Tuesday, 25 November 2014

मेघ - रणजित देसाई

वैर

आमच्या रामपूरचा रामनवमीचा उत्सव साऱ्या कऱ्यात मशहूर आहे. रामनवमीच्या उत्सवाला यात्रा भरावी तसे लोक जमतात. त्या नऊ दिवसांत रात्रंदिवस टाळांचा गजर रामाच्या देवळात घुमतो. रामनवमी दिवशी तर गावात पाऊल ठेवायला जागा राहात नाही. गावच्या ताम्रपर्णीचा काठ गाड्यांनी भरून जातो. पण या वर्षी रामनवमी अवघ्या चार-आठ दिवसांवर आली होती, तरी रामाच्या देवळासमोर मंडपाचा पत्ता नव्हता,की देवळाच्या रंगरंगोटीला सुरुवात नव्हती. दरवर्षी सारा गाव देवळात रात्रंदिवस राबत असे. पण आता त्या बाजूला कोणी फिरकतही नव्हते. उलट साऱ्या गावात एक प्रकारची बेकीच वावरत होती. 

याला कारण म्हणजे पाटलाच्या थोरल्या वाड्यात आणि धाकल्या वाड्यात माजलेले वैर. या दोन्ही वाड्यांतील वैर काही आजचेच नव्हते. पिढ्यान्पिढ्या ते चालत आलेले होते. पण हे वैर कितीही जरी विकोपाला गेले तरी गावच्या देवकीच्या बाबतीत आजवरती कधीच आडवे आले नव्हते. घराण्यात चालत आलेल्या रीतीप्रमाणे आजचे थोरल्या वाड्यातले श्रीपतराव आणि धाकल्या वाड्याचे यशवंतराव पाठच्या भावाप्रमाणे या उत्सवात वैर विसरून वावरत असत. निदान त्यांना तसे दाखवावे तरी लागतच असे. देवकीच्या उत्पन्नातील वाटणीच अशी चमत्कारिक झाली होती की, त्यामुळे त्यांना एकत्र येणे भागच पडे. देवळासमोरच्या मांडवाची मुहूर्तमेढ रोवायचा मान थोरल्या वाड्याकडे होता, तर पालखी उचलायचा मान धाकल्या वाड्याकडे होता. हे मान सांभाळताना दोघांनाही एकत्र यावेच लागे. तसे वागण्यात त्यांना अभिमान वाटत असे. सारी कऱ्यात या दोघांच्याकडे रामनवमीत मोठ्या कौतुकाने पाहात असे. उत्सव संपला की, त्याबरोबर ते पुन: आपापले मार्ग पत्करीत असत.

पण या वर्षी साऱ्याच गोष्टी चिघळल्या होत्या. पाटलांच्या वाड्यातच नव्हे, तर साऱ्या गावात दोन तट पडले होते. याला कारण म्हणजे नुकतीच झालेली निवडणूक. धाकल्या वाड्याचा यशवंतराव अधिक शिकलेला होता. श्रीपतरावापेक्षा तो अधिक समंजस होता. राजकारणात तो कधी फारसा भाग घेत नसे. पण निवडणूक जेव्हा आली, तेव्हा त्याला विचार करावाच लागला. श्रीपतरावाने काँग्रेस पक्षातर्फे उभा असलेल्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला. 

यशवंतरावाने बऱ्याच विचाराअंती स्वतंत्र म्हणून उभा असलेल्या एका उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला. श्रीपतरावाला त्याचा अर्थ निराळा वाटला. आपण काँग्रेसला पाठिंबा दिला आणि म्हणूनच वैर साधण्यासाठी यशवंतरावाने असे केले, असा त्याचा ठाम समज झाला. आणि येथूनच सारे चिघळत गेले. 

आजपर्यंत या पाटलाच्या घराण्यातल्या वैरामध्ये कधी सारे गाव पडलेले नव्हते. पण या निवडणुकीच्या धामधुमीत गावात उघड उघड दोन तट पडले. दोघाही पाटलांना भरीला घालायला माणसे मिळाली. आणि रामपूरची होती नव्हती ती शोभा पार धुळीला मिळाली. जसजशी निवडणूक अधिक जवळ येऊ लागली तसतसे हे वैर अधिकच पेटू लागले. ज्या गावांनी कधी फारशा मोटारगाड्या पाहिल्या नव्हत्या, त्या गावात मोटारी म्हणजे सर्वसामान्य होऊन बसल्या. एकदा यशवंतराव असाच दौऱ्यावर असताना, गावामध्ये श्रीपतरावाची सभा भरली होती. त्या सभेमधे बोलताना श्रीपतरावाचा संयम राहिला नाही. तो यशवंतरावावर वैयक्तिकरीत्या तोंड सोडू लागला. त्या सभेमध्ये हजर असलेल्या यशवंतरावाच्या साथीदारांना ते सहन झाले नाही. सभेत बोलाचाली झाली, दगडपेâक होऊ लागली, आणि सभा उधळली गेली. श्रीपतरावाच्या संतापाला पारावार राहिला नाही. त्याने भर सभेत सूड उगवायची प्रतिज्ञा केली. 

