Saturday, 19 April 2014

हास्यसम्राटाची व्यथा


         मी कवी देवा गोपीनाथ झिंजाड झी टीव्ही मराठी हास्यसम्राट !

देवा झिंजाड
 बरेच जण मला म्हणतात तुंम्ही फार हसता, हसवता ह्याचा अर्थ तुमचा जन्म फार मोठ्या श्रीमंत कुटुंबात झाला असेल नाही का ? बालपण खूप चांगल गेले असेल, खूप मज्जा केली असेल, ऐश केली असेल ?  पण...त्यांना काय माहिती कि माझा जन्म एका गरीब कुटुंबात झालाय म्हणून. अश्या कुटुंबात कि जिथे माझे वडील माझ्या लहानपणीच देवाघरी राहायला गेले होते आईला एकटीला सोडून...अन मला पण !

वडील गेले तेव्हा मी इयत्ता पहीलीला होतो...अन आमच्याकडे दहा शेळ्या होत्या...मला एवढचं कळले होते कि आता आईला शेळ्या सांभाळायला मदत नाही होणार आणि मला शेळ्या घेवून डोंगराला जावं लागणार...मग मी म्हटलं, आई ! मग त्यांना जाळून का ग टाकलं???

त्यावेळेस ती म्हणाली अरे जी माणसे देवाला आवडतात त्यांना देव बोलावून घेतो आभाळात...अन मग त्यांना देवाकडे पाठविण्यासाठी...त्यांना अग्नी द्यावा लागतो !

हे बोलताना ती माझ्याकडे न पाहता बोलायची... मग मी म्हणायचो आई मला एक सांग मग अशी देवाघरी गेलेली माणसे परत कधीच येत नाहीत का ग ? त्यावर आई म्हणायची सगळीच नाही येत परत...पण काही काही येतात. मग, मी वाट पाहिली दिवाळीपर्यंत पण, मग कळले कि जाळून टाकलेली माणसे परत कधीच येत नाहीत...!

मी सुन्न झालो पण सुन्न होऊन आईला जाणवून द्यायचं नाही एवढी प्रगल्भता माझ्यात कुठून आली होती देव जाणे?

आईने सांगितलेले खोटे ठरू नये म्हणू मी ते खरे मानत गेलो ते आजवर !

खरच मला हे कळत नसेल का? कि मी फक्त आईला बरे वाटावे म्हणून अस समजतोय हे आईला समजले असेल का ? अन समजले असेल तर ती इतके दिवस मला बोलली का बर नसेल? माझ्याशी खोटं बोलल्याची बोचणी अजूनही लागत असेल का ?

पावशेर गोडेतेल माझी आई महीनोनमहीने पुरुवून पुरवून कालवणाला वापरायची.

कालवणात जर चुकून जास्त तेल जर कधी दिसलं तर मला केवढा आनंद व्हायचा. ताटलीला थोडं हि तेल राहू द्यायचो नाही मी...सगळं चाटून पुसून घ्यायचो. कधी कधी कालवण नसलं कि आई अन मी मीठ पाणी घ्यायचो अन त्यात बाजरीची भाकर चुरून खायचो..मग ती रोजंदारीवर जायची अन मी शाळेत.

दुसर्यांनी दिलेल्या जुन्या लुगड्याचे तीन चार तूकडे जोडून ती रंगीबेरंगी लुगडं तयार करायची...आणि आनंदानी नेसायची सुद्धा. फाटलेल्या पदरातून तिचे काळेभोर केस डौलाने डोलायचे...आमच्या दारीद्र्याची ठिगळे ती अख्ख्या समाजात मानाने मिरवायची..माझ्या शाळेच्या खाकी हाफ चड्डीवर पाठीमागे ठिगळावर ठिगळ वाढत जायची तशीच वरची ईयत्ता गाठायची..चार ईयत्ता तरी आरामात पास व्हायचो एका चड्डीवर ! मग कधी कुणाला थोडीफार द्या आलीच तर त्यांच्या पोरांच्या नको असलेल्या अन वापरून वापरून खराब झालेल्या कपड्यांची एखादी जोडी मला दिवाळीला भेटायची.
ज्याने असे कपडे दिलेत त्याच्यासमोरूनच जाताना फार कसतरी वाटायचं पण "गरिबीला आग लागली होती ना " ! लहानपणी मला बबू म्हणायचे सगळे...तेव्हा मी पुढे चाललो कि मागून मुले म्हणायची बघ-बघ बबुने दुसऱ्याची कपडे घातल्यात...मला वाईट नव्हते वाटत तेव्हा त्याचे...उलट वाटायचं कि...ज्याने मला हि कपडे दिलीत त्याचे नाव तरी निघतंय ना...अशीच कपडे घालून घालून बबुचा देवा झिंजाड झाला. पण, कधी त्रागा केलाच नाही मी!

