Friday, 1 March 2013

‘मारण्या’पेक्षा ‘वाढवू’ या!


मी माझ्या नुकताच परदेशात गेलेल्या मित्राशी चॅटिंग करत होतो.

तो - तुला एक गंमत सांगायचीये. इथल्या लोकांना आपल्याबद्दल फार आश्चर्य वाटतं अरे...

मी- का?

तो - कारण आपल्याला दोन किंवा तीन भाषा बर्‍यापैकी येत असतात याचं त्यांना भारी अप्रूप वाटतं.

मी – म्हणजे?


तो – ते म्हणतात की, इंग्रजी, अमेरिकन माणसाला इंग्रजीच येते, जर्मन-फ्रेंच लोकांना त्यांची-त्यांची भाषा. पण आपल्याला आपली मातृभाषा येतेच, हिंदीही जुजबी येते आणि आता इंग्रजीही कामापुरती का होईना, पण समजते. आता मलाच इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तीन भाषा येतात, थोडीफार गुजरातीही मी जाणू शकतो, असं म्हटल्यावर माझ्या मल्टिलिंग्विलिटीने माझा परदेशी कलिग तर एकदम माझ्याकडे आदरानेच पाहू लागला!

मी - आणखीन म्हणजे एखादी बोलीभाषाही आपल्याला येत असते. म्हणजे मराठीचंच बोलायचं झालं तर कोकणातल्याला कोकणी, मालवणी येत असते, मराठवाड्यातल्याला मराठवाडी, विदर्भातल्याला वैदर्भीय, खानदेशातल्याला खानदेशी. अगदी मुंबई-पुण्याकडचीही किंवा कॉलेजकट्ट्यावरचीही!

आमचा संवाद सुरूच होता; पण माझ्या डोक्यातली विचारचक्र या गोष्टीने फिरू लागली, आणि तो दिवस होता जागतिक मराठी भाषेचा आणि त्यामुळे तर चाकांना अधिकच चालना मिळाली...

आजच्या या पोस्टमॉडर्न म्हणजे उत्तरआधुनिक जगात भाषेचा ती मरतेय, मेलीएअसा नकारात्मक विचार करायला हवा का? कारण जागतिकीकरणानंतर झालेल्या घुसळणीत हे सिद्ध झाले आहे की, इंग्रजी ही ग्लोबल – जागितक भाषा आहे, ती ज्ञानभाषा आहे हे आपण मान्य करणं भाग आहे. 

इंग्रजी शिकण्याने, त्यातील साहित्य, कला व इतर व्यवहार जाणून घेतल्याने आपल्या समजुतीच्या, जाणिवांच्या कक्षा रुंदावण्यास, वाढण्यास मदत होते. (खरंतर हे कोणत्याही नव्या भाषेशी, संस्कृतीशी संबंध आल्यावर होत असतं. जागतिकीकरणामुळे संपर्क साधण्याची साधनं वाढल्याने ही देवाणघेवाणाची प्रक्रिया वेगाने होतेय.) या तंत्रज्ञानाच्या युगात तर इंग्रजी ही कळीची भाषा आहे. मग अशा वेळेला तिच्यातून मिळणारा नव्या जाणिवांचा, विस्तारित दृष्टिकोन आपण मराठीत आणायला हवा.

मी स्वतः भाषाशास्त्र शिकलो आहे. भाषा ही सरकार किंवा कोणतीही संस्था घडवीत नसते, तर लोक घडवीत असतात व ही अतिशय सूप्तपणे सतत चालत असलेली प्रक्रिया असते. साधं उदाहरण घ्यायचं, तर ज्ञानेश्वरांची भाषा मराठीच असली तरी ती आज आपल्याला कळत नाही, त्यासाठी त्या-त्या शब्दांचे अर्थ व सटीप स्पष्टीकरण वाचावे लागते. ती भाषा मराठीच असली तरी आज ती आपल्याला संपूर्ण कळत नाही. इंग्रजी वाढण्यामागे महत्त्वाचे कारण असे की, त्यांनी विविध भाषांमधले शब्द आपल्या भाषेत घेतले, इतर भाषांना दिले. इतकंच काय तर जागतिक श्रेष्ठ दर्जाचे साहित्य हे इंग्रजीत अनुवादित होत असते व इंग्रजीनेही ते इंग्रजी साहित्य म्हणून समाविष्ट करून घेतले आहे.

