Wednesday, 29 June 2022

 

वाचकच बनतील शिवरायांच्या धगधगत्या इतिहासाचे साक्षीदार ! हो , मला खात्रीच आहे, मी जी आता मायमराठीमध्ये "महासम्राट" नावाची कादंबरी घेऊन वाचकांच्या समोर येत आहे . महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यानीं आणि इथल्या वादळवाऱ्याने जी शिवगाथा मला सांगितली आहे. त्यामध्ये अफजलखान आणि शिवरायांच्यामधील संघर्षाचा प्रसंगही मी लिहिला आहे. जो या आधी अनेकांनी अनेकदा सांगितला आहे . मात्र हे सांगताना मी संशोधनाच्या अंगाने प्रतापगडाच्या परिसराकडे सरकणार्या अनेक अपूर्व व अकल्पित वाटा व वळणे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे ..माझ्या "झंजावात" या खंडातील अनेक प्रसंग पैकी हा एक आहे. या आधी अफजलखानाने सलग पन्नास लढाया जिंकल्या होत्या. पराभव किंवा हार हा शब्द कधी त्याच्या आसपासही फिरकला नव्हता. त्यामुळेच विजापुराहून निघताना शिवरायांचा पराभव करून त्यांना आपण साखळदंडाने बांधून जिवंतच घेऊन येऊ असा वेडा विडा त्याने उचलला होता. तेव्हा अफजलखानाच्या मालकीचा अनेक गलबतांचा तांडा गोव्याकडच्या समुद्रामध्ये होता. प्रतापगडाच्या लढाई वेळी अफजलखानाने मोठ्या हुशारीने गुपचूप गोव्यामार्गे कोकणात दाभोळच्या बंदरात तीन जहाजे आणून नांगरून ठेवली होती. त्याच्या स्वप्नाप्रमाणे तो जर शिवरायांना जिवंत पकडण्यात यशस्वी झाला तर , विजापूरकरकडे जाताना वाटेत मराठे शिवरायांना सोडवण्यासाठी हजारोंच्या जमावाने गोळा होऊन आपणास कापून काढतील अशी भीती त्याला वाटत होती. त्यामुळेच महाराजांना पकडल्यावर कोकणाचे घाट उतरून रातोरात दाभोळ बंदरातून त्यांना समुद्रमार्गे गोव्याकडून विजापूरला पळवायचे खतरनाक ख्वाब त्याने बघितले होते. इकडे शिवरायांच्या महासंघर्षासाठी सह्याद्रीच्या रानातील फक्त मावळे नव्हेत तर हजारो घोडी, खेचरे, तोफांचे बैल सारे चराचर कसे उतरले होते. त्यामुळेच महाराजांनी अफजलखानाच्या बेछुट स्वप्नांचा चुराडा करून प्रतापगडाच्या पायथ्यालाच त्याच्यासाठी कबर खोदायला कसे भाग पाडले. शिवरायांनी आपल्या प्रचंड श्रमाने प्रतापगडाच्या परिसरातील धनगर, गुरेवासरे , गावोगावचे पाटील , कुणबी आणि माता-भगिनींना आपल्या लढाईमध्ये कसे उतरवले. विजापुरी फौजेच्या मानाने आपले बळ कमी असतानाही शेवटी इतिहासाचे चक्र उलटेसुलटे कसे फिरवले.. कळीकाळाला सुद्धा प्रतापगडाच्या परिसरात मराठ्यांच्याच बाजूने तुतारी फुंकायला कसे भाग पाडले. केवळ वाचकांच्या व श्रेष्ठ गुरुजनांच्या आशीर्वादावर पानोपानी व अंगावर क्षणोक्षणी काटा उभा करणारी ती सारी चित्तथरारक कहाणी पेश करण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते . मी आपल्या दीर्घ अभ्यासाच्या व गेली अनेक वर्ष दक्षिणेतल्या गडकिल्ल्यांच्या भटकंतीनंतर व मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन नव्याने शिवरायांची ज्वलजहाल कहाणी माझ्या "महासम्राट," या नव्या कादंबरीत उभी केली आहे. या कादंबरीची मेहता प्रकाशनाने वाचकांच्या सोयीसाठी 15 जुलैपर्यंत सवलत योजना जाहीर केली आहे. तिचा लाभ वाचक बांधवांनी जरूर घ्यावा "महासम्राट" ही कादंबरी वाचताना शिवरायांसोबत वाचकांना सुद्धा त्त्या युद्धात व युगात प्रत्यक्ष सहभागी झाल्याचा थरारक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. —-विश्वास पाटील

No comments:

Post a Comment