DAINIK KESARI 03/07/2022--
आपल्या दैनंदिन भावविश्वाच्या पलीकडे असे जग आहे, जिथे सतत काही ना काही घडत असते. नवीन उलथापालथ होत असते. घटना घडल्यानंतर त्याचा आढावा प्रसारमाध्यमांद्वारे घेऊन आपण पुन्हा आपल्या कामांकडे वळतो. वरवरचं दिसणं सोडलं तर अंतर्गत घडामोडी किती खोलवर परिणाम करतात, त्यात नाहक कसे बळी पडतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी हे दोन्ही लेखक ज्येष्ठ गुन्हे शोध पत्रकार असून यांनी शोध पत्रकारिता करून अनेक हाय प्रोफाइल्स गुन्हे उघडकीस आणले आहेत. या लेखकद्वयींचं पहिलं पुस्तक ‘तेलगी स्कॅम’ खूप गाजलं. या पुस्तकाच्या यशानंतर आता हे लेखकद्वयी वाचकांसाठी रोमांचक, थरारक अशी कहाणी घेऊन आले आहेत. ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’ ही कादंबरी चित्तथरारक अशी खाकी वर्दीची कहाणी आहे. मूळ कादंबरी हिंदी भाषेत आहे. त्याचा मराठी अनुवाद मुकुंद कुळे यांनी केला आहे. कादंबरीतील कथानक मुंबई परिसरात घडतं. कादंबरीचं निवेदन तृतीयपुरुषी असून पात्रांच्या संवादातून कथानक आणखी रंजक होत राहते. कादंबरीची सुरुवात होते एका ब्रेकिंग न्यूजने. भारतातील सगळ्यात श्रीमंत आसामी कुबेर. कुबेरच्या घराबाहेर म्हणजे कुबेरियाबाहेर एक स्फोटकांनी भरलेली बेवारस गाडी आढळते आणि तिथून सुरू होतं थरारनाट्य. या प्रकरणी पोलीस दल, बॉम्बशोध पथक, मीडिया सगळे जमा होतात. ही कसे पाहण्यासाठी १७वर्षांपूर्वी पोलीस दलातून निलंबित केलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक यतिन साठेला पाचारन केले जाते आणि त्याला सीआययूचा प्रमुख केले जाते. या प्रकरणाची चौकशी एटीएस, एनआयए, मुंबई पोलीस या सर्वांकडून सुरू होते. एक प्रकारे त्यांच्यात स्पर्धा सुरू होते. कथानकातील प्रसंग वर्तमानातून भूतकाळात पुन्हा वर्तमानात अशा पद्धतीने घटनांची मांडणी केलेली आहे की, वर्तमानातील घटनेचा भूतकाळाशी असलेला संबंध अधोरेखित होतो आणि कथानक जसजसे पुढे जात राहते तसतसे अनेक गोष्टींचा उलगडा होतो आणि वाचकांची उत्कंठा वाढत राहते. या गाडी प्रकरणात आणखी एक प्रकरण घडतं ते म्हणजे हसमुख जैन हत्या प्रकरण. या प्रत्येक घटनेनंतर साठेच्या संशयास्पद हालचाली सगळ्यांच्या नजरेत येतात. खरेच या सगळ्यामागे यतिन साठेचं नियोजन होतं का? हे करून त्याला काय मिळणार होतं? का यामागे खरा सूत्रधार कोणी वेगळा आहे? हे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. या पुस्तकात अनेक सरकारी यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा याविषयी उल्लेख आहे. या यंत्रणांच्या कामकाजाची, नियोजनाची माहिती यातून कळते. कादंबरीत अनेक पात्रे प्रसंगानुरूप भेटतात. मुंबई पोलीस आयुक्त महावीर तोमर हा अत्यंत महत्त्वाकांक्षी अधिकारी. त्याने आपल्या पदाच जोरावर वसुलीतंत्र सुरू केलेलं असतं. तोमर आपल्या पदाचा गैरवापर करून कसे खेळ खेळतो आणि इतरांना अडकवतो पण खरे काय आहे? या प्रकरणाचा सूत्रधार कोण? या गुन्ह्यामागील नेमका हेतू कोणता? तो सूत्रधार सापडतो का? हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे. एखाद्या गुन्ह्यामागे कसे नियोजन केले जाते आणि आपल्या हाताखालील वक्तींचा प्याद म्हणून कसा वापर केला जातो? आणि प्रकरण अंगाशी आल्यावर स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी कसे दुसऱ्याला उद्ध्वस्त केलं जातं. हे वास्तव यात मांडले आहे. पोलीस दलात ‘क्रिमिनल्स इन यूनिफॉर्म’ ही टीम कोण तयार करते, हा प्रश्न उद्भवतो. ही केस कशा पद्धतीने सोडवली जाते. त्यामागची प्रक्रिया कशी असते. हे वाचताना एखाद्या चित्रपटाची कथा वाचतोय की काय असे भासते. एक प्रकारचं थ्रिल याद्वारे अनुभवता येतं. या पुस्तकाद्वारे कोणत्याही यंत्रणेला बदनाम करण्याचा हेतू नाही. पण काही व्यक्तींमुळे संपूर्ण यंत्रणा कशी बदनाम होते, यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीत यतिन साठी सोबतच सतत उल्लेख येतो तो गुन्हे शोध पत्रकार संजय त्रिवेदी यांचं. तो ही या प्रकरणातील दुवे कसे शोध्तो. हे समजते. यातील बाकीची पात्रे गृहमंत्री सरदेशपांडे, कुबेरचा मुख्या सुरक्षारक्षक अमन चौधरी, निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप वर्मा, एटीएसचा प्रमुख पलांडे, पोलीस निरीक्षक नित्या, आर्य, रोहतगी, जितेंद्र नागपुरे, महेश भोर, शिक्षा भोगणारा पोलीस गजानन झेंडे, कुबेर, कुबेरचा मुलगा ध्रुव, संचिनी, नीना डायस या सगळ्या पात्रांचं एकमेकांशी असलेलं कनेक्शन जाणून घेण्यासाठी ही रोमांचक आणि थरारक कादंबरी नक्की वाचा. लेखकद्वयी यांना गुन्हे शोध पत्रकारितेचा ४० वर्षांचा अनुभव आहे. अनेक प्रकरणं त्यांनी जवळून अनुभवली आहेत. अनेक प्रकरणं मिडियासमोर आणले आहेत. त्या निरीक्षणातून, कामाच्या अनुभवातून या कादंबरीची निर्मिती झाली. या कादंबरीच्या आकृतिबंधामुळे ही कथा त्यांना विस्तृतपणे आणि रंजकतेने वाचकांसमोर आणता आली. कादंबरी नक्की वाचा आणि अनुभवा ‘कहाणी खाकी वर्दीची’. – अस्मिता प्रदीप येंडे
No comments:
Post a Comment