Friday, 29 May 2015

राधेय - रणजित देसाई

कुरुक्षेत्राची विस्तीर्ण, विशाल रणभूमी उदास, उजाड वाटत होती. आकाशी सूर्य तळपत असूनही, त्या भूमीचे तेज ओसरले होते. ज्या भूमीवर एवढा घनघोर रणसंग्राम झाला, त्या भूमीवर वीरांच्या चिता रचल्या जात होत्या. विजयाच्या आकांक्षेने, जन्ममृत्यूचे भय न बाळगता, शत्रुरुधिराच्या तहानेने रणभूमीवर सदैव वावरणारे जीव विजय संपादन करूनही, त्याच रणभूमीवर नतमस्तक होऊन धारातीर्थी पडलेल्या आपल्या वीरांचा शोध घेत होते. जयपराजयांचा अर्थ केव्हाच संपला होता. ज्यांच्या चाकांच्या भेदक वेगाने रणभूमीला लक्षावधी चाकोऱ्या पडल्या, त्या भग्न रथांच्या राशी त्या रणांगणावर एकत्रित केल्या जात होत्या. आपल्या गंभीर मंत्राने अचेतनामध्येही जीव ओतणाऱ्या रणनौबतींना तडे गेले होते. आपल्या दीर्घ नादाने विजयाचा विश्वास देणारे शंख, बाणांच्या सड्यांनी आच्छादलेल्या भूमीवर विखुरले होते. आता रणवाद्यांच्या राशीत तेही विसावले गेले.
रणांगणावर छाया फिरत होती अतृप्त गिधाडांची. रणांगणाच्या चिंतेने सदैव अस्वस्थ असणारे पाच पांडव, धौम्य, संजय, विदुर, युयुत्सु यांच्यासह सेवकांच्या मदतीने वीरांचे दहनकर्म पार पाडीत होते. एक एक चिता
अग्निशिखांमध्ये धडाडू लागली. धरतीवर पुण्य अवतरावे, म्हणून एके काळी जी भूमी सुवर्णनांगराने नांगरली गेली होती, त्या कुरुक्षेत्रावर उठलेले धुराचे शेकडो काळेकभिन्न लोट आकाशाला भिडले होते. वीरांच्या दहनाची व्यवस्था लावून, सारे खिन्न मनाने गंगेकडे चालू लागले. मध्याह्नीचा सूर्य पश्चिम क्षितिजाकडे ढळला होता. गंगेचा विशाल, निळाशार प्रवाह त्या सूर्यकिरणांत तळपत होता. तापल्या वाळूवरून गंगेकडे जाणाऱ्यांना, गंगेच्या दर्शनाने ना प्रसन्नता लाभली होती, ना पायांखालच्या दाहाची जाणीव होत होती. विजयी पांडव आणि पराजित कौरव दोघांच्याही जय-पराजयांच्या ऊर्मी दहनभूमीच्या अंगारात जळून गेल्या होत्या. गेल्या जीवांच्या वियोगाने व मागे राहिलेल्यांच्या खंतीने साऱ्यांची मने पोखरून गेली होती. गंगेच्या वाळवंटावर तात्पुरते शिबिर उभारले होते. नतमस्तक झालेले, खिन्न वदनाने आणि मंद पावलांनी गंगेकडे जाणारे वीर दिसताच त्यांच्या वाटेकडे लक्ष देऊन बसलेल्या शिबिरातील राजस्त्रिया आपल्या परिवारासह उठल्या आणि नदीकडे चालू लागल्या.

युधिष्ठिर गंगेच्या प्रवाहामध्ये जाऊन गुडघाभर पाण्यात उभा होता. नदीकाठच्या एका कातळावर राजमाता कुंती बसली होती. तिच्या शेजारी द्रौपदी अधोवदन उभी होती. त्या दोघींच्या मागे तटस्थपणे कृष्ण उभा होता... भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आपल्या स्वकीयांच्या समूहात वाळूकिनाऱ्यावर व्यथित मनाने बसले होते. पराक्रमाचा अहंकार नव्हता, प्रतिज्ञांची जाणीव नव्हती, विजयाचा आनंद नव्हता. बाहुबलाचे तेज केव्हाच सरले होते. आठवण होती फक्त विजयासाठी रणांगणी बळी गेलेल्या वीरांची!

नदीपात्रात उभा असलेला युधिष्ठिर एकेका वीराचे नाव घेऊन तिलांजली देत होता. त्या उच्चारल्या जाणाऱ्या नावाबरोबर आठवणींचे उमाळे येत होते. दाटलेले अश्रू गालांवरून निखळत होते.

साऱ्या वीरांना तिलांजली दिली गेली. युधिष्ठिराने मागे न पाहता विचारले, ‘विस्मरणानं कोणी वीर राहिलाय् का?’ सारे एकमेकांकडे पाहत होते. मनात नावे आठवत होते, कोणी राहिल्याचे स्मरत नव्हते.

राजमाता कुंतीच्या मनात त्या शब्दांनी एकच भावनांचा कल्लोळ उसळला. बसल्या जागी तिचे सारे शरीर कापू लागले, ओठ कोरडे पडले. तिचे शुष्क नेत्र अज्ञात जिव्हाळ्याने भरून आले. कुंतीने आशेने कृष्णाकडे पाहिले.
कृष्ण तसाच एकाग्रपणे गंगेच्या प्रवाहाकडे पाहत होता. त्याच्या नेत्रकडांवर अश्रू गोळा झाले होते.

युधिष्ठिर वळणार, हे पाहताच सारे बळ एकवटून वुंâतीने हाक मारली, 
‘कृष्णा ऽ!’
कृष्णाने कुंतीकडे पाहिले.
‘कृष्णा, तू तरी ऽ ऽ’
कुंतीला पुढे बोलवले नाही. सारे कृष्णाकडे पाहत होते. कृष्णाने उभ्या जागी एक दीर्घ श्वास घेतला, आपले उत्तरीय सावरले आणि तो गंगेच्या दिशेने चालू लागला. युधिष्ठिर वळतोय्, हे ध्यानी येताच कृष्णाने दुरूनच हाक दिली,
‘थांब, धर्मा, वळू नकोस.’
गंगेच्या प्रवाहात उभ्या असलेल्या युधिष्ठिराजवळ जात असता आपले वस्त्र सावरण्याचेही भान कृष्णाला राहिले नाही. कृष्ण जवळ जाताच युधिष्ठिराने विचारले, ‘कृष्णा, साऱ्यांना तिलांजली दिल्या गेल्या...?’
नकारार्थी मान हलवीत कृष्ण म्हणाला, ‘नाही! धर्मा, अद्याप एक तिलांजली द्यायला हवी.’ ‘अशक्य! कृष्णा, पराजयात साऱ्यांचंच विस्मरण होतं; पण विजय आपल्या वीरांना कधीही विसरत नाही. या मिळवलेल्या विजयाची निरर्थकता या तिलांजली-प्रसंगानं मला पुरेपूर समजलीय्. ते दु:ख आणखी वाढवू नकोस. असा वीर कोण आहे, की ज्याचं मला विस्मरण व्हावं!’

कृष्णाने उभ्या जागी आवंढा गिळला. आपल्या भावना शक्य तो आवरण्याचा प्रयत्न तो करीत तो म्हणाला, ‘धर्मा, ज्याच्या तिलांजलीला अग्रहक्क द्यावा, असा तो वीर; तुमच्या विजयासाठी ज्यानं स्वेच्छेनं मृत्यूचं आव्हान पत्करलं, तो वीर; तुम्ही ज्याला शत्रू मानत होता, पण तुमचा ऋणानुबंध ज्याला सदैव ज्ञात होता, असा तो एकच वीर आहे...’ 

कृष्णाच्या बोलण्याने धर्म भयव्याकूळ झाला. तो कष्टाने उद्गारला, ‘पितामह भीष्माचार्य! अशक्य, ते तर उत्तरायणाची वाट पाहत आहेत. त्याखेरीज ते देह ठेवणार नाहीत. उत्तरायणास अद्यापि अवधी आहे. असा अपमृत्यू..’ ‘नाही, युधिष्ठिरा, मी पितामहांबद्दल बोलत नाही. मी बोलतोय् महारथी कर्णाबद्दल...’ ‘कर्ण! राधेय..?’ युधिष्ठिराचा सारा संताप त्या एका नावाबरोबर उफाळला. तो निश्चयपूर्वक म्हणाला, ‘नाही, कृष्णा, माझ्या शांत स्वभावालासुद्धा मर्यादा आहेत. माझ्या नीतीचे बंध निश्चित आहेत. ज्याला मी शत्रू मानलं, त्याला मी तिलांजली देत नसतो.’

‘तो तुझा आप्तस्वकीय असला, तर...?’
‘कृष्णा, एक वेळ मी कौरव-वीरांसाठी तिलांजली देईन. पण कर्ण! त्या राधेया...’ ‘शांतपणे ऐक!’ कृष्णाचा आवाज शुष्क बनला होता, ‘महारथी कर्ण तुझा ज्येष्ठ भ्राता आहे.’
‘कृष्णा...!’
‘तो राधेय नाही. कौंतेय आहे.’
‘खोटं ऽ खोटं ऽ ऽ!’ म्हणत युधिष्ठिराने कानांवर हात ठेवले. कृष्णाचे नेत्र अश्रूंनी भह्वन आले. धर्माने मोठ्या आशेने कुंतीकडे पाहिले. तिची मान गुडघ्यांत गेली होती. बसलेले चारी पांडव आश्चर्यचकित होऊन उभे राहिले होते, कृष्णाचे शब्द कानांवर पडत होते.
‘युधिष्ठिरा, मन स्थिर कर! शांत हो! नियतीपुढं कुणाचंही काही चालत नाही. महारथी कर्ण साक्षात सूर्याचा पुत्र होता. माता कुंतीला कुमारी अवस्थेत मिळालेलं ते वरदान आहे. कर्ण ज्येष्ठ अन् श्रेष्ठ कौंतेय आहे. त्याला तिलांजली देणं तुझं कर्तव्य आहे. मी सांगतो, ते सत्य आहे. धर्मनिष्ठ युधिष्ठिरा, कौंतेय म्हणून आदरानं,
ज्येष्ठ म्हणून नम्रतेनं, दाता म्हणून कृतज्ञतेनं कर्णाला तिलांजली दे.’ साक्षात संयम असा लौकिक असणाऱ्या युधिष्ठिराचे बळ त्या शब्दांनी खचत होते. त्याने कष्टाने गंगेची ओंजळ उचलली. ‘अज्ञानाच्या आवरणात आणि विजयाच्या उन्मादात सदैव तुझ्या मृत्यूची इच्छा करणारा मी युधिष्ठिर, हे महारथी कर्णा, ज्येष्ठ अन् श्रेष्ठ कौंतेया... आज तुला...’ पुढचे शब्द उच्चारण्याचे बळ युधिष्ठिराला राहिले नाही. थरथरणाऱ्या ओंजळीतील
जल सुटले. गंगेच्या विशाल प्रवाहात एक नाजूक खळगा क्षणभर दिसला आणि युधिष्ठिर पाण्यात ढासळला. त्या धक्क्यातून सावरलेल्या पांडवांच्या मनांत एकच शोक उसळला. अर्जुनाच्या मनाचे बांध फुटले. तप्त वाळूवर अंग झोकून देऊन, आपल्या हाताने वाळूचे तोबरे घेत तो मूक रुदन करीत होता. सारे मन गुदमरून गेले होते. नौबत झडावी, तसा अखंड नाद मनात उठत होता.

‘कर्ण...राधेय नव्हे, कौंतेय!! वैरी नव्हे, बंधू!
‘शस्त्रस्पर्धेच्या वेळी याच कर्णाचा राधेय, सूतपुत्र म्हणून मी अपमान केला होता. सरोवरात पडलेल्या प्रतििंबबाला पाहून चंद्राला गारगोटी समजलो होतो. ‘हाच तो कर्ण! द्रौपदीस्वयंवराच्या वेळी मत्स्यभेद करूनही अपमानित बनलेला. शौर्यामुळं नव्हे... कीर्तीमुळं नव्हे... खोट्या कुलाभिमानामुळं. निमूटपणं! ‘हाच ना तो वीर, ज्याला द्रौपदीवस्त्रहरणाची सारी दूषणं दिली! ती दूषणं तरी खरी होती का? ‘हे महाबाहो, अभिमन्यूच्या वधात तुझा हात नव्हता, हे फार उशिरा कळलं. पण त्याआधी तुझ्या पुत्राचा वध मात्र मी सूडभावनेनं केला होता. ते पाहत असूनही तुझ्या मुखातून शाप का बाहेर पडला नाही, हे आज समजून तरी काय उपयोग?...’ जवळ येणाऱ्या पावलांच्या आवाजाने अर्जुन भानावर आला. त्याने दचकून वर पाहिले.

कृष्णाची सावली त्याच्यावर पडली होती. मागे सूर्य असल्याने त्या आकृतीचे रूप दिसत नव्हते. ती कृष्णच्छाया पुढे सरकत होती. अर्जुन पुन्हा सावध झाला. र्मूितमंत तिरस्कार त्याच्या चेहऱ्यावर प्रकटला. कृष्ण अधिक जवळ येत आहे, हे ध्यानी येताच पडल्या जागेवरून खुरडत दूर जात तो कष्टाने उठला. मागे सरकत तो ओरडला, ‘थांब, कृष्णा! माझ्याजवळ येऊ नकोस. तुझ्या पापी हातांचा स्पर्श माझ्या शरीराला करू नकोस. अरे, कुणी सांगितलं होतं आम्हांला असलं कलंकित राज्य हवं, म्हणून! जन्माला येताच दैवी वनवास घेऊन आलेले आम्ही, असला शापित विजय मिळण्याऐवजी आयुष्यभर आनंदानं वनवास पत्करला असता. साक्षात अग्नीकडून जे गांडीव धनुष्य हस्तगत केलं, ते का मोठ्या भावाच्या वधासाठी? तुला हे नातं माहीत होतं. तुला आमच्या ऋणानुबंधाची जाण होती. तरीही या अक्षम्य पातकाचा धनी बनवलंस! कृष्णा, तुझ्यावर निष्ठा ठेवली, त्याचं हे फळ दिलंस! तूच असा आमच्या अधोगतीला कारणीभूत होशील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. धिक्कार असो...’

अश्रू ढाळणारा, दु:खाने संतप्त बनलेला अर्जुन कृष्णाकडे पाठ फिरवून जात होता. कृष्णाकडे न पाहता शोकव्याकूळ पांडव अर्जुनामागून जात होते. कुणाला अडवण्याचे सामथ्र्य कृष्णाच्या ठायी नव्हते. त्याची दृष्टी कुंती-द्रौपदींकडे वळली. द्रौपदी सुन्न होऊन निश्चल उभी होती. ओठ थरथरत होते. आरक्त नेत्रांत अश्रू गोळा
झाले होते. आपला उजवा तळहात सामोरा धरून ती तो तळहात स्थिर दृष्टीने निरखीत होती. हळूहळू तो तळहात तिच्या कपाळाकडे जाऊ लागला. द्रौपदीचा कुंकवाकडे जाणारा तो हात पाहताच कृष्ण पुढे झाला आणि त्याने तो हात पकडला. मनगटावर पकडलेल्या मिठीच्या स्पर्शाने द्रौपदी सावरली गेली. तिचे अश्रुपूर्ण व्याकूळ डोळे कृष्णाच्या डोळ्यांना भिडले. ‘कृष्णा, हवं, ते हरवणं आपल्या दैवी सदैव लिहिलं आहे का, रे?’ राजमाता कुंती कष्टाने उठत होती. दौपदीने आपला हात सोडवून घेतला आणि कुंतीला आधार देण्यासाठी ती धावली.
द्रौपदीच्या आधाराने उभी राहत असलेल्या कुंतीने कृष्णाकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत सारे भाव तरळून गेल्याचा भास कृष्णाला झाला.

कुंतीसह द्रौपदी निघून गेली. त्या शांत गंगातटाकी आता कोणी उरले नव्हते. एकटा कृष्ण त्या कातळावर उभा होता. अस्ताचलाला जाणाऱ्या तिरप्या सूर्यकिरणांत गंगेचा प्रवाह पाहत तो उभा होता, एकटा...