मग अशा वेळी, संपर्काच्या आजच्या जगात बोलीभाषांकडे अशुद्धतेचा चष्मा घालून पाहण्यापेक्षा त्यांच्याकडे भाषेची प्रयोगशाळा म्हणू पाहायला हवे. भाषेचा प्रवाह वाहता राहिला, तरच तो टिकतो अथवा त्याचे डबके होते. बोलीभाषा ही प्रमाणभाषेच्या प्रवाहातला अंतःस्थ;  पण जिवंत, रसरशीत प्रवाह असतो. बोली तसेच इतर भाषांच्या शब्दांच्या देवाणघेवाणातून हे प्रवाह वाहते राहतात.

एक गंमत अशी की, इंग्रजीतून प्राप्त झालेले ज्ञान किंवा माहितीच्या मराठी लिहिण्याची सॉफ्टवेअर्स तयार झाली आहेत. आणि त्यातून आता फेसबुक, ट्विटरपासून अन्ड्रॉइडसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक जण मनसोक्तपणे मराठी भाषा सहज वापरताहेत! किंवा मराठीत ई-बुक तयार होतातहेत आणि जगात कुठेही लोक ती डाउनलोड करून वाचू शकत आहेत! हे इंग्रजी किंवा जागतिक संपर्कामुळे, देवाणघेवाणीनेच घडले आहे हे लक्षात घ्यायला हवे.

मी स्वतः एका प्रकाशनसंस्थेत संपादक आहे. प्रकाशन व्यवसाय हा इंग्रजीतून आपल्याकडे आला आणि संपादक हे पद निर्माण झालं व त्यामुळे आज माझा चरितार्थ सुरू आहे. आणि म्हणून मी मराठीत काही काम करू शकतोय. म्हणजे मराठी मरतेय असं म्हणण्यापेक्षा तिला व्यावसायिक, सामाजिक, साहित्य अशा विविध क्षेत्रांत एक्स्पोजर दिलं पाहिजे. मराठीतून कथा-कादंबर्‍या-कोश-ग्रंथ-वैज्ञानिक असं सगळ्या प्रकारचं लिखाण, व्यवहार जास्तीत जास्त झाले पाहिजेत.

म्हणजेच इतर कोणत्याही भाषांबद्दल अढी, नकारात्मक भावना न बाळगता जास्तीत जास्त लवचीक राहून काम – वर उल्लेखलेल्या प्रत्यक्ष कृती केल्या पाहिजेत. कारण मोडेन पण वाकणार नाहीपेक्षा, लवचीकतेने टिकून राहता येते आणि सर्व्हाव्हल – टिकेल तो जगेल हा निसर्गाचा नियम आहे.
म्हणजे मरून जाण्यापेक्षा जगून राहून काम करणे, ही माझी पसंती आहे.  

आणि तुमची?

;-) J J



प्रणव 
मेहता पब्लिशिंग हाऊस 

2 comments:

  1. सहसा स्वत:बरोबरच आपला समाज/species जगवणे ही माणसाची उपजत ओढ आहे. पण आपण मराठी लोक या बाबतीच करंटेच म्हणायचे. सरकारी, अनैसर्गिक वाटाव्याशा मराठीमुळे आणि आधुनिकतेच्या खोट्या कल्पनांनी बोलीभाषेचा सहज होऊ शकणारा वापरही टाळला जाणे, हा मोठा अडसर आज दिसतो. ’मला मराठीचा अभिमान आहे’ हे आपण बुजत म्हणतो, कारण आपल्याला अकारण विशिष्ट राजकीय किंवा पारंपरिकतेचे लेबल चिकटायला नको असते. वरवर दिखावा असणारे पोकळ कार्यक्रम संधीसाधूंकडून केले जातात, त्यांचाच गवगवा होतो.

    नव्या पिढीने मराठीचा अधिकाधिक प्रभावीपणे वापर करायला हवा असेल , तर प्रणवने म्हटल्याप्रमाणे नवे तंत्रज्ञान वापरण्याशिवाय पर्याय नाही, नवनवे अर्थपूर्ण शब्द स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
      तुम्ही म्हणता तो मुद्दा योग्य आहे.

      Delete