Tuesday, 7 October 2014

कथा गुर्जरी

कहाणी वडाच्या लाडक्या मुलाची

नान्युकी आणि सेम्बा जातीच्या लोकांमध्ये मोठं भयंकर युद्ध चालू होतं. दोघांमध्ये फरक एवढाच होता की, नान्युकी जातीचे लोक डोक्याच्या उजव्या बाजूला भांग पाडायचे आणि सेम्बा जातीचे लोक डोक्याच्या डाव्या बाजूला.


‘ओहोऽ! तर त्यात काय मोठंसं झालं?’

असा विचार करून कोणी त्यांना समजवायला गेलं, तर ते लोक रागानं लालेलाल व्हायचे आणि समजूत
काढायला जाणाऱ्याला रुईच्या झाडाच्या फांदीला लटकवून द्यायचे. आता लटकवल्यावर खायलाप्यायला तर
काही मिळायचं नाही, त्यामुळं तो वाळून लाकडासारखा होऊन जायचा आणि मोठमोठ्यानं हाका मारून
विनवण्या करायचा, ‘‘बाबांनो, मला खाली उतरवा ना! पुन्हा कधीही मी तुम्हाला समजवायला नाही येणार!’'

त्यानं सत्तावन्न वेळा अशा हाका मारल्या, म्हणजे त्याला खाली उतरवला जायचा आणि चार पेले उसाचा रस पाजून पळवून लावला जायचा. जसजसं लोकांना हे ठाऊक होत गेलं, तसतसं लोकांनी ठरवलं की, काय वाट्टेल ते झालं तरी ह्या नान्युकी आणि सेम्बा जातीच्या लोकांकडे फिरकायचं नाही. करू देत त्यांना लढाई. चिखल संपला म्हणजे लढाई आपोआपच बंद होईल; कारण त्यांच्या लढाईत शस्त्र म्हणून वापरले जायचे चिखलाचे गोळे.

काळा, चिकट आणि चकचकीत दिसणारा चिखल त्यांना जास्त आवडायचा आणि हे सर्व लोक नेहमी चिखल असलेल्या तलावाच्या शोधात असायचे. लहानिं कवा मोठे, गोलगोल किंवा अगदी बेडौल गोळे बनवून ते एकमेकांवर फेकण्यात त्यांना खूप मजा यायची. एकदा नान्युकी जातीच्या लोकांना कोणीतरी सांगितलं, `‘चिखलाच्या गोळ्यांनी कपडे घाण होतात, चेहरा, केस घाणेरडे होतात, पण फार लागत तर नाहीच.

त्याच्याऐवजी दगड मारा की, दगड!’’ 

‘‘अरे मूर्खा! तसं केलं तर सेम्बा मरतीलच ना?’’ 

‘‘मग ते तर चांगलंच ना?’’

‘‘काय चांगलं? ते लोक मेले तर मग आम्ही लढायचं कोणाशी? हट्! मूर्ख कुठला! एवढंही समजत नाही? नीघ इथून, पळ, नाहीतर तुलाही रूईच्या झाडावर लटकावून देऊ!’’

सेम्बा जातीच्या लोकांना कोणीतरी सांगितलं, `‘तुम्ही चिखलाच्या गोळ्यांच्या ऐवजी विटांनी नान्युकींना मारा.’'

ऐकून त्यांना खूप राग आला. ते म्हणू लागले, `‘अरे अकलेच्या कांद्या! आम्ही माती खोदून काढायची, ती
गाढवांवरून पोती भरून आणायची, मग ती माती चाळायची, भिजवून मळायची, चाकावर घालून गोलगोल फिरवून मग हलक्या हातांनी त्याला आकार द्यायचा, सनाच्या दोऱ्यानं कापून नीट करायच्या, मग त्या विटा उन्हात सुकवून झाल्या, की भट्टी तापवून त्यात भाजायच्या, तेव्हा कुठं विटा तयार होतील. इतकी सगळं
करायचं म्हणजे आम्ही थकून नाही जाणार? कोण हात, पाय चेपून देईल आमचे? कोण वारा घालेल आम्हाला? समजत नाही काहीसुद्धा आणि आला मोठा सल्ला द्यायला! काय, तर म्हणे विटा मारा नान्युकी लोकांच्या अंगावर! अरे मूर्खा, एवढा तरी विचार कर की, त्यांना लागलं आणि रक्त आलं, तर त्यांना बांधायला पट्टे
कुठून आणायचे? जखमांवर दाबायला कापूस कुठून आणायचा? लढाई करायची सोडून आम्ही काय शेती करायला लागू? कापसाची झाडं लावू? काय उगीच आपलं वाट्टेल ते सांगतोयस? त्याच्यापेक्षा जा आणि एखादा झकासपैकी चिखल असलेला तलाव शोधून काढ, तर लढाई करायची मजा येईल!’'