पिठाच्या गिरणीवर पाच किलो म्हणजे एका पायलीला दळायला लागायचे दोन रुपये. पण ते वाचवण्यासाठी आई पहाटेच उठायची अन जात्यावर दळत बसायची. सुंदर सुंदर ओव्या म्हणायची. काहीतरी बोलायची ती त्या मुक्या जात्याशी. ते फक्त तिला अन जात्यालाच माहिती असावं. तिच्या कपाळावरून निथळलेल्या घामाने पीठाचे सोने व्हायचे. बऱ्याचदा मी तिच्या ओव्या ऐकायला पहाटे पहाटे उठायचो. सगळ दळून झाल्यावर आई जात्याच्या पाळूभोवतीच पीठ झाडून घ्यायची अन थोडसं शिल्लक ठेवायची. तिला मी म्हणायचो अस का ग करतेस आई तू ? तेव्हा ती म्हणायची अरे मुंग्यासाठी ठेवते. मी म्हटलं त्यांना का बरे ? तर ती म्हणायची आरे बाळा पोट तर सगळ्यांना असते ना रे, जशी तुला भूक लागली अन तुला कुणी खायला दिलं तर मला किती बरे वाटते तसंच त्या मुंग्याच्या  आयांनाही बरं वाटतच असल ना रे ? काय तत्वज्ञान होत ते लहानपणी नाहीच समजलं मला. पण आता कळतय सगळं ! 

एक तर घरात रॉकेल नसायचे अन असलेच तर ते चिमणीला लागयचे. मग काय ते वाचवण्यासाठी घराबाहेर ग्राम पंचायतीच्या लाईटच्या दिव्यावर अभ्यास करत बसायचे किंवा ज्यांच्या घरी लाईट असेल त्यांच्या घरी अभ्यासाला जायचे...पण, वर्गात पहिलाच नंबर मिळवायचो..मग शाबासकी म्हणून आई मला मोलमजुरी वरून येताना चिंचा, बोरे, सिताफळे अशी हंगामी फळे आणायची अन माझं तोंड गोड करायची...त्यावेळेस मला तो रानमेवा फार मोठा वाटायचा.

मी अगदी Graduate, MBA etc पास झालो तरी कधीच पेढे वाटलेच नाहीत...कारण मला आई म्हणायची आपण कष्ट करायचे अन लोकांना का बरे पेढे वाटायचे?  मला ते खरे वाटते...मी अजूनही नाही वाटत.

नवीन दफ्तर दरवर्षी मुलांना मिळायची. मला पण मिळायचे पण, माझ्याच वापरून वापरून फाटलेल्या खाकी चड्डीच्या कापडाचे...त्यालाच दोन बंद लावायचे कि झाले नवीन दफ्तर ! फार फार तर त्याला सजवण्यासाठी आईच्या फाटलेल्या चोळीचे काठ मिळायचे अन मग माझ दफ्तर खूप खूप छान दिसायचं... मी ते मुद्दाम दिसेल अस चालायचो. मला चांगल आठवतय कि आईने मला इयत्ता तिसरीत असताना सांगितलं होतं कि तुला मी चौथीत गेल्यावर नवीन दोन बंदाच पाठीवर अडकवायचं दफ्तर घेऊन देईन, तू फक्त चांगला अभ्यास कर म्हणजे झालं. मी खूप अभ्यास करायचो वर्गात कायम पहिलाच यायचो. अन निकाल लागला कि नवीन दफ्तराची वाट पाहायचो. पण बहुदा आईच्या लक्षात राहत नसावं. सातवी इयत्ता पास झालो तरी नवीन दफ्तर नाहीच मिळालं. पण, मीही आईला नाही मागितलं कधीच, हट्ट पण नाही केला कधीच. फक्त वाट पाहत राहिलो, अन आई मात्र एकटीच आमच्या गरीबीच दफ्तर घेऊन कष्ट करीत राहिली. सणावाराला दुसऱ्या पोरांची नवीन कपडे पाहून मी नाराज होऊ नये म्हणून ती  मला घरातच खूप काम सांगायची. सरपण तोडून ठेवणे,शेळ्यांच्या खालच्या लेंड्या झाडून काढणे, घराच्या भिंती सारवण्यासाठी पांढरी माती चाळणे. भिंती सारवणे. मीही करायचो हे सगळं. पण त्यामागचा उद्देश नाहीच समजला लहानपणी.

भात सणाला जरी मिळाला तरी मी उड्या मारायचो. कारण रेशन वरले तांदूळ भरायला जे २० रुपये लागायचे ते सुद्धा मिळणे दुरापास्त होते.. चुलीवर भात शिजायला टाकला कि मी चुलीअसमोरच बसून राहयचो. अन चुलीला जाळ घालायचो. त्याचा रट रट हा आवाज मला आईच्या कष्टाचं संगीत वाटायचं. पुरण पोळी खायला वर्षभर वाट पहावी लागायची... त्याच आनंदात मी आईला मदत म्हणून दगडाच्या पाट्यावर पूरण वाटून द्यायचो... मी आईच्या हाताखाली काम करायला लागलो कि आई मला पकुबाई म्हणायची. कासाबाई नावाची आज्जी होती तिचा पुनर्जन्म म्हणून मी आलोय असे सर्वजण समजत. गावातल्या देवांना ती मला नैवेद्य ठेवायला सांगायची...पण मला लहानपणापासून देवांचा फार राग होता... माहितीय का माझा समज होता कि "देवामुळेच" आपले हाल होताहेत...मग घरून नेलेले नेवैद्य मीच खावून घायचो अन अजून दुसर्यांचेपण खावून यायचो..तेव्हा पण एक प्रश्न होता अन आज पण आहे जो देव खात नाही त्यालाच का बरे सर्वजण खायला देतात अन मंदिरा बाहेर बसलेल्या गरिबांना का खायला देत नाहीत? शेवटी ते नैवेद्य कुत्रेच खातात ना ? हे त्या देवाला कळत नाही का ?

बिन तेलाच्या मिरचीला ( चटणीला ) कंटाळून, रानात शेळ्या घेऊन गेल्यावर शेळीचं दुध जर्मलच्या डब्यात काढून भाकर चुरून खायची...अन आईला घरी आल्यावर सांगायचो कि तिच्याच करडाने (पिल्लाने) दुध पिऊन टाकलं म्हणून....पण हे खोट असूनही आई काही म्हणायची नाही. तिला काय हे कळत नसेल का ?

माझी एक आवडती शेळी होती. तीच नाव होतं “झिपरी ती अजूनही माझ्या स्वप्नात येते...फार जीव लावला त्या शेळीने मला...माझी दुसरी आईच वाटायची ती....रानात गेल्यावर तिच्या "स्तनालामी बिनधास्त तोंड लावून दुधू प्यायचो ! तरी ती काही नाही करायची. रानातून येताना दिवसभर फिरून फिरून खूप थकायचो मी, मग त्या झिपरीच्या पाठीवर बसून आलो तरी ती बिचारी काही करायची नाही. एकदा तिने मला पाठीवरून पाडलं होतं, म्हणून मी रागा रागात तिच्या डोक्यात मारलं होत खुटीने. डोक्यातून खूप रक्त आलं होतं. जवळ जवळ पंधरा दिवस माझ्याशी तिने कट्टी टाकली होती अस ती वागायची. पण नंतर झाली ती गोड. त्या झिपरी शेळीच्या आठवणीने मी अजूनही भूतकाळात हरवून जातो... ती शेळी देवाघरी गेली पण तिची नात अजून आहे एका बाईकडेगावाला जर गेलो तर अजून तिला भेटावे वाटते. त्या झिपरीच्या नातीत सुद्धा मला माझी दुसरी आई दिसते.

इयत्ता दहावीपर्यंत पायात घालायला चप्पल मिळालीच नाही. मामाच्या गावाला किंवा जत्रेला जायचे म्हटले किआई एक कापडाची पिशवी द्यायची अन त्यात असायची वडाची पानेपायाला चटके बसू नये म्हणून... ती पाने पायाला बांधायची अन मग बिनधास्त चालायचं मैलो अन मैल उन्हातूनचआईच्या पडलेल्या सावलीवर पाउल ठेवत ठेवत पुढे पुढे जायचे  अनं पानं फाटली कि परत पिशवीतून दुसरी पाने काढायची अन पायाला बांधायची...ती पाने बांधताना माझ्या आईला खूप वाईट वाटायचं...डोळ्यातलं पाणी कित्येकदा माझ्या पायावर पडलेलं मी पाहिलंय...पणतिने कधी ते जाणवून दिले नाही. खूपच जर उन्हाचा त्रास व्हायला लागला तर ती मला तिच्या पाठीवर उचलून घ्यायची अन दमत नाही तोवर चालत राहायची....फार दमायची ती...घामानी ओलीचिंब होऊन जायची...पदराने माझ्यासहित तिचंही तोंड पुसायची ओढ्यावर किंवा विहिरीवर गार गार पाणी प्यायचं अन पुढच्या प्रवासाला निघायचचं...असा आम्ही दोघे एका दिवसात कमीत कमी २० किलोमीटर चा प्रवास करायचो.. दहावीला २० रुपयाची पहिली चप्पल (स्लीपर) मिळाली ती १९९७ साली...तेव्हा पायाला चप्पलेची सवय नव्हती त्यामुळे मी ती कुठेही विसरून यायचो...जास्त खराब रस्ता असला तर चप्पल हातात घ्यायचो खराब होऊ नये म्हणून.

निवडणुकांमध्ये वापरले जाणारे ह्यानडबिलाच्या पाठीमागे मी गृहपाठ करून न्यायचो...पण अक्षर पाहून गुरुजी फक्त मार्क द्यायचे. सातवीपर्यंत नवीन वही कधीच मिळाली नाही मला. गाईड काय असत ते फक्त इतर मुलांकडेच पहायचं...जो अभ्यास करायचा तो एखाद्या जुन्या पुस्तकावर किंवा गुरुजींनी फळ्यावर शिकवलेल्या धड्यावरच पास होत जायचं जेव्हापासून हातात टिकाव,फावडे उचलता येतंय तेव्हापासून रोजगार हमीच्या कामावर जायचोवय बसत नसायचंमग लेबर ऑफिसर अचानक आला कि पळत पळत जाऊन ढेकळात पालथे झोपायचे, मग तो तेथून जाईपर्यंत तसच थांबायचं. अन रोजगार हमीची कामे उन्हाळ्यातच असायची. त्यावेळेस ढेकळात पालथे झोपल्याने अंग एवढ भाजून निघायचं कि विचारू नका...पण जर लेबर ओफिसरने पहिले तर... आईला खड्डे खणायला मदत करता येणार नाही अन मदत जर केली नाही तर पैसे मिळणार नाही म्हणून गपगुमान तसच राहायचं पडून ढेकळात...मग लेबर ऑफिसर गेला कि परत बाहेर यायचे अन कामाला लागायचे...तेवढेच १० / २० रुपये मिळायचे ना...त्यात सुद्धा मुकादम पैसे खायचा हे मला कळायचे पण काय करणार ना वय वर्षे १० होते त्यावेळेस पण मस्टर वर ते १८ लावले जायचे...अन नाव होते बबू झिंजाड ! लहानपणी माझे नाव बबू होते. मोठा झाल्यावर देवा झिंजाड झाले !
दिवाळीला फटाक्यांचा आवाज माझ्यापेक्षा माझ्या आईला जास्त त्रास द्यायचा मला फटाके आवडायचे पण मिळायचेच नाहीत. मीही हट्ट करत नसे. सकाळी उठल्या उठल्या रस्त्यावर जायचे अन इतर मुलांनी रात्री वाजवलेल्या फटाक्यांच्या रिकाम्या पुंगान्या, फुसके फटाके गोळा करून आणायचे, त्यातली दारू काढायची अन मग ती पेटवायची कि झाली दिवाळी. हा सगळा उद्योग पाहून आई म्हणायची बाळा, फटाके फोडून माणूस अजून गरीब होतो....मी तेव्हापासून अजूनपर्यंत फटाका फोडत नाही. एखाद्या दिवाळीला आई कधी कधी लाडू करायची अन  “मी खाईन नंतर” असं म्हणून ती आख्खी दिवाळी तशीच काढायची अन मला मात्र पोटभर खायला घालायची.. तरी ती फार गोड राहायची ! लाडू संपले तरी ते ज्या पातेल्यात ठेवलेले असायचे त्याचा वास मी महिनाभर घ्यायचो.  


मला गोड फार आवडायचं पण घरात साखर अभावानेच यायचीती भरपूर असावी म्हणून मी चौथीत असताना थोडी साखर पेरली होती. अन दररोज तिला पाणी पण घालायचो...एक दिवस आईने पहिले अन म्हणाली  “काय करतोस रे” ?  तेव्हा तिला कळल्यावर ती खूप हसली अन म्हणाली अरे साखर हि उसापासून तयार होते रे... अन उस जमिनीतून येतो साखर नाही येत. तेव्हापासून मी हुशार झालो..असे मला वाटतय.!


माणसे कधी मरतील ह्याची मी लहानपणी आतुरतेने वाट पाहायचो....का माहितीय का??  कारण माणूस मेल्यावर दशक्रियेला बुंदी,शिरा.लापशी,भात असलं काहीतरी गोडधोड खायला मिळायचं ना...गावजेवण असल्यावर जेवायला ताटली घेवून गेलो कि घरी वाढून पण आणायचे अन ते उन्हात वाळवून वाळवूनखायचे...शाळेत मिळणारी सुकडी तर खूप मोठा आधार असायची. ती चाळून चाळून त्यातली साखर खायचा कार्यक्रम हा खूप मोठा वाटायचा मला.


वाचनाची आवड फार होती पण शाळेचीच पुस्तके मिळणे कठीण तिथे इतर पुस्तके कुठून मिळणार ना...मग मी आमच्याच गावातल्या छोट्याश्या हॉटेलच्या बाहेर उभा राहायचो अन लोकांनी भेळ खावून टाकलेला वर्तमान पत्राचा तेलकट तुकडा घेऊन वाचनाची भूक भागवायचो...जे मिळेल ते वाचायचो.


एखाद्या कागदावर देवा/देवराम नाव छापून आले तर मी ते नाव गुपचूप कापून घ्यायचो..अन घरी आईला दाखवायचो (हे लिहितानाही माझ्या अंगावर शहारे आले )


मी ज्या हायस्कूलला शिकलो तिथल्या ग्रंथालयातली खूप पुस्तके मीच वाचायचो म्हणून आमचे सर म्हणायचे कि ह्या ग्रंथालयाला देवा झिंजाडचेच नाव देवून टाकू आपण ! मी कोलेजला असताना पार्ट टाईम जॉब सांभाळून आचार्य अत्रेंची सगळी पुस्तके..आत्मचरित्र वाचून काढली...आणि नकळत पणे त्यांच्या लिखाणाचा माझ्याही लिखाणावर संस्कार झालाय..विनोद बुद्धी आधी होतीच पण अत्रेमुळे ती जास्त फुलली !


मला चांगलं आठवतंय आमच्याकडे एक गारीगार   (आयिस्क्रीम) वाला यायचा त्याच्याकडे चार आणे आणि आठ आणे अशा दोन प्रकारच्या गारीगार असायच्या, आमच्या शेजारची एक बाई मुंबईहून उन्हाळ्यात गावाला आली कि तिच्या मुलांना गारीगार घ्यायची....मला पण कधी कधी द्यायची चार आन्यावली गारीगार... तेव्हा मला वाटायचं कि मला आठ आन्यावली द्यावी पण नव्हती मिळत... मग संध्याकाळी आई कामावरू आली कि मी तिच्याकडे आठ आणे मागायचो.. गारीगार् साठी... आई म्हणायची अरे आठ आण्याची गरीगारची काडी खाण्यापेक्षा त्याच आठ आण्यात दोन काडेपेट्या” येतीलं अन त्या महिनाभर पुरतील..मग मी म्हणायचं जाऊदे आई मी असच म्ह्टल !


पण दुसर्या दिवशी परत तो गारीगारवाला यायचा अन माझ्या मनाला त्रास द्यायचा. मग मी नंतरतो गारीगार वाला आला कि स्वतःला घरात कोंडून घायचो अन तो निघून गेला कि मगच बाहेर यायचो.!


मला चांगल आठवतंय किहास्यसम्राट झाल्यावर माझी आई झी टीव्ही वर झळकली खरी .....पण ती कुठल्याच एपिसोडला हसलीच नाही............
ती रडली ....फक्त रडली !
ती जशी रडली तशी ती एकदाच रडती होती ...बाप गेल्यावर !
तीचं आजच वय ८० च्या पुढे आहे, पण माझी सर्वात जवळची मैत्रीण म्हणून मी तिच्याकडे पहातो......माझी लहानपणाची अंगडी दुपडी ती अजून जपून ठेवते अन त्यातच माझ बालपण शोधते.......तिला म्हटल का  आई जपून ठेवते अस तू तर ती म्हणते बाळा कितीही मोठ्ठा झालास तरी मागचे दिवस विसरू नकोस”  तेच आपल्याल जगण्याचं बळ देत असतातते विसरू नये म्हणून मी तुझी अंगडी दुपडी अजूनही ठेवलीत !
आई आय लव यु !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
आई तू जगातली सगळ्यात सुंदर माता आहेस ग !!!
कधी कधी जेवायला नाही मिळाल तर .....
दोन तांबे पाणी प्यायचं...
मग गच्च पोट भरायचं...
आई म्हणायची आता...
आता जेवणाच र काय करायचं ???????
पोटाला दोन्ही पाय लावून रातभर गपगुमान झोपायचं..... गपगुमान झोपायचं....
                
खूप शिकलोखूप अनुभव घेतले खूप चांगली वाईट माणसे भेटली पण मनाला कधी मळून दिले नाही. कविता केल्याव्याख्याने देतोय, हास्यसम्राटचे शो करतोयसूत्रसंचालन चालू आहेमाणूस म्हणून चांगली माणसे जोडतो...मी जे भोगलं ते इतर गरीब मुलांना भोगायला लागू नये म्हणून सामजिक काम पण करतोय..

हे सगळ आपल्याशी शेयर करण्याच कारण म्हणजेजर कुणी जीवनाला नावे ठेवत असेलपरिस्थितीला दोष देत असेलहतबल झालं असेल तरत्यांना थोडा धीर द्यावा!


सांगायला गेल तर खूप आहे... हे फक्त ०.००००१ % सांगितल मी ! सगळ जगलेल भोगलेलं येईलच माझ्या आत्मचरित्रातून.

आत्ता...नाही सांगणार....आत्ता फक्त हसायचं अन हसवायचं ..आईला राणीवाणी ठेवायचं.......

----
देवा झिंजाड

14 comments:

  1. Touching one, Thanks for sharing.

    ReplyDelete
  2. khupch chan sir .......hart touching..........

    ReplyDelete
  3. खुपच हृदय स्पर्शी!
    ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीला जिंकुन मोठा होणार्या देवाला सलाम!

    ReplyDelete
  4. Khupach sundar likhan. Devane v tyachya matene khup kasta bhogale aahet aayushyat.

    ReplyDelete
  5. Deva
    very nice
    Nitin Shilimkar

    ReplyDelete
  6. gr8
    khupch chan sir .......hart touching...

    ReplyDelete
  7. हृदय स्पर्शी ! कथा वाचताना एका एका शब्दाना अश्रू टपकत होता … खूप छान ~ जगातील सर्वात सुंदर माता ! सलाम, सलाम, सलाम !!

    ReplyDelete
  8. Thanks all for going through the blog.. keep checking this space for more such inspiring stories and new books

    ReplyDelete
  9. काळिज सुन्न करणारी था देवा झिंजाड या लेखकाने योग्य रितीने मांडली

    ReplyDelete
  10. Really Heart Touching, Apratim

    ReplyDelete
  11. हृदयस्पर्शी कथा .....

    ReplyDelete