Saturday, 29 June 2019
माय नेम इज परवाना
डेबोरा एलिस लिखित आणि अपर्णा वेलणकर अनुवादित

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर त्यांनी मांडलेल्या मुलींच्या आणि स्त्रियांच्या छळाच्या कहाण्या बाहेर येऊ लागल्या.
१९७९ मध्ये सोव्हिएत युनियननं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं. दहा वर्षांच्या युद्धानंतर १९८९ मध्ये रशियन सेनेचा पाडाव झाला तरीही युद्ध संपलं नाही. कारण अफगाणिस्तानातल्याच अनेकानेक टोळ्या देशावर कब्जा मिळवण्यासाठी परस्परांशी लढत होत्या. तालिबान ही त्यांतलीच एक टोळी. कधी काळी अमेरिका आणि पाकिस्तान यांनी पोसलेली. पैसे आणि शस्त्रं पुरवून उभी केलेली. त्यांनी १९९६ मध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा मिळवला. त्यांनी मुलींचा आणि स्त्रियांचा छळ सुरू केला. मुलींच्या शाळेत जाण्यावर बंदी आली. मुलींच्या शाळाच बंद पाडल्या गेल्या. स्त्रियांना नोकरी करण्यास मज्जाव करण्यात आला आणि कपड्यांवर, सार्वजनिक वावरावर जुनाट बंधनं लादली गेली.
तालिबानच्या वळचणीला ‘अल् कायदा’ ही दहशतवादी संघटना जन्मली आणि पोसली गेली.
‘अल् कायदा’नं २००१ मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ला चढवल्याने चवताळलेल्या अमेरिकेनं बदला घेण्यासाठी जगातल्या प्रगत राष्ट्रांची एकजूट करून अफगाणिस्तानात सैन्य घुसवलं. तालिबानच्या मुसक्या आवळल्या गेल्या. २००५ मध्ये अफगाणिस्तानात नवं लोकनियुक्त सरकार स्थापन झालं. नवी राज्यघटना मंजूर करून लागू झाली.
– तरीही युद्ध संपलं नाहीच.
देशात परदेशी सैन्याच्या काही तुकड्या होत्या. त्यांच्याशी वितुष्ट घेऊन तालिबानच्या टोळ्यांनी नव्यानं हल्ले चढवले. तालिबान विरुद्ध अफगाणिस्तानातली लोकनियुक्त राजवट असाही एक संघर्ष पेटला. पूर्वीच्या टोळ्यांचे बलदंड नेते देशभर पसरलेले होते. त्यांनी सत्तेसाठी नव्या टोळ्या बांधून आपापसात दुश्मनी सुरू केली.
युद्धग्रस्त अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी जगभरातून पैशाचा मोठा ओघ या देशात ओतला गेला. पण यातले बरेचसे पैसे एकतर युद्धात संपले; जे उरले ते सगळे सर्व स्तरांवर बोकाळलेल्या भ्रष्टाचारानं गडप केले.
– या पार्श्वभूमीवर आपल्या मोडलेल्या, उद्ध्वस्त देशाला पुन्हा उभं करण्याचे प्रयत्न अफगाणिस्तानमध्ये चालू आहेत. इथली माणसं पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी धडपडू लागली आहेत. वर्षानुवर्षांच्या अखंड पेटलेल्या युद्धानं या देशाचे इतके लचके तोडले आहेत, की साध्यासाध्या गोष्टींसाठीही इथल्या माणसांच्या नशिबी मोठा संघर्ष वाढून ठेवलेला असतो.
शाळेच्या इमारती, पुस्तकं, खडू, पेनं आणि प्रशिक्षित शिक्षक– यांतलं काहीच पुरेसं नाही. अफगाणिस्तानातल्या जवळपास निम्म्या मुलांना शिक्षणाची कसलीही सोय उपलब्ध नाही. निम्म्याहून अधिक देश आजही निर्वासितांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या शिबिरांमध्ये राहतो. या शिबिरांमध्ये ना पुरेसं पाणी आहे, ना दोन वेळच्या भुकेला पुरेसं अन्न. विजेसारख्या सोयी तर दूरच.
या देशातल्या स्त्रिया आणि मुलांचं आयुष्य तर अधिकच वैराण. त्यांना तऱ्हेतऱ्हेच्या हिंसाचाराचा सामना करत रोज आपला जीव वाचवण्याची कसरत करतच जगावं लागतं.
स्त्रियांची परीस्थिती दयनीय असण्याला कारणं अनेक.
एकतर गरिबी. कित्येक वर्षांच्या युद्धग्रस्ततेतून आलेली राजकीय-सामाजिक आqस्थरता... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाई ही दुय्यम दर्जाची, उपभोगासाठी निर्मिलेली वस्तू असते; तिला पुरुषाच्या आज्ञा पाळण्यापलीकडे स्वतःच्या मताचा अधिकार नाही, असं मानणाऱ्या पारंपरिक विचारसरणीचा घट्ट करत नेलेला पगडा.
कायदे आहेत; पण त्यांच्या अंमलबजावणीची शक्यता जवळपास शून्यच.
अशा परीस्थितीत स्त्रियांच्या हक्कांसाठीच्या चळवळी अफगाणिस्तानात सुरू आहेत. मुलींसाठी सुरू केलेल्या शाळा जाळल्या जातात, स्त्रियांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालून मारलं जातं... तरीही हे प्रयत्न थांबलेले नाहीत.
आता अमेरिकेसह अनेक देशांनी अफगाणिस्तानातून आपापलं सैन्य काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
...आणि तरीही युद्ध संपलेलं नाही.
ज्याचा जेता कोण याचा अंदाज बांधणंही मुश्कील अशा युद्धाच्या ज्वाळांमध्ये धुमसणं हेच आजच्या अफगाणिस्तानचं वास्तव आहे.
...पण तरीही, जगणं कुठे थांबतं?
अफगाणिस्तानातल्या सामान्य माणसाला रोजच्या जगण्याची लढाई लढावीच लागते.
वीरा मौसी, परवाना, शौझियासारख्या अनेक व्यक्ती ही लढाई निकरानं आणि हिमतीनं लढत आहेत.
ही माणसं, यांच्यासारखी अनेकानेक अफगाण माणसं, या देशातले पुरुष, स्त्रिया आणि मुलं... या सगळ्यांना या लढाईत मदतीचा, आधाराचा हात हवा आहे.
परवाना या पंधरावर्षीय कोवळ्या वयातील मुलगी या धगधगत्या निखाऱ्याचे चटके सोसूनही शिक्षणाची, फ्रान्सला जाण्याची- स्वातंत्र्यपूर्ण भरारीची स्वप्ने पाहतेय... तिच्या अम्मीला, नूरिया, मरियम, असीफ या भावंडांबरोबर स्त्रियांना शिक्षण देण्यासाठीच्या धडपडीत मदत करत आहे. या लढाईत तिच्या अब्बूंबरोबर तिच्या अम्मीलाही ती गमावून बसते. मागे उरतात मरियम, तिच्या आश्रयाला आलेले बद्रिया, हसन, इव्हा, किना. त्रास देणारे नवरे आणि दुष्ट वडिलांच्या तावडीत सापडलेल्या स्त्रिया, मुलींची सुटका करून त्यांना आसरा मिळवून देणं हे वीरा मौसीचं मुख्य काम आहे. ‘‘यांतले काही पुरुष समाजातले मातब्बर असतात, काहींचा आर्मीशी संबंध असतो. त्यांच्या हाती सापडलो, तर ठारच मारतील आम्हाला ते. हे परदेशी आर्मीवाले पण त्यांचीच बाजू घेतात. स्वतःच्या मनाने काही करणाऱ्या बायकांचा गट कधीच कुणाला आवडत नाही आपल्या देशात. त्यामुळे हे काम फार अवघड आहे; पण केलं पाहिजे ना कुणीतरी. आम्ही करतो-’’ वीरा मौसी सांगते. अशा या वीरा मौसीच्या आधारावर ती त्या स्फोटक परिस्थितीतून कशी बाहेर पडते, याविषयी अंगावर शहारे आणणारी परवानाची गोष्ट.
द फुल कबर्ड ऑफ लाईफ
अॅलेक्झांडर स्मिथ लिखित आणि नीला चांदोरकर अनुवादित.
दक्षिण
आफ्रिकेतील बोट्स्वाना देशातील गॅबोरोन हे शहर. त्या शहरात मॅडम रामोत्स्वे
डिटेक्टिव्ह एजन्सी चालवत असते. वयाने प्रौढ असलेल्या रामोत्स्वेचं एक लग्न
अयशस्वी झालेलं असतं. गॅरेज मालक असलेल्या
मातेकोनी यांच्याबरोबर तिचा वाङ्निश्चय झालेला असतो. मातेकोनी हे एक प्रेमळ पण
भिडस्त सद्गृहस्थ असतात. रामोत्स्वेबरोबर वाङ्निश्चय झालेला असला तरी लग्न मात्र
ते लांबणीवर टाकत असतात. अनाथालयाची चालक-मालक मॅडम पातोक्वानी ही एक कंजूस पण
सुस्वभावी आणि धाडसी स्त्री असते. मातेकोनी यांच्या भिडस्तपणाचा फायदा घेऊन ती
मातेकोनींकडून तिची इतर कोणी करणार नाही, अशी काही कामे करून घेत असते. उदा.
तिच्या अनाथालयातील जुनाट पंपाची वारंवार दुरुस्ती. एकदा ती मोतेकोनींसमोर तिच्या अनाथालयासाठी
निधी जमवण्यासठी विमानातून पॅराशूटच्या साह्याने उडी मारण्याचे आव्हान ठेवते.
भिडस्त स्वभावाचे मातेकोनी तिला ठामपणे विरोध करू शकत नाहीत. मातेकोनींचं
विमानातून उडी मारणं कसं टळतं आणि त्यांचं रामोत्स्वेशी कसं लग्न होतं, याचं चित्रण ‘द फुल कबर्ड ऑफ लाइफ’ या कादंबरीत आहे. या कादंबरीचे मूळ
लेखक आहेत अॅलेक्झांडर स्मिथ आणि अनुवादक आहेत नीला चांदोरकर.
या कादंबरीच्या उपकथानकात वाचकांना परिचय
होतो रामोत्स्वेची सहायक असलेली मॅडम माकुत्सी, रामोत्स्वेनं दत्तक घेतलेली अपंग मुलगी
मोथेलेली आणि मुलगा पुसो, मातेकोनी यांच्या गॅरेजमध्ये काम करणारे दोन तरुण - चार्ली आणि
त्याचा सहकारी, स्त्रियांच्या
केसांच्या आकर्षक पद्धतीनं वेण्या घालून त्यांच्या सौंदर्यात भर घालणारी एक यशस्वी
केशरचनाकार मॅडम होलोंगा, होलोंगा ज्यांच्याशी लग्न करू इच्छित असते तो शिक्षक बोबोलोगो आणि
रेडिओ निवेदक स्पोकेस स्पोकेसी, मांसमच्छीचं दुकान चालवणारा आणि रोव्हर ९०चा मालक लोबात्से, फस्र्टक्लास मोटर्सचा मालक मोलेफी
यांच्याशी. होलोंगाने प्रौढ वयात लग्न करायचा निर्णय
घेतलेला असतो. तिने लग्नाचा प्रस्ताव मांडताच तिला बरेच फोन येतात. त्यातल्या चार
पुरुषांची ती निवड करते; पण त्या चार जणांपैकी कुणा एकाची निवड करण्याआधी तिला त्या चौघांची
चौकशी करायची असते. म्हणून ती डिटेक्टिव्ह रामोत्स्वेकडे येते आणि त्या चौघांविषयी
माहिती सांगते. त्यात एक असतो शिक्षक बोबोलोगो आणि एक असतो चोवीस वर्षांचा रेडिओ
निवेदक स्पोकेस स्पोकेसी, ज्यांची माहिती काढताना रामोत्स्वेला कळतं, की बोबोलोगो बारबालांसाठी ‘आशा सदन’ चालवतो आणि त्याच्या विस्तारासाठी
त्याला पैशांची गरज असते. बोबोलोगो आणि स्पोकेस स्पोकेसी निव्वळ पैशांसाठी
होलोंगाशी लग्न करायला तयार आहेत, असं रामोत्स्वेला वाटतं; पण होलोंगाला तसं वाटत नाही. ती
बोबोलोगोशी लग्न करण्याचा निर्णय घेते आणि त्याच्या समाजकार्यातही सहभागी होते.
मॅडम माकुत्सीचं भावविश्व तिच्या
गावाकडच्या कुटुंबाबरोबरच रामोत्स्वे आणि मातेकोनी यांच्याबरोबर बांधलं गेलं आहे.
या दोघांशी तिचे संबंध सौहार्दाचे आहेत. तिचा एक अपंग भाऊ रिचर्डला मृत्यूने
तिच्यापासून हिरावून घेतलं आहे. रामोत्स्वेला मदत करण्याबरोबरच ती फक्त
पुरुषांसाठी टायपिंग क्लासही चालवते. लघुलिपी ती जाणते आणि बोट्स्वाना सेव्रेâटरिअल कॉलेजमधून ती ९७ टक्क्यांनी
उत्तीर्ण झालेली असते. एका खोलीतून दुसNया प्रशस्त घरात राहायला जायची तिची
तीव्र इच्छा असते आणि ती पूर्ण झाल्यावर तिचा आनंद गगनात मावत नाही.
मातेकोनी मॅडम पातोक्वानींच्या
सांगण्यावह्वन पॅराशूटच्या साह्याने विमानातून उडी मारणार आहेत, हे जेव्हा रामोत्स्वेला समजतं, तेव्हा तिला भीती वाटते. म्हणून ती
चार्लीला सांगते, की पॅराशूटचं धाडस तू केलंस तर पेपरमध्ये तुझं नाव छापलं जाईल, तुला प्रसिद्धी मिळेल, सुंदर मुली आपणहून तुझ्या मागे येतील
वगैरे. रामोत्स्वेचं हे म्हणणं चार्लीला पटतं आणि तो पॅराशूटचं धाडस करायला तयार
होतो. दरम्यान, लोबात्सेच्या
रोव्हर ९० या गाडीचं फस्र्ट क्लास मोटर्सचा मालक मोलेफी याने जाणीवपूर्वक नुकसान
केलं आहे, हे
मातेकोनीला समजतं आणि ते त्याच्या गॅरेजमध्ये जाऊन त्याच्या माणसांकडे त्याची
चौकशी करतात. मोलेफीला हे समजल्यावर तो मातेकोनींशी भांडायला येतो; त्यांच्या भांडणात तो मातेकोनींना
मारहाण करेल या भीतीने रामोत्स्वे मॅडम पातोक्वानींना घेऊन येते. त्या मोलेफीला
असा काही सज्जड दम भरतात, की तो पळच काढतो. त्याचवेळेला रामोत्स्वेला त्या सुचवतात, की मातेकोनींना बेसावधपणे विवाहाच्या
बंधनात अडकवता येईल. रामोत्स्वेची संमती मिळाल्यावर तिला त्याकामी मदत करायचं त्या
आश्वासन देतात. चार्लीचं पॅराशूटचं धाडस यशस्वी होतं का आणि मॅडम पातोक्वानी
रामोत्स्वे-मातेकोनींच्या विवाहासाठी कोणता मुहूर्त शोधतात, यातील रोचकता अनुभवण्यासाठी हे पुस्तक
वाचलंच पाहिजे.
सँँक्ट्स : साक्षात्कार की हाहाकार
सायमन टॉएन लिखित आणि उदय भिडे अनुवादित
एक कडवी धर्म संघटना आहे. टर्कीमधील रुइन या ऐतिहासिक शहराजवळच्या डोंगराळ भागात ती अत्यंत गुप्तपणे राहते आहे. त्या संघटनेच्या लोकांना ‘सँक्टस’ असे संबोधले जाते. सॅम्युएल नावाचा एक सँक्टस या संघटनेचा क्रूर चेहरा पाहिल्यानंतर तिथून निसटतो. या भूतलावरील सर्वांत जुन्या मानवी संस्कृतीच्या अधिष्ठानस्थळाच्या सर्वोच्च स्थानावर (एका पर्वतावर) पोचतो. त्याने आपले हात अशा पद्धतीने ठेवलेले असतात, की दूरवरून तो एखाद्या क्रॉससारखा दिसावा आणि त्याच अवस्थेत तो काही वेळ त्या सर्वोच्च स्थानावर उभा असतो. त्या विशिष्ट स्थानावर क्रॉस दिसणं, हा काहीतरी दैवी संकेत आहे, असं लोकांना वाटायला लागतं आणि त्या स्थानाभोवती पर्यटकांची गर्दी उसळलेली असताना, दूरचित्र वाहिन्यांवरून या क्रॉस दिसत असलेल्या ठिकाणाचं थेट प्रक्षेपण सुरू असताना एकदम तो क्रॉस म्हणजेच सॅम्युएल स्वत:ला झोकवून देतो आणि त्याचा मृत्यू होतो. या घटनेने अर्थातच खूप खळबळ माजते. सॅम्युएलचं मृत शरीर पोलीस ताब्यात घेतात. त्याच्याजवळ एक मोबाइल नंबर पोलिसांना सापडतो आणि त्याच्या जवळ असलेल्या सफरचंदाच्या बियांवर काही इंग्रजी अक्षरं कोरलेली असतात, त्या अक्षरांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न पोलीस करत असतात. या घटनेचा तपास इन्स्पेक्टर दाऊद अर्काडियन करत असतो. सॅम्युएलचं शवविच्छेदन करताना त्याच्या अंगावरच्या खुणा पाहून, त्याचा शारीरिक छळ झाला असल्याचं आणि कोणत्या तरी कडव्या धर्म संघटनेशी त्याचा संबंध असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात येतं. अर्थातच त्याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडे सोपवला जातो. सॅम्युएलकडे सापडलेल्या मोबाइल नंबरवर इन्स्पेक्टर अर्काडियनने संपर्क साधला असता तो नंबर लिव्ह नावाच्या पत्रकार तरुणीचा असल्याचं त्याला समजतं. सॅम्युएल तिचा भाऊ असल्याचं ती त्याला सांगते. सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी लिव्ह न्यू जर्सीहून रुइनला जायला निघते. सॅम्युएलचा मृतदेह पोलिसांच्या हातात पडू नये, असं त्या कडव्या धर्म संघटनेला वाटत असतं; पण त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. सॅम्युएलच्या या आत्महत्येच्या घटनेमुळे पोलीस आपल्यापर्यंत पोचतील, ही भीती त्या संघटनेच्या प्रमुखांच्या (मठाधिपतींच्या) मनात असते. दरम्यान, पोलिसांच्या कॉम्प्युटरवरून शवचिकित्सेचा अहवाल, शवाचे फोटो, डॉक्टर आणि अर्काडियनच्या संभाषणाची नोंद, अर्काडियनने करून ठेवलेली टिपणे – या सगळ्याची मेमरी स्टीकमध्ये एक प्रत तयार करून ती प्रत एक मनुष्य कॅॅथरीन मान या स्त्रीकडे पोचवतो आणि तीच प्रत तो त्या धर्म संघटनेकडेही पोचवतो. कॅॅथरीन एक समाजसेवी संस्था चालवत असते. आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लिव्ह रुइनला येते. ती विमानतळावर उतरते तेव्हा गॅब्रिएल नावाचा माणूस तिला घ्यायला आलेला असतो. ती त्याच्याबरोबर गाडीतून जात असताना तिला अर्काडियनचा फोन येतो. लिव्हला घेण्यासाठी त्याने ज्या माणसाला पाठवलेलं असतं, तो माणूस गॅब्रिएल नाही, हे त्या फोनमुळे तिच्या लक्षात येतं. गॅब्रिएलपासून स्वत:ची सुटका कशी करून घ्यावी, या विचारात ती असतानाच त्यांच्या गाडीवर हल्ला होतो. लिव्ह तिथून कसाबसा पळ काढते आणि अर्काडियनपर्यंत पोचते. सॅम्युएलच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी अर्काडियन तिला शवागारात घेऊन येत असतो, तेवढ्यात सॅम्युएलचा मृतदेह तिथून नाहीसा करण्यात येतो. सीसीटीव्ही फुटेजमधे सुरुवातीला गॅब्रिएल सॅम्युएलचं शव चोरून नेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. नंतर दुसरीच कुणीतरी माणसं येऊन ते शव चोरताना दिसतात. अर्काडियन शहरातील पोलीस यंत्रणेला ते शव घेऊन जाणा-या गाडीला अडवण्याच्या सूचना देतो.दरम्यान, अर्काडियन गॅब्रिएलची माहिती काढतो, तेव्हा गॅब्रिएल सैन्यातून निवृत्त झाल्याचं त्याला समजतं; पण सॅम्युएल आणि लिव्हशी त्याचा काय संबंध आहे, हे मात्र त्याला समजत नाही. आता लिव्ह पोलिसांच्या संरक्षणात असते; पण पोलिसांमध्ये असूनही ती सुरक्षित नाही, असे फोन तिला येत असतात. म्हणून ती पोलिसांना गुंगारा देते आणि रुइनमधल्या एका वर्तमानपत्राच्या कचेरीत आश्रयाला जाते. सॅम्युएलच्या मृतदेहाबरोबर जी इंग्रजी अक्षरं सापडलेली असतात, त्याचा अर्थ लावण्याचा ती खूप प्रयत्न करत असते; पण तिला तो लागत नसतो. त्या अक्षरांचा आणि सॅम्युएलच्या आत्महत्येचा काही संबंध असावा, असं तिला वाटत असतं. इकडे मठाधिपतींनी गुलिर्मो रॉड्रिग्ज, जोहान लार्सन आणि कार्नेलियस वेब्स्टर या तिघांना लिव्हच्या मागावर पाठवलेलं असतं. त्यांनीच गॅब्रिएल तिला घेऊन चाललेला असताना तिच्यावर हल्ला केलेला असतो. ती पोलिसांच्या तावडीतून निसटल्यानंतरही ते तिच्या मागावर असतात.परत एकदा गॅब्रिएल लिव्हला तिच्या असुरक्षिततेची जाणीव करून देऊन तिला स्वत:बरोबर येण्यास भाग पाडतो. ती गॅब्रिएलबरोबर ज्या ठिकाणी जाते, तिथे तिला गॅब्रिएलची आई कॅॅथरीन मान आणि त्याचे आजोबा (आईचे वडील) ऑस्कर भेटतात. गॅब्रिएलविषयी लिव्हच्या मनात एक अनामिक ओढ निर्माण होते. त्यांच्यापाठोपाठ इन्स्पेक्टर अर्काडियनही तिथे येऊन पोचतो. सॅम्युएलचा मृतदेह चोरण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याला गॅब्रिएलला अटक करायची असते; पण गॅब्रिएल त्याला समजावू पाहतो, की त्याच्या अटकेपेक्षा लिव्हचं संरक्षण करणं आणि सॅम्युएल मरताना जो काही संदेश देऊ पाहत असतो, त्याचा माग काढणं महत्त्वाचं आहे.त्यांचं हे संभाषण चाललेलं असताना मठाधिपतींनी लिव्हच्या मागावर पाठवलेले जोहान लार्सन आणि कार्नेलियस वेब्स्टर तिथे पोचतात (त्यांच्याबरोबर असलेला गुलिर्मो रॉड्रिग्ज आधीच मारला गेलेला असतो.) आणि जोहान तिथे ग्रेनेडचा स्फोट घडवून आणतो; पण तो स्वत: त्यात मारला जातो. त्या गडबडीत कार्नेलियस, लिव्हचं अपहरण करतो. अर्थातच लिव्हला त्या धर्म संघटनेच्या गुप्त जागी नेलं जातं. काय दिसतं लिव्हला तिथे? मठाधिपतींना लिव्हला ठार का मारायचं असतं? तिथे गेल्यावर लिव्हला त्या इंग्रजी अक्षरांचा अर्थ लागतो का? गॅब्रिएल, कॅॅथरीन आणि ऑस्करचा त्या धर्म संघटनेशी आणि सॅम्युएलच्या मृत्यूशी काय संबंध असतो? ते लिव्हला का वाचवू पाहत असतात? त्या धर्म संघटनेत राहणारे फादर थॉमस आणि अथानायसिस त्या संघटनेच्या नकळत, त्या संघटनेच्या ग्रंथालयातील कोणता ग्रंथ शोधत असतात आणि कशासाठी? तो ग्रंथ शोधण्यात ते यशस्वी होतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘सँक्टस’ ही कादंबरी अवश्य वाचायला हवी. ती वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
Subscribe to:
Posts (Atom)