Monday, 27 June 2022

Latest Reviews

कुलामामाच्या देशात-

चन्या (म्हणजे अमरावतीचे सुप्रसिद्ध डॉ. चंद्रशेखर कुळकर्णी) कुलामामाच्या देशात या पुस्तकाबद्दल तू केलेलं सविस्तर परीक्षण त्या पुस्तकाची केलेली स्तुती मीना, शरद यांचे अभिप्राय व सर्वमान्य लेखिका डॉ. किरण पाटणकर, सोलापूर हिचे रसाळ रसग्रहण ह्यामुळे हे पुस्तक घ्यायचं ठरवलं. कोल्हापुरातील मेहता पब्लिसिंग मध्ये जाऊन पुस्तक खरेदी केले. कींमत २०० रुपये, सवलतीची कींमत १७० रुपये. आल्या आल्या लेखक जी.बी.देशमुख यांचा परिचय, शेवटच्या आतील पानावर असलेला रविंद्र वानखडे वनाधिकारी यांची ओळख नि त्यानंतर शेवटचं पान वाचल्यावर लेखक जी.बी. देशमुखांचे हितगुज वाचून चन्याला व्हाट्सपवर कळवलं. त्यानंतर पहिली कथा झटक्यात वाचून काढली. एखाद्याला आवडीचं अन्न मिळावं , ते चवदार व्हावं, अशावेळी ते अन्न आधाशाप्रमाणे खाऊन संपवावं वाटत नाही ! तसंच काहीसं हे पुस्तक वाचताना झालं. मुळात मला जंगलाची आवड , त्यात हे अतिशय सुंदर पुस्तक. जे पहिली कथा वाचल्यावरच लक्षात आलं. त्यामुळे प्रत्येक कथेचा हळूहळू आनंद घेत आज हे पुस्तक वाचून झालं. एक नि एक कथा खूपच छान. एक कथा वाचली की लगेच दुसरी वाचावी असं वाटायचं पण मुद्धाम दम धरून दुसरी वाचायची. मी बरीच जंगल पालथी घातली. बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी पहाटे उठून जंगल सफारी केल्या. पण वाघ काय दिसायचा नाही.किरकोळ जंगली पक्षी, प्राणी दिसायचे पण वाघ नाही. बऱ्याच वेळा इतर प्राणीसुद्धा इतरांना दिसायचे, ते मला दाखवायला बघायचे पण मला काहीच दिसायचं नाही ! शैला वैतागायची ! पण वाघ तर कुणलाच दिसला नाही ! वाघ बघितला ते पूर्वी सर्कशीत, किंवा प्राणिसंग्रहालयात पिंजऱ्यात, किंवा खुल्या प्राणिसंग्रहालयात एकतर सारखा फेऱ्या मारत असलेला किंवा सुस्तावून पडलेला ! पण ह्या कथा वाचताना मात्र प्रत्यक्ष वाघ बघत आहे, असं वाटायचं ! वनअधिकारी रवींद्र वानखडे यांचे निरिक्षण, जंगलावरील प्रेम, जंगलचे कायदे, वनांचे कायदे, जंगलातील प्राण्यांचे कायदे, येथील लोकांची गरिबी, जंगलावरील, तेथील प्राण्यांवरील प्रेम, प्राण्यांचे स्वभाव, हे सगळं प्रत्यक्ष दीर्घकाळ अनुभवलेलं. निस्पृहपणे, झोकुन देऊन, आनंदाने केलेली नोकरी आणि ह्या सर्वांच जी.बी.देशमुख यांनी कुठेही धक्का लागू देता केलेलं ओघवत वर्णन,फारच, फारच सुंदर. दोघांचंही कौतुक करावं तितकं थोडंच.प्रत्येकानं वाचावा असा हा जंगलातील गोष्टींचा खजिना.

 --डॉ. तेजपाल अग्रवाल, कोल्हापूर

No comments:

Post a Comment