एकूण असा प्रकार होता, त्यामुळे जोपर्यंत सूर्याचं कडक ऊन पडेल, चमचम करणारं चांदणं पडेल, मग पाऊस पडेल आणि गवत उगवेल, तोपर्यंत ह्या लोकांचं युद्ध काही संपेलसं दिसत नव्हतं. नान्युकींना सेम्बा दिसायची खोटी, चिखल शोधायला निघालेच आणि नान्युकी दिसले रे दिसले, की सेम्बांचे हातही चिखलाचे गोळे करायला शिवशिवायला लागायचे. 

अशातच नान्युकींच्या प्रमुखाच्या घरी पुत्रजन्म झाला. मुलगा तर दुधासारखा गोरापान, लोण्यासारखा मऊमऊ, खूप छान डोळे मिचकवायचा आणि गोडगोड हसायचा. बघितला की लगेच कोणालाही आवडेल असा मुलगा, पण एकच वैगुण्य होतं, की डोक्यावर एकही केस नव्हता! अरेरे! हा मोठा झाल्यावर डोक्यावरच्या केसांचा उजव्या बाजूला भांग कसा काय पाडेल? हा नान्युकी आहे का सेम्बा ते लोक ओळखतील कसं? 

अशानं तर असंही होणं शक्य आहे की, ह्याला सेम्बापण मारतील आणि नान्युकीपण मारतील. पोरगा बिचारा चिखलाच्या गोळ्यांचा मार खाऊनखाऊन अर्धमेला होईल. नान्युकींना मोठीच काळजी पडली, नान्युकींच्या प्रमुखालाही मोठी काळजी पडली.

सेम्बांचा प्रमुख हातात पांढरं निशाण घेऊन भेटायला आला. नान्युकींचा प्रमुख त्याला भेटला.

‘‘गोष्ट खरी आहे?’’ सेम्बानं विचारलं.

‘‘अगदी खरी आहे.’’ नान्युकीनं सांगितलं.

आता काय करावं? दोन्ही प्रमुख चिंतेत पडले. कोणालाच काही मार्ग सुचेना. शेवटी कोणालातरी सुचलं, ‘‘वाट बघूया. मोठा झाल्यावर कदाचित केस येतील, तो उजव्या बाजूला भांग पाडू शकेल आणि हा नान्युकी आहे, हे ओळखू येईल.’’ ठीक. वाट बघितली.

मुलगा पाच वर्षांचा झाला, केस आले नाहीत. मुलगा दहा वर्षांचा झाला, केस आले नाहीत. मुलगा पंधरा वर्षांचा झाला, तरीही केस नाही ते नाहीच आले. करायचं काय?

शेवटी अश्रू ढाळत आणि भग्न हृदयानं त्याला नान्युकींनी त्यांच्या राज्यातून काढून लावला.

तो सेम्बांकडे गेला. त्यांनीही ठेवून घेतला नाही. बिचारा एकटाएकटा स्वत:शीच बोलतबोलत जंगलात गेला.
‘‘मी नान्युकी नाही, मी सेम्बा नाही, मग मी आहे कोण? कोण आहे मी?’’ जंगलात एक विशाल वटवृक्ष होता, त्याच्या खाली जाऊन तो बसला. वडाची फळं त्याच्या मांडीवर पडली. पारंब्या झुलत त्याला वारा घालत राहिल्या. तो पुन्हा म्हणाला, ‘‘मी कोण आहे?’’

वटवृक्षानं उत्तर दिलं, ‘‘तू माझा लाडका! नाहीस तू सेम्बा, नाहीस तू नान्युकी. तू आहेस वडाचा लाडका. सांग मला, काय हवंय तुला?’’ ‘‘केस.’’

‘‘ओहो! एवढंच ना? हे घे केस! वडानं आपल्या पारंब्या खूप प्रेमानं त्याच्या डोक्यावरून फिरवल्या, तशा ह्या मोठाल्या बटा त्याच्या डोक्यावर उगवल्या. ‘‘जा, आता त्या मूर्खांना सांग ह्याच्यात भांग पाडायला. उजवीकडे पाडला तर तू नान्युकी, आणि डावीकडे पाडला तर तू सेम्बा.’’

मुलगा मग आनंदानं नान्युकींकडे गेला, वडिलांना भेटला, आईला भेटला, सगळ्यांना भेटला. सगळ्यांना आनंद झाला, पण कोणीही भांग पाडू शकलं नाही. मग तो सेम्बांकडे गेला, पण त्या जगावेगळ्या अद्भुत जटांपुढे तेही हरले. कोणालाही भांग पाडता आला नाही.

‘‘मग आता मी परत जाऊ?’’ मुलानं विचारलं. तो इतका काही छान, मजेदार होता, की कोणीच त्याला वडाकडे पाठवायला तयार नव्हतं.

‘‘तर मग भांगाचं कसं काय?’’ त्यानं विचारलं.

‘‘भांग गेला उडत!’’

‘‘आपण मजेत राहूया!’’ नान्युकी आणि सेम्बा एकदमच म्हणाले, हसायला लागले, लढाई-भांडणं बंद झाली. तलावातला चिखल वाचला. वडाच्या त्या लाडक्या मुलानं सगळ्यांना मिठ्या मारल्या. सगळीकडे आनंदीआनंद झाला.