Saturday, 28 September 2013

नांदी ई-बुक्सची


२०१० किंवा २०११ म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट...

पाश्चिमात्य देशांमध्ये ई-बुकमुळे प्रिंट बुक – छापील पुस्तकांच्या विक्रीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याची बातमी मी वाचली होती. तेव्हा काय असेल हे ई-बुक, असा उत्सुक प्रश्न मला पडला होता. त्यानंतर किंडलसारख्या रीडरवर पुस्तकंही वाचली. आणि मला तेव्हाच हे ई-बुक हे नवे साधन आवडलं होतं. मराठी प्रकाशन क्षेत्रात काम करणारा एक संपादक या नात्याने अशी ई-बुक्स मराठीतही व्हायला हवीत असं फार वाटत होतं आणि याबाबत या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा-बोलणंही होत होतं. मधल्या काळात काहींनी पीडीएफ किंवा पुस्तकांची पाने स्कॅन करून हीच ई-बुक्स आहेत, असा धुरळा उडवला होता....

आणि दिनांक 27 सप्टेंबर, 2013, डेक्कन रानदेवू, पुणे.

कार्यक्रम होता, मराठीतल्या अग्रगण्य प्रकाशन संस्थेच्या – मेहता पब्लिशिंग हाऊसच्या ई-बुकच्या प्रकाशन सोहळ्याचा! आणि या दिवशी किंडलप्रमाणे किंवा पाश्चात्त्य देशातल्या ई-बुक्सप्रमाणेच (स्कॅन केलेली पाने नव्हेत!) मराठी ई-बुक्स याचि देही याचि डोळा पाहायला मिळाली आणि मी या नव्या साधनाने भारावून गेलो. पुढील काळात यामुळे प्रकाशन व्यवसायाला किती वेगळं स्वरूप प्राप्त होणार आहे याचा विचार करू लागलो....

या प्रकाशन सोहळ्याला दिमाख कंन्सल्टन्सीचे श्री. दिमाख सहस्रबुद्धे, श्री. रवींद्र मंकणी आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे श्री. सुनील मेहता उपस्थित होते. साधारण तासभराच्या या कार्यक्रमाला लेखक, प्रकाशक, चित्रकार आणि प्रसिद्धिमाध्यमांचे प्रतिनिधी असा या क्षेत्राशी निगडित वर्ग उपस्थित होता.

रणजित देसाई यांनी लिहिलेल्या स्वामी या प्रसिद्ध पुस्तकाच्या ई-बुकचे प्रकाशन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

पूर्वी लोक पुस्तकांपर्यंत जायचे आणि आता मात्र पुस्तकांनी लोकांपर्यंत जायला हवे, ई-बुक हे लोकांपर्यंत जाणारे पुस्तक आहे. कारण ते घरबसल्या जगात कोठेही सहज डाउनलोड करता येऊ शकते अशी मार्मिक टिपणी करत सहस्रबुद्धे यांनी भाषण केलं. हे भाषण मला सर्वांत जास्त आवडले. ते स्वतः, आयटी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले जाणकार असल्याने त्यांनी अत्यंत साध्या, सोप्या व सरळ भाषेत ई-बुक म्हणजे काय हे सांगितले. ई-बुक आणि प्रिंट बुकमधला फरक सांगताना ते म्हणाले की, बर्‍याच जणांना असे वाटेल की, छापील पुस्तकांची पाने स्कॅन केली किंवा त्याची पीडीएफ तयार केली की झाले ई-बुक तयार. पण ई-बुक तसे नसते. पाने स्कॅन करणे ही पायरसी झाली. कारण ई-बुकची मांडणी पूर्णतः वेगळी असते. त्यात इंटरअॅक्टिव्हिटी हा महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे समजा एखादे ई-बुक वाचत असताना तुम्हाला एखादा परिच्छेद आवडला तर तुम्ही तिथे त्याची नोट तयार करून ती ठेवू शकता. इतकेच नाही तर ती नोट किंवा तुमचे मत फेसबुक किंवा तत्सम सोशल मीडियाच्या साइट्सवर मित्रांशी शेअर करू शकता. अगदी अशाच मुद्दे तुम्ही छापील पुस्तकांवरदेखील लिहिता, पण तिथे तत्काळ शेअरिंगची सोय नसते. शिवाय ई-बुकमध्ये मजकुराचा फॉन्ट हवा तसा छोटा-मोठा करून पाहता येतो किंवा हव्या त्या पानावर सहज जाता येते.

साठवण्याची जागा हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा विशद करताना दिमाख म्हणाले की, छापील पुस्तकं साठवण्यासाठी भरपूर जागा लागते, तर ई-बुक्सना मात्र तितकी प्रत्यक्ष जागा लागत नाही. शिवाय ई-बुक्स तुम्ही बस, रेल्वे किंवा विमानातही कुठेही तुमच्या टॅबवर, आयपॅड किंवा मोबाइलवर वाचू शकता. पाश्चिमात्य देशांमध्ये सुरू झालेली डिजिटल लायब्ररी संकल्पना भविष्यात आपल्याकडेही सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात ई-बुक्समध्ये ऑडिओ, व्हिडिओ अशा विविध गोष्टींचे अपडेटशन होणार असून यामुळे प्रकाशन क्षेत्राला वेगवेगळ्या शक्यतांचे आयाम मिळणार आहेत, असेही ते म्हणाले.

मी पुस्तकांच्या घरातच लहानाची मोठी झालेली असल्याने मला छापील पुस्तकांबद्दल अधिख जिव्हाळा असला तरी माझा मुलाला मात्र नक्कीच आयपॅडवर पुस्तके वाचायला आवडतील असे मत मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या नव्या साधनांचा वापर करून नव्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्याचा मेहता यांचा हा प्रयत्न स्तुत्य असून त्याला नक्कीच भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी हा कार्यक्रम गौतमी प्रकाशनाचे कै. श्री. निषाद देशमुख यांना अर्पण केला. मेहता, देशमुख फ्रँकफर्टला गेले असताना, प्रथम त्यांना मराठी ई-बुक करण्याची कल्पना २००९ साली सुचली. आज ती २०१३ साली प्रत्यक्षात येत आहे, निषाद असता तर त्याला माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला असता असे भावपूर्ण उद्गार मेहता यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, रणजित देसाई यांच्या गाजलेल्या स्वामी कादंबरीवरील मालिकेत रमाबाई आणि माधवरावांची भूमिका करणार्‍या मृणाल कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी यांना महाराष्ट्राच्या घरा-घरांत नेली. आम्हालाही स्वामी दैवतासारखी असल्याने श्रींच्या आशीर्वादानेच आम्ही हा टप्पा गाठला आहे.

सध्या www.mehtapublishinghouse.com या वेबसाइटवर 200 ई-बुक्स उपलब्ध असून येत्या दीडएक वर्षांत 1300 ई-बुक्स व त्यानंतर जुनी मुद्रित स्वरूपात उपलब्ध नसलेली पुस्तकेही ई-बुक्स रूपात आणणार असल्याची, तसेच ही बुक्स अधिक इंटरअॅक्टिव्ह स्वरूपात करणार असल्याची माहिती मेहता यांनी दिली. शेवटचे सत्र लेखक आणि प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नोत्तराचे झाले.
एकूणच कार्यक्रम उत्तम झाला. कार्यक्रम संपल्यावर मी कल्पना करत होतो –

अजून दहा वर्षांनी – 2023 साली, मी आयपॅडवर किंवा टॅबवर पुस्तकांचे संपादन करत असेन, चॅट करून संबंधित व्यक्तीला पुस्तकाबद्दल सूचना सांगत असेल... लेखकाला किती डाउनलोड झाले याचे किंवा रॉयल्टीचे अपडेट्स क्षणांत मिळत असतील... प्रकाशक सोशल मीडियावर वेगळ्या प्रकारे जाहिरात करत असतील.... प्रिंट बुकला अँटिक व्हॅल्यू आली असेल… (!?)

अशा अनेक शक्यता, कल्पना.... या निमित्ताने मराठी साहित्याच्या व प्रकाशन व्यवसायाच्या रंगमंचावर ई-बुक्सची नांदी सुरू झालीए, हे मात्र नक्की!

---------
-          प्रणव सखदेव




प्रश्नोत्तराच्या सत्रात चर्चिलेले महत्त्वाचे मुद्दे

१.      लेखकाचे मानधन व अर्थकारण –

मेहता – कोणत्याही लेखकाचे पुस्तक डाउनलोड झाल्यावर त्याची संख्या त्वरित लेखकाच्या अकाउंटवर दिसेल, त्यानुसार त्याचे मानधनही त्याला दिसेल. यामुळे प्रकाशक व लेखक यांच्यातला व्यवहार अधिक पारदर्शक होईल.

२.      यामुळे लेखक स्वतःच प्रकाशक होईल का?

मेहता – होणार नाही. कारण शेवटी मार्केटिंग करणे ही गोष्ट फार महत्त्वाची ठरणार असल्याने  जाहिरातीचा खर्च पाहता ते कितपत शक्य होईल हे कळेलच. पण माझ्यामते लेखन आणि प्रकाशन या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.

3. मग आता तुम्ही छापील पुस्तके बंदच करणार का?

मेहता – माझ्यामते आपल्याकडे अजून दहा वर्षं किंवा कदाचित पंधरा वर्षं तरी छापील पुस्तके काढावी लागतील. पण जर का ई-बुक्सची मागणी वाढली तर मात्र छापील पुस्तके हळूहळू बंद होण्याची शक्यता आहे.

4. सध्या कोणकोणत्या साधनांद्वारे ही पुस्तके वाचता येतील?


मेहता – अॅपल, अॅन्ड्रॉइड, विंडोज असे प्लॅटफॉर्म असलेल्या कोणत्याही टॅब, मोबाइल किंवा कॉम्प्यूटवर ही पुस्तके डाउनलोड करून वाचता येतील. 

http://www.mehtapublishinghouse.com/ViewBooks1.aspx?xid=MQAyAE0AUABIAA== या लिंकवर अधिक माहिती सचित्र वाचता येईल. शिवाय ही पुस्तके कशी दिसतात, कशी हाताळायची यासाठी काही फ्री पुस्तकेही देण्यात आली आहेत.