Friday 1 July 2022

New Arrivals--June 2022

 

भारतीय संस्कृती ही उपासना, त्याग, संयम, शुचिता, सहिष्णुता,पूर्वजांचे स्मरण इ.चे मिश्रण असून,ती अंधारातून प्रकाशाकडे नेते. महामानव घडवते ही संस्कृती. दिवसेंदिवस हा विस्तार वाढतच जाणारा. देवर्षी नारद, वसिष्टमुनी, भगवान पतंजली, नाट्याचार्य भरतमुनी, वाल्मीकी, श्रीराम-श्रीकृष्ण, संत तुलसीदास, ज्ञानदेव-तुकाराम, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, कवी कालिदास इ. अविस्मरणीय थोर विभूतिंचे दर्शन आपल्याला ‘भारतीय संस्कृतीचे सर्जक’ मधून घडते. या सर्जकांचा अजूनही खूप मोठा विस्तार होऊ शकतो. आपल्या संस्कृतीतल्या प्रथा-परंपरा, वेद, उपनिषदे, भारतीय संस्कृतीची प्रतीके-(स्वस्तिक, कमळ, नंदी, शिविंलग, तुळस इ.), ऋषी-मुनी, महान विभूती व नवविधा भक्ती, वैदिक साहित्य यांचा विशेष अभ्यास करून लेखक द्वयींनी हे सृजनात्मक नवनीत आपल्यासमोर ठेवले आहे. ‘भारतीय संस्कृतीचे सर्जक’मधून ही ज्ञानरूपी कवाडे वाचनसमृद्धीकडे निश्चितच नेतात. म्हणूनच हा संस्कृतीसृजनाचा वारसा मौल्यवान ठरतो.













श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर अक्रूर, उद्धव, अर्जुन, द्रौपदी इत्यादी त्याच्या स्मृती जागवत आहेत. त्यांच्या स्मरणातून कंसवध, स्यमंतक मणी, उग्रसेन-पवनरेखेची कथा, अश्वत्थाम्याने पांडवपुत्रांची केलेली हत्या, रुक्मिणीने त्याला केलेलं शासन, जरा पारध्याचा बाण लागून श्रीकृष्णाचा झालेला मृत्यू इत्यादी अनेक घटना उलगडत जातात. वर्तमान-भूत या दोन काळांमध्ये आंदोलणाऱ्या या घटनांना चिंतनाची जोड आहे. हे चिंतन म्हणजेच ‘परतुनि ये घनश्याम...’ ही कादंबरी. श्रीकृष्णाच्या मृत्यूमुळे भकास झालेल्या द्वारकेपासून सुरू झालेली ही कथा उद्धवाच्या परममुक्तीच्या बिंदूशी येऊन ठेपते, या दोन बिंदूंमधील हे अंतर नक्कीच अनुभवण्यासारखं.












श्रीकृष्णाच्या केवळ स्मरणाने अस्तित्वाविषयीचा अहंकार गळून पडतो. ‘कृष्णं वन्दे जगद्गुरूम!’ मधून कृष्णाचे अदृश्य दर्शनही मानवांत फार मोठा बदल घडवते, इथेच श्रीकृष्णाची थोरवी व प्रचिती मिळते. वर्तमानातल्या जगण्यातच हा कृष्ण आपलं सारथ्य करत असतो. या बदल्यात कृष्णाला काही नको असते, फक्त निखळ, निव्र्याज प्रेम व निर्लेप भक्ती हवी असते. सच्चेपण हवे असते; आणि ते त्याला मिळते. ‘महाभारता’तून जणू जीवनाचे नवरस मानवाची पाठराखण करतात. कारण–कृष्ण म्हणजे एक आदर्श आहे, पूर्णत्वाचा आदर्श! शेवटी काळ कोणताही असो, धर्म वा प्रदेश कोणताही असो, विविध काळांतल्या, धर्मांतल्या अथवा प्रदेशांतल्या अखिल मानवजातीला ईश्वराबद्दल जी एक उत्कंठा आहे, आणि जी अत्यंत उत्कट स्वरूपाची आहे, त्या उत्कंठेचा आविष्कार म्हणजेच, ‘श्रीकृष्ण’ होय.






