Monday, 31 August 2015

मृत्युंजय-शिवाजी सावंत

कर्ण 

भल्या पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटानं मी जागा झालो. गवाक्ष उघडून बाहेर पाहिलं. आकाशाच्या कडा नुकत्याच उजळत होत्या. गंगेच्या चंदेरी वळणानं धुक्याचं अंशुक पांघरलं होतं. सगळं हस्तिनापूर हळूहळू जागं होत होतं. दुसरं एक कोरडं उत्तरीय घेतलं आणि दालनाबाहेर पडलो. गंगेच्या पाण्यात कोणी नसताना शांतपणे मनसोक्त स्नान करून यावं, असं योजून मी तिच्या घाटाकडे चालू लागलो. आजूबाजूचं सगळं जग धुक्याची दुलई अजूनही सोडायला तयार नव्हतं. सगळे मार्ग नि प्रासाद अंधूक नि अस्पष्ट धुक्यात फारच मजेदार दिसत होते. गंगेच्या किनाऱ्यावर मंदिरात एक घंटा वाजत होती. तेवढीच त्या नीरव शांततेत स्पष्टपणे ऐवूâ येत होती. त्या आवाजाच्या रोखानं चाललो. मला आईनं केलेली सूचना आठवली, ‘‘गंगेच्या पाण्यात जाऊ नकोस.’’ मी स्वत:शीच हसलो. किती भित्री आहे आई! ती काय मला लहान मूल समजते? मला कसली त्या पाण्याची भीती?विचारांच्या तंद्रीतच घाटावर आलो. बरोबर आणलेलं उत्तरीय एका पायदंडीवर ठेवलं. 

अंगावरच्या अधरीयाचा काचा मारला नि समोर पाहिलं. दहा-बारा हातांवरचं पात्र तेवढं स्पष्ट दिसत होतं. बाकीचं सर्व पात्र पांढरट भुरक्या धुक्यात झाकलं होतं. त्या पात्राला आदरानं नमस्कार केला नि पाण्यात सूरकांडी मारली. पाण्याचा स्पर्श उबदार होता. जवळ-जवळ घटकाभर मी त्या पाण्यात मनसोक्त डुंबत होतो. घटकाभरानं धुवंâ निवळलं. मी पाण्यातून घाटाच्या दिशेनं पाणी कापत आलो. अंगावरचं उत्तरीय बदललं. ओलं वध्Eा पाण्यात बुचकळून ते पिळून पायदंडीवर ठेवलं. समोर पाहिलं. सूर्यदेव दूरवर आकाशात हळूहळू वर येत होते. त्यांची कोवळी किरणं गंगेच्या पाण्याला गुदगुल्या करून जागं करीत होती. ओंजळभर पाणी घेऊन त्याचं अघ्र्य भक्तिभावानं मी सूर्यदेवांना दिलं. किती रमणीय रूप दिसत होतं त्यांचं! मला दिसणारी त्यांच्या रोजच्या तेजाची वलयं. एका दिवसाची दर्शनशोभा दुसऱ्या दिवशी तशीच नसे. तिच्यात दुसऱ्या दिवशी आगळीच खुमारी चढे. ती पाहिली की, मला नेहमीच हुरूप येई. हजारो योजनं दूर असलेल्या त्या तेजात नि आपल्यात काहीच अंतर नाही असं वाटे! शरीर हलकं  झाल्यासारखं वाटे नि माझे हात आपोआपच जोडले जात! डोळे आपोआपच मिटले जात! मी त्या तेजाचं मनोमन चिंतन करू लागे. लाखो योजनं मला केवळ, प्रकाशच प्रकाश दिसू लागे. अत्यंत तेजस्वी असा प्रकाश! तेजस्वी तरीही शीतल आणि हवाहवासा वाटणारा प्रकाश! उगाचच वाटू लागे की, त्या तेजाशी आपलं कसलंतरी नातं आहे! जगातील सगळा अंधकार उजळणारा तो अखंड महादीप आपल्याशी कसल्यातरी धाग्यांनी जोडला गेला आहे! मी स्वत:ला विसरे आणि त्या धाग्याच्या आधारानं दूरदूर उंच-उंच जाऊ लागे. आजचं त्या तेजाचं रूप तर अतिशयच मनोहारी होतं. 

मी शांतपणे हात जोडले नि डोळे मिटले. मी म्हणजे प्रकाशाच्या असीम समुद्रातील केवळ एक लाट झालो! त्या लाटेला कोणतंही स्वत:चं असं अस्तित्व नव्हतं आणि ते असावं असंही तिला वाटत नव्हतं. त्या अमाप सागरातील ती केवळ अनेकांपैकी एक लाट होती. कुणाचातरी स्पर्श माझ्या खांद्याला झाला असावा. प्रथम, प्रथम त्याची स्पष्टपणे जाणीवच झाली नाही, पण कोणीतरी माझा खांदा गदागदा हलवीत होतं. मी हळुवारपणे डोळे उघडले नि वळून पाहिलं. एक अत्यंत शांत चेहऱ्याचा वृद्ध माझ्याकडे पाहत होता! त्याच्या दाढीचे, डोक्याचे नि भुवईचे सर्व केस ढगासारखे पांढरेशुभ्र होते. भव्य कपाळावर भस्माचे लांब पट्टे होते. त्याचा माझ्या खांद्यावरचा हात तसाच होता. तो हात मात्र अतिशय वजनदार नि भारदस्त वाटला मला!

कोण असावा हा वृद्ध? लागलीच मी प्रश्नांचे बाण मनाच्या धनुष्यावर चढवू लागलो! छे, कुठंच पाहिलं नाही कधी यांना.

अतिशय प्रेमळ आवाजात त्यानं मला विचारलं, ‘‘बाळ, तू कोण?’’

मी सूतपुत्र कर्ण!’

’‘सूतपुत्र? कोणत्या सूताचा पुत्र तू?’’

चंपानगरीच्या अधिरथाचा.’’

अधिरथाचा?’’

होय, पण आपण?’’ मी अत्यंत उत्सुकतेनं विचारलं.

मी भीष्म!’’ त्यांच्या दाढीचे केस वायुलहरीवर हिंदोळत होते.

भीष्म! पितामह भीष्म! कौरव-पांडवांचे वंदनीय भीष्म! गंगापुत्र भीष्म! कुरुकुलाच्या मंदिराचे कळस भीष्म! योद्ध्यांच्या राज्यातील ध्वज भीष्म! माझं मन क्षणकाल गोंधळून गेलं. कुरुकुलातील साक्षात पराक्रम माझ्यासमोर गंगाकाठी उभा होता. एका विशाल वटवृक्षासमोर एक लहानसं गवताचं पातं असा मी उभा होतो. काय करावं तेच मला समजेना. लागलीच कसंतरी स्वत:ला सावरून मी वाकून त्यांना वंदन केलं. त्यांनी मला झटकन वर उठविलं.  

अत्यंत मृदू स्वरात ते म्हणाले, ‘‘तुला तुझ्या पूजेतून जागं केलं म्हणून तू नाराज तर झाला नाहीस?’’

नाही.’’ मी म्हणालो.

खरंच बाळ, पण तुला जागं करण्याचा मोह मी आवरू शकलो नाही!’’

मी आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहू लागलो. थोड्या वेळानं ते म्हणाले, ‘‘आज तीन तपं झाली. न चुकता रोज मी या वेळी गंगेच्या घाटावर येतो, पण या हस्तिनापुरातला एकही माणूस कधीच माझ्या अगोदर इथं आलेला मी पाहिला नाही. आज पाहत असलेला तू तो पहिला माणूस आहेस!’’

मी?’’ मला पुढं काय बोलावं ते सुचेना.

होय! आणि म्हणूनच मी बराच वेळ वाट पाहून शेवटी तुला जागं केलं.’’ माझ्या कानातील वुंâडलांकडे पाहत ते म्हणाले, ‘‘ही कुंडलं तुला फारच शोभून दिसतात.’’

हो, जन्मजातच आहेत ती.’’ मी म्हणालो.

त्यांना नेहमीच जपत जा!’’ धीमी पावलं टाकीत ते घाटाच्या पायदंड्या हळूहळू उतरू लागले. भव्य पर्वतासारखा दिसणारा त्यांचा तो उंच देह अस्पष्ट होऊ लागला. गळाभर पाण्यात जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या डोक्यावरचे केस पाण्याच्या लाटांबरोबर हिंदकळू लागले. त्यांचं शुभ्र केसांनी झाकलेलं मस्तक गंगेच्या पाण्यावर शुभ्र कमलासारखं शोभून दिसू लागलं! मी उभा होतो तेथूनच त्यांना वंदन केलं. उत्तरीयाचा ओला पिळा खांद्यावर टावूâन राजवाड्याकडे परतलो. माझ्या हस्तिनापुरातील पहिल्याच पहाटेची सुरुवात पितामह भीष्मांच्या दर्शनानं झाली होती. मला त्या विचित्र योगायोगाचं नवल वाटलं. ज्या पितामह भीष्मांना पाहावं म्हणून काल दिवसभर योजित होतो, ते स्वत:च आज मला भेटले होते. तेही एकटे नि या गंगेच्या घाटावर आणि अशा या रम्य प्रभातकाली! किती गोड आहे त्यांचा आवाज! चेहरा कसा मंदिराच्या गाभाऱ्यासारखा शांत नि पवित्र आहे! माझ्यासारख्या एखाद्या सामान्य सूतपुत्राची एखादी गोष्ट त्यांना आवडते. कौरवांचे ज्येष्ठ महाराज माझ्यासारख्या सूतपुत्राच्या खांद्यावर हात ठेवून त्याची आस्थेनं विचारपूस करतात! खरोखरच वीरपुरुषाच्या ठिकाणी निगर्विता असली की, तो किती थोर वाटू लागतो!

ज्या कुरुकुलात पितामहांसारखे वीर नि निगर्वी पुरुषश्रेष्ठ निर्माण झाले ते कुल धन्यच होय. मीही किती भाग्यवान आहे की, अशा राजवाड्यात राहण्याचं भाग्य मला मिळालं! आता वारंवार या पुरुषश्रेष्ठाचं आपणाला दर्शन घडेल. ते दोन शांत नि बोलके डोळे आपल्यावरही कृपादृष्टी ठेवतील. माझ्या जीवनातील ज्या तीन व्यक्तींवर माझं प्रेम होतं, त्यात आणखी एका व्यक्तीची भर पडली. पितामह भीष्म!

Wednesday, 26 August 2015

सचोटी हृदयातून येते

तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. जून महिन्यातील एक प्रसन्न सकाळ होती. मी नेहमीसारखी कन्नड वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्याच दिवशी एस्. एस्. सी.चा निकाल जाहीर झाला होता. आतल्या पानांवर उत्तीर्ण झालेल्यांची यादी छापली होती,तर वरच्या पानावर गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो झळकत होते. जवळ जवळ आख्खं पानच त्यांनी व्यापलं होतं. गुणवत्ता यादीत आलेल्या  विद्यार्थ्यांबद्दल मला नेहमीच अपार कौतुक वाटत आलेलं आहे. गुणवत्ता यादीत नाव येणं हे केवळ माणसाच्या बुद्धिमत्तेचंच निदर्शक आहे असं नाही, तर विद्यार्थ्यांनं हे यश मिळवण्यामागे त्याची किती अपार मेहनत आहे, किती दृढनिश्चय आणि प्रयत्नशीलता आहे, हेही दिसून येतं. मी स्वत: एका प्राध्यापकांच्या घरात वाढलेली आहे. माझी ही पार्श्वभूमी  आणि माझा स्वत:चा अध्यापन क्षेत्रातला अनुभव, या दोहोंमुळे माझी ही मनोभूमिका झालेली आहे. त्या दिवशी वर्तमानपत्रात आलेल्या त्या सगळ्या फोटोंमधून एका मुलाच्या फोटोनं माझं लक्ष वेधून घेतलं. माझी नजर त्यावरून हटेना. तो तसा अशक्त, नाजूक दिसत होता. पण त्याच्या डोळ्यांत जी काही चमक होती, ती मंत्रमुग्ध करणारी होती. त्या मुलाविषयी आणखी जाणून घ्यायची इच्छा मला झाली. त्याचं नाव होतं हनुमंतप्पा. त्याचा गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक आला होता. त्याच्याविषयी एवढंच काय ते मला कळलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच दिवशी परत एकदा त्याचा फोटो झळकला. या खेपेला त्याची मुलाखतही छापलेली होती. मी उत्सुकतेने ती वाचली. तो एका हमालाचा मुलगा होता. तो एका खेड्यात राहात होता. त्याच्या वडिलांची मिळकत दिवसाला फक्त चाळीस रुपये होती, त्यामुळेच त्याला पुढे शिकणं शक्य नव्हतं, असं त्यानं मुलाखतीत म्हटलं होतं. हनुमंतप्पा पाच मुलांमधला सर्वात मोठा. घरात मिळवते फक्त वडील. ते लोक आदिवासी जमातीचे होते. या इतक्या हुशार मुलाविषयी हे ऐवूâन मला वाईट वाटलं. आपल्यातील बरेच जण आपापल्या मुलांना खाजगी शिकवण्यांना, नाही तर क्लासला पाठवतो. त्यांना संदर्भ ग्रंथ, गाईडस् वगैरे आणून देतो. त्यांना चांगल्यात चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी झटतो. खर्चाचा जरासुद्धा विचार करत नाही. पण रामपुरा गावात राहणाऱ्या  हनुमंतप्पाची गोष्टच वेगळी होती. माणसाला लागणाऱ्या  काही जीवनावश्यक गोष्टी देखील त्याच्या वाट्याला आल्या नव्हत्या आणि तरीही त्यानं एवढं उज्ज्वल यश मिळवलं होतं. हातात वर्तमानपत्र तसंच धरून मी त्याचाच विचार करत बसले होते, तेवढ्यात माझी नजर शेजारच्या अंगणातील आंब्याच्या झाडावर पडली. ते झाड ताजंतवानं दिसत होतं. नुकती उमललेली पालवी... त्यावर चमकणारे दवाचे थेंब... झाडावर लटकणाऱ्या  कैऱ्या . लवकरच त्या पिकणार होत्या. झाडापलीकडे थोड्याशा अंतरावर एका वुंâडीत एक लहानसं रोपटं होतं. माझ्या मनात आलं, गेले कितीतरी दिवस हे एवढंच आहे...जरासुद्धा वाढलेलं नाही.ती सकाळची शांत वेळ होती. हवा गार आणि स्वच्छ होती. माझे विचार जणू मोकाट सुटले होते. एवढ्यात घरात प्रेशर कुकरची शिट्टी मोठ्यांदा वाजली आणि त्या शांततेचा भंग झाला. मी भानावर आले. अर्धा तास लोटला होता.वर्तमानपत्रातील त्या मुलाखतीत हनुमंतप्पाचा पत्ता दिलेला होता. आता मात्र जास्त वेळ न दवडता मी लगोलग एक पोस्टकार्ड घेऊन त्याला एक पत्र लिहून टाकलं. मी दोनच ओळी लिहिल्या होत्या. ‘माझी तुला भेटायची इच्छा आहे. तू बंगलोरला येऊ शकशील का ?’ एवढ्यात माझे वडील सकाळचा फेरफटका मारून घरी परतले. ते अत्यंत व्यवहारी विचारसरणीचे आहेत. त्यांनी माझं ते पत्र वाचलं आणि ते म्हणाले, ‘इतक्या लांब यायचं तर भाडेखर्चाचे पैसे तरी कुठून आणणार तो ? तो इथे यावा असं तुला वाटतंय ना, मग तू भाड्याचे पैसे त्याला पाठवून दे. शिवाय जरा बरे कपडे विकत घेण्यासाठी आणखीही थोडी रक्कम पाठव.’ मग मी पत्रात अशी पुष्टी जोडली : ‘मी तुला, भाडेखर्च तसेच कपडे विकतघ्यायला पैसे पाठवीन.’ त्यानंतर चारच दिवसांनी त्याचं पत्र आलं. दोनच ओळींचं. पहिल्या ओळीत त्यानं माझ्या पत्राबद्दल आभार मानले होते व दुसऱ्या  ओळीत बंगलोरला येऊन मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी तातडीनं त्याला पैसे पाठवले व माझ्या ऑफिसचा तपशीलवार पत्ताही कळवला. अखेर तो आमच्या ऑफिसात येऊन ठेपला. तो एखाद्या बावरलेल्या,वाट चुकलेल्या वासरासारखा दिसत होता. कदाचित ही त्याची बंगलोरला येण्याची पहिलीच खेप असावी. तो अत्यंत नम्र होता. त्याने स्वच्छ शर्ट-पँट घातली होती.केसांचा नीट विंचरून व्यवस्थित भांग पाडलेला होता. डोळ्यांत ती चमक आताही होतीच.मी लगेच मुद्याचंच बोलले. ‘तू मिळवलेल्या शैक्षणिक यशामुळे आम्हांलाफार आनंद झाला आहे. तुला पुढे काही शिकायची इच्छा आहे का ? तुझ्या शिक्षणाचा खर्च आम्ही करायला तयार आहोत. तू तुला पाहिजे तो अभ्यासक्रमनिवड. अगदी कुठलाही.’तो गप्पच राहिला. माझे एक वरिष्ठ सहकारी शेजारी उभे होते. ते हसून मला म्हणाले : ‘बिटस् आणि बाईटच्या (संगणकाच्या) वेगानं नको जाऊ अशी. तू जे काही सुचवते आहेस, ते त्याच्या नीट पचनी पडू दे आणि त्यावर विचार करून आज संध्याकाळपर्यंत त्यानं आपल्याला सांगितलं तरी चालेल.’अखेर हनुमंतप्पा जेव्हा घरी जायला निघाला तेव्हा त्यानं हळू आवाजात पण ठामपणे सांगितलं : ‘मॅडम, बेल्लारीच्या टीचर्स ट्रेिंनग कॉलेजात जाऊन पुढील अभ्यासक्रम करायचा माझा विचार आहे. आमच्या गावाच्या सर्वांत जवळचं कॉलेज तेच आहे.’ मी ते लगेच मान्य केलं पण त्याच्या मनात खरोखर याहून वेगळा दुसरा कुठला अभ्यासक्रम आहे का ते पाहण्यासाठी त्याच्याशी आणखी थोडा वेळ बोलले. त्याने अगदी दुसरा कोणताही अभ्यासक्रम निवडला तरी त्याची फी भरायला आम्ही तयार आहोत, ही गोष्ट त्याला पुरेशी स्पष्ट करून सांगितली. पण त्याचा निर्धार पक्का होता. आपल्याला पुढे काय करायचं आहे, हे त्याचं ठरलेलं होतं.‘मग मी तुला दर महिन्याला किती पैस पाठवूत्या कॉलेजला वसतिगृहाची सुविधा आहे का ?’ मी विचारलं.त्यावर सर्व काही माहिती काढून तपशीलवार कळवतो, असं त्यानं सांगितलं. दोन दिवसांनंतर परत एकदा आपल्या वळणदार हस्ताक्षरात त्यानं कळवलं,त्याला महिन्याला साधारणपणे तीनशे रुपये लागणार होते. तेथे एक खोली भाड्याने घेऊन आपल्या आणखी एका मित्राच्या सोबतीनं राहण्याचा त्याचा बेत होता. एकूण खर्च कमी यावा म्हणून ते दोघे घरीच स्वयंपाक करणार होते. मी लगेच सहा महिन्यांच्या हिशेबाने अठराशे रुपये त्याला पाठवून दिले.माझा ड्राफ्ट पोचताच त्याने ताबडतोब पत्राने त्याची पोच दिली आणि आभारहीमानले. असेच दिवस गेले. एक दिवस अचानक आठवण झाली, हनुमंतप्पाला पुढच्या सहा महिन्यांचे पैसे पाठवायचे होते. मी पुन्हा एकदा त्याला अठराशेरुपयांचा ड्राफ्ट पाठवून दिला. त्याचीही पोच देणारे पत्र उलट टपाली आले. आश्चर्याची गोष्ट अशी की पत्रासोबत त्याने पाकिटातून काही पैसेही पाठवले होते. ‘मॅडम,’ त्याने लिहिले होते,‘तुम्ही पुढच्या सहा महिन्यांचे पैसे मला पाठवून दिले, हा तुमचा चांगुलपणा. पण गेले दोन महिने मी बेल्लारीत नव्हतो. आधी महिनाभर आमच्या कॉलेजला सुट्टी होती आणि नंतरचा महिनाभर संप होता. तेव्हा हे दोनही महिने मी घरीच होतो. या काळात माझा खर्च तीनशे रुपयांहून कितीतरी कमी झाला. त्यामुळे मी माझ्या खर्चातून वाचलेले तीनशे रुपये तुम्हाला परत पाठवत आहे. त्याचा कृपया स्वीकार करावा.’मी थक्क झाले. इतकी गरिबी आणि तरीही एवढा प्रामाणिकपणा ! मी हनुमंतप्पाला खर्चासाठी जे पैसे पाठवत होते त्याचा हिशोब त्याने मला द्यावा, अशी अपेक्षा माझी मुळीच नव्हती, आणि हे त्यालाही माहीत होतं आणि तरीही त्याने उरलेली रक्कम परत पाठवून दिली. विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.एक गोष्ट मात्र मी अनुभवातून शिकले आहे. सचोटी, प्रामाणिकपणा हीकाही कुण्या एका विशिष्ट वर्गाची मत्तेâदारी नव्हे, त्याचा शिक्षणाशी किंवा  श्रीमंतीशीही संबंध नाही. ती कोणत्याही विद्यापीठात शिकवली जात नाही. अनेक माणसांच्या ठायी ती हृदयातूनच फुलून आलेली असते.
या साध्यासुध्या खेडवळ मुलाच्या प्रामाणिकपणावर कशी आणि काय प्रतिक्रिया द्यावी तेच मला समजेना. ईश्वराने या हनुमंतप्पावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर आपलं कृपाछत्र नेहमी ठेवावं अशी मी मनोमन प्रार्थना केली.