. हे पत्र मित्रप्रेमाची साक्ष तर देतंच, त्याचबरोबर वाचकाला अनपेक्षित धक्का देत नव्या समांतर कथानकाची रुजवण करतं. सोनावणेंच्या भ्रष्ट यंत्रणेविरुद्धाचा लढा आणि देशप्रेमापोटी भारतात परतलेल्या डॉ. समीर यांचा विज्ञानजगताला थक्क करणारा संशोधनाचा प्रवास हा कादंबरीचा मुख्य गाभा आहे. रामपूरमध्येच एका वनस्पती संरक्षण व संशोधन केंद्रात रुजू झालेले डॉ. समीर वनस्पतींमधील स्मृतिसदृश प्रथिनांचा शोध अशा ठळक अक्षरांत जेव्हा प्रबंध मांडतात, तेव्हा कादंबरीच्या बीजकथानकाला सुरुवात होते. वनस्पतींतील स्मृती प्रथिनांचा शोध घेणारं यंत्र म्हणजे ‘प्लँटोन’ कादंबरीचा नायक आहे. या यंत्राची निर्मिती केवळ विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या वाचकालाच थ्रिलर अनुभव देते असं नाही, तर सर्वसामान्य व्यक्तीही ‘वनस्पतींना मेंदू आहे का?’ या कल्पनेनेच प्रभावित होते. डॉ. समीर यांच्या सहकारी डॉ. अंजली सहसंशोधक म्हणून कार्य करतात. संशोधक संस्थेतील वातावरण देशातील आजच्या रखडलेल्या संशोधनामागचं कारण अगदी लिटमस टेस्टसारखं स्पष्ट करतं. कथानकाच्या निमित्ताने का होईना, सर्वसामान्यांना देशात संशोधन कसं चालतं, प्रकल्प कसे सादर होतात, चर्चा कशी होती आणि देशात कोणकोणत्या संशोधन संस्था आहेत याची तरी जाणीव होते. त्यांची कार्यपद्धती वाचकाच्या नकळत स्मरणात राहते. वनसंपदेने समृद्ध असलेल्या वनपरिक्षेत्रातील चंदन तस्करी रोखण्यासाठी सोनवणे आटोकाट प्रयत्न करतात; परंतु अगदी वनरक्षकापासून वरिष्ठ अधिकारी, आमदार ते मंत्री अशा अनेकांच्या कुटील साखळीमुळे हे प्रयत्न अपुरे ठरतात. अगदी जीवघेण्या प्रसंगांचाही सामना त्यांना करावा लागतो. अशा वेळी त्यांना दैनिक चव्हाट्यावर या वृत्तपत्राचे वार्ताहर जयंत पाटील, पोलीस सबइन्स्पेक्टर गोविंद पवार यांच्यासारखे कर्तव्यदक्ष संरक्षक लाभतात. डॉ. समीर यांनी वनस्पतींमधील स्मृती प्रथिनांचा घेतलेला शोध, त्याचा चंदनतस्करी रोखण्यासाठी होणारा उपयोग आणि त्याहीपेक्षा सोनवणेंना न्याय मिळवून देण्यासाठी वनस्पतीने दिलेली साक्ष, एक थ्रिलर अनुभव वाचकाला देते. वैज्ञानिक तथ्यांशी कोणतीही तडजोड न करता लेखक अगदी सहजतेने सर्वसामान्य व्यक्तीला विज्ञानाच्या उत्कटतेची सफर घडवून आणतो. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याचं समाजातील महत्त्व अधोरेखित होतं. कथानकाबरोबरच उत्कटतेचा प्रवासही परमोच्च बिंदू गाठतो. वाचकाला जाणवणाऱ्या उत्कटतेला न्याय देणारा वेग कादंबरीने साधला आहे. म्हणजे कादंबरीच्या शेवटी वाढलेला वेग उत्कटतेला पूरक ठरतो. मराठी विज्ञान कादंबरीच्या प्रवासात ही कादंबरी एक मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही. –--सम्राट कदम.


