Saturday, 13 May 2023

‘ताज महाल’ की ‘राझ महाल’?

 

अज्ञात इतिहासाच्या पटावरील कल्पनारम्य कहाणी!


            पहिल्याच कादंबरीत एखादं गूढ रहस्य उलगडताना त्यात रंजकता पेरत जाणे. हे लेखक 'नील नेथन' यांनी आपल्या 'राझ महाल'मधून सहज साध्य केले आहे. उत्कंठा आणि अद्भुताच्या अनुभूतीत गुंतवणारं अफलातून कथानक... म्हणजे 'राझ महाल'. या कादंबरीच्या निमित्तानेच आपले लाडके लेखक 'नील नेथन' वाचकांच्या भेटीला आले होते. पुस्तकाच्या अनुवादक गौरी देशपांडेही यावेळी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम शुक्रवार दि. १२ मे २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता मेहता पब्लिशिंग हाऊस ग्रंथदालन, सदाशिव पेठ, माडीवाले कॉलनी, पुणे-३० येथे पार पडला.
            आपल्या पहिल्याच पुस्तकामुळे प्रसिद्धी मिळणारे खूप कमी लेखक असतात. त्यापैकी एक म्हणजे नील नेथन. 'मेहता पब्लिशिंग हाऊस'तर्फे जानेवारी २०२३ मध्ये प्रकाशित झालेली त्यांची 'राझ महाल' ही अनुवादित कादंबरी त्यामुळेच अलीकडे खास चर्चेचा विषय ठरली आहे.

            या लेखक-अनुवादक गप्पांच्यावेळी अनुवादक गौरी देशपांडेंनी विचारलेल्या कादंबरीसाठी निवडलेला विषय आणि त्यावरील संशोधनाबद्दलच्या प्रश्नावर बोलताना ‘मुळातच पुरातत्व विषयातील आवड आणि त्यातील संशोधनाबद्दलचे कुतूहल यामुळे या विषयी लिहिण्याची इच्छा निर्माण झाली. सुरुवातीला याविषयावरील संशोधनातून एखादा प्रबंधसदृश लेख किवा कथा होऊ शकेल असा विचार करून लिखाणाला सुरुवात केली. परंतु तीन पानी लेखाची तीनशे पानी कादंबरी कशी झाली याचे मलाही आश्चर्य वाटते.’ असे लेखक नील नेथन म्हणाले. यात आपल्या कुटुंबाची खूप साथ लाभली असेही ते यावेळी म्हणाले. कादंबरीत अनेक जिवंत व्यक्तिरेखा तर आहेतच पण ताजमहाल ही स्वतःच एक व्यक्तिरेखा असल्याचे आपल्याला दिसून येते. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.


          ‘कादंबरीत जाणीवपूर्वक काही पदर मोकळे सोडल्याचे दिसून येते. तर कादंबरीचा पुढील भाग ही आणण्याचा विचार आहे का ?’ या प्रश्नावर त्यांनी या विषयावर पुढेही संशोधन चालू असल्याचे सांगितले. तसेच कादंबरीचा पुढचा भाग लिहिण्याची इच्छा ही व्यक्त केली.


         अनुवादाविषयी बोलताना अनुवादक गौरी देशपांडे म्हणाल्या की ‘पुस्तकाचा अनुवाद करताना त्याचं रटाळवाणं भाषांतर न होता ते त्याच भाषेतील पुस्तक आहे असं वाटायला हवं. हे पुस्तक इतकं अभ्यासपूर्ण व संशोधन करून लिहिलं गेलं आहे, की मला त्याचा अनुवाद करणं एक महत्वाचा टास्क आहे. असंच वाटत राहिलं. त्यामुळे अनुवाद करायला खूपच मजा आली. अभ्यासपूर्ण घटना, त्यात गुंफलेल्या व्यक्तिरेखा, अनेक गुपितं, गुंतागुंतीचं कथानक या सर्वच गोष्टी पुस्तकाला वेगळंच महत्व प्राप्त करून देतात. असंही त्या यावेळी म्हणाल्या.

         वाचकांना त्यांच्या सहीनिशी त्यांचं हे पुस्तक घेण्याची संधीही यावेळी मिळाली. या कार्यक्रमास 'मेहता पब्लिशिंग हाऊस'चे संचालक अखिल मेहता, साहिल मेहता व रूपा मेहता आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment