वाचलेल्या विचारांना स्वतः चे अनुभव
जोडायचे असतात .
म्हणजे ते ते साहित्य स्वतः पुरतं चिरंजीव होतं .
करमणूक करवून घेतानाही स्वतः ला खर्ची
घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही .
' साहित्य हे निव्वळ चुण्यासारखं असतं .
त्यात आपल्या विचारांचा कात
टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ
रंगत नाही .
आणि लेखकाला हवा असतो संवाद .
त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही . --- वपुर्झा
व. पु. अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे. गेली तब्बल पाच दशके या दोन शब्दांनी मराठी मनावर शब्दांचं जे गारुड केलं आहे ते आजही तसचं टिकून आहे किंबहुना वाढतच गेलं आहे.
व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या या अवलियाने साहित्यविश्वात शब्दांच्या ज्या अजोड कलाकृती निर्मिल्या त्या प्रत्येकवेळेस वाचकाला एका वेगळा अनुभव देऊन जातात. प्रत्येकवेळेस तेच पान, तेच पुस्तक पण मिळणारा अनुभवाचा गंध मात्र वसंतात फुटलेल्या नव्या पालवीप्रमाणे ताजा, कोरा, टवटवीत, मन प्रसन्न करणारा. ज्याच्या नावातच वसंत आहे अशा या मुशाफिराने वाचकांच्या आयुष्यात नेहमीच आनंदाच्या, उत्साहाच्या रंगांची पखरण केली. जगण्याच तत्वज्ञान इतक्या साध्या सोप्या शब्दात उलगडून सांगितलं की वाचताना प्रत्येकाला 'जगण' म्हणजे 'महोत्सव' च आहे असं वाटावं.
व. पु. च साहित्य वाचताना नेहमीच वाटत राहत की पंचेन्द्रियाबरोबरच व. पुं ना एक कॅलिडोस्कोप मिळाला होता ज्यातून इतक विविधरंगी आयुष्य ते पाहत असत आणि शब्दाच्या कुंचल्याने कागदावर रेखाटत.
व. पु. आणि कथाकथन म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्यांच्या कथा त्यांच्याच आवाजात ऐकण ही श्रोत्यांसाठी एक मोठी पर्वणीच असे. आपल्या कथाकथनाच्या यशाच रहस्य सांगताना ते म्हणतात कथाकथनात नाट्य हवं पण नाटक नको, अभिनय हवा पण अभिनेता नको स्मरण हवं पण पाठांतर नको. "पार्टनर", "सखी", "प्रेममयी" अशा अनेक रूपात व. पु. आपल्याला जागोजागी, क्षणोक्षणी भेटत राहतात. अशा या सर्व वाचकांच्या दोस्ताला त्यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त सलाम ! सलाम ! सलाम !
---
सानिका करंदीकर
मेहता पब्लिशिंग हाऊस