पानिपतची तिसरी लढाई प्रामुख्याने अहमदशहा अब्दाली आणि भाऊसाहेब पेशवे (नानासाहेब पेशवे यांचे भाऊ) यांच्यात लढली गेली. काय होती या लढाईमागची कारणमीमांसा आणि का झाला मराठ्यांचा घोर पराभव, का झाली एवढी मनुष्यहानी, याचा वेध विश्वास पाटील यांनी ‘पानिपतचे रणांगण’ या नाटकातून घेतला आहे. पेशवाईचं समूळ उच्चाटन करण्यासाठी उत्तरेकडील मुस्लीम सत्ताधारी (अहमदशहा अब्दाली हा त्यातील प्रबळ पातशहा) एकवटले. त्यांचा सामना करण्यासाठी भाऊसाहेब पेशवे विश्वासरावांसह पूर्ण सज्जतेनिशी, आत्मविश्वासाने उत्तरेच्या मोहिमेवर गेले; पण नानासाहेब पेशव्यांचा गहाळपणा, मल्हारराव होळकर आणि अन्य सरदारांनी इब्राहिम गारदीच्या गोलाची लढाईला (लढाईची एक पद्धत) ऐन रणांगणात फासलेला हरताळ यामुळे मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात संहार होऊन त्यांना हार पत्करावी लागली. आपसातील लाथाळ्या केवढा प्रचंड राजकीय, आर्थिक, सामाजिक, भावनिक, मानसिक विध्वंस करू शकतात, हे दाहक वास्तव अधोरेखित करणारं नाटक.
द्रोणाचार्य म्हणजे... ज्यांच्या पत्नीवर दूध मागणाऱ्या मुलास पाण्यात पीठ कालवून देण्याची वेळ येई असे दरिद्री ब्राह्मण...जातीचं कारण पुढे करून कर्णाची विद्यायाचना नाकारणारा आणि न शिकवलेल्या विद्यार्थ्यांकडे (एकलव्य) गुरुदक्षिणा मागण्याचा धूर्तपणा करणारा पक्षपाती गुरू...अर्जुनाच्या गुरुदक्षिणेच्या माध्यमातून द्रुपदाचा सूड उगवणारा, ब्राह्मणधर्म त्यजून क्षत्रियधर्माचा अंगीकार करणारा गरजवंत... मिंधेपणामुळे द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी गप्प राहिलेला हाQस्तनापूरचा पगारदार नोकर... असे द्रोणाचार्यांच्या व्यक्तित्वाचे विविध पैलू... पण द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न आपला अंत करण्यासाठी जन्माला आला आहे हे माहीत असूनही त्यालाच विद्यादान करणारा आचार्य...हा पैलू तसा अज्ञातच... मूळ संहिता सांभाळून त्याबाबत तर्कसंगत अनुमान काढण्याचा लेखकाचा प्रयत्न म्हणजेच ‘अमृतयात्रा.’

देशाच्या फाळणीस कारणीभूत ठरलेले महंमद अली जीना यांच्याविषयी भारतात तिरस्काराची भावना असली तरी पाकिस्तानमध्ये त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपती’ असा होतो. त्यांच्याविषयी अनेक समज- गैरसमज आहेत. राष्ट्रप्रेमी असलेले जीना नंतर धर्मांध झाले, पण एक यशस्वी नेता म्हणून त्यांची इतिहासात नोंद घेतली जाते. जीनांची संपूर्ण जीवनकहाणी अभ्यास पद्धतीने तटस्थ व पारदर्शकपणे सांगणे कठीण असले तरी दिनकर जोषी यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. भारताच्यादृष्टीने खलनायक ठरलेले जीना प्रत्यक्षात कसे होते हे ‘प्रतिनायक’ या कादंबरीतून कळते. तथ्यापेक्षा सत्याला महत्त्व दिल्याने ही कादंबरी वास्तव झाली आहे व एक वेगळा इतिहास आपल्याला समजतो.

महाभारताच्या युद्धानंतर तब्बल छत्तीस वर्षांनी प्रभासक्षेत्री झालेली यादवी आणि भगवान श्रीकृष्णाचा देहही पंचतत्त्वात विलीन झाला त्याची ही कथा आहे. कुरुक्षेत्रावरील महासंहारानंतर गांधारीने श्रीकृष्णाला ‘आजपासून छत्तीस वर्षांनी यादव कुळाचा परस्परांशी लढताना पूर्ण विनाश होईल,’ असा शाप दिला. पुढे ही छत्तीस वर्षे श्रीकृष्ण द्वारकेतच होता. त्या काळामध्ये सुरक्षित - ऐषआरामी व निष्क्रिय जीवन यामुळे कुमारवयीन लहानांपासून थोरांपर्यंत सर्व यादवगण मृगया, नृत्य-गायन यात मश्गुल असत; जोडीला अनिर्बंध मद्यपान होतेच! श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामही याला अपवाद नव्हता; साहजिकपणे इतरेजन याचा अनायासे लाभ उठवत. यात श्रीकृष्णपुत्र सांब याने महर्षी कश्यपांबरोबर केलेल्या अनुचित आचरणाची भर पडली आणि त्यांनीही यादवकुळाचा नाश होईल, असा शाप दिला. परिणामी, प्रभास क्षेत्री यादवांच्या परस्परांत झालेल्या लढाईने यदुवंशाची अखेर झाली आणि त्यानंतर श्रीकृष्णाचा, पारध्याचा बाण लागून मृत्यू झाला. एका दुर्दैवी कालखंडाची मनाला चुटपुट लावणारी कहाणी!

बापूंसाठी आफ्रिकेतून हरिलाल हिंदुस्तानात येतात. गुलाबसारखी संस्कारी पत्नी व तीन मुलांच्या सहवासात ते उत्तम आयुष्य जगतात. आश्रमातील कार्यात बापूंना मदत करतात. बॅरिस्टर पदवी मिळवायचीच, या ध्येयाने प्रेरित होतात. पण बापूंना हे मान्य नसते. ही अढी त्यांना आश्रम सोडण्यास भाग पाडते. इतर भावंडंही शिक्षणापासून वंचितच असतात. हरिलालना हा अन्याय सहन होत नाही. बाहेर पडल्यावर शिक्षण, व्यवसाय-नोकरीतल्या अपयशाने ते खचून जातात. भटके जीवन, कुटुंबाची काळजी, व्यसने, वेश्यागमन, छंदीफंदी मित्र यांच्यात ते वाहवत जातात. मुस्लीम धर्म स्वीकारून बापूंविरोधात लेख लिहतात. पत्नीचे व बांचे निधन होते. राष्ट्रकार्यात बापूंवर गोळीबार होतो. बापूंच्या निधनानंतर काही महिन्यांतच राष्ट्रपित्याच्या या मुलाचा दुर्दैवी अंत होतो. शेवटी शवागारातील दारवान ओळख पटवून देण्यासाठी विचारतो, ‘’आठ नंबर का मुर्दा आपका है क्या साब?’’ राष्ट्रपित्याच्या मुलाची ही शेवटची ओळख अंगावर शहारा आणते.

No comments:
Post a Comment