Saturday 13 May 2023

‘ताज महाल’ की ‘राझ महाल’?

 

अज्ञात इतिहासाच्या पटावरील कल्पनारम्य कहाणी!


            पहिल्याच कादंबरीत एखादं गूढ रहस्य उलगडताना त्यात रंजकता पेरत जाणे. हे लेखक 'नील नेथन' यांनी आपल्या 'राझ महाल'मधून सहज साध्य केले आहे. उत्कंठा आणि अद्भुताच्या अनुभूतीत गुंतवणारं अफलातून कथानक... म्हणजे 'राझ महाल'. या कादंबरीच्या निमित्तानेच आपले लाडके लेखक 'नील नेथन' वाचकांच्या भेटीला आले होते. पुस्तकाच्या अनुवादक गौरी देशपांडेही यावेळी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम शुक्रवार दि. १२ मे २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता मेहता पब्लिशिंग हाऊस ग्रंथदालन, सदाशिव पेठ, माडीवाले कॉलनी, पुणे-३० येथे पार पडला.
            आपल्या पहिल्याच पुस्तकामुळे प्रसिद्धी मिळणारे खूप कमी लेखक असतात. त्यापैकी एक म्हणजे नील नेथन. 'मेहता पब्लिशिंग हाऊस'तर्फे जानेवारी २०२३ मध्ये प्रकाशित झालेली त्यांची 'राझ महाल' ही अनुवादित कादंबरी त्यामुळेच अलीकडे खास चर्चेचा विषय ठरली आहे.

            या लेखक-अनुवादक गप्पांच्यावेळी अनुवादक गौरी देशपांडेंनी विचारलेल्या कादंबरीसाठी निवडलेला विषय आणि त्यावरील संशोधनाबद्दलच्या प्रश्नावर बोलताना ‘मुळातच पुरातत्व विषयातील आवड आणि त्यातील संशोधनाबद्दलचे कुतूहल यामुळे या विषयी लिहिण्याची इच्छा निर्माण झाली. सुरुवातीला याविषयावरील संशोधनातून एखादा प्रबंधसदृश लेख किवा कथा होऊ शकेल असा विचार करून लिखाणाला सुरुवात केली. परंतु तीन पानी लेखाची तीनशे पानी कादंबरी कशी झाली याचे मलाही आश्चर्य वाटते.’ असे लेखक नील नेथन म्हणाले. यात आपल्या कुटुंबाची खूप साथ लाभली असेही ते यावेळी म्हणाले. कादंबरीत अनेक जिवंत व्यक्तिरेखा तर आहेतच पण ताजमहाल ही स्वतःच एक व्यक्तिरेखा असल्याचे आपल्याला दिसून येते. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.


          ‘कादंबरीत जाणीवपूर्वक काही पदर मोकळे सोडल्याचे दिसून येते. तर कादंबरीचा पुढील भाग ही आणण्याचा विचार आहे का ?’ या प्रश्नावर त्यांनी या विषयावर पुढेही संशोधन चालू असल्याचे सांगितले. तसेच कादंबरीचा पुढचा भाग लिहिण्याची इच्छा ही व्यक्त केली.


         अनुवादाविषयी बोलताना अनुवादक गौरी देशपांडे म्हणाल्या की ‘पुस्तकाचा अनुवाद करताना त्याचं रटाळवाणं भाषांतर न होता ते त्याच भाषेतील पुस्तक आहे असं वाटायला हवं. हे पुस्तक इतकं अभ्यासपूर्ण व संशोधन करून लिहिलं गेलं आहे, की मला त्याचा अनुवाद करणं एक महत्वाचा टास्क आहे. असंच वाटत राहिलं. त्यामुळे अनुवाद करायला खूपच मजा आली. अभ्यासपूर्ण घटना, त्यात गुंफलेल्या व्यक्तिरेखा, अनेक गुपितं, गुंतागुंतीचं कथानक या सर्वच गोष्टी पुस्तकाला वेगळंच महत्व प्राप्त करून देतात. असंही त्या यावेळी म्हणाल्या.

         वाचकांना त्यांच्या सहीनिशी त्यांचं हे पुस्तक घेण्याची संधीही यावेळी मिळाली. या कार्यक्रमास 'मेहता पब्लिशिंग हाऊस'चे संचालक अखिल मेहता, साहिल मेहता व रूपा मेहता आदी उपस्थित होते.


Wednesday 3 May 2023

नवे परीक्षण - झुंड (लेखक - बाबाराव मुसळे) | LATEST REVIEW

 'झुंड' वाचताना शोलेची आठवण येते.


    सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा भयंकर राडा झालेला आहे. राजकारण, लोकशाही यासंदर्भात समाजामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अश्या परिस्थितीत आमचे बंधु प्रसिद्ध ग्रामीण कथाकार, कादंबरीकार श्री बाबाराव मुसळे लिखित 'झुंड' ही संपूर्ण राजकारणावर आधारित नविन कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे मार्फत प्रकाशित झाली आहे. निराशामय वातावरणात ओॲसीस निर्माण करणारी सकारात्मक कथा या कादंबरीच्याद्वारे वाचकांच्या भेटीस आलेली आहे. मंत्रालयात काम करताना राजकीय लोकांच्या सहवासात 30-32 वर्ष काढल्यामुळे या कादंबरीबद्दल उत्सुकता होती.

    कादंबरीचे वाचन करताना मला शोले ह्या सिनेमाची आवर्जून आठवण झाली. यापुर्वीच्या त्यांच्या काही कादंबर्यांमध्ये उदा. डंख-नायक सोपान कांबळे, दि लास्ट टेस्ट–नायक लेखकाचा सख्खा पुतण्या संजू, पुढचं पाऊल-ज्या वसंता लांडकर या वास्तवातील व्यक्तीवर ती कादंबरी बेतली ते वसंता नावाचेच मुख्य पात्र, हाल्या हाल्या दुदु दे मधील न्यानबा, त्याची बायको आनसा, पाटीलकीमधला आदिवासी जमातीचा नायक या कादंबऱ्यांमधील कथानक हे त्या कथेच्या नायक-नायिकाभोवतीच फिरत राहते. 'झुंड' या कादंबरीमधील कथानक नायकासह इतर अनेक पात्रांभोवती फिरत राहते. शोले या सिनेमातील जय, विजय, ठाकुर, गब्बर, बसंती, मौसी, सांबा आणि अनेक छोटी छोटी पात्रे ह्यांच्याभोवती कथानक फिरते. आणि ह्या सर्वपात्रांना संबंधित सिनेमात योग्य तो न्याय दिला आहे. तशाचप्रकारे 'झुंड' ह्या कादंबरीमधील कथानक विशाल ह्या नायकाशिवाय रंगादा, देवीदास, बिशनसींग, राणी, सुमी, साहेब अशा अनेक पात्रांना आपल्या कवेत घेत त्यांना समान न्याय देत फिरत राहते. कथानकामध्ये ही सर्व पात्रे रेल्वे रुळाप्रमाणे समांतर पुढे जाताना दिसतात. त्यामुळे सहाजिकच या पात्रांची तुलना शोले मधील पात्रांशी करण्याचा मोह होतो.

    स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे इथे गेलेला विशाल. तोही स्वबळावर कमवा आणि शिका या तत्वावर विश्वास ठेवून. कारण वडिलांनी बी ए सेकंड इअर पासूनच त्याच्या बाबतीत हात आखडलेला. एवढंच नाही बोलणंही सोडलेलं. अचानक असं काय घडलं ते त्याला कळेनासं झालं. तरी हिंमत न हारता तो पुण्याला आलेला. पण दुर्दैवाने  त्याला सतत हुलकवणी देणारे स्पर्धा परीक्षेतील यश. मधेच मनातून इच्छा नसताना घराच्या भानगडीमुळे परत गावी म्हणजे वाशीमला येण्यासाठी मामाने पुण्याला येऊन आग्रह केल्याने यावे लागणे. वाशीमचा कोणी डाॅन त्याच्या बाबाचे घर हडप करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा साऱ्या उपायांनी प्रयत्न करणारा. त्यालाही न जुमानणारा बाप. वाशीमला आल्यावर डाॅनची भेट घेतल्यावर सामंजस्याऐवजी त्याच्याशी अधिकच ताणलेले विशालचे संबंध. त्यातून त्याच्या परत पुण्याला जाण्याच्या मानसिकतेला आवर घालणारी आई. कारण आई डाॅनच्या दहशतीत वावरणारी. एम पी एस सी ची परीक्षा तोंडावर आली तरी नाईलाजाने त्याचे वाशीमलाच थांबणे. त्याने या घरात राहू नये अन फुकट खाऊ नये ही वडिलांची धारणा. त्यातून त्याचा स्वरोजगार शोधणे. शहरातील डाॅनग्रस्तांपैकी एकाच्या मल्टिप्लेक्सवर तात्पुरती नोकरी मिळणे.

