Monday 18 November 2013

विरंगुळा

संध्याकाळ झाली आणि कोर्ट सुटले तसे तात्या हळूहळू घरी आले. नुसतेच पुढे केलेले दार त्यांनी ढकलले. आत पाऊल टाकल्यावर सवयीने ते एकदम उजवीकडे वळले. त्याबरोबर जमिनीवरच्या सतरंजीच्या छिद्रात त्यांचा अंगठा अडकला आणि रोजच्याप्रमाणे आजही त्यांना ठेच लागली. या हिसक्याने सबंध सतरंजी गोळा झाली. खाली दडपलेला धुरळा एकदम उसळला. तात्यांच्या नाकात गेला. जरा ठसकत ते कोपNयाजवळच्या टेबलापाशी गेले. लकालका मागे-पुढे हलणारी खुर्ची त्यांनी बेताने पुढे ओढली. तिच्यात बसून ते स्वस्थ पडून राहिले. 

घटकाभराने तात्यांनी आखडलेले पाय पुढे ताणले. पाठ खाली घसरून थोडा विसावा घेण्याचा प्रयत्न केला; पण कमरेला रग लागू लागली तसे ते पुन्हा ताठ झाले. दोन्ही हातांची कोपरे त्यांनी टेबलावर टेकवली. त्यावर आपले शिणलेले मस्तक ठेवले. डोळे मिटले.

मग थकलेल्या शरीराने ते कितीतरी वेळ तसेच पडून राहिले.

आत स्वैपाकघरात स्टोव्ह फरफरत होता. मधूनमधून भांडी वाजत होती. कुणीतरी मूल रडत होते. या सगळ्या आवाजातून बायकोचे खेकसणे स्वच्छ उमटत होते. हे सर्व सूर रोजच्या ओळखीचे होते. घरी परत आल्यावर न चुकता कानावर पडणारे होते. तात्यांना त्यांची सवय झाली होती, इतकी की संध्याकाळचा विशिष्ट वेळेचाच
तो स्वाभाविक आवाज आहे, असे त्यांना मनोमन वाटत असे. हा आवाज ऐवूâ आला आणि त्यांची खात्री पटली – संध्याकाळचे सहा-साडेसहा झाले आहेत. आपण आपल्या घरी परत आलो आहोत. आता आठ वाजेपर्यंत असेच पडून राहायचे. 

थोड्या वेळाने चहा घेऊन बायको येईल आणि काही कर्मकटकटी सांगेल. हे नाही, ते नाही; हे आणा, ते आणा. मग आपला दहा-बारा वर्षांचा पोरगा येईल. कशासाठी तरी पैसे मागेल. आपण त्याची खोटी समजूत काढू. यापेक्षा वेगळे काय घडायचे?.... एकदा डोळे उघडावेसे वाटले; पण तात्यांनी उघडले नाहीत. ते तसेच पडून
राहिले. डोळे मिटले म्हणजेच बरे वाटते. थकलेला देह कुरकुर करीत नाही. डोक्याची भणभण कमी होते. थोडासा विसावा मिळतो. कसे शांत वाटते. 

पाच-दहा मिनिटांनी टेबलावर पिचका आवाज झाला. तात्यांनी सवयीने ओळखले

– चहा आला.

तात्यांनी डोळे उघडले. हळूहळू वर पाहिले.

ओला हात पदराला पुशीत बायको उभी होती. तात्यांनी तिच्याकडे दृष्टी टाकल्यावर तिने हसण्याचा प्रयत्न केला. दमून गेलेल्या सुरात सांगितले, ‘‘चहा ठेवलाय बरं का!’’ ‘‘अं? हां, हां –’’

तात्या हळूहळू सरळ बसले. कुठेतरी उगीचच पाहत राहिले. मग उजव्या हाताने टेबलावरचा सबंध कप चाचपला. त्यातल्या त्यात न पोळणारा भाग मुठीत धरून कप बशीत आडवा केला. बशीतल्या चहाचे सावकाश घुटके घेतले. थकलेल्या डोळ्यांनी ते नुसतेच बायकोकडे बघत राहिले. बशीभर चहा पोटात गेल्यावर जरा बरे वाटले. अगदी खोल आवाजात त्यांनी प्रश्न विचारला, ‘‘कोण रडतंय गं आत?’’

