Wednesday, 11 February 2015

आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद

जून ते ऑगस्ट, २००५
न्यूयॉर्क शहर

मी इराकला जायचं आहे हे मला समजण्याच्या दोन दिवस आधी मला अ‍ॅन्डी भेटली. मी माझ्या संपादकांना मला तिकडे पाठवायला सांगत होतो त्याला वर्ष होऊन गेलं होतं. सुरुवातीला तर ते अक्षरश: हसले होते. न्यूजवीक मासिकाच्या लोकांमध्ये आम्हा वार्ताहरांचे प्रमुख मार्क्स मॅब्रीचं हसणं ही प्रसिद्ध गोष्ट आहे. ते मोठमोठ्यानं हसत हॉलच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत गेले. मला तोफेच्या तोंडी जायची हौस आलीय हा आमच्या परराष्ट्र संपादकांना एक विनोदच वाटत होता. पण मी माझ्या मागणीला चिकटून राहिलो. सरतेशेवटी मार्क्स म्हणाले, की माझी फारच इच्छा असली तर मला जरूर ते सुरक्षा प्रशिक्षण देण्यास पाठवतील. तीन महिन्यांनंतर मे २००५ मध्ये व्हर्जिनिया प्रांताच्या अंतर्भागात एकेई नावाच्या एका खासगी सुरक्षा कंपनीनं चालवलेला प्रशिक्षणाचा कोर्स मी पूर्ण केला.

एक आठवड्याच्या त्या कोर्समध्ये आणखी सुमारे पंधरा पत्रकार होते. बहुतेक सर्व वृत्तसंस्था जेथे लढाई चालू असेल तेथे स्टाफवरच्या माणसाला पाठवण्यापूर्वी त्याला हे प्रशिक्षण घेण्यास पाठवत. त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मला आठवतात,  तुम्ही चुकून एखाद्या सुरुंग लावलेल्या परिसरात शिरलात, तर मोठ्यानं ‘‘थांबा!  सुरुंग आहेत!’’ असं ओरडायचं, मग जागच्या जागी उभं राहायचं, मग गुडघ्यांवर बसायचं आणि तुमच्या पेननं किंवा जवळ एखादी काडी, काठी काहीही असेल तर ती घेऊन रांगत पुढे जायचं किंवा पाठीमागे जायचं. जाता जाता तुमच्या समोरची जमीन पेन किंवा काडीनं हलक्या हातानं उकरत जायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी तुम्हाला पळवून नेत नाही याची काळजी घ्यायची. पण तरी तसे झालेच, तर सकारात्मक वृत्ती ठेवायची. चेचेन्यामधल्या एका माणसाची व्हिडीओ आम्ही बघितली होती. त्याची बोटे एकेक करून कापली आणि पोस्टानं त्याच्या कुटुंबीयांना ती पाठवली गेली. त्याची सकारात्मक वृत्ती तो टिकवून ठेवू शकला नाही आणि पुढे एकही बोट शिल्लक राहिले नाही तेव्हा त्याला मारून टाकण्यात आले. तिसरी एक सामान्यपणे कोठेही लक्षात ठेवण्याची सूचना अशी होती, की खूप रक्त वाहत असेल तर ते थांबवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जखमी भागाच्या वरच्या बाजूला अगदी घट्ट पट्टा बांधणे. 

प्रशिक्षणाचा कोर्स झाला, तरी न्यूजवीकचे लोक मला खरोखरीच इराकला पाठवणार आहेत की नाही हे मला माहीत नव्हते. म्हणून रिपोर्टिंगचा इतरही अनुभव मिळवण्यासाठी मी थोडेफार स्वतंत्र फुटकळ लेखनही करीत होतो.त्यात टोपणनाव घेऊन एका वेबसाइटवर न्यूयॉर्कमधल्या बारीकसारीक घडामोडी लिहीत होतो. त्यामध्ये जून महिन्यात मला जेरी स्प्रिंगरची मुलाखत घेण्याचे काम देण्यात आले होते. स्प्रिंगरचा नवा रेडिओ प्रोग्रॅम सुरू होत असल्याच्या निमित्ताने एअर अमेरिका रेडिओ पार्टी देणार होती. त्या पार्टीला जायला मला आवडेल का? असं संपादकांनी दुपारी फोन करून मला विचारलं. खरं म्हणजे मला जायची इच्छा नव्हती. पण मी होकार दिला. मी एफ ट्रेन पकडून सत्तावन्न नंबरच्या रस्त्यावर पोहोचलो आणि तेथून चालत ‘रोझा मोक्सिकानो’ या रेस्टॉरंटमध्ये आलो. जेथे ही पार्टी होणार होती. एअर अमेरिकेच्या दोन प्रसिद्धीविषयक काम करणाऱ्यांपैकी एक अ‍ॅन्डी होती आणि या कार्यक्रमाच्या आयोजनाचे व यजमान म्हणून करण्याचे काम तिने करायचे होते. मला दिलेले आमंत्रण रद्द करावे असा विचार, तिच्या व तिच्या सहकाऱ्यांच्या मनात एकदा आला होता. मुळात माझ्या त्या गॉसिप वेबसाइटने प्रोग्रॅम सुरू होत असल्याबद्दल लिहावे की नाही याबद्दलही ते साशंक होते. पण मग त्यांनी ठरवले, की विरोध दर्शवल्यास परिस्थिती आणखी वाईट होऊ शकली असती.

मी आत शिरल्या शिरल्या ‘‘मायकेल होस्टंग्ज येऊन पोहोचला आहे.’’ असे एका प्रशिक्षणार्थीने अ‍ॅन्डीला जाऊन सांगितलं. त्याला माझ्या येण्यावर लक्ष ठेवायलाच सांगितलं होतं. एका टेबलापाशी नॅचोज् (कॉर्नफ्लॉवरच्या वर चीज इत्यादी घातलेला चपटा लहान नाश्त्याचा पदार्थ) आणि ‘गुआकामोल’ (शिजवून कुस्करून मसाला घातलेले अ‍ॅव्हाकाडो हे फळ) देत होते, तेथे मी उभा होतो. तेथे अ‍ॅन्डी आली. मी माझी ओळख करून दिली आणि मी स्प्रिंगरची मुलाखत घ्यायला आलो आहे असे सांगितले. मला आठवतं, त्या क्षणीच मला वाटलं होतं की, ती खूप गोड दिसत होती.

अ‍ॅन्डीनं स्प्रिंगरशी माझी ओळख करून दिली. मी त्याला पाच-सहा प्रश्न विचारले. त्यानं एकही विवादास्पद किंवा धक्कादायक विधान न केल्यानं माझा जरा विरसच झाला. मुलाखत संपल्यावर मी अ‍ॅन्डीशी आणखी पंधरा-वीस मिनिटं बोललो. गप्पाटप्पांचा स्तंभ लिहिणाऱ्या माणसांबरोबर तिला बोलताना बघून तिच्या सहकाऱ्यांना धक्काच बसला. मी भर देऊन सांगितलं, की मी खरं म्हणजे ‘न्यूजवीक’साठी काम करीत होतो आणि हे ‘गप्पाटप्पांचं काम’ आपलं मजा म्हणून करीत होतो. ‘‘मी जास्त करून खऱ्या, देण्यासारख्या बातम्या देण्याचंच काम फक्त करतो–
’’ असं मी सांगितलं.
‘‘ते तुमच्याजवळचं नोटबुक तर अगदी स्पेशल दिसतंय!’’ ती म्हणाली.
माझ्या मागच्या खिशातून बाहेर डोकावणारं ते स्पायरल बाउन्ड, स्पेशल रिपोर्टरसाठीचं नोटबुक होतं.
‘‘आपण दुसऱ्या महायुद्धाच्या बातम्या वगैरे देतोय, असं वाटतंय की काय तुम्हाला? नाही, म्हणजे तुम्ही त्या ‘न्यूजी’ चित्रपटातले आहात असं तुम्हाला वाटत असेल. तुमची ‘फेडोरा’ (दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली एक तऱ्हेची हॅट) घरी ठेवून आलात का?’’

त्या थट्टेखोर बोलण्याला एक धार होती. माझ्या लक्षात आलं, की तिच्या मते मी स्वत:ला ‘विशेष कोणीतरी’ समजत होतो आणि तिला माझा नक्षा थोडासा उतरवायचा होता.

मी तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. सोनेरी केस तिच्या हनुवटीच्या खालपर्यंत येत होते. नाक अपरं होतं आणि डोळे निळे होते. थोडेसे फ्रेकल्स होते. (त्वचेवर अगदी बारीक तपकिरी ठिपके) या मुलीशी खूप दाट मैत्री करायला आवडेल, तिला पाहताक्षणी मला असं वाटलं.

मी तिचं कार्ड मागितलं. तिनं म्हटलं की, तिच्याजवळ तिचं कार्ड नव्हतं– जी थाप होती– कारण तिला तिचं नाव त्या गप्पाटप्पांच्या वेबसाइटवर यायला नको होतं. निघण्यापूर्वी तिच्यावर छाप टाकायला मी सांगितलं, की मी माझ्या एका मैत्रिणीला निरोपाची पार्टी होती तिकडे चाललो होतो. मी सुरक्षा प्रशिक्षणासाठी ट्रेनिंगला गेलो होतो तिथे तीही होती आणि आता इराकला निघाली होती.स्प्रिंगरची मुलाखत लिहून काढून पाठवून दिली. लिहायला मिळालेली माहिती फारशी नव्हतीच. खरं म्हणजे गप्पाटप्पा टाइप हलकंफुलकं लिहिण्याच्या मन:स्थितीतही मी नव्हतो. गेले काही महिने मी त्यांच्याबरोबर काम करीत होतो, पण तशा पद्धतीचं निरर्थक वायफळ काहीतरी लिहिण्यात मला आता रुची राहिली नव्हती.स्प्रिंगरची मुलाखत हा त्या वेबसाइटवरचा कदाचित अत्यंत कंटाळवाणा आणि निरर्थक लेख झाला असेल. कदाचित योगायोग असेल किंवा समजून उमजून असेल, पण एअर अमेरिकातले अ‍ॅन्डीचे सहकारी तिला चिडवायचे, की तो लेख हा ‘अ‍ॅन्डीला पाठवलेल्या व्हॅलेन्टाईन’सारखा होता. ज्या दिवशी तो लेख वेबसाइटवर आला त्या दिवशी मला अ‍ॅन्डीची ई-मेल आली, की मला भेटून तिला आनंद झाला होता. मी लगेच मेल पाठवली : 

‘‘म्हणजे काय? ाqस्प्रंगरवरच्या लेखाबद्दल काहीच नाही?’’ तिनं लगेच उत्तर पाठवलं की, म्हणजे त्याबद्दल तिनं स्तुती करावी अशी माझी अपेक्षा होती. मी कळवलं की, तिचं अगदी बरोबर होतं आणि असंही सुचवलं की, आपण लंचला कुठेतरी बरोबर जाऊ या. आमच्या पहिल्या ‘डेट’च्या दिवशी बगदादहून मला स्कॉट जॉन्सनचा फोन आला.

‘‘हाय माइक, स्कॉट बोलतोय.’’
‘‘हाय स्कॉट, काय कसं चाललंय?’’
सॅटेलाइट फोन कनेक्शन असल्यामुळे आणि स्कॉट नेहमीच हळू आवाजात आणि संथगतीनं बोलायचा, त्यामुळे मधे मधे खंड पडायचा.
‘‘माझी ई-मेल मिळाली?’’
‘‘कुठली ई-मेल?’’
‘‘या उन्हाळ्यात बगदादला यायला मोकळा आहेस का तू?’’
मी याबद्दल त्याच्यासारखं शांत राहण्याचा प्रयत्न केला आणि म्हटलं, ‘‘हो, नक्कीच! काहीच अडचण नाही.’’
मी फोन खाली ठेवला. विश्वास बसत नव्हता. ते खरंच होणार होतं! मला ते मोठ्यानं कोणाला तरी सांगायचं होतं. मी माझ्या केबिनमधून उठलो आणि जॅकच्या– माझ्या मित्राच्या ऑफिसमध्ये गेलो आणि म्हटलं, ‘‘यार! मला इराकला पाठवतायत हे लोक!’’

मी आमची पहिली ‘डेट’ म्हटलंय खरं, पण ती खरंच ‘डेट’ होती का, हा जरा प्रश्नच आहे. मी अ‍ॅन्डीला न्यूजवीकच्या ऑफिसच्या समोरच्या ‘ब्रुकालिन डाइनर’मध्ये लंचला बोलावलं, ‘एअर अमेरिका’बद्दल बोलायला. आढेवेढे घेत तिनं शेवटी कबूल तर केलं. तिला वाटलं कामाचं बोलायचं असेल, पण माझा इरादा कामाबद्दल बोलण्याचा मुळीच नव्हता. एवढंच नव्हे तर मी आधीच जेवूनही घेतलं होतं.

ती ‘डाइनर’च्या दारातून बाहेर पडत होती तेव्हा मी पोहोचलो. 
‘‘सॉरी, मला उशीर झाला.’’
‘‘मी परत जायलाच निघत होते.’’
आम्ही कोपऱ्यातल्या बूथमध्ये बसलो. माझं जेवण झालं होतं, हे मी अ‍ॅन्डीला सांगितलं, तेव्हा मी वेडपट, मूर्ख माणूस आहे अशा चेहऱ्यानं तिनं माझ्याकडे बघितलं. ‘‘जेवण झाल्यावर जेवायला कोण जातं?’’ मी यावर धड काही उत्तर देऊ शकलो नाही म्हणून मग मी म्हटलं की, तिथे मिल्कशेक्स खूप छान मिळतात. मी व्हॅनिला मिल्कशेक मागवला आणि तिनं चॉकलेट मिल्कशेक. मी स्वत:ला मनाशी शांत राहायला सांगत राहिलो. तिला मी बगदादला जाणार आहे, हे निदान ‘लंच’ अर्धा संपेपर्यंत तरी सांगणार नव्हतो. पण पाच सेकंदांनंतर मी म्हटलं, ‘‘मी बगदादला जातोय.’’ तिच्यावर फारशी छाप पडल्यासारखं वाटलं नाही. ती म्हणाली, पुढच्या महिन्यात ती इंग्लंडला ‘लाईव्ह-८’ कॉन्सर्ट बघायला जाणार होती. ‘‘लाईव्ह-८ म्हणजे काय आहे हे तुला माहीत नसेल ना? का आहे?’’

‘‘अर्थात आहे.’’ मी थाप मारली.
तिनं तिथे कुठले कुठले बॅन्डस असतील ते सांगितलं– ‘‘कोल्ड प्ले, स्नो पेट्रोल, यू२.’’
‘‘स्नो पेट्रोल,’’ मी म्हटलं, ‘‘द आयरिश इन्डी बॅन्ड.’’ मला एवढं माहीत होतं. कारण त्या बॅन्डमधल्या एकानं त्यांच्या बॅन्डबद्दल आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये काही आठवड्यांपूर्वी लिहिलं होतं.
‘‘ते आयरिश नाहीत, स्कॉटिश आहेत.’’
‘‘नाही. मी पैजेवर सांगतो की, ते आयरिश आहेत.’’
पैज म्हणून आम्ही शेकहँड केला.
आमचा लंच जवळजवळ दोन तास चालला आणि तेवढ्या वेळात मी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला स्वत:ला आमंत्रण मिळवून घेतलं. योगायोगानं पार्टी लोअर साइडवरच्या माझ्या अपार्टमेंटच्या रस्त्यावरच होती. तिचं लहानपण ओहायोमधल्या पेरी गावात गेलं होतं. त्या गावातच अणुशक्ती-विद्युतगृह होतं आणि अ‍ॅन्डीचं म्हणणं होतं, की तिच्याकडे ठोस पुरावा नसला, तरी तिला वाटत होतं, की त्या प्रकल्पामुळे गावातले लोक सारखे आजारी पडायचे. ती भावंडांमध्ये मधली आणि त्यामुळे उपेक्षित होती. हा माझा अंदाज खरा ठरला आणि दुसरा अंदाज तिच्या मधल्या नावाबद्दलचा! (ख्रिश्चन लोकांमध्ये बरेचदा दोन नावं ठेवली जातात. त्यातलं पहिलं नाव वापरात राहतं.) दुसऱ्या प्रयत्नाला बरोबर ठरला, की ते नाव सूझॅन होतं. तिला जॉर्ज डब्ल्यू बुश आवडायचा नाही आणि कटकारस्थानांचं तिला कौतुक वाटायचं. त्याच्या वडिलांच्या वाटचा सूड घ्यायला बुशनं इराकवर हल्ला केला, असं तिचं ठाम मत होतं. मी सहानुभूतीपूर्वक मान डोलावली, कारण तिची मतं अगदी ठाम होती. पण राजकारणाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन जरा भोळाभाबडा होता. तिच्या दृष्टीने जगात चांगलं किंवा वाईट, लाचखाऊ आणि शुद्ध मनाचे, असे लोक होते आणि तिला चांगल्या गोष्टींची पुरस्कर्ती व्हायचं होतं. मी कोणाला मत दिलं, असं तिनं विचारलं.

‘‘मी? कॅनडाचे प्राइम मिनिस्टर डिफेनबेकर यांच्या शब्दांत सांगायचं, तर ‘‘डिअर सर, मी मतदान कोणाला करतो हे फक्त मला आणि देवाला ठाऊक असतं.’’

‘‘बापरे! तू रिपब्लिकन आहेस?’’ तिनं विचारलं, ‘‘२००४ मध्ये बुश क्लृप्त्या करून निवडणूक जिंकला तेव्हा तू कोणाला मत दिलंस? ओहायोमध्ये त्यानं तसंच केलं, माहीत आहे?’’

तिनं माझ्याविषयी तिच्या मित्रमैत्रिणींना सांगितलं आणि मी माझ्या. तिची एक मैत्रीण म्हणाली, ‘‘मी लढाईला चाललोय वगैरे ‘पर्लहार्बर’ टाइप नाट्यानं तो तुझ्यावर छाप नाही ना पाडत आहे एवढं बघ.’’
तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे दोन फोटो आहेत. एकाला ती व्हाडेर फोटो म्हणाली. म्हणजे मी त्याच्यात मानभावीपणानं हसतोय म्हणून माझ्या स्वभावातली दुष्ट बाजू कळून येतेय. दुसऱ्या फोटोत तिनं दोन्ही हात माझ्याभोवती टाकले आहेत आणि तिचं डोकं माझ्या खांद्यावर आहे. पार्टीतल्या दुसऱ्या एकानं मला विचारलं की, ती माझी खास मैत्रीण आहे का? मी ‘नाही’ म्हटलं तेव्हा तो म्हणाला, ‘‘ती तशी वागतेय तर खरी.’’

दुसऱ्या दिवशी तिला फोन करून मी विचारलं, की ‘‘आपण रात्री जेवायला एकत्र केव्हा जायचं ठरलं?’’
‘‘रात्री जेवायला?’’
‘‘तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळी तू मला तसं वचन दिलंस.’’
‘‘मी वचन दिलं?’’

‘‘हो! तुला आठवत नाही? तू त्या दिवशी जरा जास्त ड्रिंक घेतलं होतंस. मला ठाऊक आहे की, तू क्वचितच पितेस.’’ (जेवणाबद्दल असं काही बोलणं झालंच नव्हतं, पण मला वाटलं तिला अगदी शंभर टक्के काय बोलणं झालं ते सगळं आठवत नसेल, म्हणून ‘तू असं वचन दिलं होतंस’ असं सांगून चान्स घेतला!)

रविवारी रात्री लोअर ईस्ट साइडला आम्ही जेवायला गेलो. क्लिंट क्लिन्टन आणि रिव्हिन्गटनच्या कोपऱ्यावरचं ‘एलियास’ रेस्टॉरंट होतं ते. आम्ही आत गेल्याबरोबर ती म्हणाली, ‘‘हे तुझं ‘डेट’ रेस्टॉरंट आहे, होय ना? तुझ्या सगळ्या मैत्रिणींना तू इथे आणतोस.’’
‘‘कुठल्या मैत्रिणी? मुळीच नाही.’’ 

खरं म्हणजे तिचं बरोबर होतं. यापूर्वी मी तीन मुलींना ‘डेट’साठी इथे आणलं होतं. त्या दिवसांत लोअर ईस्ट साइड बकाल तऱ्हेचं शनेबल होऊ लागलं होतं.

खूप घट्ट, कमरेखाली जीन्स घालणाऱ्या लोकांची बारमध्ये गर्दी असायची आणि पहाटे पाच वाजेपर्यंत लोक तेथे असत. अ‍ॅलन स्ट्रीटवरच्या माझ्या अपार्टमेंटच्या बाहेरच्या रस्त्यांवर ग्लासेस फु टणे, नशेत आरडाओरडा करणे या गोष्टींचा खूप आवाज यायचा. फेशनेबल विस्कटलेले केस आणि घट्ट काळ्या जीन्स घातलेले स्त्री-पुरुष ड्रग्ज घेत, ड्रिंक्स घेत आणि आणखी ड्रग्ज घेत असत. जेवण झाल्यावर आपण माझ्या अपार्टमेंटवर जाऊ असं मी तिला पटवून दिलं. एनबीएच्या फायनल्स चालू होत्या आणि तिला स्पोर्ट्सची आवड आहे हे मला ठाऊक होतं. मी ऑनलाइन स्पोर्ट्स गॅम्बलिंग करतो आणि दोनशे डॉलर्स हरलो होतो असं मी तिला सांगितलं. ती माझ्याबरोबर माझ्या अपार्टमेंटवर आली. माझ्या खोलीत एक फ्यूटॉन बेड होतं. टेबलावर बिनकामाची पत्रं,
कागद, सुटे पैसे यांचा ढीग होता. एक कॉम्प्युटर होता, आणखी एक खुर्ची होती आणि मोठा स्क्रीन असलेला टीव्ही होता. जमिनीलगतचा मंद प्रकाश पाडणारा एक दिवा मी लावला आणि एक सुगंधी मेणबत्ती लावली. मग टीव्हीवर मॅच चालू असलेले चॅनेल लावले. ती गोंधळून माझ्याकडे बघायला लागली. 

‘‘तू बेडवर बसू शकतेस.’’ मी म्हटलं आणि मीही बेडवर बसलो.
ती जागची हलली नाही.
‘‘ये, इथे बस माझ्याजवळ.’’
ती जरा घुटमळत माझ्याजवळ आली आणि बेडवर बसली. मी तिच्या खांद्याभोवती हात टाकायचा प्रयत्न केला.
ती ताडकन उठून उभी राहिली.
‘‘काय करतोयस तू?’’
‘‘अं? मी तुझं चुंबन घ्यायचा प्रयत्न करतोय. तुला काय वाटलं, मी काय करतोय?’’
‘‘तुला काय वाटलं? तू सहज माझं चुंबन घेऊ शकतोस?’’
‘‘माझ्याबरोबर माझ्या अपार्टमेंटवर आलीस तू.’’
‘‘तू म्हणालास, आपण टीव्हीवर मॅच बघू या.’’
‘‘बरं ठीक आहे, मॅच बघ.’’
‘‘नाही, मी आत्ताच्या आत्ता परत जाते आहे.’’
‘‘तू चालली आहेस? कमाल आहे! म्हणजे तू माझ्या अपार्टमेंटवर येतेस, मी तुझं चुंबन घेऊ बघतो आणि तुला धक्का बसतो?’’
‘‘हे बरं नाही.’’
‘‘ठीक आहे. तसं असेल, तर तू जाऊ शकतेस.’’
‘‘तू हे असं करतोस? मुलींना इथे आणतोस आणि त्या तुझ्याशी प्रेमाचे चाळे करू लागतात?’’
‘‘होय! ‘डेट’ कशासाठी करायचं मग?’’
मी वैतागलो होतो आणि मला अवघडल्यासारखंही झालं होतं. मला वाटलं होतं तिचं न् माझं जमेल; पण तिच्या नीतिमत्तेच्या कल्पनांनी मला ओशाळल्यासारखं झालं. मूर्खासारखं वाटलं म्हणून मी तसं वाटणं झाकायला तोऱ्यानं म्हटलं, ‘‘म्हणजे तू मला झिडकारते आहेस? मग तू गेलीस तर तेच बरं.’’

ती बेडवर बसली.

‘‘ही पहिली डेट आहे आपली. पहिल्या डेटवर असं वागतं कोणी?’’
‘‘खरं म्हणजे ही तिसरी डेट आहे. एकदा आपण मिल्कशेक्स प्यालो, मग तुझ्या वाढदिवसाची पार्टी–’’
‘‘हीच पहिली डेट आहे.’’
‘‘मला वाटलं तू निघून जाणार होतीस?’’
‘‘मी जावं अशी इच्छा आहे का तुझी?’’
‘‘तुला जे करायचं असेल ते कर. पण उघड आहे की, तू जावंस असं मला वाटत नाहीये.’’
टीव्हीवरची गेम सुरू झाली.
‘‘मला वाटतं मी आणखी वीस डॉलर्स हरणार आहे.’’ मी म्हणालो.
तिनं नुसतं माझ्याकडे बघितलं.

हळूहळू आम्ही शांत झालो. मग मी बोलू लागलो. तिला दिलासा वाटेल अशा स्वरात साध्या गप्पा मारत शेवटी मी तिच्याजवळ सरकलो. तिचा हात हातात घेऊन हळुवारपणे बोलत राहिलो आणि तिला सांगितलं, की अस्वस्थ वाटल्याने ती निघून गेली तरी मी रागावणार नाही. सगळं काही हळूहळू होऊ द्यावं हे मी समजू शकतो, तेव्हा प्लीज, तिची थांबायची इच्छा नसेल, तर मी समजू शकतो.

मग मी पुढे वाकलो आणि तिचं चुंबन घेतलं. तिनंही प्रतिसाद दिला.

Saturday, 7 February 2015

रंगरेषा

घटातील पोकळी

परवा मला एक सुंदर ग्रीटिंग कार्ड आले. त्यात नववर्षाच्या शुभेच्छा होत्या. पण माझे मन विशेष वेधून घेतले ते कार्डावरच्या चित्राने. चित्र तसे साधेच होते. 