    2019च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहणे. पूर्वतयारी म्हणून वाशीम विधानसभा मतदार संघाचे आमदार व मंत्री साहेब यांंच्या मतदारांशी अफलातून संपर्क साधन्याच्या योजनेचा एक मुख्य मोहरा म्हणून साहेबांचे सर्व आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या रंगादाने विशालला जास्तीत जास्त तरूणांची झुंड जमा करण्याचे आवाहन करणे. रंगादा हे या कादंबरीतील एक अफलातून व्यक्तिमत्व. गावातील ओळखीच्या लोकांची बेमालूम फसवणूक करून त्यांना लुबाडणं हा त्याचा पूर्वव्यसाय. पण साहेबांच्या संपर्कात आल्यावर त्याच्या वागण्यात पूर्ण बदल. साहेबांसोबत परदेश वाऱ्या करणारा. एका जागी तो म्हणतो, 'मागं इंग्लंड पाह्यलं. आता लंडन पाह्याले जायाचं.' इतकं अज्ञानी हे पात्रं. पण अशिक्षित असूनही सर्व बाबतीत आॅनलाईन डील करणारं. हा रंगादा विशालचा चुलत भाऊ. म्हणून तो त्याला शंभर दीडशे तरूण जमा करण्याची आॅफर देतो. वाशिममध्ये जेथे कोणाचीही ओळख नाही असा विशाल त्यातही यशस्वी होतो. आणि ते आवाहन पूर्ण करतो 

    त्या काळात अतिवृष्टीमुळे गावोगावचा शेतकरी त्रस्त झालेला. महापुराने सोंगलेले सोयाबीन, सुड्या वाहणे, पाण्याखाली जाणे असे सारे प्रकार. त्यात साहेबांच्या मतदारसंघात सर्कलवाईज दहा दहा जणांचे गट करून प्रत्येक गावातल्या गरीबातल्या गरीबांची मदत करणे. त्यातून साहेबांपेक्षा विशालचेच नाव मतदारसंघात सर्वतोमुखी होते. विशालचा  मंत्री आणि आमदार असलेल्या साहेबाशी संबंध दृढ होतो. निवडणूक जाहीर झाल्यावर साहेबांना त्यांच्या भाजपा पक्षाचे तिकीट मिळण्याची शक्यता कमी म्हणून साहेबानेच विशालला डमी उमेदवार म्हणून भरायला लावलेला अर्ज. त्यानंतर अशा काही राजकीय घडामोडी घडतात की अर्ज मागे घे असा साहेब विशालला आदेश देऊनही त्याच्या मागची झुंड त्याला तसे करू देत नाही. जिवघेण्या डावपेचांस पुरून उरून शेवटी साहेबांना हरवून विशाल निवडून येतो. राजकीय घडामोडी निवडणुकीसंदर्भातील लहान सहान घटना सविस्तरपणे येथे नमुद केलेल्या आहेत हे विशेष. 

    रंगादा हे पात्र मोठ्या कुशलतेने रंगविण्यात आले आहे. प्रत्येक मंत्री आमदार त्याचप्रमाणे वजनदार लोक प्रतिनिधी यांच्याकडे रंगादा सारखे किमान एक दोन तरी व्यक्ती असतातच. बीशनसींग या पात्राची तुलना शोले मधील गब्बर सींगशी करण्याचा मोह होतो. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अश्या लोकांना लोकप्रतिनिधींचा आश्रय असतो. त्या आश्रयाच्या जोरावर त्यांची गुन्हेगारी चालते. आणि त्या मोबदल्यात निवडणुकीसाठी फंड निधी या अश्याप्रकारच्या लोकांकडुन जमा केल्या जातात. या बीशनसिंगचा फार मोठा त्रास विशालला सहन करावा लागतो. त्यातूनही तो वडिलांचे घर सुरक्षितरित्या वाचवितो. हा बीशनसिंग, त्याची दहशत, त्याला बळी पडणारी विशालची आई कुसुम, बहीण राणी, पत्नी तथा मामाची मुलगी सुमी, फारसे संपर्कात नसले तरी त्याचे बाबा, त्याची सव्वाशे तरूणांची झुंड, ही वैयक्तिक आणि समूहपात्रे सतत विशालच्या अवतीभोवती फिरत असलेली दिसतात. तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला विशालच्या झुंडमध्ये सामील झालेला खून्या नावाचा सोबती सतत त्याच्या आजुबाजुला सावलीसारखा वावरतो.

    हे कथानक काल्पनिक आहे. मुळात वाशीम विधानसभा मतदार संघ हा गेली कित्येक वर्षे अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. ईथे तो ओपन दाखविला आहे. आतापर्यंत इथला कोणी आमदार मंत्री झालेला नाही. कादंबरीत साहेब मंत्री असतो. हा मतदार संघ प्रत्यक्षात आणि कादंबरीत भाजपचाच दाखविला आहे. यात ज्या काही घटना दर्शविल्या त्या या मतदारसंघात कधी घडल्या नाहीत. असे असले तरी यामधील बऱ्याशच्या घटना वास्तविक वाटतात. लेखकाचे वास्तव्य याच मतदार संघातील असल्याने कदाचित त्यांनी या मतदार संघाची कथानकासाठी पार्श्वभूमी निवडली असावी.