                                 वनस्पतींना सुद्धा स्मृती असू शकते ही कल्पना सूचणे सर्वसामान्यांच्या कल्पने पलीकडील गोष्ट आहे. पहिले दोन प्रकरण वर्णनात्मक असल्याने थोडसं हळूवार वाचले गेले पण त्यानंतर एक एक पात्राची एन्ट्री होत गेली आणि कथेला हळू हळू स्पीड प्राप्त होत गेला तसतसा माझा वाचनाचा वेगही कथानकाच्या गतीनुसार वाढला. मी तीन ते अकरा भाग एका दमात एका जागी बसून न उठता पाणीही न पिता एका बैठकीत वाचन केले. यावरुन कादंबरीची ओघवती शैली, उत्कंठा, रंजकता लक्षात येते. प्रकरण क्रमांक 12 मध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये वनस्पतीचे विविध कार्य त्याची रचना हे सगळं आलेला आहे त्यात ज्याचा शास्त्राशी संबंध नाही त्याला तेवढं ते दोन-तीन पान वाचताना थोडसं जड जातात आणी वाचनाचा वेग थोडासा मंदावतो परंतु विज्ञान कादंबरीची ती मागणी आहे ते क्लासिफिकेशन येणे जरुरी आहे आणि ते अत्यंत चपखल पणे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून बसवले आहे. पुढील काही भागातही वनस्पतीचे वैज्ञानिक वर्णन आलेलं आहे परंतु कथेतील रंजकता ओघ आणि वेग यामुळे तो भाग त्याच वेगाने निघून जातो. डॉक्टर समीर दवाखान्यात असताना आदिवासी लोक एक पिशवी परत करून जातात त्यावेळी असं वाटतं की या पिशवीतच पुढे काहीतरी घडणार आहे परंतु डॉक्टर समीर ला डीस्चार्ज देताना ती पिशवी परत केली जात नाही त्यावेळेस मनात थोडीशी खंत राहून जाते नंतर ती पिशवी पुन्हा डॉक्टर समीर कडे पान नंबर 212 वर येते. उपकरणात साठवून ठेवलेले मेमरी तील माहिती का पुसली गेली हा प्रश्न मात्र शेवटपर्यंत अनुत्तरितच राहिला. बऱ्याच ठिकाणी भावनिक गुंफण अतिशय उत्कृष्टपणे निर्मिती केली आहे जसे मित्रांची ओळख आणि तेही एकाच ठिकाणी नोकरीला येणे त्यानंतर सोनवणे यांनी फॅमिली आणल्यानंतर प्रसंग यातील भावनिक प्रसंग त्यानंतर डॉ. समीर दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतरचा प्रसंग अप्रतिम. कादंबरी लिखाणात वर्णन अप्रतिम. वर्णन हे 4D चित्रपट पाहिल्यासारखे, चौफेर सुक्ष्म केल्याने कादंबरी वाचत असताना आपण त्या कथेचा एक भाग होऊन जातो आणि तो प्रसंग आपण प्रत्यक्ष जवळ उभे राहून बघतोय असं वाटतं. कादंबरी चा सुरुवातीचा प्रसंग मन मानायला तयार नव्हतं सोनवणें सोबत रेल्वेत प्रथम श्रेणीत मी ही चढलो होतो.आणी प्रथम श्रेणीत सोनवणे यांनी खिडकी उघडून हवेचा चा थंड झोत अंगावर घेतला होता मी मात्र प्रथम श्रेणीत चढल्या बरोबर ACच्या गार हवेने आधीच थंड झालेलो होतो त्यामुळे सोनवणे यांचे खिडकी उघडणे मला थोडे जड गेले. मग मी सर्च केल्यावर असे समजले की, काही रेल्वेत प्रथम श्रेणीत non AC सुविधा आहे. आणी माझे समाधान झाले. कादंबरी लिहिण्यासाठी जवळपास वीस वर्षाचा कालावधी लागला. त्यात भरपूर अडचणी आल्या.असे असताना मधेच कादंबरी लिखाण थांबल्याने व पुन्हा जेव्हा ते कादंबरी लेखन सुरू झाले यावेळेस मागचे सर्व संदर्भ लक्षात ठेवणे खरंच आपले कौशल्य आहे.आणी एवढी मोठी कादंबरी लिहिणे ही सोपी गोष्ट नव्हती . लिखाणातील खंडानंतर घटना पात्र नेमके लक्षात ठेवून पुढे लिहिणे यात तुमच्या स्मृतीचाही कस लागला आहे. बऱ्याच दिवसानंतर कादंबरी वाचन केले कादंबरी उत्कंठा वाढवत नेणारी व रंजक असल्याने चार बैठकीत मी कादंबरी पूर्ण संपवली शेवटपर्यंत कुठेही कंटाळवाणे वाटले नाही . आणि विज्ञानात रंजकता आणून मांडणे ही धुरा आपण समर्थपणे सांभाळली आहे. शेवटी एवढी मोठी कादंबरी लिहिणे खरच ग्रेट. मनापासून सलाम--- कैलास ताराचंद ढोले


                          वनस्पतींच्या जगतातील ‘सायन्स थ्रिलर’... मराठी साहित्यात विज्ञानकथा आणि कादंबऱ्यांचे दालन प्रशस्त होत आहे. विज्ञानकथा किंवा कादंबरी लिहिणे ही सोपी बाब नव्हे; परंतु वैज्ञानिक कथावस्तू आणि वाङ्मय यांची अजोड अशी गुंफण घालणाऱ्या शास्त्रज्ञ-लेखकांची एक परंपरा मराठीत विकसित होत आहे. डॉ. संजय ढोले हे त्या परंपरेतील एक महत्त्वाचे नाव. ‘प्रतिशोध’, ‘अश्मजीव’, ‘अंतराळातील मृत्यू’, ‘डिंबक’, ‘संकरित’ हे विज्ञानकथासंग्रह त्यांच्यातील साहित्यिक अधोरेखित करणारे आहेत. आता त्यांनी विज्ञान कादंबऱ्यांच्या दालनात प्रवेश केला आहे. ‘प्लँटोन’ ही त्यांची पहिलीच विज्ञान कादंबरी. वनस्पतींच्या भावभावनांना केंद्रस्थानी ठेवून, डॉ. ढोले यांनी साकारलेली ही कादंबरी विज्ञान साहित्याच्या सर्व कसोट्यांना उतरणारी तर आहेच; परंतु त्याचबरोबर एका निखळ थरारक कादंबरीची अनुभूती देणारीही आहे. ‘प्लँटोन’ ही खरे तर ‘सायन्स थ्रिलर’ आहे. वनखात्यातील काही मतलबी अधिकारी आणि वजनदार राजकीय नेते यांच्या भ्रष्ट युतीतून जंगलातील काळे व्यवहार रोखण्यासाठी, प्राण्यांची पर्वा न करणाऱ्या प्रामाणिक वनाधिकाऱ्यांचा संघर्ष या कादंबरीत डॉ. ढोले यांनी वेधकपणे मांडला आहे. वैविध्यपूर्ण वनस्पतींनी संपन्न असलेले जंगल, तेथील साधेभोळे आदिवासी, स्थानिक राजकीय नेत्यांची आणि गुंडांची दहशत, त्यांच्याकडून होणारे आदिवासींचे शोषण या पार्श्वभूमीवरील संघर्ष वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा आहे. रहस्यमय घटनांद्वारे उलगडणाऱ्या या कादंबरीत धडाडीचा अधिकारी सुनील सोनवणे, कुशाग्र बुद्धिमत्तेचा शास्त्रज्ञ डॉ. समीर