ओल्या मातीचा गोळा चाकावर घालून कुंभार त्याला मडक्याचा आकार देत आहे असे दृश्य चित्रात रंगवलेले होते. चित्र मला आवडलेच, पण चित्रापेक्षाही कार्डाच्या आतल्या बाजूला त्यासंबंधी जो मजकूर छापलेला होता तो अधिक अर्थपूर्ण वाटला. मजकूर इंग्रजीत होता. त्याचा आशय साधारणत: असा होता, ‘मातीच्या गोळ्यापासून मडके तयार होते. पण मडक्याचा खरा अर्थ म्हणजे त्याच्या आतली पोकळी. मडक्याचा खापराचा देह ही झाली त्याची व्यावहारिक उपयुक्तता. पण आतली पोकळी हा त्याचा आत्मा आहे. तो त्याचा जीवनाशय आहे!'

मजकूर वाचता वाचता माझ्या मनात एक वेगळीच आठवण जागी झाली. माझा एक आर्किटेक्ट मित्र आहे, तरुण वयातच त्याने खूप नाव मिळवले आहे. आपल्या कामाबद्दल अखिल भारतीय पातळीवरून राष्ट्रपतींनी त्याचा गौरव केला आहे. तो आपल्या शास्त्रात निष्णात आहे तशी त्याला उत्तम रसिकता आणि वाङ्मयीन जाणही आहे. एकदा तो वास्तुकलेसंबंधी माझ्याशी बोलत होता, आता घरबांधणीचे शास्त्र हा विषय तसा माझ्या आवाक्यातला नाही. त्याचे मला फारसे आकर्षणही नाही. तरीही मित्र जे सांगत होता ते मला कुतूहलजनक वाटले. तो मला म्हणाला, ‘आम्ही घरं बांधतो. इमारती बांधतो, घराला आकार देणाऱ्या भोवतालच्या घटातील पोकळी भिंती, दरवाजे, वरचे छप्पर हे तर सारे महत्त्वाचे असतेच पण तितकीच महत्त्वाची असते ती आतली पोकळी, अधिक नेमका शब्द वापरायचा झाला तर अवकाश. आम्ही जेव्हा घर, इमारत बांधतो तेव्हा त्यातला अवकाश बंदिस्त, सीमित करून त्याला एक अर्थ देत असतो. लेखक लिहिताना निवेदनातल्या काही जागा तशाच मोकळ्या सोडतो ना? लेखनातल्या या मोकळ्या जागांना जे महत्त्व असते तेच घटातल्या या अवकाशालाही!’

मित्र जे सांगत होता ते ऐकताना आपल्या अध्यात्मातले काही संदर्भ माझ्या मनात उलगडू लागले. वस्तुत: अध्यात्म हाही मला पूर्णत: अनाकलनीय असलेला विषय. भगवद्गीतेमध्ये आत्म्याचे अमरत्व सांगताना श्रीकृष्णांनी देह भंगुर आहे पण आत्म्याचे अविनाशित्व नष्ट होत नाही असे म्हटले आहे, आता ते श्लोकही आठवू लागले. ‘घटाकाश’, ‘मठाकाश’ या ज्ञानदेवांनी वापरलेल्या संज्ञांचे स्मरण झाले. घटामध्ये घटाच्या आकाराची पोकळी असते. मठामध्ये मठाच्या आकाराची पोकळी असते. या दोन्ही पोकळ्या किंवा रित्या जागा बाहेर सर्वभर पसरलेल्या अनंत अवकाशाचाच छेद असतात. महत्त्व घटाला किंवा मठाला नसते. ते त्यात सामावलेल्या आकाशाला असते. घटाचा किंवा मठाचा बाह्याकार भंगून गेला तर आत कोंडलेले आकाश बाहेरच्या आकाशात मिसळून त्याच्याशी एकरूप होऊन जाते. पाण्यात बुडलेला आणि पाण्याने काठोकाठ भरलेला घडा फुटला तर आतलेबाहेरचे पाणीही एक होते, खऱ्या अर्थाने आकाश व पाणी नाहीसे झालेलेच नसते. ते काही काळापुरते मुळापासून अलग झालेले असते इतकेच. या विचारापाठोपाठ आणखीही काही विचार मनात आले. पोकळी म्हणजेच शून्य. आणि या ‘शून्य’ संज्ञेलाही आपल्या अध्यात्मात विशिष्ट अर्थ, महत्त्व आहे.

शून्य आणि पूर्ण दोहोंचा अर्थ एकच मानला जातो. पूर्णातून पूर्ण वजा केले तरी पूर्णच राहते अशा अर्थाचा एक श्लोक आहे. तो साNयांना माहीत असेल. ‘पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते’ शून्यातून शून्य वजा केले, शून्याने शून्याला गुणले, भागले तरी उत्तर शून्यच येते. गणितशास्त्र आपल्याला सांगते. पण ध्यात्मशास्त्रही तेच आपल्या मनावर ठसवते. मग जीवनमरण, लाभहानी, यशअपयश साऱ्यां चा अर्थच बदलून जातो. एका ग्रीटिंग कार्डावरील चित्राच्या, मजकुराच्या निमित्ताने इतके भिन्न भिन्न संदर्भ मनात जागे व्हावेत हे आश्चर्य तर खरेच, पण तसे ते झाले खरे. या शून्यावरून आणखी जुनी गोष्ट आठवली. मागे अनंत काणेकर यांनी ‘लहान शून्य आणि मोठे शून्य’ अशा शीर्षकाचा एक सुंदर लघुनिबंध लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, ‘माझ्या लहानपणी शंभरातून शंभर वजा केले तरी शून्य आणि लाखातून लाख गेले तरीही शून्यच हा हिशेब मला कळत नसे. मला वाटे, पहिल्या शून्यापेक्षा दुसरे शून्य खूपच मोठे असले पाहिजे.’ काणेकरांचे हे तर्कशास्त्र त्यांच्या बालवयाला साजेसे भाबडे असले तरी एका फार गहन अर्थाने ते खरेही आहे. पूर्णातून पूर्ण गेले
तरी अंती पूर्णच शिल्लक उरते या आध्यात्मिक विचाराशी ते किती जवळीक साधते!

या शून्याचीही एक गंमतच आहे. म्हटले तर ते अगदी लहान असते. आणि म्हटले तर ते साऱ्या विश्वाला गवसणी घालण्याइतके विराटही होते. ज्याला आपण ईश्वरी चैतन्य म्हणतो ते प्राणिमात्राच्या ठायी सामावलेले असते त्याबरोबर ते अखिल ब्रह्मांडालाही व्यापून राहू शकते. आपल्यासारख्या सामान्य माणसांना हा विचार समजून घेणे अवघड जाते. पण ज्ञानदेवांसारखा थोर आध्यात्मिक अधिकारी पुरुष जेव्हा ‘हे विश्वचि माझे घर’ असे म्हणतो तेव्हा ‘घरा’ चा हाच विशिष्ट अर्थ त्याला अभिप्रेत असतो. आपली प्राणिमात्राबद्दलची स्नेहभावना, कनवाळूपणा विश्वव्यापक होणे म्हणजेच ‘हे विश्व' आपले ‘घर’ होणे. प्रारंभी एकाच व्यक्तीच्या ठायी केंद्रित असणारे प्रेम साऱ्या विश्वापर्यंत पसरत जाणे याचेच नाव अध्यात्म. हीच कल्पना जिगर मुरादाबादी या उर्दू शायराने आपल्या एका शेरात फार सुंदर रीतीने मांडली आहे. ते म्हणतात-
इस लफ्जे मुहब्बतका
इतनाहि फसाना है
सिमटे तो दिले - आशिक
फ़ैले तो जमाना हैं ।

या शेराचा अर्थ असा : प्रेमाच्या एका शब्दाची इतकीच कहाणी असते. ते संकुचित झाले तर प्रिय व्यक्तीच्या हृदयात सामावून राहते. आणि त्याचा विस्तार झाला तर ते साऱ्या विश्वाला व्यापून टाकते. ते प्रेम म्हणजेही आपल्या अध्यात्माने सुचवलेले घटातली पोकळी आणि बाहेरचे अंतराळ यांचे अभिन्नत्वच! 

इथे एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. आत्मा आणि परमात्मा यांची अंती होणारी एकरूपता अध्यात्म आपल्याला समजावून देते. ‘आब्रह्मस्तंबपर्यंत’ म्हणजे परब्रह्मापासून तो साध्या गवताच्या झुबक्यापर्यंत साऱ्या विश्वात एकच ईश्वरी चैतन्य भरून राहिले आहे असे थोर आध्यात्मिक अधिकारी पुरुष आपल्याला सांगातात. ज्ञानदेवासारख्यांना गवताच्या पात्यात, प्राणिमात्रात या चैतन्याचा साक्षात्कार होतो आणि त्यांच्या स्नेहाची कक्षा सर्व विश्वाला आपल्या कवेत घेते. विज्ञानही आपल्या भाषेत वैश्विक एकतेची हीच जाणीव आपल्याला करून देते. एकच चेतना, एकच ऊर्जा विश्वाला व्यापून राहिली आहे हे शास्त्राच्या द्वारा विज्ञान आज सिद्ध करू शकते. तिसरा मार्ग आहे तो प्रतिभाशाली कलावंतांचा. हे कलावंत आपल्या प्रतिभेच्या बळावर स्वत:चे संकुचित व्यक्तिमत्त्व ओलांडून विश्वाशी सहज एकरूपता साधू शकतात. केशवसुत म्हणतात 
पूजितसे मी कवणाला 
तर मी पूजी अपुल्याला
अपुल्यामध्ये विश्व पाहुनी
पूजितसे मी विश्वाला

गोविंदाग्रज जेव्हा ‘शून्यात परार्धे भरली’ असे म्हणतात तेव्हा त्यांनाही केशवसुतांच्या कवितेतला विश्वप्रेमाचा हाच अर्थ कदाचित अभिप्रेत असावा. अध्यात्मवादी, शास्त्रज्ञ, कलावंत हे आपापल्या भिन्न मार्गांनी पण शेवटी
एकाच निष्कर्षाला जाऊन पोहोचतात. कुणाचा मार्ग तत्त्वज्ञानाचा, कुणाचा शास्त्राचा तर कुणाचा उत्कट प्रेमाचा. पण साऱ्या मार्गांचा अंतिम विराम एकाच ठायी असतो, प्रश्न आहे तो आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा. आपल्यापाशी आध्यात्मिक अधिकार नाही. वैज्ञानिक जाणीव नाही की प्रतिभावंताची प्रतिभाही नाही. या विश्वात प्रतिभाबलाने विचरण्याची कवींची किमया आपल्याला कुठून साध्य होणार? आपण आपली व्यावहारिक स्वार्थ जपणारी, ऐहिक वासनाविकारांनी ग्रस्त झालेली आणि आपल्या एकसुरी जीवनाच्या चाकोरीतून फिरणारी सामान्य माणसे. पण आपल्याजवळही एक गोष्ट आहे. ती म्हणजे प्रेम करण्याची ताकद. कवीप्रमाणे प्रतिभेच्या बळावर नव्हे तर साध्या प्रापंचिक शहाणपणाने आपण एकमेकांवर प्रेम करतो. एकमेकांच्या गरजा जाणून घेतो. एकमेकांच्या साहाय्याला धावून जातो. या प्रेमाची सुरुवात स्वार्थी भावनेपासून होत असली तरी तिचा प्रवास निरपेक्ष प्रीतिभावनेपर्यंत होत जातो. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘ऐशी कळवळ्याची जाती! करी लाभावीण प्रीती’ हा अनुभव आपल्यासारख्या क्षुद्र माणसांनाही आयुष्यात कधी ना कधी येतोच. प्रश्न असतो तो त्याच मार्गाने पुढे पुढे जाण्याचा. ज्याची जितकी कुवत असेल तितका तो स्वत:ची प्रगती करून घेतो. आणि मला वाटते, हेच आपल्यासारख्यांना उमगणारे अध्यात्म. याहून वेगळे अध्यात्म आपल्याला कधी भेटणार नाही आणि आपल्याला त्याची आवश्यकताही नाही.

Thursday, 5 February 2015

संपत पाल, गुलाबी साडीवाली

सकाळचे आठ वाजलेत. मी आवरून तयार होतीय. यांत्रिकपणे माझ्या हालचाली घडतायत. मी माझ्या छोट्याशा अंधाऱ्या खोलीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे माझं मुख्य कार्यालय आहे. मी केसांचा अंबाडा वळते, मग गुलाबी साडीची घडी उघडून ती नेसते. बाहेर जमलेल्या गर्दीचा गलका केव्हापासूनच कानावर पडतोय. त्या सगळ्या जणी युद्धासाठी सज्ज आहेत. माझ्याकडून एक इशारा मिळायचा अवकाश, त्या आणखी मोठ्यानं गर्जत उसळून उठतील!

झालं... माझं आवरून झालंय. मी काठी घेऊन बाहेर जाते. मी दारापाशी येताच आभाळाच्या दिशेनं उंचावलेल्या काठ्यांचं जंगल माझ्या स्वागतासाठी उत्साही आवाजात गगनभेदी गर्जना करतं :
‘‘गुलाबी गँग! गुलाबी गँग!’’
इथला रस्ता सकाळच्या वेळी नेहमी शांत शांत असतो. पण आता तो थरारून गेला आहे. मीही समोरचं दृश्य पाहून उत्साहित होत माझ्या गँगला त्याच घोषणेनं प्रत्युत्तर देते.

