Wednesday, 29 April 2015

नटरंग - आनंद यादव

‘‘तमासगिरांची दशा बघून. दुस्काळातली माणसं उतरल्यागत त्या शाळंत उतरली हुती. पोटार्थी आल्यागत दिसतेली. आपूण का नि कशाला आलूय ह्येची जाण एकालाबी न्हाई. उगंच मंतऱ्यामागं, फुडाऱ्यामागं पळत हुती. म्हाताऱ्या बजरंगागत हात जोडून त्येंच्या फुडंफुडं करत हुती. रातच्या बैठकीत बगिटलंस न्हवं; सरकारी पर्चाराचं कार्येक्रम मिळत न्हाईत म्हणून कुत्र्यागत भांडत हुती. अध्यक्ष झालेल्या गोपाळमामांनी तरी कशाला आपल्या बोलण्यातनं मंतऱ्याफुडं तमासगिरांच्या पोटापाण्याच्या, घरादाराच्या अडचणी सांगायच्या? सरकारी मदतीची भीक मागायची? सरकारच्या जिवावर का तमासगीर तम्माशा करतूय?... 

असं ह्या अध्यक्षानं बोलायचं नि आम्ही मंतऱ्याफुडं टाळ्या वाजवायच्या. नुसता माकडखेळ...त्या मंतऱ्याला तरी तम्माशातलं काय कळत हुतं? ना जिवाळा ना आस्था, वाट्टंल तसा बडबडत हुता. तम्माशा ऱ्हायला बाजूलाच. आम्ही आपल्या वाजवतूय टाळ्या. तम्माशाबद्दल काय तरी बोलणं झालं का ह्या तीन दिसात? सगळं ठराव सरकारकडं तोंड करून मांडलं नि ‘सरकार यंव करंल, त्यंव करंल अशी आशा बाळगू’ म्हणून येळ खाल्ला. 

आपलं गणगोत सरकार नव्हं, खेड्यापाड्यातलं पब्लिक हाय...! जाऊ द्या. आपलं आपून करत ऱ्हावं हेच खरं.’’ स्वत:शीच बोलल्यासारखा तो बोलत होता. नयना त्याच्याकडं एकटक बघत होती. बघता बघता खुदकन हासली.
‘‘का हासलीस?’’
‘‘न्हाई; एक व्याख्यानच झालं म्हणून हसू आलं.’’
‘‘हे का खोटं हाय?’’
‘‘तसं कुठं मी म्हणाली? अहो, गोरगरीब तमासगीर पोटापाण्याचं आदूगर बघणार. पोट भागलं की मग कला. मग सरकारकडं पोट भागलं तर सरकारकडनं; पब्लिककडनं भागलं तर पब्लिककडनं.’’
‘‘पर सरकारम्होरं कुत्र्यागत किती लाळ गाळायची ती. आपूण आलू ते तम्माशाचं काय तरी ऐकायला मिळंल. बोलायला मिळंल म्हणून. पर हितं तम्माशा सोडून बाकीचंच समदं.’’
‘‘एकंदरीत तुम्हांस्नी बरं वाटलं न्हाई म्हणा.’’
‘‘तसंच झालं नि काय.’’
थोडा वेळ ती काहीच बोलली नाही. त्याचा ताव थोडा कमी झाल्यावर म्हणाली, ‘‘आणि ही तुम्हांस्नी नटराजाची मूर्ती तुमच्या कलेबद्दल मिळाली ती? का
तीबी वाईटच?’’
‘‘तिला कसं मी वंगाळ म्हणीन? माझ्या कलेबद्दल मिळाली ती. पोटापाण्यापायी न्हवं. तेवढाच कार्यक्रम तम्माशाचा झाला. गुणी कलावंतांचं कौतिक झालं. रातरी वग-लावण्या झाल्या..’’ ‘‘बघू तरी मूर्ती जरा. मी अजून नीट बघिटलीबी न्हाई.’’ ‘‘बघ की.’’ त्यानं ट्रंकेतनं मूर्ती काढली. तिच्यावर गुंडाळलेला कागद सोडला नि अलगद तिच्या मांडीवर दिली...जडसर होती. 
‘‘जड हाय की हो.’’
‘‘जड असणारच; पंचरसी धातूची हाय.’’
ती न्याहाळू लागली. उचललेला डावा पाय, दुसऱ्या पायावर सहज सावरलेला तोल, चारी बाजूंनी चार हात पसरून केलेली मुद्रा, गळ्यातल्या दोन नागांचे डौलदार आकार, मागे पसरत गेलेल्या जटा...मूर्ती सुरेख होती. ‘‘झकास हाय. किती मोठा मान मिळाला तुम्हांस्नी!’’ ‘‘त्यातला अर्धा वाटा तुझा हाय.’’ ती मुग्ध झाली. पाहून झाल्यावर त्याच्या मांडीवर तिनं ती ठेवली. धावत्या गाडीतून बाहेर मागेमागे सरकणारा निसर्ग एकटक पाहू लागली. आपण नाच्या म्हणूनच कायम राहावं असं गुणाला वाटू लागलं होतं. या मानमरातबानं त्याच्या मनाचा पक्का निश्चय झाला. पुढची धुक्यामागची स्वप्नं बघू लागला. एकटा एकटा झाला...‘आपूण आता मनापासनं हीच कला पत्करायची. नाचेपणाचाच रातध्याड ध्यास घ्यायचा. नुसतं कामापुरतं नाच्यागत बोलून चालून भागणार न्हाई. तसं केलं तर कामात कमतरता येती. चुकून बापय अवतरतू. बाईगत वागलं पाहिजे. तिच्यागत बोललं चाललं पाहिजे. तिच्यागतच दीसभर हाताचं, मानंचं हावभाव केलं तर रातचं नाच्या सजासजी हुबा ऱ्हाईल. नाच्या गुणा म्हंजे नाच्या गुणाच झाला पाहिजे.

...पैल्यापैल्यांदा कामं कराय हुबा ऱ्हायलू की बाईगत चालणं-बोलणं कराय किती धडपड करावी लागायची. बायकी चालीनं चालू बघायचा नि हिकडं बोलण्याच्या नादात बापयाची चाल कवा उरावर बसायची नि बाहीर पडायची पत्त्याच लागायचा न्हाई. नाच्याच्या वक्ताला ह्या बापयाच्या चालीसंगं तर झटपट करून तिला मागं सारावं लागायचं. तिथल्या तिथं तटवून धरावं लागायचं. पैलं वरीस हेच्यातच गेलं. ...ह्या हुन्नरीकडं जीव लावून वळलं पाहिजे. बायकांचं हावभाव, त्येंची चाल, बसणं-बोलणं, हसणं-रुसणं सारखं न्यहाळलं पाहिजे. त्येंचं बारकावं नीट ध्येनात ठेवलं पाहिजेत. कुणी नसलं की आपल्या पालात त्येंचा अंगावर घेऊन सराव करायचा. तसं केल्यबगार खरा नाच्या हुबा ऱ्हाणार न्हाई माझ्यातनं. 

...राधानं क्रिस्नाचा ध्यास घेटला नि क्रिस्नरूप झाली; तसा क्रिस्नानंबी राधाचा ध्यास घेटला हुता. त्योबी राधारूप झाला हुता. तशी गुणाची गंगी झाली पाहिजे. शंकराची पार्वती झाली पाहिजे. एका बाजूनं बघावं तर शंकर आणि दुसऱ्या बाजूनं बघावं तर पार्वती...नाच का बाईनंच करावा असं न्हाई. शंकरबी नाचतू. पार्बतीत मिळून जातू. पार्बती त्येच्यात मिळून जाती. कसं एकमेकांत ऱ्हाईत असतील?...देवाची करणी!’ 

...खरं म्हंजे बापयात बाई नि बाईत बापय कायम असतू. मला न्हाई झाली दया? अगदी माझ्या तोंडातनं पडल्यागत. बाईच हाय ती माझ्यातली. माझा राजा दारकीच्या तोंडातनं पडल्यागत. दारकी बाई तर राजा बापय. शंकर-पार्बतीचीच ही कला? तो मूर्तीकडं मन लावून बघू लागला...‘नाचे-नर्तकांच्या राजा, कसा संभाळलाईस ह्यो तोल? ह्यो डावा पाय हलकापूâल तरी अवघड अवघड वर उचललेला नि दुसरा वाकुन भक्कम हुबा. तुझ्या ह्या चारी हातांची अशी हालचाल की आता बघता बघता दुसरी मोड हुणार. एकानं डमरूचा ताल धरलाय नि दुसऱ्याच्या तळव्यावर जिता जाळ. फुडचा हात भगताला धीर देणारा तर दुसरा...दुसरा तुझ्या पायावर डोकं टेकंल त्येला आशीर्वाद देणारा. आता डोळं झाकलं तर झटक्यानं दुसरा डौल घेशील अशी अंगाची गत. लांबसडक बारीक जिती बोटं. नागणीच्या पिल्यागत वळवळणारी. अंग झोकता झोकता उडालेल्या बटांची चवरी. अंगांगात नाचाची उसळी किती उफाळलीया देवा! काय हे कसब! तुझा तूच ताल, तोल धरून नाचतूस हे एक बरं हाय... पर हे हातावर आग घेऊन नाचणं कशापायी? एवढा का कडक तू? कसली आग ही? तुझं पाय वडता वडता पायाबुडीच दडपलेला ह्यो राक्षेस कोण?

‘...नटेसुरा, मी दुबळा. मला बळ दे. माझा मलाच ताल दे. जिवात डमरू दे. माझा मीच नाचीन. तुझ्यासारखा धुंद हुईन. हातापायात नाच भरून ऱ्हायलेल्या नटरंगा, हे सगळं मला शिकीव. मी तुझी पूजा बांधीन. तुझी ही मूर्ती कायम जवळ बाळगीन. सोमवार, उपासतापास करीन नि तुझा वसा घेऊन नाचीन. देवा, आता नाच माझा नसंल; तुझाच असंल. त्येचं भलंबुरं तुझं तू बघ. तुझ्यातली पार्वतीच माझी गंगी होऊन उतरंल आता. नटराजा, तुला कसं सांगू?...म्हणशील तर माझ्या मुंडक्याची माळ तुझ्या गळ्यात घालतू. माझ्या ध्यायीची राख करून तुला माखतू. मला नाचाचं बळ दे’ डोळे उनउनीत पाण्यानं भरून आले. तसाच मूर्ती न्याहाळू लागला. तिच्या रेखीव, नीटस शरीरावरून हळुवार थरथरती बोटं फिरवू लागला.

Saturday, 4 April 2015

वावरी शेंग - शंकर पाटील

नवरा

जोंधळ्याच्या रानात भांगलण करता करता रत्ना उठून तीनदा वगळीला जाऊन आली. रानात बसायचं होईना झालं, तशी आपल्या बांधालाच झाडाखाली ती पडून राहिली. उचलून टाकल्यागत होत होतं, पायांत पेटके येत होते. हातापायांतला जीवच गेल्यागत झाला होता. एकाएकी हे असं का व्हावं तिला कळत नव्हतं. चांगलं जेवूनखाऊन ती रानात येऊन बसली होती. निम्मा आरा भांगलून झाला होता. तोवर कसली भावना नव्हती. सगळं एका तासाभरात बिघडलं होतं. तोंंडाकडनं वांत्याही होत होत्या. पोटात घाबरा पडला होता. तसं काही असेल असं म्हणावं, तर बाहेरचं कुठलं पाणीही ती प्याली नव्हती. तहान लागली आणि कुठलंतरी पाणी प्याली असती, तर तशी शंका घेता आली असती. तसं काही नव्हतं, हे खरं, मग हे एकाएकी असं का व्हावं? मनात शंका आल्याशिवाय राहत नव्हती. एवढ्या वांत्या होऊन, पोटात काही नसताना, मग हे असं का होत असेल? काळजी पडली. गेल्या आठवड्यात शिवा—शिवदूरच्या लेकाला, असंच झालं होतं. ताबडतोब कोल्हापूरला नेऊन थोरल्या दवाखान्यात ठेवलं, म्हणून पोरगं वाचलं. एकाला दोन चार उदाहरणं डोळ्यापुढं दिसू लागली. खोताचा म्हातारा बाजारला म्हणून हुपरीला गेला होता. येता येता वाटेतच त्याला असं गाठलं आणि निम्म्या वाटेतच त्याचा जीव गेला. एक म्हणता दहा आठवू लागलं आणि असं काही झालं तर काय करायचं हा घोर लागला.

शिवदूर तालेवार होता. त्यानं लगोलग आपल्या लेकाला कोल्हापूरला नेलं. तशी पाळी आपल्यावर आली, तर कोण कोल्हापूरला घेऊन जाईल?... मालक असा! पेकाळून गेलेली रत्ना झाडाखाली सावलीला पडली होती तरी तिचा मालक पुढं बघून भांगलत होता. हातातलं काम सोडून तो जवळ येईल, असं वाटत होतं. 

पण एक तास झाला, ती बघत होती, तिचा मालक काही जवळ येत नव्हता. हातातलं खुरपं खेळवत तो आपल्या रानातच बसून होता. एकाला बारा वर्षे संसार करून, बिचाऱ्याला मायाच नव्हती. कधी दुखलं खुपलं, तर येऊन जवळ बसावं, एका शब्दानं चौकशी करावी, काय होतंय म्हणून विचारावं, असला गुणच त्याच्याजवळ नव्हता. असला हा मालक काय झालंसवरलं तर काय बघणार? एकाएकी उचमळून आलं. पडलेली रत्ना उठून बसली. डोळ्याला अंधारी आल्यागत झाली. आपल्याच हातानं तिनं कपाळ धरलं आणि ती पुढे वाकली. भडाभड वांती झाली. डोळ्यांना तर काही दिसेना झालं. नुसतं पाणी पडत होतं. ती तिथंच पुन्हा लवंडली. आपल्या रानाकडं तोंड करून पडून राहिली. हातापायांतली सगळी शक्तीच गोळा होऊ आली होती. त्यातनंही तिनं डोळे उघडून बघितलं. भांगलण करीत बसलेला बाबा, आपलं काम सोडून काही उठत नव्हता... काय होतंय म्हणून येऊन विचारुने? एकाएकीच हे असं का व्हाय लागलंय आणि काय होतंय याचा विचारपाचार करूने?... 

तिचा मालक हातातलं काम सोडून उठत नव्हता आणि तिलाही त्याचा राग आल्यागत झाला होता. रत्ना नुसती डोळ्यांनी बघत पडली होती. पण त्याला हाक मारीत नव्हती. असं असं व्हायला लागलंय म्हणून त्याला सांगावं असं तिच्या मनातच येत नव्हतं... एवढं डोळ्यांनी बघूनही विचारपूस करीत नाही, तर कशाला सांगायचं? काही सांगायचं नाही, काही नाही! जे होतंय ते डोळ्यांनी बघायचं आणि अंगात ताकद असेल तोवर सोसायचं!...

सोसवेनाच झालं, हातापायांत पेटके येऊ लागले. वात फिरावा तसा साऱ्या अंगातनं गोळा फिरू लागला. काय होतंय हेच कळेना झालं. जीव सारखा आत आत ओढत होता. काळीजच थंड पडत चाललं होतं. कुणालातरी हाक मारल्याशिवाय गत्यंतर नव्हतं... कुणालातरी हाक मारावी? स्वत:चा मालक तिथंच रानात असताना, दुसऱ्या कुणालातरी कसं बोलवायचं? आपण होऊन तो काम सोडून येत नव्हता, काय झालंय म्हणून विचारायचं त्याला कळत नव्हतं. काही झालं, तरी त्याला हाक मारायची नाही असं तिच्या मनानं ठरवलं होतं. निर्धार केला होता, पण आता जीव राहील असं काही वाटेना झालं. हातपाय उरावर आल्यागत झाले. 

सोसवेनासं झालं आणि कसाबसा एक हात करून ती म्हणाली, ‘‘जरा हिकडं या हो...’’ तिला मोठ्यानं हाक मारता येत नव्हती. त्यात वारं सुटलं होतं. तिचा आवाज त्याला ऐकू जात नव्हता. आत ओढलेल्या आवाजानं ती हाका मारीत होती आणि हातातलं खुरपं खेळवत तो तसाच रानात बसून होता. उठून जाऊन त्याला सांगावं, तर तेवढी ताकदही अंगात राहिली नव्हती. बसलेली जागा उठवत नव्हती... हे असलं काय झालं? हे असल्या व्हाऱ्याला आता करावं तरी काय? हाक मारली, तर ऐकायला जात नव्हती. त्याचे तर कान असे किवडे होऊन बसले होते. कामातनं त्याला ऐकू जात नव्हतं आणि तोंड असून हाक मारता येत नव्हती... काय करायचं! थोरला दीर बांधानं रानाकडं निघाला होता. बिचारा देवानंच धाडल्यागत तो जवळ आला. तिनं आपल्या मालकाला मारलेली हाक ऐकून दीरच समोर येऊन उभा राहिला. त्याला बघून काही धड सांगता येईना झालं, सवरता येईना झालं. तोंड गेलं आणि घळाघळा डोळ्यांतनं पाणीच येऊ लागलं. दिरानं सगळं डोळ्यांनी बघितलं. बोटभर डोळे खोल गेले होते. चेहरा सगळा आत ओढला होता. काळा ठिक्कर पडला होता. चांगली धडधाकट बाई एकाएकी तुरकाटीच्या काडीगत दिसू लागली होती. सकाळी चांगली हिंडत होती आणि एकाएकी अशी पिळून निघाल्यागत चोपलेली दिसत होती. त्यानं बघितल्याबरोबर ताडलं—चलन निराळं दिसत होतं. शेजारीच वांती झालेली बघितली आणि मग तो अधिक चौकशी करीत बसला नाही. रानाकडं तोंड करून तो उभा राहिला आणि हळी देऊन आधी भावाला बोलावलं. तिचा मालक येऊन उभा राहिला आणि मग दिरानं विचारलं, ‘‘खुळ्या, काय कराय् लागलाईस?’’

‘‘भांगलत बसलोय्!’’
‘‘ते झालं बाबा. ही हिकडं पेकाळून पडलीया आणि तू तिकडं जुंधळा भांगलत बसलाईस व्हय?’’ एवढं ऐकल्यावर मग त्यानं विचारलं,
‘‘काय झालंय्?’’
‘‘काय इचारतोस? निराळं दुकणं दिसतंय्! आताच्या आता कायतरी इलाज कराय पायजे.’’
‘‘काय इलाज करायचा?’’ असं म्हणून तो खाली बसला. ना बोलणं ना चालणं, गप्पच बसून राहिला. थोरल्या भावानं विचारलं,
‘‘असं बसून कसं व्हायचं रं?’’
‘‘तर मग काय करू?’’
‘‘बाबा, ताबडतोब हिला कोल्हापूरला घेऊन जावं लागलं.’’
थोरला भाऊ एवढं बोलला, तरी तो गप्प राहिला. त्याचा स्वभाव भावाला माहीत होता. घरदार, रानमाळ सोडून कुठं कोल्हापूरला जायाचं, म्हणून हा बाबा गप घरात राहील आणि बायकोचा जीव घालवून मोकळा होईल, हे त्यानं ओळखलं आणि आपणच तयारीला लागला. भराभरा चार माणसं गोळा केली. सगळ्यांनी मिळून कोल्हापूरला जायचं ठरवलं. पण जायाचं कसं? कोल्हापूर तर काय जवळ होतं? अठरा-वीस मैलांची सडक! बैलगाडीनं जावं, तर उशीर लागणार. रत्ना आताच पेकाळून गेली होती. तिच्या अंगात काही त्राण राहिलं नव्हतं. काय जोडणी करावी, याचा खल चालला होता आणि रत्नाकडं बघून तिचा मालक म्हणाला, ‘‘का येवढी घाई कराया लागलाय? बघू दोनचार रोज!’’ ‘‘आणि मग काय करतोस?’’ ‘‘काय काय होतंय बघू. न्हाईतर तिच्या म्हाताNयाला सांगावा धाडतो. म्हेवणा आला म्हंजे काय करायचं ते ठरवू.’’

‘‘मग काय ठरीवतोस माती!’’ असं म्हणून भावानं खॅस मारली आणि बाळा खाली मान घालून गप उभा राहिला. त्याचा भाऊच म्हणाला, ‘‘असं गप बसून भागायचं न्हाई.’’ ‘‘तर काय करू?’’ ‘‘हुपरीला जाऊन, टॅक्सी मिळती का बघून; ती घेऊन याला पायजे.’’ ‘‘-आणि त्याला पैसा नगो!’’ ‘‘मी माझ्या पदरचा देतो बाबा! मग काय तुला घोर हाय?’’ बाळा तोंडाकडं बघत म्हणाला, ‘‘आज तू देशील, पर उद्या तर मलाच भरावं लागतील न्हवं?’’ ‘‘सावकाश दे.’’

‘‘पर कवातरी द्यावं लागणारच का न्हाई?’’ ‘‘मग काय जीव घालवून बसतोस? खुळ्या तिला कालरा झालाय!’’ त्याच्या नादाला लागण्यात काय अर्थ नाही, हे ओळखून रत्नाचा दीर तयारीला लागला. दोन-अडीच मैलांवर हुपरी होती. भरकन् एक गडी सायकल घेऊन हुपरीला गेला. घटकाभरात टॅक्सी आली. स्वत: दीर पुढं बसला. भाऊ भाऊ वेगळे झाले होते. दोन वर्षं त्यांचं बोलणं-भाषण बंद झाल्यापैकीच होतं. कारणापुरतं बोलत होते. पण घटकेला दीरच वाली झाला होता. नवरा नुसता सोबतीचा धनी होता. कोल्हापूरला जाईतोवर शुद्ध उडाली होती. माणसं ओळखत नव्हती. काय काय करीत होते, काही कळत नव्हतं. रात्रीतनं सारखी इंजेक्शन चालू होती. दीर उशाला बसून होता आणि आता किती खर्च येईल, याचा बाळाला घोर पडला होता. एकाला दोन दिवस गेले. जीव दगावत नाही, अशी खात्री झाली. रत्नाला तोंड आलं, जरा जरा ती बोलू लागली आणि बाळानं आपल्या भावाला काय विचारावं? बाळानं विचारलं, ‘‘दादा, आता सगळ्यांनी हितं कशाला बसायचं?’’ ‘‘आजच्या दिवस बघून मी जाईन उद्या!’’ ‘‘मग आज मी जाऊ?’’ ‘‘तू जातोस?’’ ‘‘तर मी हितं बसून काय करणार?’’

‘‘तर, तिकडं जाऊन काय धन लावणार!’’ बाळा सांगू लागला, ‘‘जुंधळा भांगालयचा पडलाय् , तंबाकूचा खुडा करायचा हाय. पाण्याची पाळीबी उद्या हाय.’’

त्याची ही सगळी लांबड ऐकून त्याचा दादा बोलला, ‘‘तुझी रानातली कामं खोळंबल्यात म्हणून तू जातोस व्हय?’’ ‘‘मग काय रान सोडून हितं बसू?’’

‘‘तर काय मी मक्ता घेतलाय हितं बसायचा?’’ असं विचारून तो म्हणाला, ‘‘मलाबी रानमाळ हाय. घरदार हाय. माझीबी कामं रग्गड खोळंबल्यात. मी जातो, तू बस हितं.’’

बाळानं विचारलं, ‘‘मला शार गावात काय कळतंय?’’ ‘‘म्हणून मी ऱ्हायलोय. एकाला दोघं असलेलं बरं. काय तिकडं घातमिराय लागलीया?’’ ‘‘ते काय न्हाई खरं.’’ ‘‘मग?’’ कपाळाला आठ्या घालून बाळा बोलला, ‘‘पर रोजी दोन रुपयं नुसतं जेवणावारी चालल्यात की!’’

‘‘पाळी आलीया तर नको खर्च करायला?’’ ‘‘पर एकाला दोघांचा खर्च होतोय की.’’ हे ऐकून त्याचा दादा चरकला. उगाच भुरदंड वाटायला नको, म्हणून तोच निघून गेला काही लागलं सवरलं तर या खुळ्याला आणून देता यायचं नाही, त्यांच्या उपयोगी पडावं, म्हणून एकाला दोन दिवस तो राहिला होता. आपलं काम सोडून बसला होता. पण खर्च वाढतोय असं म्हटल्यावर कशाला राहायचं असा विचार करून तो आपला घरी निघून गेला. तो सकाळी गेला आणि पाठोपाठ बाळा रात्री घरात हजर झाला. बाळाला बघून छातीत धडकी भरली. अजून चार-सहा दिवस तरी दवाखान्यात राहावं लागणार असं डॉक्टरनं सांगितलं होतं. आजच सकाळी सांगितलं होतं आणि तो सकाळी आला नाही, तंवर रात्री बाळा येऊन हजर झाला. काय झालंय काही समजेना झालं. त्यानं विचारलं, ‘‘लगेच कसा आलास बाळा?’’ ‘‘दुपारी रागरंग बघितला आणि आलो निघून!’’ ‘‘काय जास्त झालंय आज?’’ ‘‘जास्त कशाला हुतंय?’’ ‘‘तर मग का आलास रं?’’ ‘‘आता सगळं बरं हाय, तर मग कशाला बसू तिथं?’’ 

त्याचा भाऊ कपाळाला हात लावून म्हणाला, ‘‘सगळं बरं हाय म्हणून निघून आलास? काय नडलं होतं हितं? तिथं जवळ माणूस नको?’’ ‘‘कशाला लागतोय माणूस?’’ काय बोलायचं? भाऊ कपाळ धरून तोंडाकडं बघत राहिला आणि बाळाच सांगू लागला, ‘‘आज जरा मुसंबं आणा म्हणत होती. मंडईत गेलो तर, दोन, अडीच-तीन रुपये डझन मुसंबं, काय इकत घ्यायची तर मजा हाय?’’ ‘‘मग मुसंबं घेतलास का न्हाईस?’’ ‘‘छाती व्हायला नको?’’ ‘‘घेतला न्हाईस?’’ ‘‘कशाला घेऊ गा?’’ असं विचारून तो म्हणाला, ‘‘काय चार रोज उपास घडला म्हंजे मरत न्हाई माणूस. कसंतरी चार रोज ‘च्या’ पिऊन काढ म्हटलं, हिकडं गावाकडं आल्यावर दोन-दोन माप दूध पिऊ दे की, दुधानं अंगात ताकद तर ईल? ती मुसंबं खाऊन काय रगात वाढणार हाय?’’ रत्ना दवाखान्यात राहिली आणि बाळा जोंधळा भांगलत, तंबाकूचा खुडा करीत, उसाला पाणी पाजत बसला. तिकडची काळजी न करता आपलं रान सांभाळत राहिला. त्याचा भाऊच मध्ये जाऊन बघून आला. त्यानंच एकदा दोन डझन मोसंबी घेऊन दिली. पाच रुपयं जवळ ठेवून आला. काय लागलं, तर कुणाकडनं तरी आणवून घे, असं सांगून तो निघून आला आणि मग पाचव्या दिवशी बाळा गाडी घेऊन कोल्हापूरला गेला. डॉक्टरनी जायला परवानगी दिली आणि उनाचंच गाडीत बसवून बाळा निघाला. 

गाडीला सवारी नाही, सावलीसाठी जवळ छत्री नाही, ऊन वरनं चणचणत होतं. कॉलऱ्यातनं उठलेली बाई डोक्यावर ऊन घेत आली. सात-आठ दिवस उपास घडला होता. दिरानं दोन डझन मोसंबी आणून दिली आहेती. तेवढीच तिच्या पोटात गेली होती. तेवढ्यानं काय होणार? अंगात ताकद नव्हती, ऊनाकडं बघवत नव्हतं, डोळे उघडून बघितलं तर सगळं काळं, निळं पिवळं दिसत होतं. घरात आल्याबरोबर घेरी आल्यागत झाली. उशाला एक हात घेऊन ती पडली आणि दातखीळच बसली. घरात आल्यावरही तीन-चार दिवस अंथरूण घालूनच राहिली. मग उठून हळूहळू चूल तेवढी पेटवू लागली. तेवढं एक-दोन दिवस तिच्या मालकाने बघितलं आणि एक दिवस सकाळी उठल्या उठल्या तो म्हणाला, ‘‘बाई, दोन आठवड्याचं शान पडलंय.’’ हे का सांगत असेल म्हणून रत्ना त्याच्या तोंडाकडं बघत राहिली आणि बाळानं विचारलं, ‘‘चगाळा आणून ठेवतो, पाणी आणून देतो, बसूऽन तेवढं शान तर जरा लावायचं हुतंय का बघतीस का?’’

‘‘बघतो की!’’ असं रागाच्या सपाट्यातच ती म्हणाली. काय बोलावं कळेना झालं. अंगात ताकद नाही. डोळ्यांनी बघतोय आणि तरी असं विचारतोय म्हटल्यावर काय बोलायचं? नुकते दोन दिवस झाले, ती जरा जरा उठून चुलीपुढं बसू लागली होती. किती हालवनवास झाले! काय काय तऱ्हा झाली. उगच तो दीर पुढं झाला म्हणून जीव तरी वाचला ... आणि हा बाबा शान लावतीस का म्हणून विचारतोय. काय सांगावं त्याला? ती नुसती बघत राहिली आणि घाई करीत तो म्हणाला- ‘‘मग ऊठ की!’’ तिलाही आता आपला जीवच नकोसा झाला होता. मनात आलं- काय करायचं जगून तरी! उभं आयुय असं काढायचं त्यापेक्षा मरून गेलेलं काय वाईट! कायमची सुटका तरी होईल! कुठं आपली पोरंबाळं तरी रडाय लागल्यात! तीच आपल्या जीवावर उदार झाली आणि म्हणाली, ‘‘हाताला धरून घेऊन चला. बघू लावायचं होतंय काय?’’‘‘चल की, हाताला धरून घेऊन जातो, घेऊन येतो. मग काय हाय?’’ ‘‘मग काय न्हाई.’’ असं म्हणून ती उठली. त्याच्या हाताला धरून घरापाठीमागे गेली. चालताना पाय थरथरत होते. शरीराचा तोल जात होता. तशीच गेली. गाडीभर शेण पडलं होतं. चांगलं आळं करून करून पाणी घालून ठेवलं होतं. शेजारीच चगाळा गोळा करून ठेवलेला दिसत होता. पाण्याच्या बादल्याही भरून ठेवल्या होत्या. सगळी तयारी करूनच तो विचारायला आत आला होता! हे सगळं बघून ती खाली बसली आणि वर बघत म्हणाली, ‘‘आता तुम्ही हितं थांबू नका.’’

‘‘तर काय करू?’’ ‘‘मी एवढं शान लावतो. तंवर तुम्ही लाकडं गोळा करून ठेवा.’’ ‘‘लाकडं कशाला?’’ कपाळावरचा घाम पुसत ती म्हणाली, ‘‘मेल्यावर मला जाळाय नको काय?’’ बाळा आवाज चढवून म्हणाला- ‘‘काय सोंग तर लावलंय! गप पुâडं बघून शान लावाय लाग. एवढा कालरा झाला तर तुला काय झालं न्हाई! आणि आता काय हुतंय बाई? बसून जरा शान लावलंस तर लगेच मरतीस व्हय?’’ असं विचारून तो म्हणाला, ‘‘काय घाबरू नकोस बघ. पानी बी काय लांब न्हाई. हितंच हायं. जीव चालला तर सांग तोंडात पानी घालीन म्हणं!’’