ताटकरे, प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत, निष्टेने आरोग्यसेवा देणारी आदिवासी डॉक्टर इला गावित ही या कादंबरीतील प्रमुख पात्रे; परंतु खरा कथानायक आहे. ‘प्लँटोन’. वनस्पतींच्या अंतरंगातील गुणधर्माचा वेध घेण्यासाठी, तसेच त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या या उपकरणाची या कादंबरीत अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. कादंबरीतील थरार मांडताना विज्ञानाला केवळ पार्श्वभूमीवर न ठेवता समोर आणून, त्याद्वारे कथेला वळण देण्याचा डॉ. ढोले यांनी केलेला प्रयोग वाचनीयता वाढविणारा आहे. कादंबरीतील घटना-घडामोडी अतिशय जलदतेने घडणाऱ्या असल्या, तरी तिचा पट मोठा आहे. कथानक घडते, ते रामपूर वनक्षेत्रात. संपूर्ण कादंबरीभर हे वनक्षेत्र पार्श्वभूमीच्या स्वरूपात आहे. त्यामुळेच कादंबरीच्या सुरुवातीला लेखकाने त्याची सफर घडवून आणली आहे. एखाद्या कॅमेऱ्याने विहंगम दृश्य टिपावे, तशा पद्धतीने लेखकाने या वनक्षेत्राचा भूगोल उलगडला आहे. या क्षेत्रात सोनवणे अधिकारी म्हणून, तर याच क्षेत्रात असलेल्या संशोधन संस्थेत डॉ. ताटकरे येतात. ते येण्याच्या आधीपासून तिथे सुरू असलेली तस्करी, काळे व्यवहार आणि हे सारे लपविण्यासाठी होत असलेला दहशतवाद रहस्यमय घटनांद्वारे मांडत कथानकाला लेखकाने गती दिली आहे. वनस्पतींच्या गुणधर्माचे संशोधन उलगडत कथानक पुढे नेताना, लेखकाने मानवी नातेसंबंधांचाही सूक्ष्मपणे वेध लेखकाने घेतला आहे. विज्ञानातील, विशेषत: ‘प्लँटोन’चा तपशील मांडताना तो वाचकांना सहज उमगेल, इतकेच नव्हे तर त्याला त्यात रस निर्माण होईल आणि कथानकाचा वेग कमी होणार नाही, याची काळजी डॉ. ढोले यांनी घेतली आहे. ‘प्लँटोन’द्वारे विशिष्ट वनस्पतीतील मेंदूसदृश प्रथिनांचा शोध लागल्यानंतर कादंबरी अधिक गतिमान होते. जंगलातील गूढ घटनांची उकल होण्यास मदत होऊ लागते आणि संघर्षही वाढतो. कथानकातील ‘प्लँटोन’ची भूमिका आणि कादंबरीचा शेवट विलक्षण आहे. कादंबरीतील सर्व पात्रे अस्सल वाटतात. कादंबरीची भाषाही साधी-सोपी आहे, त्यामुळे कादंबरी मोठी असली आणि बरीक सारीक तपशील टिपणारी असली, तरी कंटाळवाणी होत नाही. विज्ञानकथा भविष्यवेधी असतात. उद्याचे जग कसे असू शकेल, विज्ञानामुळे आपल्या जीवनात काय बदल होऊ शकेल, हे विज्ञानकथा सहजपणे सांगत असतात. ‘प्लँटोन’द्वारे डॉ. ढोले यांनीही वनस्पती आणि मानवी नात्याचा वेध घेतला आहे. मानवी जीवनात वनस्पती आणखी काय भूमिका बजावू शकतात, हे मांडले आहे. विज्ञानात रुची नसली, तरी ‘प्लँटोन’ वाचाविशी वाटते. यातच लेखकाचे यश आहे.--– श्रीधर लोणी