अतार्रा गावातल्या उखडलेल्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा छोटी छोटी काँक्रीटची घरं आहेत. हे सारं तडाखेबंद गुलाबी लाटेनं झाकून गेलंय. या मानवतेच्या महापुरात सर्व वयोगटातल्या स्त्रिया आहेत. त्या आमच्या गँगचा गणवेश परिधान करून आल्या आहेत. या साडीनं आम्हाला लोकप्रिय बनवलंय. इथं जवळपास दीडशे बायका एकत्र जमल्या आहेत, कदाचित दोनशेसुद्धा असतील. त्यांच्यापैकी बऱ्याचशा खालच्या जातीतल्या आहेत. त्या अतिशय कष्टात आयुष्य कंठतात, पण त्या स्वखुशीनं घरातून बाहेर पडून माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली कामं सोडून इथं आल्या आहेत. त्यांच्यातल्या काही जणी जवळपासच्या खेड्यांतून बैलगाड्यांतून किंवा टॅक्सी करून आल्या आहेत. काही जणी कुणा गाडीवानाला सोबत नेण्याची विनंती करून, तर कुणी कित्येक किलोमीटर्सचा रात्रभर प्रवास मी, करून इथं पोहोचल्या आहेत. मी माझ्यासोबत निरनिराळ्या खेड्यांत काम करणाऱ्या माझ्या काही सहकारी महिलांना काल रात्री फोन केला होता. त्यानंतर काही तासांतच त्यांनी माझा निरोप सर्वत्र पोहोचवला. कुठं त्यांनी घराची दारं ठोठावून माझा निरोप पोहोचवला, तर काही ठिकाणी चौकाचौकांत जाहीर घोषणा केल्या.
‘‘संपत पालचा निरोप आहे. उद्या सकाळी सर्वप्रथम तिच्या कार्यालयात हजर राहा, गणवेशात!’’
ज्यांना ज्यांना शक्य होतं त्या सगळ्या जणींनी माझ्या आवाहनाला साद दिली होती आणि गुलाबी साडी परिधान करून त्वेषानं हातात काठी पकडून इथं हजेरी लावली होती. माझं न्यायदाता सैन्य... किती विलक्षण दृश्य असतं! उशिरा येणाऱ्यांची प्रतीक्षा करत मी त्यांच्यात मिसळते. माझ्या दलांमध्ये चेतना जागवते. माझ्या ब्लाऊजमध्ये खोचलेला माझा सेलफोन अविरत वाजत असतो. माझ्या गँगमधली एखादी बाई नवा गट आल्याचं सांगत असते किंवा एखादा पत्रकार आम्ही खरंच आगेकूच करतोय ना, याची खातरजमा करत असतो. पत्रकार महोदय आले आहेत. कारण आम्ही जेव्हा जेव्हा धाड टाकायला जातो तेव्हा कायम, न विसरता प्रेसला सूचना देतो. आम्हाला जितके जास्त लोक बघतील तितका आमचा आवाज ऐकला जाण्याची शक्यता जास्त असेल. आज आम्ही खळबळ माजवणार असं मला वाटतंय!

बायका अतिशय थरारून गेल्या आहेत; उतावीळ झाल्या आहेत. सर्वत्र हास्याचे फवारे, किलबिल भरून राहिलीय. पायांचे आवाज येतायत. काही जणी आतुरता शमवण्यासाठी हवेत काठी फिरवण्याचा सराव करतायत. प्रतिस्पध्र्याला भीती घालण्यासाठी किंवा दृष्टी किंचित कमी असलेल्या अधिकाऱ्याला ‘कारण’
दाखवण्यासाठी ‘लाठी’सारखं शस्त्र नाही. या बायका इथं नटण्यामुरडण्याची मौज करायला जमलेल्या नाहीत. त्या इथं जमल्या आहेत ते त्यांना संताप आलाय म्हणून आणि त्यांना हे सर्वांना कळायला हवंय. एव्हाना सूर्य वर आला होता. आमची निघायची वेळ झाली होती. मी निघण्याचा इशारा दिला,
‘‘चलो!’’
मिरवणूक पुढं निघाली. या धुमसत्या लाव्हालोळाच्या अग्रभागी मी आमच्या नेहमीच्या घोषणा देत होते :
‘‘गुलाबी गँग! गुलाबी गँग! बघा, आम्ही आलोय! लक्ष्मणरेषा ओलांडायचा प्रयत्नही करू नका! विजय आमचाच आहे, गुलाबी गँगचा!’’

आम्ही आम्हाला अतिशय चांगली माहीत असणारी गाणी मंत्र म्हणावेत तशी म्हणतो. आमच्या लेखी ही जणू युद्ध सुरू होण्याआधी रक्त उसळवणारी रणदुदुंभी असते. अतार्राच्या रस्त्यावरून आमची यात्रा सुरू होताच इथले रहिवासी आमचा गलबला ऐकून घराबाहेर येतात. दर खेपेला त्यांची प्रतिक्रिया एकच असते. ते भारून गेलेले असतात. त्यांच्यापैकी बरेच जण आमच्यामागून येऊ लागतात. आम्ही कुठं निघालोय हे जाणून घ्यायचं कुतूहल त्यांना स्वस्थ बसू देत नसतं. औत्सुक्यानं आमच्या मागून येणाऱ्या या मंडळींसोबत आमची यात्रा सुरूच असते. आमचा ज्वर आता पराकोटीला पोहोचलेला असतो. आमच्या गालांनाही आमच्या साडीचाच रंग चढलेला असतो. आमची ही यात्रा पाहून दर्शक चार पावलं मागं सरकून आम्हाला वाट करून देत असतात. आता ही यात्रा एक अजस्त्र, तेजस्वी गुलाबी रंगाची लाट बनलेली असते... सर्वत्र फक्त हीच लाट दिसत असते. अध्र्या
तासानं आम्ही आमच्या नियोजित लक्ष्याप्रत पोहोचतो. गावातलं पोलीस ठाणं. मी माझ्या हातातली काठी उंचावून थांबण्याचा आदेश देते. तत्क्षणी सगळ्या जणी थांबतात. नि:शब्द शांतता पसरते. समोरच्या इमारतीमधून जराही आवाज येत नसतो. मात्र पोलीस खिडकीतून आमच्याकडं बघतायत हे लक्षात येतं.
‘‘ साहेब बाहेर या! आम्हाला तुमच्याशी बोलायचंय.’’
‘‘तुमच्याशी बोलल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीय!’’ मग त्या इमारतीतून एक माणूस बाहेर येतो आणि माझ्या दिशेनं येऊ लागतो.
‘‘तर मग तुम्हाला काय हवंय?’’
‘‘आम्हाला तक्रार दाखल करायचीय.’’
‘‘कुणाविरुद्ध?’’
‘‘खेड्यातल्या भ्रष्टाचारी प्रमुखांविरुद्ध! ते गरीब माणसांसाठी असणारा पैसा शोषत आहेत.’’
‘‘तुम्ही कशाबद्दल बोलताय?’’
‘‘आम्ही प्रधान मंडळींबद्दल बोलतोय. त्यांनी गरीब लोकांना काम द्यायचं आहे, त्यासाठी सरकारी निधीतून पैसे मिळतात. काही जण सांगतात की, कामही नाहीय आणि पैसेही नाहीत. पण मी चौकशी केलीय, पैसे आले आहेत. मग ते गेले कुठं?’’
‘‘आणि म्हणून तुम्ही उत्तर प्रदेशच्या सर्व रहिवाशांना तक्रार दाखल करण्यासाठी सोबत घेऊन आला आहात?’’
‘‘दु:खाची गोष्ट आहे, पण याचं उत्तर ‘होय’ आहे. तुम्हाला ते चांगलंच ठाऊकही आहे. अलीकडं कित्येक महिने आम्ही या सार्वजनिक निधीला कुठं पाय फुटतात याचा तपास करत होतो. कितीतरी लोकांनी त्यांच्या गावातल्या पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे तक्रार दाखल करण्याचाही प्रयत्न केलाय, पण प्रत्येक वेळी तुमच्या अधिकाऱ्यांनी एकतर त्यांना हाकलून दिलंय किंवा त्यांची तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिलाय. तुम्ही पोलीसवालेही इतर अधिकाऱ्यांसारखेच, आतपर्यंत पोखरलेले!’’
‘‘असलं बोलायचं काम नाही!’’
‘‘तुम्हाला माझं खरं बोलणं नकोय, पण तुम्ही या जिल्ह्यातल्या पोलिसांना त्यांची कर्तव्यं न पार पाडण्याची परवानगी देता.’’
‘‘मी या संदर्भात काहीही करू शकत नाही.’’
‘‘तुम्ही असं सांगायचं धाडसच कसं करता? हे अधिकारी तुमच्या आज्ञेनुसार काम करतात. तुम्ही त्यांना आमच्या तक्रारी दाखल करून घ्यायला लावू शकता. त्यांना त्यासाठी तर पगार मिळतो.’’
‘‘हं... ठीक आहे. मी बघतो काय करता येतंय ते.’’
‘‘नुसतं बघू नका. करा!’’
‘‘पण मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे?’’
‘‘या गुन्ह्याबद्दल प्रधानांविरुद्ध आमच्या तक्रारी दाखल करून घ्या. आत्ताच्या आत्ता! त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करायला नकार देणाऱ्या पोलिसांना निलंबित करा. ते अधिकारीवर्गाचं प्रतिनिधित्व करण्याच्या लायकीचे नाहीत.’’
‘‘ते ठरवण्याचं काम तुमचं नाही.’’
‘‘बरोबर आहे! आमचं नाही, तुमचं आहे. बघा, तुम्ही जर काहीच केलं नाही, तर मी पुढच्या वेळी देशातल्या सर्व स्त्रीयांचा उठाव घडवीन आणि तुम्ही तरीही काही केलं नाहीत, तर आम्ही जिल्हान्यायाधीशांना भेटू. समजा त्यांनीही काही केलं नाही तर आम्ही थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटू आणि कदाचित, नवी दिल्लीत पंतप्रधानांनासुद्धा!’’
त्या पोलिसानं माझ्याकडं तुच्छतेनं पाहिलं. पण तो आमची तक्रार दाखल करून घेणार, हे मी ओळखून होते. कारण एका बाईला हुसकून लावणं सोपं असेल, पण शंभर बायकांना घालवणं अशक्य असतं. म्हणूनच मी दोन वर्षांपूर्वी ‘गुलाबी गँग’ची मुहूर्तमेढ रोवली. दबाव आणून न्याय मिळवण्यासाठी! ही गँग महिलांचीच का? त्याचं कारण म्हणजे महिलांच्या माध्यमातूनच समाजपरिवर्तन घडेल. सगळ्या लोकांमध्ये महिला सर्वांत कमजोर असतात, पण त्याच सर्वांत ताकदवानही असतात. कारण त्यांच्यात जास्त एकी असते. इतकी एकी पुरुषांमध्ये कधीच होणार नाही. आम्ही एकत्र आल्यामुळं आमच्यात प्रस्थापित नियम-हुकुमांची चौकट उलथून लावण्याची ताकद आहे. माझ्या बाबतीत अपवादात्मक असं, खास करून सांगण्याजोगं काहीही नाही. इतर बायकांपेक्षा मी जास्त भोगलंय अशातलाही भाग नाही. सर्वांत तिरस्कृत मानल्या जाणाऱ्या एका जातीतल्या गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. माझं शिक्षण झालेलं नाही. मी भारतातल्या लक्षावधी स्त्रियांसारखीच एक स्त्री आहे. माझा नवरा माझ्या माथी मारला गेला होता. कितीतरी काळ मी शरणागती पत्करून आयुष्य जगत होते. इतर अनेक स्त्रियांसारखीच मीही ‘बळी’ ठरू शकले असते. पण एके दिवशी मी पुरुषांच्या कायद्यापुढं मान तुकवायला नकार दिला. ते सोपं नव्हतं, पण मी स्वत:च्या आयुष्याचा मार्ग निवडला. आज मी या गँगचं नेतृत्व करते, अन्यायाचा बळी ठरलेल्या सर्वांच्या पाठीशी उभी राहते : समाजानं तिरस्कृत केलेल्या, गरीब आणि शोषितांच्या, पिळवणुकीचे बळी ठरलेल्यांच्या, ज्यांच्या जमिनी बळकावल्या गेल्या आहेत अशा लोकांच्या, मनमानी हिंसाचाराच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभाराचे बळी ठरलेल्या लोकांच्या रक्षणार्थ धावून जाते. यामागचा माझा उद्देश योग्य व बरोबर आहे आणि या ठाम खात्रीमुळंच मला जराही भय वाटत नाही. मला अधिकारीवर्गाचं दडपण येत नाही. मी माझ्या धनगर जातीतल्या एखाद्या शेतकऱ्याची जशी कानउघडणी करीन, तशाच पद्धतीनं एखाद्या पोलीस-निरीक्षकाला त्याची जागा दाखवून देईन. मी त्याला त्याच आक्रमकपणे धमकी देईन, त्याच ठाम निश्चयानं त्याला जेरीला आणीन. मी कुणी फार मोठी वगैरे नाहीये, पण मला जबरदस्त शरीरप्रकृती लाभली आहे. माझ्या भेदक नजरेची लोकांवर कशी छाप पाडायची ते मला चांगलं माहीत आहे. मला जबरदस्त आवाजही लाभला आहे आणि लोक माझं बोलणं ऐकतात. मी एक स्त्री आहे. मला माझा आवाज इतरांना ऐकवायचा असेल, तर मला इतरांपेक्षा जास्त मोठा आवाज काढावा लागेल; शक्य असेल तेव्हा शांततेनं आणि गरज पडली, तर माझ्या मनगटांच्या जोरावर!