    ही कथावस्तू वाशीम जिल्हातील असून अनेक छोट्या मोठ्या वास्तवाशी निगडीत आहे. त्यापैकी जिल्हयातील दुर्गम भागातील रस्त्यांच्या परिस्थितीवर केलेले भाष्य महत्वपूर्ण आहे. महानगरी, शहरी लोकांमध्ये राहून राजकारण करण्यापेक्षा गावाकडच्या गरजू लोकांकडे जाऊन त्यांच्यासाठी चांगले काम केल्यास मतदारांचे हमखास सहकार्य मिळते व त्याचा फायदाही मिळतो. निवडणुकीसाठी लोकांकडून पैसाही मिळतो. त्यासाठी कुठल्या डाॅनची गरज नाही. हा संदेश ही कादंबरी ह्या कथानकामधून देण्यात यशस्वी झाली आहे.

    या कथेच्या नायकाच्या तो जेव्हा आमदारकीसाठी उभा राहतो तेव्हाच्या संदर्भातील काही घटना विधानसभेचे विद्यमान आमदार श्री देवेेंद्र भुयार ह्यांच्या बाबतीत तत्कालिन निवडणुकीत घडलेल्या घटनांची आठवण करून देतात.

    या कादंबरीत 2019 च्या विधानसभा निकालानंतर राज्यात जी एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती तिचा अन एकूणच राष्ट्रीय, राज्यस्तरीय राजकारणााचा यथायोग्य परामर्श घेलला आहे.

बाबाराव मुसळे यांची ही संपूर्ण राकारणावरची पहिली कादंबरी आहे. तिचे महत्व ओळखून दि 30 एप्रिल 2023 रविवारच्या दै लोकसत्ताच्या रविवारच्या लोकरंग पुरवणीत 'बाजारात आलेली पुस्तके' या महत्वाच्या सदरात पाच पुस्तकांपैकी दुसऱ्या नंबरवर या कादंबरीस हायलाईट केले आहे. यावरून या कादंबरीचे वेगळेपण आणि महत्व वाचकांच्या लक्षात यावे. मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे यासारखे अत्यंत दर्जेदार प्रकाशक या कादंबरीस लाभणे हेही या कादंबरीच्या गुणवत्तेचे एक गमक आहे.

    राजकारणाशी संबंध असलेल्या किंवा नसलेल्यांनीही ही कादंबरी अवश्य वाचावी. निवडणुकीसंदर्भातील  घटना,त्यातील जिवघेणे डावपेच  छान  सादर केले गेले आहेत. निवडणुकीचे  काम केलेल्या कार्यकर्त्या- अधिकारी-कर्मचारी मंडळींना तर ते  सतत कामच करत असल्याचा भास ही कादंबरी वाचतांना  होईल.


परीक्षण - रामकिसन मुसळे (सेवानिवृत्त अप्पर सचिव, सामान्य प्रशासन  विभाग ,मंत्रालय ,मुंबई)

झुंड (राजकीय कादंबरी)

लेखक- बाबाराव मुसळे (9325044210)



प्रकाशक -मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे(+919422323039)

-अॅमेझानवर उपलब्ध

पृष्ठे- 444, किंमत- 580/-

Tuesday 2 May 2023

पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली ‘रणखैंदळ’! लवकरच...


पावनखिंडीतला थरार, सुरतेची महालूट, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीत केलेले निशस्त्रीकरण, शाहिस्तेखानाला वेसण, कुडाळचे महायुद्ध आणि सागराच्या पोटातले सिंधुदुर्ग निर्मितीचे अचाट स्वप्न! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली ‘रणखैंदळ’!
महाकादंबरीकार 'विश्वास पाटील' लिखित महासम्राट कादंबरीचा भाग- २ ‘रणखैंदळ’ येत आहे, २० मे २०२३ रोजी... 
हा शिवकालीन रणखैंदळ तुम्हालाही अनुभवायचाय ना? तर आपली प्रत आजच नोंदवा. 
या पुस्तकाची प्रकाशन पूर्व नोंदणीची मुदत १८ मे २०२३ पर्यंत आहे. नोंदणी केल्यास ६२५ रु. किमतीची ही कादंबरी आपल्याला फक्त ४८० रु. एवढ्या सवलतीच्या दरात मिळणार आहे. त्यामुळे वाचक मित्रांनो त्वरा करा!