दोन्ही हात पाठीमागे जुळवून, भिंतीला टेकवून बायको तशीच उभी राहिली होती. ती म्हणाली,

‘‘प्रभ्या.’’

‘‘का?’’

‘‘त्याला लाडू पाहिजे.’’

तात्यांनी पुढचा प्रश्न विचारला नाही. उत्तर माहीत असलेला प्रश्न कशाला विचारायचा?

एक सुस्कारा सोडून त्यांनी जरा दम घेतला. राहिलेला चहा हळूहळू संपविला. बोटाची पेरे उगीचच टेबलावर वाजविली. 

‘‘नारायण कुठे गेलाय?’’

‘‘खेळतोय बाहेर. असेल इकडंतिकडं कुठेतरी.’’

‘‘होय का?’’

बायकोने रिकामी कपबशी हातात घेतली.

‘‘कोळसे संपलेत बरं का. उद्या अगदी नाहीत. निदान सक्काळच्याला आणायलाच पाहिजेत.’’

तात्यांनी निमूटपणे मान हलवली. बोलणे समजले अशा अर्थाने. तोंडाने त्यांनी होय-नाही काहीच सांगितले नाही. बायको निघून गेली तरी ते तसेच मुकाट्याने खुर्चीत बसून राहिले. टेबलावर बोटे वाजविण्याचा चाळा करीत त्यांनी पुन्हा डोळे मिटले. चला, बायकोचा प्रवेश संपला. आता मुलगा – थोड्या वेळाने दार एकदम खडखडले. डोळे उघडले.

दहा-अकरा वर्षांचा नारायण पळतपळत टेबलाजवळ आला. टेबलाच्या कडेला दोन्ही कोपरे रोवून लोंबकळला. धापा टाकीत म्हणाला, ‘‘तात्या, तात्या –’’

पण त्याला अशी जोरात धाप लागली होती की त्याच्या तोंडून शब्दच पुâटेना. तात्या त्रासिक सुरात म्हणाले,
‘‘अरे, हो हो हो! किती पळतोस? जरा सावकाश थोडं.’’

धाप कमी झाल्यावर नारायणाने विचारले, ‘‘तात्या, आमच्या शाळेची ट्रीप जायचीय –’’ ‘‘हो का? छान!’’

‘‘वर्गणी फक्त तीन रुपये –’’

‘‘अरे वा!’’

‘‘जाऊ मी? मास्तर म्हणाले, उद्या सकाळच्याला शाळेत घेऊन या पैशे.’’

तात्यांनी नुसतीच मान डोलविली. होय नाही अन् नाहीही नाही. नारायण पुâरंगटला. रुसल्यासारखा आवाज काढून म्हणाला, ‘‘असं काय हो तात्या? तुम्ही नेहमीच असंच करता. देत नाही अन् काही नाही.’’

‘‘बरं बरं. देऊ उद्या.’’

‘‘हो! देत नाही अन् काही नाही तुम्ही. नुसतं म्हणता. मागच्या महिन्याची फीच दिली नाही अजून.’’

‘‘नाही नाही. नक्की द्यायचे आता.’’

‘‘उद्या नको. आत्ताच देऊन ठेवा. सकाळच्याला शाळा आहे.’’

‘‘बरं बरं, देऊ. जा, पण.’’

तात्यांनी समजूत घातली तसे ते पोरगे पुन्हा पळाले. फाटकी चड्डी सावरीत खेळायला गेले. त्याच्याकडे बघत तात्या उदास होऊन बसून राहिले. न बोलता न हलता खुर्चीतच बसून राहिले. त्यांचे डोळे पुन्हा जड झाले. डोके भणभणू लागले. सबंध दिवसभर लिहून लिहून शिणलेली बोटे शिवशिवू लागली. अंग जडजड झाले. कधीकाळी या खुर्चीतून आपल्याला उठता येईल, असे त्यांना वाटेच ना.

चांगला अंधार पडला. बाहेर दिवे लागले. घरात वंâदील लागला. कोनाड्यातली मिणमिणती चिमणी पेटली. रस्त्यावरून येणारे लोकांचे हसणे-खिदळणे कानावर एकसारखे पडू लागले. घरात पोरांची रडारड सुरू झाली तरी तात्या खुर्चीत बसूनच होते. त्यांचे डोळे अजूनही दुखतच होते. डोके भणभणतच होते. 

No comments:

Post a Comment