यशवंतरावाच्या कानी जेव्हा ही हकीकत गेली; तेव्हा त्याला फार वाईट वाटले. पण झाल्या गोष्टीला इलाज नव्हता. त्यानंतर रामपूरमध्ये कुठल्याच पक्षाची सभा नीटपणे पार पडू शकली नाही. लहान पोरापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सारे या दोन तटांत विभागले गेले. आणि साऱ्या रामपूरची होती नव्हती ती शोभा धुळीला मिळाली.

निवडणुकीची चाललेली धामधूम प्रत्येक घराप्रती पोहचत होती. रात्र नाही, दिवस नाही, गल्लीगल्लीतून आरडाओरड होत होती. यशवंतरावाने निवडणुकीच्या प्रचारासाठी पोवाडे मागविले होते. ते पाहून श्रीपतरावांनी हस्तेपरहस्ते वाघ्यामुरळ्यांचे कार्यक्रम ठेवले. तमाशे उभे केले. जिथे जिथे यशवंतरावांची गाडी जात होती; तिथे
तिथे श्रीपतराव गाड्या घेऊन जात होता. सुरुवातीला मोठ्या उत्साहाने ह्या चुरशीत भाग घेणारी मंडळी वैराच्या कैफाने बेभान होऊन जेव्हा निवडणुकीचा प्रचार करू लागली, तेव्हा सारा गावदेखील जरा हादरलाच.  पतरावाने तर एका भरसभेत आपला उमेदवार निवडून आणण्याच्या पैजेचा विडा उचलला. 

निवडणूक जेव्हा चार दिवसांवर ठेपली तेव्हा गोंधळ इतका वाढला की, शेवटी रामपूरला एक स्वतंत्र पोलिस पार्टी आली. खुद्द रामपुरात खबरदारी म्हणून सभाबंदीचा हुकूम बजावला गेला. निवडणुकीच्या दिवशी श्रीपतराव व यशवंतराव पहाटेपासून रात्रीपर्यंत साऱ्या केंद्रावरूनफिरत होते. गावोगाव जाऊन राहिलेल्या लोकांना मतासाठी बाहेर काढीत होते. अगदी शांत रीतीने त्या निवडणुका पार पडल्या, आणि रामपूरने सुटकेचा उसासा टाकला. 

मतमोजणीचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी गावची अधीरता वाढत होती, गावात निरनिराळे तर्कवितर्क केले जात होते. दोन्ही वाड्यांत आपल्या उमेदवाराला किती मते मिळणार आहेत, ह्याच्या याद्या तयार होत होत्या. आपल्या उमेदवारांची खात्री दोघांनाही वाटत होती. गावात एकमेकांना पाहताच मिशीला पीळ भरत होते. 

निकाल जाहीर व्हायच्या दिवशी यशवंतराव व श्रीपतराव आपल्या लोकांसह शहराकडे गेले. तिथंच मतमोजणी होणार होती. श्रीपतराव तर गावात जय्यत तयारी ठेवूनच शहराकडे गेला होता. निकाल जाहीर होताच तो उमेदवाराची प्रचंड मिरवणूक काढणार होता.

निकाल दोनप्रहरी तीन वाजता बाहेर पडला. श्रीपतरावांनी पाठिंबा दिलेला उमेदवार दोन हजार मतांनी पडला, आणि यशवंतरावाने पाठिंबा दिलेला उमेदवार निवडून आला. श्रीपतरावाला तो निकाल एकून मोठे दु:ख झाले. त्याच्या संतापाला पारावार राहिला नाही. त्या दिवशी रात्र पडेपर्यंत तो गावाला परतला नाही. यशवंतरावाला आपला उमेदवार निवडून आलेल्याचा आनंद झाला. पण त्याने गाजावाजा केला नाही. तो तसाच मनात दबून ठेवला. निवडणूक संपली, त्याचबरोबर चुरसही संपली असाच त्याने विचार केला. पण घडले मात्र अगदी निराळेच. श्रीपतरावाने तो पराजय फारच मनाला लावून घेतला. त्याच्या आजूबाजूच्या लोकांनीही त्याला चिथवला. श्रीपतरावाने ह्या अपमानाचा पुरा सूड उगवायची प्रतिज्ञा मनाशी केली. ही कुणकुण यशवंतरावाच्या कानांवर येत होती. गावात पडलेल्या ह्या दुफळीचे यशवंतरावाला सुरुवातीला फार दु:ख झाले. पण त्याला असे वाटत होते की, रामनवमीच्या उत्सवात हे वैर टिकायचे नाही. त्यात निश्चितपणे हे वैर धुऊन जाईल. तेवढ्या विश्वासावर यशवंतराव स्वत:ला धीर देत होता.