भ. श्रीकृष्ण व म.गांधी या दोन्ही युगपुरुषांचे जीवन म्हणजे समाजमनाचा निर्लेप आरसाच. न्याय-नीतिला स्वीकारून या दोघांनीही अन्यायाला आपापल्या पद्धतीने विरोध दर्शवला. गांधींनी उपोषण, स्वपीडनाचा मार्ग स्वीकारून हृदयपरिवर्तन घडवून आणले व ब्रिटिशांना पळवून लावले. तर श्रीकृष्णाने कंस, शिशुपाल, पूतना, नरकासुर इ. अन्याय करण्याऱ्या राक्षसांना मारले व कौरवांशी युद्ध स्वीकारून पांडवांना न्याय दिला. या असामान्य व्यक्तींच्या जीवित ध्येयाचा परीस भारताला गवसला; पण तो न ओळखताच फेकला गेला, ही वस्तुस्थिती. या दोन्ही युगपुरुषांना आयुष्याच्या अखेरी एकाकी-उपेक्षित जीवन वाट्यास आले. कृष्णाचे स्वजन त्याची नजर चुकवून बेभान झाले. मद्यपान, द्यूत, कलह, मारामाऱ्यांनी त्यांनी एकमेकांचा सर्वनाश करवून घेतला. गांधींच्या तत्त्वांना, आदर्शांना जणू चूड लावली गेली. तुरुंगातून सुटल्यावर गांधी शक्तिहीन होऊन पाहात राहिले. कस्तुरबांचा मृत्यू झाला. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले. त्यांचे ’सत्य’ विद्रूप झाले व ’अहिंसा’ मृत्युपंथाला गेली. ’चक्र ते चरखा’ या पुस्तकातील कृष्ण-गांधींचे विचार आजही उचित ठरतात.




पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी यांचे `फिअरलेस गव्हर्नन्स` हे पुस्तक शासनाच्या वास्तविकतेचे प्रकटीकरण आहे. डॉ. बेदी यांनी नायब राज्यपाल म्हणून केलेल्या सुमारे पाच वर्षांच्या सेवेचा आढावा यात पाहायला मिळतो. भारतीय पोलीस सेवेतील चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर डॉ. बेदींनी जबाबदार शासनाच्या योग्य पद्धती दाखवून दिल्या. संघभावना, सहयोग, आर्थिक विवेक, प्रभावी पोलिसिंग, सेवांमधील बंधन आणि निर्भय नेतृत्वाद्वारे अनेक धडाडीचे निर्णय घेतले. `फिअरलेस गव्हर्नन्स` हे सुशासन आणि नेतृत्वाचा पाठ वाचायला, बघायला, ऐकायला आणि अनुभवायला देणारं पुस्तक आहे. यात छायाचित्रे, ग्राफिक्स आणि लहान व्हिडिओंसह सचित्र मांडणी करण्यात आली आहे ज्यांचा QR कोडद्वारे आनंद घेता येतो.







राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करू इच्छिणारे धोरण आहे. त्यात जशा जमेच्या बाजू आहेत, तशाच उणिवाही आहेत. या धोरणावर भाष्य करणे धोरणाच्या दोषरहित अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे ठरते. म्हणून अनेक मुद्द्यांची सविस्तर विचारपूर्वक मांडणी या पुस्तकात पाहायला मिळते. ज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणातील महत्त्वाच्या तरतुदींसोबतच, धोरणांच्या अंमलबजावणीतील विविध संस्थांची संस्थात्मक जबाबदारी, धोरणातील स्वागतार्ह बाबी आणि धोरणाच्या पुनर्मांडणीची आवश्यकता स्पष्ट करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment