Friday, 5 July 2019


मगरडोह

शिशीकांत काळे लिखित 


कथा हा वाङ्मय प्रकार सर्वसाधारणपणे वाचकाच्या आवडीचा असतो. गूढकथा हाही तसा वाचकप्रिय प्रकार. मगरडोहया कथासंग्रहातून शशिकांत काळे यांनी एकूण अकरा गूढकथा वाचकांच्या भेटीला आणल्या आहेत. रत्नाकर मतकरींची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या गूढकथासंग्रहाला लाभली आहे. घातचक्रही कथा पुनर्जन्मावर आधारित आहे. श्यामकांत हा एका कंपनीचा मालक आपली पत्नी सुमनसह अमावस्येच्या दिवशी रेल्वेतून प्रवास करत असतो. त्यावेळी बोलता बोलता सहज त्याच्या कंपनीत पूर्वी (श्यामकांत व सुमनच्या विवाहापूर्वी) स्टेनो कम सेक्रेटरी असलेल्या ज्यूली परेराचा विषय निघतो आणि श्यामकांत अस्वस्थ होतो.  त्यानंतर श्यामकांत त्या प्रवासात सुमनच्या नकळत मध्येच कुठेतरी उतरतो. सुमन पोलिसांच्या साह्याने त्याच्यापर्यंत पोहोचते. कुठे गेलेला असतो श्यामकांत? तिथे गेल्यावर त्याच्या पूर्वजन्माचं स्मरण त्याला कोण करून देतं? पूर्वजन्मात ज्यूलीशी आणि सुमनशी त्याचा काय संबंध असतो? ‘सन १८६०चा रुपयाया कथेतील प्रल्हाद घाटगे त्याची पत्नी अरुणाबरोबर लोणावळ्याला वर्षासहलीसाठी गेलेला असतो. लोणावळ्यात एका ठिकाणी ते दोघं फिरायला गेलेले असताना अचानक तो एका खड्ड्यात पडतो आणि त्याच्या अंगावर बरीच माती पडते. त्याला जेव्हा जाग येते तेव्हा तो एका तंबूत असतो. काही दिवसांनी त्याच्या असं लक्षात येतं, की त्या अपघातानंतर तो २००७ सालातून १८६० सालामध्ये पोचला आहे. आता त्याच्यासमोर प्रश्न असतो, २००७मध्ये कसं परतायचं?‘चकवाही कथा आहे संजय गिते ऊर्फ ए.उ.ची. ए.उ.नी लहानपणीच आई-वडिलांवर रागावून त्यांच्या नकळत जुनापाडा येथील त्यांचं घर सोडलेलं असतं. त्यानंतर त्यांचा घराशी काहीच संपर्क नसतो. आता डहाणूत बायको आणि बावीस वर्षाचा मुलगा रंजन याच्यासह ते सुखनैव जगत असतात; पण रंजनच्या आग्रहावरून आपलं गाव, आपले कुटुंबीय याविषयी ते रंजनला सांगतात. रंजन त्यांच्या गावी जाऊन येतो आणि आजी, काका-काकु यांचे फोटो काढून आई-वडिलांना दाखवायला आणतो; पण ए.उ.ना त्या फोटोत एका मध्यमवयीन अनोळखी बाईशिवाय कोणीच दिसत नाही. एकदा ते कुणाला न सांगता आपल्या गावी स्वत:च्या घरी जातात. त्या घरात माणसांच्या वावराच्या खुणा असतात; पण एकही माणूस त्यांच्या दृष्टीला पडत नाही. त्यामुळे ते आपल्या मनाची अशी समजूत करून घेतात, की आपल्या मनातील सूड भावनेमुळे आपलं कुटुंब नाहीसं झालं आहे. काय असतो हा प्रकार?
        ‘रेखाचा आरसाया कथेत एक तरुण मुंबईहून कारवारला आयनापूरनावाच्या गावात ऑफिसच्या कामासाठी गेलेला असतो. त्याच्या प्रकाश नावाच्या मित्राच्या घरी त्याची राहायची सोय केलेली असते. प्रकाश स्वत: नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. त्याच्या अनुपस्थितीत त्याची बहीण रेखा आणि त्याची आई या तरुणाचा पाहुणचार करतात. त्या वास्तव्यात त्या तरुणाची आणि रेखाची चांगली मैत्री होते. रेखाने त्याला एक मोठा आरसा भेट म्हणून दिलेला असतो. तो मुंबईला आल्यावर आपल्या बेडरूममध्ये तो आरसा लावतो. त्या आरशातून रेखा रोज रात्री त्याला भेटायला यायला लागते. पुढे काय होतं? ‘रंजनाची प्रतिमाया कथेतील तरुण चंदनपूर या गावी त्याच्या वडिलांनी बांधलेलं घर विकण्याच्या दृष्टीने गेलेला असतो. त्याच्या त्या घरात रंजना सामंत नावाची विधवा तरुणी एकटीच राहत असते. त्या तरुणाच्या वडिलांकडून विकत घेतलेली शेती ती कसत असते. हा तरुण तिच्यासमोर घर विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवतो, तेव्हा ती दोन-तीन वर्षांची मुदत मागून घेते. पहिल्या वेळेस त्याच्याशी मोकळेपणाने वागलेल्या रंजनाबाबत नंतरच्या दोन-तीन वर्षांत त्याच्या मनात एका बाबतीत शंका उत्पन्न होते. रंजना घर विकत घेते का? त्याचं शंकानिरसन होतं का?
        ‘मगरडोहया कथेत डॉ. कर्वे या मानसोपचारतज्ज्ञांच्या मुंबईतील क्लिनिकच्या रिनोव्हेशनच्या दरम्यान एक धबधब्याचं चित्र त्यांच्या केबिनमध्ये लावलं जातं. ए.उ.(संजय गिते) या त्यांच्या मित्राला त्या चित्रात काहीतरी विचित्र वाटत असतं. पौर्णिमेच्या दिवशी ते चित्र प्रकाशमान होत असतं. ते चित्र लावल्यापासून दोन-तीन वेळा कव्र्यांच्या हाताला जखम झालेली असते आणि ज्या ज्या वेळेला त्यांच्या हाताला जखम झालेली असते, त्यावेळी अमावस्या असते. कव्र्यांना त्याबाबतीत वेगळं काही वाटत नाही; पण ए.उ. आणि लेखक यांना मात्र त्या चित्राबाबत काहीतरी गूढ वाटत असतं. उकलतं का ते गूढ?
        तर ही आहे या कथासंग्रहातील काही कथांची झलक.अगदी साध्या निवेदनातून या कथा पुढे सरकत राहतात. गूढकथांप्रमाणे गूढ किंवा भयप्रद वातावरणनिर्मिती काळे करत नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या भावभावनांना थोड्याशा गूढातून भिडतात;
पण त्यांचं निवेदन वाचकाला खिळवून ठेवतं. तेव्हा रंजक अशा या कथा वाचकांनी आवर्जून वाचाव्या अशा आहेत. रत्नाकर मतकरींची प्रस्तावना नवोदितांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.
अशक्य भौमिती


मिचिओ काकू लिखित आणि लीना दामले 


भौतिकशास्त्राच्या भूत, वर्तमान, भविष्याला अभ्यासपूर्णतेने स्पर्श करणारे पुस्तक 

 आज जे तंत्रज्ञान अशक्य वाटतं आहे, ते कदाचित येत्या काही दशकांत अथवा शतकांमध्ये अगदी नेहमीच्या वापरातलं होऊन जाईल, या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित पुस्तक आहे – ‘Physics Of The Impossible’ मिचिओ काकू यांनी लिहिलेलं हे पुस्तक मराठीत अनुवादित केलं आहे लीना दामले यांनी. या पुस्तकाचं मराठी शीर्षक आहे ‘अशक्य भौतिकी.’ 

या पुस्तकाच्या उपोद्घातात मिचिओ काकू यांनी या पुस्तकाच्या कल्पनेचं बीज त्यांच्या मनात कसं रुजलं, या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना काय आहे, हे सांगताना अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे. त्यांच्या मनात कोणत्या वैज्ञानिक कल्पना रुंजी घालत होत्या, कोणत्या वैज्ञानिक गोष्टींची मोहिनी त्यांना पडली होती, त्यांच्या मनावर कोणत्या टेलिव्हिजन मालिकेचा प्रभाव होता याविषयी त्यांनी  लिहिलं आहे. सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होण्यापर्यंतची त्यांची वाटचालही त्यांनी सांगितली आहे. अशक्यता या मुद्द्यावर त्यांनी सोदाहरण प्रकाश टाकला आहे. 

हे पुस्तक तीन विभागांत विभागलेलं आहे. पहिला भाग आहे, पहिल्या प्रतीची अशक्यता. ज्यात ऊर्जाक्षेत्रे, अदृश्यता, ऊर्जाशास्त्रे आणि तोफग्रह, दूरप्रेषण, परचित्तज्ञान, सायकोकायनेसिस, रोबो, एक्स्ट्रा टेरेस्ट्रिअल्स आणि यूफो, अवकाशयाने, अ‍ॅन्टिमॅटर आणि अ‍ॅन्टियुनिव्हर्स हे मुद्दे त्यांनी स्पष्ट केले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आज अशक्य वाटत असले; तरी ते भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करीत नाही.

दुस-या प्रतीची अशक्यता या दुस-या भागात प्रकाशवेगातीत, कालप्रवास, समांतर विश्वे हे मुद्दे त्यांनी चर्चेला घेतले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे; जे या भौतिक जगाच्या आपल्या समजाच्या अगदी काठावर उभे आहे. तिस-या प्रतीची अशक्यता या तिस-या विभागात शाश्वत गतियंत्र आणि भविष्यकथन हे मुद्दे स्पष्ट केले आहेत. हे तंत्रज्ञान असे आहे, जे आजच्या भौतिकशास्त्राच्या ज्ञात नियमांचे उल्लंघन करणारे आहे.‘उपसंहार’मध्ये काकू  यांनी अशक्यतेमध्ये मोडणा-या आणखी तांत्रज्ञानाकडे लक्ष वेधलं आहे. त्याचबराबेर विविध शास्त्रज्ञांची विविध विषयांवरील मते, काही सिद्धान्त, त्यासंदर्भातील आक्षेप इ. बाबींचं विवेचन केलं आहे.

एकूण , भौतिकशास्त्राला, त्यातील महत्त्वाच्या सिद्धान्तांना अभ्यासपूर्णतेने स्पर्श करणारं हे पुस्तक त्या क्षेत्रातील लोकांनी वाचावं, असं तर आहेच; पण सर्वसामान्यांनीही वाचावं असं आहे. मिचिओ काकुंच्या ज्ञानाचा आवाका थक्क करणारा आहे. विषयाची पाश्र्वभूमी, त्यात गतकाळात झालेलं संशोधन, वर्तमानात त्या  संशोधनात काही बदल झाले आहेत का आणि भविष्यात त्या संशोधनाबाबत काय परिस्थती असेल, अशा पद्धतीने त्यांनी त्या त्या विषयाची मांडणी केली आहे. उपोद्घात आणि उपसंहार ही प्रकरणं उल्लेखनीय म्हणता येतील. भोतिकशास्त्रासारखा विषय त्यांनी सोप्या भाषतले उलगडून दाखवला आहे. या पुस्तकाचं भाषांतर करणं, हे अवघड काम होतं; पण लीना दामले यांनी ते कुशलतेने पार पाडलं आहे. 

तेव्हा अवश्य वाचा – ‘अशक्य भौतिकी.’

बेटर

डॉ. अतुल गवांदे लिखित आणि सुनिती काणे अनुवादित 

वैद्यकीय क्षेत्राचा सखोलतेने, अभ्यासपूर्णतेने आणि सोदाहरण घेतलेला वेध 

डॉ. अतुल गवांदे हे अमेरिकेत शल्यविशारद म्हणून प्रॅक्टिस करतात. वैद्यकीय क्षेत्रात अधिक गुणवत्ता, अचूकता, सुसूत्रता कशी आणता येईल, या विषयी त्यांनी सखोल आणि सोदाहरण चर्चा केली आहे त्यांच्या ‘बेटर’ या पुस्तकातून. या पुस्तकाची त्यांनी तीन विभागांत विभागणी केली आहे. पहिला भाग आहे ‘परिश्रमपूर्वक लक्ष पुरविणे’, दुसरा भाग आहे ‘कार्यप्रणाली वापरणे’ आणि तिसरा भाग आहे ‘कल्पकता.’ या पुस्तकाचा अनुवाद केला आहे सुनीति काणे यांनी.

‘परिश्रमपूर्वक लक्ष पुरविणे’ या विभागात त्यांनी ‘हात धुण्याबाबत’ या प्रकरणात जंतुसंसर्ग टाळण्यासाठी हात धुणं कसं आवश्यक आहे, ते केव्हा आणि कशा पद्धतीने धुतले पाहिजेत याचं विवेचन केलं आहे. त्याचबरोबर विविध रोग पसरविणारे विविध रोगजंतू, जंतुसंसर्ग नियंत्रण विभाग याविषयीही माहिती दिली आहे. बाळंतरोग हा जंतुसंसर्गामुळे होतो, हे शोधून काढून निर्जंतुकतेचा आग्रह धरणा-या डॉक्टरची कथा, जंतुसंसर्गाच्या संबंधातील उदाहरणं इ. बाबींचा समावेशही या प्रकरणात करण्यात आला आहे.

‘स्वच्छ करून टाकणे’ या प्रकरणात त्यांनी पोलिओ निर्मूलनाच्या मोहिमेचं तपशीलवार विवेचन केलं आहे. पोलिओ मोहीम कशी सुरू झाली, इथपासून ते या मोहिमेचं जगभर पसरलेलं जाळं, कर्नाटकमधील त्यांच्या एका डॉक्टर मित्राबरोबर फिरताना पोलिओ निर्मूलन मोहिमेच्या बाबतीत आलेले अनुभव इ. बाबत त्यांनी सविस्तर लिहिलं आहे.

‘युद्धातील दुर्घटना’ या प्रकरणात त्यांनी युद्धात जखमी होणा-या सैनिकांच्या जखमा कशा प्रकारच्या असतात, सैनिकांवर उपचार करण्याच्या पद्धतींमध्ये होत गेलेल्या सुधारणा, सैनिकांना तातडीने उपचार करण्यासाठी केलेली व्यवस्था, त्यात येणा-या अडचणी, त्यावर शोधलेले उपाय इ.बाबत सविस्तर विवेचन केलं आहे. 

‘योग्य कार्यप्रणाली वापरणे’ या विभागातील ‘नग्न रुग्ण’ या प्रकरणात स्त्री-पुरुषांच्या गुप्तांगांची, नाजूक अवयवांची तपासणी वेगवेगळ्या देशांत कशा प्रकारे केली जाते, या तपासणीच्या वेळी स्त्रियांनी कशा प्रकारचे कपडे घालावेत, पुरुष डॉक्टर जेव्हा एखाद्या स्त्रीच्या नाजूक अवयवांची तपासणी करत असेल तेव्हा तिथे शॅपेरॉन (नर्स किंवा दुसरी स्त्री) असावी का, याबाबतची डॉक्टरांची आणि रुग्णांची विविध मतं सांगितली आहेत. काही डॉक्टर्सचे आणि रुग्णांचे या संदर्भातील अनुभव नोंदवले आहेत.

‘तुकड्यातुकड्यातलं काम’ या प्रकरणात डॉक्टरांच्या अर्थकारणाची चर्चा केली आहे. डॉक्टरांनी प्रत्येक सेवेसाठी किती मोबदला घ्यावा, याबाबत सुनिश्चितता नसली तरी सर्वसाधारणपणे त्याचे दर ठरवता येऊ शकतात. कोणताही डॉक्टर एखाद्या विमा कंपनीशी जोडलेला आहे का नाही, यावरही त्याची आमदनी ठरलेली असते. डॉक्टरची व्यावसायिकता आणि त्याचा सेवाभाव यावरही गवांदे यांनी सोदाहरण चर्चा केली आहे. अर्थातच ती अमेरिकेतील वैद्यकीय सेवेच्या संदर्भात आहे. एकूणच हे प्रकरण डॉक्टरांच्या  अर्थकारणावर सविस्तरपणे प्रकाश टाकणारं आहे.

‘फाशीच्या कोठडीतले डॉक्टर्स’ या प्रकरणात वैद्यांना  प्रत्यक्ष मृत्युदंड देताना डॉक्टरांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग असावा की नाही, यावर तपशीलवार चर्चा केली आहे. फाशीच्या कोठडीत डॉक्टरच्या उपस्थितीची गरज का भासली, अमेरिका आणि कॅॅलीफोर्नियातील डॉक्टर संघटनांनी मृत्युदंडाच्या वेळी डॉक्टरचा त्यात सहभाग असण्याला केलेला विरोध,वैद्यांना  मृत्युदंड देण्याचे प्रकार, त्यातील त्रुटी, मृत्युदंडाच्या अंमलबजावणीत डॉक्टरांच्या सहभागाबाबतची आचारसंहिता, ज्या डॉक्टरांनी वैâद्यांच्या मृत्युदंडात सहभाग घेतला त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचे त्या संदर्भातील अनुभव इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सखोल चर्चा केली आहे. 

‘लढा देण्याबाबत’ या प्रकरणात गुंतागुंतीच्या काही केसेसचे अनुभव सांगितले आहेत. डॉक्टरी कौशल्य पणाला लावूनही काही वेळेला गुंतागुंतीच्या केसेसमध्ये कसं अपयश येतं आणि काही वेळेला आश्चर्यकारकरीत्या पेशंट कसा बचावतो, हे या अनुभवांवरून दिसून येतं. शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नांनाही कधी कधी मर्यादा येते, हे या प्रकरणावरून दिसून येतं.

या पुस्तकाच्या ‘कल्पकता’ या तिस-या भागातील ‘गुणसंख्या’ या प्रकरणात बाळंतपणाच्या वेळेस उद्भवणा-या अडचणी, त्याबाबत केल्या जाणा-या उपाययोजना इ.बाबत सविस्तर आणि सोदाहरण चर्चा केली आहे.‘बेल कव्र्ह’ या प्रकरणात सी. एफ. या कफाशी संबंधित आजाराबाबत तपशीलवार आणि सोदाहरण चर्चा केली आहे. 

‘कामगिरी सुधारण्यासाठी’ या प्रकरणात डॉ. गवांदे यांनी नांदेड (कर्नाटक) जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या बाबतीतील अनुभव सांगितले आहेत आणि त्या अनुभवांच्या आधारे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स अनेक अडचणींवर मात करून किती कार्यक्षमतेने सेवा बजावत असतात, याची चर्चा केली आहे. जिल्हा रुग्णालयातील कार्यक्षम डॉक्टर्स बघितल्यानंतर गवांदे यांनी आपलं मत नोंदवताना लिहिलं आहे, ‘असं असूनही मला जे दिसलं, ते होतं : सुधारणा घडवणं  शक्य असतं! त्यासाठी तीव्र बुद्धिमत्ता गरजेची नसते. त्यासाठी नेटानं, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणं गरजेचं असतं. त्यासाठी स्वच्छ नैतिक विचार गरजेचे असतात आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यासाठी प्रयत्न करत राहण्याची तयारी गरजेची असते.’ समारोपात, सरासरीपेक्षा अधिक चांगली कार्यक्षमता प्राप्त करण्याच्या काही युक्त्या त्यांनी सांगितल्या आहेत. 

तर, वैद्यकशास्त्रातील काही महत्त्वाच्या बाबींची सोदाहरण आणि साधक-बाधक चर्चा करणारं हे पुस्तक वैद्यकीय क्षेत्रात येऊ घातलेल्या विद्याथ्र्यांसाठी आणि कार्यरत असणा-यांंसाठीही मार्गदर्शक असलं, तरी ते कुठेही कंंटाळवाणं किंवा रटाळ होत नाही; कारण गवांदे यांची साधी, सोपी भाषा आणि त्यांनी दिलेली उदाहरणं. त्यामुळे सर्वसामान्य वाचकही हे पुस्तक अगदी रुचीने वाचू शकतो. गवांदे यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भात केलेली चर्चा अन्यही क्षेत्रांना लागू होऊ शकते. त्यांची ही चर्चा मानवी मू्ल्यांनाही स्पर्श करते. अगदी प्रस्तावनेपासून समारोपापर्यंत हे पुस्तक वाचकाच्या मनाची पकड घेतं. तेव्हा वैद्यकीय क्षेत्राच्या विविध पैलूंचं दर्शन घडविणारं, त्या क्षेत्राविषयीची माहिती आणि ज्ञान वाचकांपर्यंत सहजतेने पोचवणारं हे पुस्तक अवश्य वाचावं असं आहे. सुनीति काणे यांचा अनुवाद उत्तम.


घणघणतो घंटानाद


अर्नेस्ट हेमिंग्वे लिखित आणि दि. बा. मोकाशी अनुवादित 

युद्धाच्या पाश्र्वभूमीवरील कादंबरी 

  दि. बा. मोकाशी हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं नाव. विशेषत: मराठी कथाविश्वात त्यांचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोकाशींनी दोन पुस्तकांचा अनुवादही केला होता. त्यातील अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’ कादंबरीचं भाषांतर ‘घणघणतो घंटानाद’ या शीर्षकाने त्यांनी केलं आहे. स्पेनमध्ये झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचं वर्णन या कादंबरीत आहे. प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्यांचे विशेषतः रॉबर्ट जॉर्डनचे विचार आणि कार्यानुभवांतूनच ही कथा साकारली आहे. तसेच उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचं वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिलं आणि अनुभवलं तेही यामध्ये आलं आहे.

मूळचा अमेरिकन असलेला जॉर्डन या युद्धापूर्वीपासून स्पेनमध्ये राहत असतो आणि लोकशाहीसाठी फॅॅसिस्टांविरुद्धच्या चळवळीत तो हंगामी सैनिक म्हणून वावरत असतो. तो अनुभवी सुरुंगउडव्या म्हणूनही प्रसिद्ध असतो. साहजिकच रशियाच्या जनरलने त्याला शत्रूसैन्याच्या रेषेमागे प्रवास करत फॅॅसिस्टांविरुद्ध लढणा-या स्थानिक गॉरिलांच्या मदतीसाठी एक पूल उडवण्याचा आदेश दिलेला असतो. या मोहिमेदरम्यान जॉर्डनची बंडखोर नेता अ‍ॅन्सेल्मोशी भेट होते. अ‍ॅन्सेल्मो त्याला गॉरिलांच्या छुप्या अड्ड्यामध्ये घेऊन जातो व तो स्वतः जॉर्डन आणि गॉरिलांमध्ये सहायकाची भूमिका बजावतो.

या कम्पमध्ये (अड्डा), आई-वडिलांना झालेल्या देहदंडामुळे आणि स्वतःवरील अत्याचारामुळे मानसिक धक्का बसलेल्या मुलीशी - मेरियाशी - जॉर्डनची प्रेमभेट होते. कॅॅम्पगॉरिलांचा नेता पाब्लो स्वकर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या आणि नियोजित कामगिरी पार पाडण्यास पुढे सरसावलेल्या जॉर्डनला मदत करण्याऐवजी जीवावरील संकटाच्या भीतीने त्यापासून परावृत्त करू पाहतो, तर पाब्लोची पत्नी - पिलर आणि इतर गॉरिलांची जॉर्डनला साथ मिळते. जेव्हा दुसNया एका पॅâसिस्टविरोधी गटाचा नेता एल् सार्दो चकमकीत शत्रूकडून मारला जातो, तेव्हा पाब्लो जॉर्डनच्या मोहिमेत येतो; पण पाब्लोच्या या मोहिमेत येण्याने या मोहिमेला एक वेगळंच वळण मिळतं.

वास्तविक, युद्धाच्या पाश्र्वभूमीवरची ही कादंबरी आहे; पण तरीही यातील संघषार्चं संयतपणे चित्रण केलं गेलं आहे, हे नमूद करावंसं वाटतं. फॅॅसिस्ट असतील किंवा गॉरिला, ती माणसं आहेत. युद्धाचा एक भाग म्हणून ते शत्रूची हत्या करतात; पण या गोष्टीची त्यांच्या मनात कुठेतरी खंत आहे. बंडखोर नेता अ‍ॅन्सेल्मोच्या मनातील विचारांतून ही खंत अधोरेखित होते. त्याच्या मनात आलं– ‘फॅॅसिस्ट उबेत आहेत. ते आज आरामात आहेत; पण उद्या आम्ही त्यांना मारू. किती विचित्र वाटतोय हा विचार! तो मनात आणणंही बरं वाटत नाही. दिवसभर मी त्यांना पाहतो आहे. ती आमच्याप्रमाणे माणसंच आहेत... ते लोक फॅॅसिस्ट नाहीत. मी त्यांना पॅâसिस्ट म्हणतो, पण ते पॅâसिस्ट नाहीत. आमच्यासारखेच ते गरीब आहेत. आमच्याविरुद्ध ते लढायला उभे राहायला नको होते. त्यांना मारण्याचा विचार मनाला रुचत नाही.’ 

या पाश्र्वभूमीवर पाब्लोची व्यक्तिरेखाही  उठून दिसते. पाब्लो भ्याड आहे, असं नाही; पण युद्धाच्या विंâवा संघर्षाच्या निमित्ताने त्याच्या हातून इतक्या हत्या घडल्या आहेत, की त्याला ते सगळं आता नको वाटतंय; म्हणून तो जॉर्डनलाही फॅॅसिस्टांशी लढण्यापासून परावृत्त करू पाहतो. अ‍ॅन्सेल्मोच्या मनात पाब्लोविषयी विचार येतात त्यावरून हे स्पष्ट होतं. अ‍ॅन्सेल्मोच्या मनात येतं ‘पाब्लोनं चौकीचे लोक झोपले होते, त्या खोलीत खिडकीतून बॉम्ब फेकला. त्याचा स्फोट झाला, तेव्हा सगळी पृथ्वी डोळ्यांसमोर लालपिवळी होऊन फु टावी तसं वाटलं. तोपर्यंत आणखी दोन बॉम्ब आत गेले होते. त्यांच्या पिना काढून ते झट्कन खिडकीतून फे कले गेले. या दुस-या बॉम्बमुळे, जे झोपले असल्यानं आधी मेले नव्हते, ते जागे होऊन उठू लागताच मेले. एखाद्या तार्तारप्रमाणे देशभर पाब्लो धुमाकुळ घालीत होता. त्याच्या तेव्हाच्या ऐन बहरातील ही गोष्ट आहे. तेव्हा एकही फॅॅसिस्ट चौकी सुरक्षित नव्हती आणि तोच पाब्लो आता खलास झाला आहे. खच्ची केलेल्या बैलासारखा खलास झाला आहे.’ 

एकूण , या कादंबरीतील व्यक्तिरेखा  किंवा  आशय व्यामिश्र नाही; पण माणसांतील क्रौर्य आणि त्याला हवी असलेली शांती, या दोन टोकांमधील जीवनाचा कुठेतरी मेळ घातला पाहिजे, असा संदेश ही कादंबरी देते, असं म्हणायला हरकत नसावी. तेव्हा त्या संदेशासाठी ही कादंबरी अवश्य वाचावी.